द्वारा - श्री. एस़्.बी.धुमाळ: मा.अध्यक्ष
ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-
1) तक्रारदार गेल्या दोन वर्षापासून DWS असेट मॅनेजमेंट लि. मार्फत चालविण्यात येणा-या DWS म्यूचल फंडामध्ये गुंतवणूक करीत आहेत. तक्रारदारांनी दि.15/05/2009 रोजी 2 ‘स्वीच अप्लीकेशन’ देवून राजकुमार सध यांच्या DWS अकाऊंट क्र.21016166406 व देवयानी सध यांचा अकाऊंट क्र. 2101279943 मधील DWS Insta cash plus growth फंडातील रकमेची DWS Alpha equity fund Dividend मध्ये पुर्नगुंतवणूक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदरची पुर्नगुंतवणूक दुपारचे तीनपूर्वी करावी अशा सूचना दिल्या होत्या. देवयानी सध यांनी राजकुमार सध यांना त्यांच्या व्यवसायासंबंधीची power of attorney दिलेली आहे.
2) सेबीच्या नियमाप्रमाणे DWS असेट मॅनेजमेंट लि. ने दि.15/05/2009 रोजी असणा-या नेट असेट व्हॅल्यूप्रमाणे स्वीच अप्लीकेशनवर कार्यवाही करणे आवश्यक होते परंतु DWS ने दि.19/05/2009 ला NAV(new asset value)प्रमाणे कार्यवाही केली व सेबीच्या नियमांचा चुकीचा अर्थ काढून तसेच वरील चुकीच्या कार्यवाहीचे समर्थन केले. तक्रारदारांनी सादर केलेले स्वीच अप्लीकेशन्स सामनेवाला यांना दि.15/05/2009 रोजी दुपारी 3 पूर्वी मिळाले होते. त्यामुळे तक्रारदारांना दि.15/05/2009 रोजी असणारी NAV मिळणे आवश्यक होते. स्टॉक मार्केटमध्ये NAVमध्ये बरीचशी वाढ झाल्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी सामनेवाला यांनी DWS चे अल्फा इक्विटी मार्केटमध्ये जादा दराने दि.19/05/2009 च्या NAV प्रमाणे विकले. वरील व्यवहारात तक्रारदारांचे सुमारे रु.3,00,000/- चे नुकसान झाले. तक्रारदारांनी वेळोवेळी विनंती करुनसुध्दा सामनेवाला यांनी त्यांच्या चुकीची दुरुस्ती केली नाही.
3) दि.15/05/2009 रोजी तक्रारदारांनी स्वीच अप्लीकेशन्स जेएम फायनान्शिएल सर्व्हिस, रिलायंस म्युचअल फंड, HSBC म्युचअल फंड यांना दिले होते व त्यांनी तक्रारदारांना दि.15/05/2009 ला NAV दिली होती. सेबीचे नियम सर्व म्युचअल फंडसाठी सारखेच आहेत. सामनेवाला यांनी दि.15/05/2009 ला NAV दिल्यामुळे तक्रारदारांचे जे नुकसान झाले झाले त्याचा तपशील तक्रार अर्ज परिच्छेद 5 मध्ये दिलेला आहे. सामनेवाला DWS यांनी तक्रारदारांचे DWS अल्फा इक्विटी फंडचे शिल्लक असणारे युनिट तक्रारदारांच्या नावावर जमा करावे व त्यावर 10 टक्के दराने नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती केलेली आहे. वरील युनिटची अंदाजित रककम रु.3,30,000/- होती असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
4) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल करुन तक्रार अर्जाच्या पृष्ठयर्थ शपथपत्र दाखल केले आहे.
5) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रार अर्जात केलेले आरोप खोटे व चुकीचे असून तक्रार अर्ज खर्चासहित रद्द करण्यात यावा असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. सदरचा तक्रार अर्ज भविष्यात घडणा-या काही कपोकल्पित गोष्टी गृहित धरुन केलेल्या असल्यामुळे तक्रार अर्ज रद्द होण्यास पात्र आहे.
6) सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सेबीच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. तक्रारदारांची विनंती मान्य करण्यास सामनेवाला यांनी विलंब केला त्यामुळे तक्रारदारांचे नुकसान झाले हा तक्रारदारांचा आरोप सामनेवाला यांनी नाकारला. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी दोनदा विनंत्या केल्या त्यापैकी पहिल्या विनंतीनुसार DWS Insta Cash Plus Growth Fund मधून त्यांना त्यांची गुंतवणूक काढायची होती तर दुस-या विनंतीत वरील गुंतवणूक DWS Alfa Equity Fund Dividend मध्ये गुंतवायचे होते. सेबीने सादर केलेल्या मास्टर सर्क्युरल मधील तरतूदींचा आधार घेवून त्यांच्या सेवेत कमतरता नाही असे म्हटले आहे. NAV मध्ये बरीच वाढ झाली त्यामुळे तक्रारदारांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले हा तक्रारदारांचा आरोप सामनेवाला यांनी नाकारला. तक्रारदारांनी तक्रार अर्जात जी आकडेमोड केली आहे ती चुकीची आहे. सामनेवाला यांच्या सेवेत कसलीही कमतरता नाही त्यामुळे तक्रार अर्ज खर्चासहित रद्द करण्यात यावा असे सामनेवाला यांनी म्हटले आहे. सामनेवाला यांनी कैफीयतीसोबत कागदपत्रे दाखल करुन प्रतित्रापत्र दाखल केलेले आहे.
7) तक्रारदारांनी प्रति निवेदन दाखल करुन सामनेवाला यांनी कैफीयतीत केलेले आरोप नाकारले आहेत. सामनेवाला यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला असून त्या लेखी युक्तिवादाला तक्रारदारांनी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रारदार राजकुमार सध व सामनेवाला यांचे वकील मोटवानी यांचा तोंडी युक्तिवाद ऐकला व तक्रार अर्ज निकालावर ठेवण्यात आला.
8) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात :-
मुद्दा क्र. 1 – तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 तरतूदीप्रमाणे ग्राहक आहेत काय?
उततर – नाही.
मुद्दा क्रं. 2 – तक्रारदारांना तक्रार अर्जात मागितलेली दाद मिळेल काय?
उत्तर – नाही.
कारण मिमांसा :-
मुद्दा क्रं. 1 - तक्रार अर्जातील मजकूर व तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तक्रारदार राजकुमार सध व देवयानी सध यांनी सामनेवाला यांच्या DWS Insta Cash Plus Growth Fund यामध्ये बरीच मोठी गुंतवणूक केलेली होती असे दिसुन येते. सदरची गुंतवणूक DWS Insta Cash Plus Growth Fund मधून काढून सामनेवाला यांच्या DWS Alfa Equity Fund मध्ये गुंतवणूक करायची होती त्यासाठी तक्रारदारांनी दोन स्वीच अप्लीकेशन सामनेवाला यांच्याकडे दि.15/05/2009 रोजी दिले होते. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी पुर्नगुंतवणूक दि.15/05/2009 रोजी करणे आवश्यक होते कारण त्यांनी स्वीच अप्लीकेशन दुपारी तीन पूर्वी दिलेले होते. तथापि, सामनेवाला यांनी सदरची पुर्नगुंतवणूक दि.19/05/2009 रोजी केली. दरम्यानच्या काळात NAV मध्ये वाढ झालेली होती त्यामुळे तक्रारदाराचे अंदाजित रु.3,30,000/- चे नुकसान झालेले आहे.
ग्राहक संरक्षण कायदा,1986 मधील कलम 2 1(d) मध्ये सन 2003 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली असून वरील दुरुस्तीप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने सेवा व्यावसायिक कारणासाठी घेतलेली असेल तर ती व्यक्ति ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीप्रमाणे ग्राहक या व्याख्येत बसत नाही. याकामी तक्रारदारांनी सामनेवाला यांची सेवा त्यांचे पैसे सामनेवाला यांच्या म्युचअल फंडमध्ये गुंतवणूकीसाठी घेतलेली होती. सामनेवाला हे डेटस्ची असेट मॅनेजमेंट म्हणून काम करतात. तक्रारदारांनी दि.15/05/2009 रोजी 2 स्वीच अप्लीकेशन दिले त्याची कार्यवाही ताबडतोब न करता सामनेवाला यांनी जाणीवपूर्वक पुर्नगुंतवणूक करण्यास विलंब केला असा तक्रारदारांनी आरोप करुन त्यांचे रु.3,30,000/- चे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. तक्रार अर्जात नमूद केलेल्या व्यवहाराचे स्वरुप पाहता तक्रारदारांनी सामनेवाला यांची सेवा व्यावसायिक कारणासाठी घेतलेली होती असे स्पष्टपणे दिसुन येते. यावरुन तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2 1(d) प्रमाणे ग्राहक नाहीत त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र. 2 - तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार ग्राहक नाहीत त्यामुळे त्यांनी दाखल केलेला अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 च्या तरतूदीमध्ये बसत नाही. सबब तक्रारदारांना या ग्राहक मंचाकडून सामनेवाला यांच्या विरुध्द दाद मागता येणार नाही. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
वर नमूद केलेल्या कारणावरुन तक्रार अर्ज रद्द करण्यात होण्यास पात्र असल्यामुळे तक्रार अर्ज रद्द करण्यात येवून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आ दे श
1) तक्रार अर्ज क्रं. 57/2010 रद्द करण्यात येतो.
2) खर्चाबद्दल आदेश नाही.
3)सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभयपक्षकारांना देणेत यावी.