निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 20/03/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 02/04/2013
तक्रार निकाल दिनांकः- 08/10/2013
कालावधी 06 महिने. 06 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
लताबाई भ्र.विश्वनाथ गरड. अर्जदार
वय 50 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.एस.एन.व्यवहारे.
रा.जवळा बाजार ता.औढा.जि.हिंगोली.
विरुध्द
1 देविप्रसाद मुं.ठोबळे. गैरअर्जदार.
बाराशिव हनुमान ग्रामीण, अॅड.पी.के.कुलकर्णी.
बि.शे.सहकारी पतसंस्था म.
जवळा-बाजार, ता.औंढा, जि.हिंगोली.
2 श्री.व्ही.डी.आष्टुरकर. अॅड.आर.बी.वांगीकर.
मुख्य व्यवस्थापक.
युनायटेड इंडिया इंन्शुरंस कंपनी.
दयावान कॉम्प्लेक्स,स्टेशन रोड, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा फेटाळून अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराचे मयत पती वैजनाथ विश्वनाथ गरड हे गैरअर्जदार क्रमांक 1 या पतसंस्थेचे कर्जदार होते, तसेच ते पतसंस्थेचे ग्राहक होते, गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे आपली पतसंस्थेच्या सर्व कर्जदार सभासदांची प्रत्येकी रक्कम 1,00,000/- चा अपघातात किंवा इतर कारणाने मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई मिळावी म्हणून विमा काढला होता. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे विमा काढण्याची रक्कम अर्जदाराच्या मयत पतीच्या खात्यावरुन चेकव्दारे दिली होती. अर्जदार याचे पती दिनांक 27/03/2012 रोजी विजेचा शॉक लागल्यामुळे जवळा बाजार येथे मयत झाले. अर्जदार यांने त्याच दिवशी सदरील अपघात मृत्यू बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना माहिती कळविली होती, अर्जदार याने गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे विम्याची रक्कम मिळावी यासाठी मुदतीत सर्व कागदपत्रे व क्लेमफॉर्मसह गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या मार्फत गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवली होती, परंतु गैरअर्जदार विमा कंपनीने पी.एम. रिपोर्ट नाही, असे कारण दाखवून अर्जदाराचा नुकसान भरपाईचा विमादावा नामंजूर केला, अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार याच्या पतीच्या अपघाताच्या मृत्यूची नोंद जवळा बाजार पोलीस स्टेशनला झाली असून त्यामध्ये त्याच्या वेल्डींगच्या दुकानात काम करत असतांना विजेचा शॅाक लागून मृत्यू झाला अशी स्पष्ट नोंद करण्यात आली आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार विमा कंपनीने जाणीव पुर्वक नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहे म्हणून सदरची तक्रार दाखल करण्यास भाग पडले. व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन तीच्या पतीच्या मृत्यूची नुकसान भरपाई रक्कम 1,00,000/- रुपये व्याजासह गैरअर्जदारांनी अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा व गैरअर्जदारास असा आदेश करावा की, सदरच्या तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश व्हावा.
अर्जदाराने नि.क्रमांक 3 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. नि.क्रमांक 6 वर 14 कागदपत्रांच्या यादीसह 14 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.त्यामध्ये विमा कंपनीचे लेखी पत्र, विमा रक्कम दिल्या बाबतचे पत्र, बॅंक पासबुक, कर्जदार ग्राहकांची यादी, विमा कंपनीकडे केलेले अर्ज, मृत्यूची पोलीस स्टेशन नोंद प्रत, डॉक्टरांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, ग्राम पंचायत जवळा बाजार जन्म-मृत्यू नोंद प्रमाणपत्र, वर्तमानपत्राची कात्रण, कर्जदार विमादार यादी, बँक पासबुक, विमा पॉलिसीची प्रत, संदर्भ चिठ्ठी इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर, गैरअर्जदार क्रमांक 1 यांस अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब न दाखल केल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 2 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचे पती हे गैरअर्जदार विमा कंपनीचे ग्राहक नाही, व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने हे देखील अमान्य केले आहे की, कर्जदार सभासदांचा ईतर कारणामुळे मृत्यू झाल्यास विमा कंपनी गैरअर्जदार क्रमांक 2 नुकसानाची रक्कम 1,00,000/- रुपये देण्यास पात्र आहे. सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे. व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने मंचासमोर देखील अर्जदाराच्या मयत पतीचे शव विच्छेदनाचा अहवाल दाखल केला नाही. व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, कोठलाही मृत्यूदावा प्रदान करण्यासाठी अत्यावश्यक जे कागदपत्रे लागतात त्यात शव विच्छेदनाचा अहवाल हा महत्वाचा दस्त आहे. अर्जदाराने मयताचे शव विच्छेदन केलेले नाही. त्यामुळे मृत्यूचे कारण समजू शकत नाही. म्हणून नियमास अधिन राहून विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नामंजूर केलेला आहे व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोठल्याही प्रकारे त्रुटीची सेवा दिलेली नाही, म्हणून अर्जदार हा गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द तक्रार दाखल करण्यासाठी पात्र नाही.म्हणून मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 विरुध्द सदरची अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. व गैरअर्जदार यांना 6,000/- रुपये दंडात्मक रक्कम अर्जदार यांच्याकडून देण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने नि.क्रमांक 12 वर आपला शपथपत्र दाखल केलेला आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन व दाखल केलेल्या कागदपत्रावरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदाराचा विमादावा देण्याचे
नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचे पती वैजनाथ विश्वनाथ गरड हे गैरअर्जदार क्रमांक 1 चे कर्जदार सभासद होते ही बाब नि.क्रमांक 6/5 वरील दाखल केलेल्या खाते उता-यावरुन सिध्द होते, गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे आपले सर्व कर्ज खातेदारांचा जनता अपघात विमा पॉलिसी काढला होता ही बाब नि.क्रमांक 6/15 वरील दाखल केलेल्या पॉलिसी प्रतवरुन सिध्द होते. तसेच सदरची विमा पॉलिसीचा कालावधी हा 10/10/2011 ते 09/10/2014 पर्यंत वैध होता व तसेच प्रत्येक कर्जदाराचे विमा रक्कम 1,00,000/- रुपये पर्यंत होती ही बाब देखील नि.क्रमांक 6/15 वरील दाखल केलेल्या पॉलिसी प्रतवरुन सिध्द होते. तसेच अर्जदाराचे पती वैजनाथ विश्वनाथ गरड याचा दिनांक 27/03/2012 रोजी विजेचा धक्का लागुन मृत्यू झाला ही बाब नि.क्रमांक 6/16 वरील दाखल केलेल्या संदर्भ चिठ्ठी व तसेच 6/8 वरील संबंधीत पोलीस स्टेशन मधील दिलेल्या तक्रार अर्जावरुन व तसेच 6/9 वरील दाखल केलेल्या मृत्यू प्रमाणपत्रा वरुन सिध्द होते. अर्जदाराचे मयत पती वैजनाथ विश्वनाथ गरड यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे सदराचा जनता अपघात विमा पॉलिसी अंतर्गत विम्याचा हप्ता गैरअर्जदार क्रमांक 2 कडे विमा हप्त्याची रक्कम भरली होती ही बाब नि.क्रमांक 6/5 वरील दाखल केलेल्या खाते उता-यावरुन सिध्द होते तसेच अर्जदाराने तीच्या पतीच्या मृत्यूनंतर गैरअर्जदार क्रमांक 1 कडे सदर जनता अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम मिळणे बाबत सर्व कागदपसत्रांसह दावा दाखल केला होता व गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे अर्जदाराच्या मयत पतीचा विमादावा मिळणे बाबत विमादावा केला होता ही बाब नि.क्रमांक 6/7 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा शेव विच्छेदन अहवाल नसल्यामुळे अर्जदाराचा विमादावा नाकारला होता ही बाब नि.क्रमांक 6/1 वरील दाखल केलेल्या रेप्युडेशन लेटरवरुन सिध्द होते. वास्तविक अर्जदाराच्या पतीचा मृत्यू अपघातानेच म्हणजेच इलेक्ट्रीक शॉक लागुन झाला होता व तो मृत्यू अपघातीच होता ही बाब नि.क्रमांक 6/16 वरील दाखल केलेल्या संदर्भ चिठ्ठी वरुन व 6/8 वरील तक्रार अर्जावरुन सिध्द होते. तसेच अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा पॉलिसी वैध कालावधी मध्ये झालेला आहे. म्हणून अर्जदार गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनी कडून जनता अपघात विमा योजने अंतर्गत निश्चितच 1,00,000/- रुपये मिळणेस पात्र आहे. असे मंचास वाटते.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने पी.एम.रिपोर्टची मागणी करुन अर्जदाराचा विमादावा नाकारुन अर्जदारास निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत
रु.1,00,000/- फक्त ( अक्षरी रु.एकलाख फक्त ) द्यावे.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.