(घोषित द्वारा – श्रीमती ज्योती पत्की) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादित केलेले दुचाकी वाहन बँकेकडून कर्ज घेऊन खरेदी केले. वाहन घेतल्यानंतर दोन दिवसातच वाहनाच्या गिअरमध्ये दोष असल्याचे निदर्शनास आले म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडून वाहनाची दुरुस्ती करुन घेतली. परंतु वारंवार दुरुस्ती करुनही गिअरमधील बिघाड दुरुस्त झाला नाही. गिअरमधील बिघाडामुळे त्याचे वाहन दिनांक 1/4/2008 पासून तीन दिवस, दिनांक 28/4/2008 पासून 10 दिवस आणि प्रत्येक सर्व्हिसींगच्या वेळेस कांही दिवस गैरअर्जदारांनी ठेऊन घेतले. म्हणून तक्रारदारास दुस-या खाजगी वाहनाने प्रवास करावा लागला व त्यास खर्च रु 6000/- आला. गैरअर्जदारांनी तक्रारदाराकडून वाहनाच्या किंमतीपेक्षा रक्कम रु 3753/- जास्तीचे घेतले. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी बॅकेला पत्र देऊन तक्रारदाराच्या वाहनाचे गियरमध्ये वॉरंटी कालावधीत बिघाड झाल्यामुळे त्याला वारंवार वाहन दुरुस्तीसाठी द्यावे लागले असे कळविले. वाहनाच्या गियरमधील दोष दूर करुन देण्याबाबत अथवा वाहन बदलून देण्याबाबत गैरअर्जदारांना विनंती करण्यात आली. परंतु त्यांनी वाहन दुरुस्त करुन दिले नाही व वाहन बदलूनही दिले नाही .गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे खोटा विमा दावा दाखल करुन रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. अशा प्रकारे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी त्रुटीची सेवा दिली आहे. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी वाहन बदलून द्यावे व त्यांच्याकडून जास्तीची घेतलेली रक्कम रु 3753/- तसेच वाहन स्वत:कडे ठेऊन घेतल्यामुळे त्यास खाजगी वाहनाने प्रवास करावा लागला म्हणून रु 6000/- आणि मानसिक त्रास व खर्चापोटी रक्कम रु 5000/- मिळावेत. तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला म्हणून रक्कम रु 25000/- द्यावेत. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारदाराची तक्रार खोटी व बनावट असल्यामुळे फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. त्यांचे पुढे असे म्हणणे आहे की, तक्रारदाराने वाहन कधी खरेदी केले व वाहनाचे कोणते मॉडेल आहे याचा उल्लेख तक्रारीत केला नाही. तक्रारदाराने वाहन दिनांक 25/3/2008 रोजी खरेदी केले व दिनांक 25/9/2008 रोजी आरटीओ कडे वाहनाचे रजिष्ट्रेशन केले. तक्रारदाराचे वाहन 100 सीसी असून गियर एकानंतर एक असे टाकावे लागतात. पहिला गियर टाकल्यानंतर दुसरा गियर टाकताना गियर पायडलला मागच्या बाजूस दाबावे लागते. तक्रारदार हे वाहनाचा पहिला गियर टाकताना मागच्या बाजूला दाबतात व दुसरा गिअर टाकतात हे चुकीचे असून तक्रारदारास वाहनाचे गियर कसे टाकायचे हे समजावून सांगण्यात आले आहे. तक्रारदाराने वाहन खरेदी केल्यानंतर दिनांक 1/4/2008 पासून वाहन पहिल्या सर्व्हिसींगला आणले व त्यादिवशी वाहनाची सर्व्हिसींग केली परंतु तक्रारदाराने वाहन तीन दिवस नेले नाही. गैरअर्जदारांनी तक्रारदारास या कालावधीत त्यांच्याकडीत दुसरे वाहन वापरावयास दिले. तसेच दुस-या सर्व्हिसींगच्या वेळेस वाहन 10 दिवस त्यांच्याकडे होते. या कालावधीत देखील तक्रारदारास दुसरे वाहन देण्यात आले होते. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी वाहनाच्या गियरमधील दोष दूर करुन दिल्यावर तक्रारदाराने त्याबाबत समाधान झाल्याचे लिहून दिलेले आहे. तक्रारदाराचे वाहन दुरुस्तीसाठी ठेऊन घेतल्यानंतर त्यांना दुसरे वाहन देण्यात आले होते त्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तक्रारदाराच्या वाहनाच्या गियरबॉक्समध्ये बिघाड झालेला नसून गियरचे Counter shaft C IV , main shaft m IV मध्ये बिघाड आहे आणि हे साहित्य गैरअर्जदार क्रमांक 2 कंपनीकडून आणून बसवून द्यावयाचे असल्यामुळे वाहन 15 दिवस ठेऊन घेतले आणि त्यास या कालावधीत दुसरे वाहन वापरण्यास दिले. तक्रारदाराने वाहन खरेदी केल्यानंतर एक वर्षापर्यंत 20000 कि.मी. चालवले आहे. त्यांच्या वाहनामध्ये कोणताही दोष नसल्यामुळे त्यांना वाहन बदलून देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारदाराच्या वाहनाचा गियरबॉक्स कुठलीही रक्कम न आकारता बदलून देण्यात आला आहे. तक्रारदाराच्या वाहनामध्ये कोणताही दोष नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारे त्रुटीची सेवा दिलेली नाही म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार करतात. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी, गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दाखल केलेले निवेदन त्यांचेही समजण्यात यावे अशी पूरसीस दाखल केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी त्यांचे लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदाराच्या वाहनाची विमा रक्कम त्यांना मिळावी म्हणून त्यांच्याकडे विमा दावा दाखल केला. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराच्या वाहनाची पाहणी करण्यासाठी सर्व्हेअरची नियुक्ती केली. सर्व्हेअरने तक्रारदारास वाहनाची पाहणी करण्यासाठी व चौकशी करण्यासाठी संपर्क साधला असता तक्रारदाराने विमा दावा दाखल केला नाही असे दिसून आले. तक्रारदाराने तक्रारीमध्ये त्यांच्या विरुध्द कोणतीही मागणी केलेली नसल्यामुळे त्यांना या तक्रार अर्जातून मुक्त करावे अशी विनंती केली आहे. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची व शपथपत्रांची मंचाने पाहणी केली. तसेच दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराने दिनांक 25/3/2008 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादित केलेली हिरो होंडा दुचाकी वाहन खरेदी केले होते याबाबत वाद नाही. तक्रारदाराचे वाहनाच्या गियरमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे दिनांक 1/4/2008 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे वाहन सर्व्हिसींग व दुरुस्तीसाठी दिले आणि वाहन तीन दिवस त्यांच्याकडे होते ही बाब गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी मान्य केली आहे. तसेच दुस-या सर्व्हिसींगच्या वेळेस वाहन गियरमधील दोष आणि सर्व्हिसींगसाठी 15 दिवस त्यांच्याकडे होते ही बाब देखील गैरअर्जदार क्रमांक 1 आणि 2 यांनी मान्य केलेली असल्यामुळे याबाबत वाद नाही. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे दिनांक 30/6/2008, 4/8/2008, 12/8/2008, 6/12/2008 रोजी गियरमधील दोष, इंजिनमधील आवाज आणि सर्व्हिसींगसाठी दिल्याचे जॉबकार्डवरुन दिसून येते. तक्रारदाराने वाहन खरेदी केल्यापासून त्याच्या वाहनाच्या गियरबॉक्समध्ये दोष निर्माण झाला असून त्यामुळे त्यांना वाहन गैरअर्जदार क्रमांक 1 कडे वारंवार दुरुस्तीसाठी आणि सर्व्हिसींगसाठी द्यावे लागले त्यावेळेस गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदाराचे वाहनामधील दोष दूर करुन देणे आवश्यक होते. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदाराचे वाहन दुरुस्तीसाठी ठेऊन घेतले आणि वाहनामधील दोष दूर न करुन तक्रारदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे. तक्रारदाराने त्याच्या वाहनाच्या गियरबॉक्स व इंजिनमध्ये असलेला मूलभूत दोष सिध्द करण्यासाठी तज्ञाचे मत / अहवाल दाखल केला नाही. तक्रारदाराने वाहन बदलून मिळावे अशी मागणी केली आहे परंतू अशा परिस्थितीत तक्रारदारास वाहन बदलून देणे योग्य ठरणार नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदाराच्या वाहनाच्या गियरबॉक्स आणि इंजिनमधील दोष याचा विचार करुन नविन पार्टस टाकून पार्टसची वॉरंटी देणे योग्य राहील असे मंचाचे मत आहे. तक्रारदाराने गैरअर्जदारांकडे वाहन दुरुस्तीसाठी दिलेले असताना त्यांना खाजगी वाहनाने फिरावे लागले आणि त्यांना रक्कम रु 6000/- खर्च आला याबाबत त्यांनी कोणताही पुरावा मंचात दाखल केला नाही म्हणून सदरील रक्कम देण्याचा आदेश करणे योग्य ठरणार नाही. तसेच तक्रारदाराने गैरअर्जदारांना वाहन खरेदी करताना जास्तीचे रक्कम रु 3753 /- दिल्याचा कोणताही पुरावा त्यांनी दाखल केला नाही. म्हणून सदरील रक्कम गैरअर्जदारांनी तक्रारदारास देणे उचीत ठरणार नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे वाहनाची विमा रक्कम मिळावी म्हणून तक्रारदाराच्या परस्पर विमा दावा दाखल करुन तक्रारदाराची घोर फसवणूक केली आहे हे कागदपत्रावरुन दिसून येते. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदाराच्या परस्पर त्यांच्या वाहनाची विमा रक्कम उचलण्याचा प्रयत्न करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसाच्या आत तक्रारदाराचे वाहन हिरो होंडा वाहन क्रमाक एमएच 20-बीजी-5546 च्या गियरबॉक्स आणि इंजिनमध्ये नवीन पार्टस, नवीन वॉरंटीसहित टाकून गाडी रोडवर्दी करुन द्यावी. 3. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व तक्रारदाराची फसवणूक केली म्हणून तक्रारदारास रक्कम रु 5000/- उपरोक्त आदेश मुदतीत द्यावेत. 4. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रु 5000/- उपरोक्त आदेश मुदतीत द्यावेत. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |