जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 80/2010. तक्रार दाखल दिनांक : 18/02/2010. तक्रार आदेश दिनांक :07/03/2011. श्री. कृष्णात मारुती निकते, वय 66 वर्षे, व्यवसाय : सेवानिवृत्त, रा. फ्लॅट नं.87, बिल्डींग नं.87, सुरवसे अपार्टमेंट, होटगी रोड, सोलापूर. तक्रारदार विरुध्द श्री. नागेश बेनुरकर, प्रो. धनराज अम्ब्युल्न्स सर्व्हीसेस, जवाहर नेहरु वसतीगृह, शॉप नं.10, पार्क चौक, सोलापूर. विरुध्द पक्ष कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार स्वत: उपस्थित विरुध्द पक्ष अनुपस्थित / एकतर्फा आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, विरुध्द पक्ष यांचा टुर्स अन्ड ट्रॅव्हल्स व्यवसाय असून तक्रारदार यांना माहे जून 2009 मध्ये त्यांच्या मुलाकडे टेबल, कॉम्प्युटर संच, घरगुती साहित्य इ. सह अंबरनाथ येथे जाण्याचे असल्यामुळे विरुध्द पक्ष यांच्याकडे वाहनाची चौकशी केली. विरुध्द पक्ष यांच्याकडे प्रति कि.मी. रु.4.50 प्रमाणे वाहन ठरविण्यात आले. दि.10/6/2009 रोजी विरुध्द पक्ष यांना रु.1,000/- अनामत रक्कम देण्यात आली. दि.11/6/2009 रोजी रात्री 11.00 वाजता विरुध्द पक्ष यांनी वाहन घेऊन आले. त्यावेळी कॉम्प्युटर टेबल वाहनामध्ये किंवा टपावर बसला नाही. त्यामुळे कॉम्प्युटर टेबलाशिवाय ते अंबरनाथकडे निघाले. अंबरनाथ येथे पोहोचल्यानंतर वाहन चालकाने सोलापूर ते अंबरनाथ 525 कि.मी. प्रवासाचे व परतीचे असे एकूण रु.4,725/- घेतले. तक्रारदार यांनी ट्रॅव्हल एजंट, एस.टी. महामंडळ व महाराष्ट्राच्या नकाशाप्रमाणे चौकशी केली असता, सोलापूर ते अंबरनाथ अंतर केवळ 360 कि.मी. असल्याचे व त्याप्रमाणे प्रवासाचे रु.3,240/- होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन जास्त घेतलेली रक्कम रु.1,485/-, अनावश्यक वाहतूक रु.45/- व कॉम्प्युटर टेबल वाहतूक खर्च रु.600/- असे एकूण रु.2,130/- व्याजासह वसूल होऊन मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व तक्रार खर्चापोटी रु.500/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली आहे. उचित संधी देऊनही त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. ते मंचासमोर अनुपस्थित राहिल्यामुळे व म्हणणे दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी धनराज अम्ब्युलन्स सर्व्हिसेस, सोलापूर यांच्याकडील वाहन क्र.एम.एच.45/ए.246 द्वारे सोलापूर ते अंबरनाथ प्रवास केला असल्याचे व त्या प्रवासाकरिता जाणे-येणे एकूण 1025 कि.मी. करिता प्रति कि.मी. रु.4.50 पैसे व टोल रु.160/- असे एकूण रु.4,885/- अदा केल्याचे रेकॉर्डवर दाखल पावतीवरुन निदर्शनास येते. प्रामुख्याने ट्रॅव्हल एजंट, एस.टी. महामंडळ व महाराष्ट्राच्या नकाशाप्रमाणे सोलापूर ते अंबरनाथ अंतर केवळ 360 कि.मी. असल्याचे व त्याप्रमाणे प्रवासाचे रु.3,240/- होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांच्याकडून रु.1,485/- जास्त घेतल्याची तक्रारदार यांची तक्रार आहे. 5. तक्रारदार यांनी मोहोळ - इंदापूर - पुणे - स्वारगेट - तळेगाव - लोणावळा -खोपोली - कर्जत (एक्सप्रेस हायवे मार्गे) नेरळ - बदलापूर असा प्रवास केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर महाराष्ट्र राज्याचा नकाशा दाखल केला असून त्याचा आधार घेत प्रवासाचे अंतर 360 असल्याचे नमूद केले आहे. निर्विवादपणे तक्रारदार यांनी महाराष्ट्र राज्याचा नकाशा दाखल करुन कि.मी. अंतराबाबत आधार घेतलेला आहे. वास्तविक पाहता, तक्रारदार यांनी दोन शहरातील अंतर दर्शविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचा उचित पुरावा दाखल केलेला नसला तरी विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर हजर होऊन प्रवासाचे अंतर हे 525 झाल्याविषयी आणि प्रवासाचे अंतर 360 होत नसल्याबद्दल किंवा तक्रारदार यांनी दाखल केलेला पुरावा उचित नसल्याबद्दल कोणतेही कथन केलेले नाही. तसेच त्यांनी म्हणणे दाखल न करण्यासह प्रवासाचे लॉगबुक मंचासमोर दाखल केलेले नाही. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केलेले नसल्यामुळे त्यांना तक्रारदार यांची तक्रार मान्य आहे, या अनुमानास आम्ही येत आहोत. वरील विवेचनावरुन तक्रारदार यांच्याकडून विरुध्द पक्ष यांनी जास्त अंतर नमूद करुन रु.1,485/- जास्त वसूल केल्याचे सिध्द होते आणि तक्रारदार ती रक्कम परत मिळविण्यासह मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र ठरतात. 6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी जास्त आकारणी केलेले रु.1,485/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत तक्रारदार यांना परत करावेत. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.500/- व तक्रार खर्चापोटी रु.500/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/21211)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |