निकाल
(घोषित दि. 14.06.2016 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून होंडा युनिकॉर्न ही दुचाकी मोटार सायकल दि.08.10.2014 रोजी दि. मंठा अर्बन को.ऑपरेटिव्ह बॅंक यांची आर्थिक मदत घेऊन खरेदी केली. गैरअर्जदार क्र.1 हे जालना येथील होंडा दुचाकी मोटार सायकलचे विक्रेते आहे. गैरअर्जदार क्र.2 हे होंडा दुचाकी मोटार सायकलचे विभागीय कार्यालय आहे व गैरअर्जदार क्र.3 हे होंडा दुचाकी मोटार सायकलचे नागपूर येथील कार्यालय आहे. सदर दुचाकीच्या खरेदी नंतर तीन महिन्यांनी सदर वाहनात 1) ब्लॉक लिकेज 2) इंजिन लिकेज 3) डिप्पर स्विच मध्ये दोष 4) मागील टायर एका बाजूने घासणे 5) गाडी उजव्या बाजूने ओढणे इत्यादी दोष निष्पन्न झाले. दि.24.01.2015 रोजी तक्रारदार याने सदर दुचाकी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे दुरुस्त करण्यास दिले, गैरअर्जदार क्र.1 यांनी आवश्यक ते शुल्क आकारुन जॉब कार्ड मधील नोंदी नुसार सदर दुचाकी दुरुस्त करुन दिली, दुचाकीच्या दुरुस्तीनंतर तक्रारदार घरी परतत असताना त्याला आढळले की, त्याच्या दुचाकीचे काम अपूर्ण आहे. सदर वाहनामध्ये जे मुख्य दोष होते ते अद्यापही कायम आहेत. त्यामुळे दुस-याच दिवशी तक्रारदार परत गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे गेला. त्यानंतर गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर वाहनातील काही सदोष भाग बदलून गाडीतील दोषांचे निर्मूलन केले असे सांगितले. त्यानंतर दोन महिन्याच्या कालावधी नंतर तक्रारदाराच्या दुचाकी वाहनामध्ये परत दोष निष्पन्न झाले त्यामुळे दि.06.04.2015 रोजी तक्रारदार याने सदर दोषाच्या निर्मूलनाकरता गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे त्याचे वाहन दिले. सुरुवातीस गैरअर्जदार क्र.1 यांच्या कर्मचा-यांनी तक्रारदाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले परंतू नंतर सदर वाहनातील दोषांचे निर्मूलन करण्याकरता ती दुचाकी ठेवून घेतली. पाच सहा घंटयानंतर तक्रारदार गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे गेले त्यावेळी त्याच्या दुचाकीचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून सदर दुरुस्ती बाबत रु.90/- चे बिल आकारण्यात आले. त्यानंतर परत दोन दिवसांनी दि.08.04.2015 रोजी तक्रारदाराचे वाहनामध्ये दोष निष्पन्न झाले. त्यामुळे तक्रारदार याने सदर वाहन दोषांचे निर्मूलनाकरता गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे दिले, त्यावेळी आकारण्यात आलेले दुरुस्तीचे शुल्क रु.76/- घेऊन व दुरुस्तीचे काम पूर्ण करुन तक्रारदाराचे वाहन त्याला परत देण्यात आले. तक्रारदाराच्या वाहनात त्यानंतरही वारंवार वर उल्लेख केलेले दोष निष्पन्न होत राहीले. दि.13.04.2015 रोजी तसेच दि.28.04.2015 रोजी तक्रारदार याने परत त्याचे दुचाकी वाहन गैरअर्जदार यांच्या वर्कशॉप मध्ये दुरुस्तीकरीता आणले होते परंतू सदर वाहनातील दोषाचे निर्मूलन झाले नाही. उलट गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदार यास सांगितले की, या वाहनातील काही सुटे भाग बदलावे लागतील व त्या बाबतचा सर्व खर्च तक्रारदार याला करावा लागेल. अशा रितीने गैरअर्जदार यांनी तक्रारदाराच्या वाहनाची दुरुस्ती करुन देण्यास नकार दिलेला आहे. तक्रारदाराचे दुचाकी वाहन वॉरंटीच्या कालावधीत होते त्यामुळे नियमानुसार सदर वाहनाची दुरुस्ती करुन देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 यांचेवर होती असे असूनही गैरअर्जदार यांनी तक्रारदाराचे वाहन न दुरुस्त करुन देऊन तक्रारदाराची गैरसोय केलेली आहे व सेवेत त्रुटी केलेली आहे. वरील कारणास्तव तक्रारदार यांनी हा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
तक्रारदार यांनी अशी विनंती केली आहे की, सदर वाहनाच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल भागामध्ये दोष असल्यामुळे सदोष वाहनाच्या बदल्यात दुसरे वाहन देण्याचा आदेश व्हावा, किंवा त्या वाहनाची खरेदी किंमत त्याला गैरअर्जदाराकडून परत देण्याचा आदेश व्हावा. तक्रारदार यास गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचेकडून जो शारीरिक व मानसिक त्रास झाला त्याबददल नुकसान भरपाई रु.1,00,000/- 18 टक्के व्याजदराने देण्याचीही मागणी त्याने केलेली आहे.
तक्रारदार याने दुचाकी वाहन खरेदी केल्याबददल गैरअर्जदार क्र.1 यांनी 08 ऑक्टोबर 2014 रोजी दिलेल्या पावतीची नक्कल, इनव्हाईसची नक्कल, आर.सी.बुक ची नक्कल, टॅक्स इनव्हाईसच्या नकला, तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांच्या कंपनीला पाठविलेल्या दि.09.09.2015 च्या पत्राची नक्कल, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहे.
गैरअर्जदार क्र.1 वकीलामार्फत हजर झाले त्यांनी लेखी जबाब दाखल केला. त्यांनी तक्रारदार यास दुचाकी वाहन विकल्याचे कबूल केले आहे तसेच सदर वाहन वेळोवेळी तक्रारदाराने दुरुस्तीकरता आणल्याचे ही कबूल केले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांचे असे म्हणणे आहे की, प्रत्येक वेळी तक्रारदाराच्या वाहनातील दोषांचे योग्य ते निर्मूलन केलेले आहे तसेच सदोष भागाची दुरुस्ती करुन देण्यात आलेली आहे. सदर दुरुस्तीकरता नियमानुसार अनुज्ञेय असलेले शुल्क घेण्यात आलेले आहे. दि.13.04.2015 रोजी सदर दुचाकी वाहनाचे शॉक अब्जर्बर व मडगार्ड सुध्दा बदलून दिले कारण त्यावेळी सदर दुचाकी वॉरंटीच्या कालावधीत होती. वरील कारणास्तव गैरअर्जदार क्र.1 यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी तक्रारदार यास नियमानुसार उचित सेवा दिलेली आहे, त्यांच्या सेवेमध्ये कोणतीही त्रूटी नाही. तक्रारदार याने फक्त गैरअर्जदार यांचेकडून पैसे उकळण्याकरता ही तक्रार दाखल केलेली आहे त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर तक्रार खर्चासहीत खारीज करावी अशी विनंती केलेली आहे.
गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी पुरशिस दाखल करुन गैरअर्जदार क्र.1 यांचा लेखी जबाबाप्रमाणेच त्यांचे ही म्हणणे आहे असे समजण्यात यावे असे कळविले आहे.
तक्रारदार याने पुराव्याकामी शपथपत्र दाखल केले आहे. त्याचप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 यांचेतर्फे संतोष कृष्णागोपाल तिवारी यांनी पुराव्याकामी शपथपत्र दाखल केले आहे.
आम्ही तक्रारदाराचा तक्रार अर्ज व गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांच्या लेखी जबाबाचे काळजीपूर्वक वाचन केले, त्याचप्रमाणे तक्रारदार याने दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे निरीक्षण केले. दोन्ही बाजूच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद ऐकला. त्यावरुन मंचाचे असे मत झाले आहे की, तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून होंडा युनिकॉर्न ही मोटार सायकल तक्रारीत दर्शविल्याप्रमाणे दि.08.10.2014 रोजी बॅंकेचे आर्थिक सहाय्य घेऊन विकत घेतलेली आहे. सदर मोटार सायकल ही गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून दि. 08.10.2014 रोजी घेतल्यामुळे सदर मोटार सायकलला खरेदी तारखेपासून एक वर्षाकरीता वॉरंटी उपलब्ध आहे. सदर मोटार सायकल विकत घेतल्यानंतर अंदाजे साडेतीन महिन्यांनी तक्रारदार यास सदर मोटार सायकलमध्ये दोष असल्याचे निष्पन्न झाले, सदर दोषांचे निर्मूलन तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांच्या वर्कशॉपमधून करुन घेतले. त्यानंतर दि. 06.04.2015 रोजी परत सदर मोटार सायकलमध्ये दोष निष्पन्न झाला. त्याचे ही निर्मूलन तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्या वर्कशॉपमधून करुन घेतले. त्यानंतर दि. 08.04.2015, 13.04.2015 व 28.04.2015 रोजी सदर मोटार सायकलमध्ये दोष निष्पन्न झाल्यामुळे त्या त्या वेळी तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्या वर्कशॉपमधून सदर दोषांचे निर्मूलन करुन घेतले. वरील तारखा लक्षात घेतल्यावर असे समजून येते की, वरील सर्व दोष तक्रारदार यांनी मोटार सायकल विकत घेतल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत निष्पन्न झालेले आहेत. याचाच अर्थ असा होतो की, सर्व दोष वॉरंटीच्या कालावधीत निष्पन्न झाले व त्याचे निर्मूलन सुध्दा वॉरंटीच्या कालावधीत करुन घेण्यात आले.
तक्रारदार याने त्याच्या मोटार सायकलमध्ये दोष निष्पन्न झाल्याच्या ज्या तारखा दिल्या आहेत व त्यातील दोषांचे निर्मूलन गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून केल्याबददलचा जो मजकूर तक्रार अर्जात लिहीला आहे, तो सर्वसाधारणपणे गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांच्या लेखी जबाबाअन्वये मान्य केला आहे. सकृतदर्शनी जरी गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदाराचा तक्रार अर्ज खोटा आहे असे विधान केले असले तरी, सदर विधान हे फक्त नकाराकरता नकार या स्वरुपाचे असल्याचे जाणवते.
गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचा लेखी जबाब आहे तसाच स्विकारला व त्याकरता पुरशिस दाखल केली आहे त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांनी ज्या ज्या गोष्टी स्पष्ट शब्दात मान्य केल्या आहेत अथवा नाकारल्या आहेत, त्या तशाच स्वरुपात गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना ही लागू आहेत.
तक्रारदार यांनी पुराव्याकामी स्वतःचे शपथपत्र सादर केले आहे, त्याचप्रमाणे शरद उत्तमराव नाईकवाडे या मेकॅनिकचे ही शपथपत्र दाखल केले आहे. मेकॅनिक शरद उत्तमराव नाईकवाडे याने सदर शपथपत्र दि. 20.04.2016 रोजी लिहीलेले असून त्यामध्ये दि. 23.01.2015 रोजी तक्रारदाराची सदोष मोटार सायकल त्यांनी तपासून त्यामध्ये उत्पादकीय दोष असल्याबददलचे मत दिलेले आहे. प्रत्यक्षात दि. 23.01.2015 रोजी तपासलेल्या मोटार सायकल बाबतचे स्मरण शरद उत्तमराव नाईकवाडे या मेकॅनिकला दि. 20.04.2016 रोजी राहीले अथवा नाही याबददल शंका वाटते, परंतू या मुद्यावर गैरअर्जदार यांच्या वकीलांनी कोणताही ठोस आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे आम्ही सदर मेकॅनिकच्या विधानावर विश्वास ठेवतो.
तक्रारदार याने ज्या ज्या वेळी त्याची मोटार सायकल गैरअर्जदार क्र.1 यांच्या गॅरेजमध्ये दोषांचे निर्मूलनाकरता दाखल केली, त्या त्या वेळच्या जॉबशीटच्या नकला ग्राहक मंचासमोर दाखल आहेत. तक्रारदार याने सदर मोटार सायकल रु.74,363/- देऊन मंठा अर्बन को.ऑपरेटिव्ह बॅंक यांच्या अर्थसहाय्याने घेतली. इतकी महाग मोटार सायकल तक्रारदार याने निश्चितच स्वतःच्या उपयोगाकरता व कामाच्या सोयीकरता घेतली हे स्पष्ट आहे, असे असतांना तो गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना त्रास देण्याकरता मोटार सायकल खराब झाली व त्यात उत्पादकीय दोष आहे असे खोटे आरोप लावणे अजिबात शक्य नाही. या मुद्यावर तक्रारदार यांच्या वतीने ज्या मेकॅनिकचे शपथपत्र दाखल आहे त्यांच्या शपथपत्रातील मजकुराचे अवलोकन करणे आवश्यक आहे. त्यामध्ये असा उल्लेख आहे की, सदर मोटार सायकलचे ब्लॉकमध्ये लिकेज, इंजिनमध्ये लिकेज, डिप्पर स्विच व मागील टायर एका बाजूने घासल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे गाडी उजव्या बाजूने ओढली जाणे इत्यादी दोष दिसून आले, हे सर्व दोष उत्पादकीय आहेत असे सदर मेकॅनिकने स्पष्ट शब्दात सांगितले आहे. आमच्या मताने रु.74,363/- ची मोटार सायकल खरेदीपासून एक वर्षाच्या आत उत्पादकीय दोषांमुळे योग्य पध्दतीने तक्रारदार यास वापरता येत नसेल तर, ती गैरअर्जदार यांनी परत घेऊन त्या ऐवजी नवीन कोणत्याही प्रकारचा दोष नसलेली त्याच किंमतीची मोटार सायकल तक्रारदार यांना बदलून देणे योग्य राहील.
सदर मोटार सायकलमधील दोष वारंवार निष्पन्न होऊन सुध्दा थातुरमातूर दुरुस्ती करुन वॉरंटीचा कालावधी संपेपर्यंत कालअपव्यय करणे ही योग्य गोष्ट नाही. वॉरंटीच्या कालावधीत आलेले वाहन हे परिपूर्ण रितीने व उचित पध्दतीने दुरुस्त करुन ग्राहकाला देणे हे गैरअर्जदार यांचे नैतिक कर्तव्य आहे परंतू सदर नैतिक कर्तव्य पार पाडण्यात गैरअर्जदार यांनी त्रुटी ठेवली. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये ही तक्रार तक्रारदार यांनी सिध्द केली आहे असे आमचे मत आहे.
वरील कारणास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो.
2) गैरअर्जदार नं.1 ते 3 यांनी स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे तक्रारदाराची मोटार
सायकल होंडा युनिकॉर्न एम.एच.21-ए.एम.-7177 या आदेशाच्या तारखेपासून
60 दिवसाच्या आत तक्रारदार यास बदलून द्यावी. बदललेली मोटार सायकल
नवी असावी व त्याच किंमतीची असावी त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा
उत्पादकीय दोष असू नये.
3) जर गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी वरील आदेशाचे पालन करण्यात कुचराई केली
तर तक्रारदार हा गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांच्याकडून रक्कम रु.10,000/-
अधिकची नुकसान भरपाई म्हणून वसूल करण्यास पात्र राहील. अर्थात ती
रक्कम जर वरील परिच्छेद 1 मधील आदेशाचे पालन केले नाही, तरच लागू
होईल.
4) या तक्रार अर्जाच्या खर्चापोटी गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यास
रक्कम रु.5,000/- द्यावे.
श्री सुहास एम.आळशी श्री के.एन.तुंगार
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना