श्रीमती कांचन एस.गंगाधरे, मा.सदस्या यांच्याव्दारे
1) तक्रारदार हे तक्रारीत नमूद केलेल्या पत्त्यावर मुलूंड, मुंबई येथे राहतात. तर सामनेवाले हे देवभूमी उत्तराखंड यात्रा कंपनी या नावांने धार्मिक सहली आयोजित करण्याचा ऑनलाईन पध्दतीने व्यवसाय करतात. तक्रारदाराने सामनेवाले यांच्या सहलीच्या अटी व नियमांनुसार दिनांक 28 मार्च, 2023 रोजी रक्कम रु.70,000/- भरुन त्यांच्या ग्राहकांसाठी सामनेवाले यांचेकडे चारधाम यात्रेचे आरक्षण केले होते. सामनेवाले यांनी हॉटेल निवासाची व्यवस्था करणे गरजेचे होते, परंतू ती व्यवस्था केली नसल्याने सहलीच्या अटी व नियमांनुसार तक्रारदार यांनी दिनांक 1 एप्रिल, 2023 रोजी यात्रेचे आरक्षण रद्द केले होते. त्यानुसार सामनेवाले यांनी रक्कम रु. 70,000/- पैकी रु.25,000/- तक्रारदार यांच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने परत केले होते. सामनेवाले यांनी राहिलेली रक्कम रु.45,000/- तक्रारदाराच्या ग्राहकांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने परत -करण्याचे कबूल केले होते. तक्रारदाराने अनेक वेळा फोनवर, व्हाट्सअॅप संदेशाद्वारे विनंती करूनही सामनेवाले यांनी राहिलेली रक्कम रु.45,000/- तक्रारदारास परत दिली नाही किंवा त्यांच्या ग्राहकांच्या बॅंक खात्यात सुध्दा जमा केली नाही या कारणास्तव तक्रारदाराने रक्कम रु.45,000/- परत मिळण्यासाठी प्रस्तुतची तक्रार या आयोगासमोर दाखल केलेली आहे.
2) सामनेवाले यांना नोटीसची बजावणी होऊन तसेच त्यांना वेळोवेळी हजर राहण्याची संधी देऊनही ते आयोगासमोर हजर झाले नाहीत त्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले.
3) तक्रारदाराने यात्रेच्या आरक्षणासंदर्भात भरलेल्या रु.70,000/- च्या पावत्या दाखल केल्या आहेत. तसेच सामनेवाले यांच्याबरोबर व्हाट्सअॅप च्या माध्यमातून झालेले संभाषण देखील दाखल केलेले आहे. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, त्यासोबतची कागदपत्रे व तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकण्यात आला. यावरून खालील बाबी स्पष्ट होतात.
तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये व तोंडी युक्तिवादादरम्यान स्पष्ट केले आहे की, सदरचे चारधाम यात्रेचे आरक्षण त्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी केले होते. त्याचबरोबर सामनेवाले यांचेसोबत झालेल्या व्हाट्सअॅप संभाषणा दरम्यान राहिलेले रु.45,000/- कधी परत करणार आहात ?, मला माझ्या ग्राहकांना पैसे परत करावयाचे आहेत असे संभाषण तक्रारदाराने दाखल केलेले आहे. यावरून तक्रारदाराने सामनेवाले यांची सेवा ही व्यावसायिक कारणासाठी घेतली असल्याचे स्पष्ट होते. व्यावसायिक कारणासाठी झालेल्या व्यवहारासंदर्भातील तक्रार ग्राहक आयोगासमोर चालू शकत नाही, असे आमचे मत आहे. यावरुन तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक होत नाहीत असे या आयोगाचे मत आहे. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 2(7) नुसार ‘ग्राहक’ या व्याख्येत समाविष्ट होत नसल्याने प्रस्तुतची तक्रार या आयोगासमोर चालू शकत नाही.
वरील विवेचनावरून खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
- तक्रार क्र.CC/117/2023 खारीज करण्यात येते.
- खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
- या आदेशाची प्रत उभय पक्षकारांना पाठविण्यात यावी.