जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1762/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 30/12/2008
सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 18/02/2009
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-12/10/2009
श्री.सुपडू फतरु तडवी (भिल),
उ.व.60 वर्षे, धंदाः शेती,
रा.लोहारा, ता.पाचोरा,
जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. देवेंद्र ट्रॅक्टर एजन्सीज, जळगांव करिता
प्रोप्रा.राजेंद्र रमणलाल भावसार,
रा.अजींठा रोड, कुसूंबा नाक्याजवळ, कुसूंबा,
जळगांव, ता.जि.जळगांव.
2. मॅनेजर,
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद,
6, बळीराम पेठ, महात्मा गांधी रोड, जळगांव,
ता.जि.जळगांव. ....... सामनेवाला.
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः12/10/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री.बी.बी.पिंजारी वकील हजर
सामनेवाला क्र. 1 स्वतः हजर (नो-से)
सामनेवाला क्र. 2 तर्फे श्री.अंबुजा वेदालंकार वकील हजर.(नोसे)
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. तक्रारदार हा शेती व्यवसाय करतो. सदर शेत जमीनीच्या मशागत करणेसाठी ट्रॅक्टरची आवश्यकता असल्याने तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांचे मालकीचे दुकानातुन सामनेवाला क्र. 2 मार्फत कर्ज प्रकरण करुन ट्रॅक्टर खरेदी करण्याचे निश्चित केले. सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारास फॉर्मटैक एफ.टी.45 व 50 हॉर्स पावर ट्रॅक्टरची माहिती देऊन सदर ट्रॅक्टर खरेदी केल्यास कंपनीकडुन विना टायरची ट्रॉली मोफत असल्याबद्यल सांगीतले. त्यानुसार तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांचेकडुन फार्माटैक एफ.टी.45 चे ट्रॅक्टर, चेसीस नंबर टी 2068518 व इंजीन नंबर 2070120 रक्कम रु.5,05,000/- इतक्या रक्कमेस खरेदी केलेंडर त्यावर सामनेवाला क्र. 1 यांनी विना टायरची ट्रॉली फ्री देण्याचे कबुल केले होते. तक्रारदाराने सदर ट्रॅक्टर सोबत नांगर किंमत रक्कम रु.40,000/- व टीलर किंमत रक्कम रु.20,000/- अशी एकुण रक्कम रु.5,65,000/- वर खरेदी करण्याचा सौदा सामनेवाला क्र. 1 सोबत केला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने योग्य त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन दि.31/1/2008 रोजी रक्कम रु.1,45,000/- चा भरणा रोख सामनेवाला क्र. 1 चे कार्यालयात केला. उर्वरीत रक्कम रु.4,20,000/- चे कर्ज प्रकरण सामनेवाला क्र. 2 कडे करण्याचे निश्चित केले. सामनेवाला क्रमांक 1 यांनी दि.3/2/2008 रोजी फॉर्मटैक एफ.टी.45 ट्रॅक्टर तक्रारदाराच्या ताब्यात दिले व बाकी राहीलेले साहीत्य नांगर, टीलर, ट्रॉली असे 8 दिवसात देण्याचे कबुल केले. आठ दिवसानंतर तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे उर्वरीत साहीत्याची मागणी केली असता सामनेवाला क्र. 1 यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली व कंपनीकडुन साहीत्य आल्यावर घरपोच देण्याचे आश्वासन दिले. सदरचे ट्रॅक्टर हे साहीत्याअभावी चालवणे शक्य नव्हते तथापी तक्रारदाराने गावातील श्री.माधव लहानु जाधव यांचे मालकीचा नांगर जोडुन ट्रॅक्टर चालवुन पाहीला असता ट्रॅक्टर मध्ये तांत्रीक बिघाड असल्याचे तक्रारदाराचे लक्षात आले. तक्रारदाराने सदर तांत्रीक बि घाडाबाबतची कल्पना सामनेवाला क्र. 1 यांना दिली असता सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचे ताब्यातील ट्रॅक्टर त्यांचे दुकानासमोर लावुन घेतले व तक्रारदारास तात्पुरते वापरासाठी जुने ट्रॅक्टर दिले. तक्रारदाराने त्यानंतर वेळोवेळी सामनेवाला यांचेकडे नवीन दोषरहीत ट्रॅक्टर व साहीत्याची मागणी केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारास टाळाटाळ करुन नवीन ट्रॅक्टर व साहीत्य देण्यास असमर्थता व्यक्त केली. तक्रारदाराने अधिक चौकशी केली असता सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी संगनमत करुन तक्रारदाराचे अज्ञाचा गैरफायदा घेऊन कर्ज प्रकरणासाठी लागणा-या इंग्रजी भाषेतील कागदपत्रांवर तक्रारदाराचा मुलगा अनील याच्या सहया घेऊन ठरलेल्या रक्कमपेक्षा जास्त रक्कमेचे खोटे व बनावट बिल तसेच कागदपत्रे तयार करुन रक्कम रु.5,65,000/- ऐवजी रक्कम रु.6,45,000/- चे खोटे बिल, कोटेशन व कागदपत्र तयार करुन रक्कम रु.5,00,000/- कर्ज प्रकरण मंजुर करुन एकुण रक्कम रु.80,000/- जास्तीचे तक्रारदाराचे नांवे काढल्याचे दि.21/10/2008 रोजीचे बँक अधिकारी यांनी दिलेल्या वसुली नोटीसीवरुन निर्दशनास आले. सामनेवाला क्र. 1 कडुन ठरल्याप्रमाणे तक्रारदारास ट्रॅक्टर व साहीत्य मिळाले किंवा नाही याची शहानीशा करण्याचे काम सामनेवाला क्र. 2 चे होते तथापी सामनेवाला क्र. 2 यांनी देखील कोणतीही चौकशी न करता सामनेवाला क्र. 1 यास परस्पर ठरल्यापेक्षा जास्त रक्कम दिलेली आहे. सामनेवाला क्र. 1 यांचेकडुन ट्रॅक्टरवर कोणतेही साहीत्य न मिळाल्याने ते सध्या उभे असल्याने त्याव्दारे कोणताही कामधंदा न करता आल्याने तक्रारदाराचे सुमारे रु.2,00,000/- चे नुकसान झाले आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे जाऊन त्यांनी दिलेले जुने ट्रॅक्टर घेऊन नवीन ट्रॅक्टर व साहीत्याची मागणी केली असता सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारास शिवीगाळ करुन हाकलुन दिले. तक्रारदाराने त्यानंतर सामनेवाला यांना रजिस्ट्रर पोष्टाने नोटीस पाठवुन मागणी केली असता सामनेवाला यांनी त्यास कोणतेही उत्तर दिले नाही. सबब तात्पुरते वापरासाठी दिलेले जुने ट्रॅक्टर फॉर्मटैक एफ.टी.50 हे बदलुन नवीन ट्रॅक्टर फॉर्मटैक एफ.टी.45 चे द्यावे व बाकी राहीलेले साहीत्य नांगर, टिलर, व विना टायरची ट्रॉली देण्याचे आदेश सामनेवाला क्र. 1 यांना व्हावेत. सामनेवाला क्र. 1 यांनी ठरलेल्या रक्कमेपेक्षा जास्तीचे स्विकारलेले रक्कम रु.80,000/- तक्रारदारास परत करण्याचे आदेश व्हावेत, सामनेवाला क्र. 2 यांनी मागणीपेक्षा जास्त रक्कम मंजुर करुन तक्रारदाराची फसवणुक केल्याबद्यल तसेच सामनेवाला क्र. 2 यांनी कर्जाचे वसुलीसाठी दि.21/10/2008 रोजी पाठविलेली नोटीस बेकायदेशीर आहे असे घोषीत होऊन मिळावे. नुकसान भरपाईपोटी रु.2,00,000/-, मानसिक, आर्थिक व शारिरिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
3. सामनेवाला क्र. 1 हे स्वतः हजर झाले तसेच सामनेवाला क्र. 2 हे वकीलामार्फत हजर झाले तथापी लेखी म्हणणे सादर करण्यास वेळोवेळी मुदती घेऊनही वेळेत लेखी म्हणणे सादर न केल्याने सामनेवाला क्र. 1 व 2 विरुध्द नो-से आदेश पारीत करण्यात आले.
4. तक्रारदार यांची तक्रार,शपथपत्र, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1) तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक होतो किंवा कसे ? होय.
2) सामनेवाला यांनी तक्रारदारास सदोष व त्रृटीयुक्त सेवा
दिली आहे अगर कसे ? होय.
3) असल्यास काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्षाची कारणेः
मुद्या क्रमांक 1
5. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांचेकडुन सामनेवाला क्र. 2 मार्फत कर्ज प्रकरण करुन फार्मटैक कंपनीचे एफ.टी.45 हॉर्स पॉवरचे ट्रॅक्टर नांगर व टीलर सह एकुण रक्कम रु.5,65,000/- इतक्या किंमतीस खरेदी केल्याचे कथन तक्रार अर्जात केलेले आहे. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत नि.क्र.1 लगत अ.क्र.9 वर सामनेवाला क्रमांक 1 देवेंद्र ट्रॅक्टर एजन्सी यांनी दि.31/1/2008 रोजी रिसीट क्रमांक 59 अन्वये रक्कम रु.1,45,000/- रोख स्वरुपात स्विकारल्याची पावतीची छायाप्रत तसेच सामनेवाला क्र. 2 स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा जळगांव यांचेकडुन तक्रारदाराचे नांवे रिसीट क्रमांक 58 दि.31/1/2008 अन्वये रक्कम रु.5,00,000/- स्विकारल्याची पावतीची छायाप्रत दाखल केलेली आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 2 कडुन कर्ज प्रकरण करुन सामनेवाला क्र. 1 मार्फत तथाकथीत ट्रॅक्टर खरेदी केल्याची बाब कागदपत्री पुराव्यावरुन शाबीत केलेली आहे. सबब तक्रारदार हा सामनेवाला क्रमांक 1 व 2 यांचा ग्राहक होतो या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे.
मुद्या क्रमांक 2
6. तक्रारदाराने सामनेवाला क्रमांक 2 बँकेकडुन कर्ज प्रकरण करुन सामनेवाला क्र. 1 यांचेकडुन फॉर्मटैक ट्रॅक्टर मॉडेल एफ.टी.45 ट्रॅक्टर सिरियल क्रमांक टी 2068518, इंजीन सिरियल क्रमांक ई 2070120, चेसीस क्रमांक टी 2068518 हे खरेदी केल्याबाबतची दि.3/2/2008 रोजीची मॅन्युअल बुकची सत्यप्रत नि.क्र.1 लगत दाखल केलेली आहे. तक्रारदाराने सदरचा ट्रॅक्टर एकुण रक्कम रु.5,05,000/- इतक्या किंमतीस खरेदी घेतल्याची डिलेव्हरी चलनाची झेरॉक्स प्रतही सोबत दाखल केलेली आहे. ट्रॅक्टर सोबत नांगर रक्कम रु.40,000/- व टीलर रक्कम रु.20,000/- इतक्या किंमतीस घेण्याचे ठरले असल्याचेही तक्रारदाराने नमुद केलेले आहे. अशा रितीने ट्रॅक्टर सह नांगर व टिलर एकुण रक्कम रु.5,65,000/- इतक्या किंमतीस खरेदी घेण्याची बाब तक्रारदाराने कागदोपत्री पुराव्यानिशी शाबीत केलेली आहे. तक्रारदाराने नि.क्र. 1 लगत सामनेवाला क्रमांक 1 यांनी सामनेवाला क्र. 2 यांना तक्रारदार खरेदी करीत असलेल्या ट्रॅक्टरचे कोटेशनची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. सदर कोटेशनचे बारकाईने अवलोकन केले असता फॉर्मटैक 45 पॉवरट्रॅक ट्रॅक्टर रक्कम रु.5,85,000/- किंमतीस नमुद केले असुन नांगर ची किंमत रक्कम रु.40,000/- व कल्टीव्हेटर ची रक्कम रु.20,000/- नमुद करुन एकुण रक्कम रु.6,45,000/- चे कोटेशन सामनेवाला क्र.2 बँकेस दिल्याचे दिसुन येते. तसेच नि.क्र.1 लगतच सामनेवाला क्र. 1 यांनी बिलबुक नंबर 391 अन्वये दि.3/2/2008 रोजीचे एकुण रक्कम रु.6,45,000/- ची पावती सामनेवाला क्र. 2 यांना दिलेबाबतचा पुरावा सादर केलेला आहे. याचाच अर्थ सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराचे अशिक्षीतपणाचा गैरफायदा घेऊन तक्रारदारास एकदा रक्कम रु.5,05,000/- चे कोटेशन देऊन तसेच तक्रारदाराकडुन पार्ट पमेंट रोख स्वरुपात एकुण रक्कम रु.1,45,000/- स्विकारुन प्रत्यक्षात सामनेवाला क्र. 2 यांना फॉर्मटैक 45 ट्रॅक्टर करिता रु.5,85,000/-, नांगर करिता रु.40,000/- व ट्रेलर करिता रु.20,000/- अशी एकुण रक्कम रु.6,45,000/- रक्कम नमुद करुन त्यापोटी सामनेवाला क्रमांक 2 यांचेकडुन ड्राफट क्रमांक 150615 अन्वये दि.31/1/2008 रोजी एकुण रक्कम रु.5,00,000/- स्विकारल्याचे सिध्द होते. अशा प्रकारे सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराकडुन एकुण रक्कम रु.6,45,000/- स्विकारले ही बाब निर्वादीत आहे. सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराचे अशिक्षीतपणाचा फायदा घेऊन त्यास वेगवेगळया रक्कमेचे कोटेशन देऊन व सामनेवाला क्र. 2 चे अधिका-यांना हाताशी धरुन जास्त कर्ज रक्कम मंजुर करुन तक्रारदाराकडुन रक्कम रु.80,000/- जास्तीचे घेतल्याची बाब स्वयंस्पष्ट होते. प्रस्तुत तक्रारीकामी सामनेवाला क्र. 2 यांनी कर्ज मंजुर करतांना तक्रारदारास दिलेल्या ट्रॅक्टर बाबत प्रत्यक्ष तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांचेकडे भरणा केलेल्या रक्कमेच्या बाबतीत तसेच सामनेवाला क्र.1 यांनी दिलेल्या बिलांची शहानिशा न करता तसेच प्रत्यक्ष ट्रॅक्टर बाबत योग्य ती तपासणी न करता परस्पर सामनेवाला क्र. 1 यांना कर्ज रक्कमेचे वितरण केल्याची बाब स्पष्ट होते.
7. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांचेकडुन खरेदी केलेला ट्रॅक्टर घरी नेल्यानंतर 8/10 दिवसानंतरही सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारास नांगर व टीलर हे साहीत्य न दिल्याने तक्रारदाराने सदर ट्रॅक्टरला गावातील अन्य व्यक्तीचे नांगर जोडले असता सदर ट्रॅक्टर सदोष असल्याची बाब तक्रारदारास कळाल्यानंतर तक्रारदाराने सदरचा सदोष ट्रॅक्टर सामनेवाला यांचेकडे दाखविणेसाठी नेला असता सामनेवाला क्र. 1 यांनी सदर ट्रॅक्टर ठेवुन घेऊन तक्रारदारास तात्पुरता दुसरा वापरलेला ट्रॅक्टर दिला व नांगर तसेच टिलर न देता सदोष ट्रॅक्टर दिल्याची तक्रार तक्रारदाराने उपस्थित केली आहे. प्रस्तुत तक्रारीकामी सामनेवाला क्रमांक 1 हे स्वतः हजर झाले तसेच सामनेवाला क्र. 2 हे वकीलामार्फत हजर झाले व लेखी म्हणणे सादर करण्यास मुदती घेऊनही मुदतीत लेखी म्हणणे सादर न केल्याने सामनेवाला क्र. 1 व 2 यांना तक्रारदाराची तक्रार एकप्रकारे मान्य असल्याचा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. तक्रारदाराने सदोष ट्रॅक्टर मुळे रक्कम रु.2,00,000/- नुकसान भरपाईची मागणी केली आहे तथापी तक्रारदाराचे रक्कम रु.2,00,000/- चे नेमके काय नुकसान झाले ? याबाबतचा कोणताही योग्य तो कागदोपत्री पुरावा तक्रारदाराने मंचासमोर सादर केलेला नाही. तथापी तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, तसेच साक्षीदारांची शपथपत्रे इत्यादीचे अवलोकन करता सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास सदोष व त्रृटीयुक्त सेवा दिल्याचे स्पष्ट होते. सामनेवाला यांनी तक्रारदारास दोषविरहीत नवीन ट्रॅक्टर व त्यासोबत असलेले साहीत्य देणेचे तसेच तक्रारदाराकडुन जास्तीचे स्विकारलेली रक्कम रु.80,000/-देणेचे निर्णयाप्रत हा मंच आलेला आहे. तसेच नुकसान भरपाईबाबत टोकनदाखल रक्कम रु.5,000/- सामनेवाला यांनी तक्रारदारास द्यावे असे या मंचाचे मत आहे. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रमांक 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदारास फॉर्मटैक 45 चे नवीन दोषविरहीत ट्रॅक्टर नवीन नांगर व टिलर सह त्वरीत द्यावे.
( क ) सामनेवाला 1 व 2 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास रक्कम रु.80,000/- दि.31/1/2008 पासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह परत करावी.
( ड ) सामनेवाला क्र. 1 व 2 यांना असेही निर्देशित करण्यात येते की त्यांनी तक्रारदार यास झालेल्या नुकसान भरपाईपोटी टोकनदाखल रक्कम रुपये 5000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्र. 2 यांनी तक्रारदारास मागणीपेक्षा जास्त रक्कम मंजुर करुन ती परस्पर सामनेवाला क्र. 1 यांना देऊन सदोष सेवा दिल्याचे सिध्द झाल्याने सामनेवाला क्र. 2 यांनी दि.21/10/2008 रोजी तक्रारदारास पाठविलेली नोटीस रद्य करण्यात येते.
( ई ) सामनेवाला क्र. 1 व 2 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 500/- देण्यात यावे.
( फ ) सामनेवाला क्र. 1 व 2 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील आदेशाची पुर्तता सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत करावी.
( ग ) सदरील तक्रारीच्या आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्यास सामनेवाला क्र. 1 व 2 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाहीस पात्र ठरतील.
( घ ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 12/10/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव