(घोषित दि. 02.07.2014 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराने वीज पुरवठा खंडित करण्यासाठी अर्ज केलेला असताना देखील गैरअर्जदार यांनी त्याची दखल न घेता वीज बिल आकारणी केली. म्हणून अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी दिनांक 19.07.1971 मध्ये मामा चौक, जालना येथील न.भु.क्रं. 10665, हे महंमद हुसेन महंमद साहेब यांच्या कडून खरेदी केले. त्या जागी असणा-या वीज मीटरचे (ग्राहक क्रमांक 510030005889) नामांतर करुन न घेतल्यामुळे, गैरअर्जदार यांच्यातर्फे देण्यात आलेली वीज बिले ही पूर्वीच्या घर मालकाच्या नावाने आहेत. सदरील जागा मोडकळीस आल्यामुळे नगर परिषद, जालना यांच्याकडून दिनांक 26.06.2012 रोजी मिळालेल्या घर पाडण्या बद्दलच्या नोटीसमुळे अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे दिनांक 22.10.2013 रोजी वीज पुरवठा कायमस्वरुपी बंद करण्याबाबत कळविले. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीची दखल न घेता वीज पुरवठा बंद केला नाही व वीज बिल आकारणी सुरु ठेवली म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार यांना वीज पुरवठा खंडित करण्याबाबत आदेश देण्याची व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत मालमत्ता खरेदी पत्रक, वीज बिलाच्या प्रती, नगर परिषद जालना यांनी दिलेली नोटीस इत्यादी कागदपत्रे सोबत जोडली आहेत.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदार हे ग्राहक नसल्यामुळे त्यांना मंचात तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही असे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तसेच मंचा समोर झालेल्या सुनावणीवरुन असे दिसून येते की, अर्जदाराने नगर भूमापन क्रमांक 10665 ही जागा मोहंमद हुसेन मोहंमद साहेब यांच्या कडून दिनांक 19.07.1971 खरेदी केली. याची मालमत्ता पत्रकातून नोंद घेण्यात आल्याचे अर्जदाराने दाखल केलेल्या मालमत्ता पत्रकावरुन स्पष्ट होते. अर्जदाराने तक्रारी सोबत ऑक्टोबर 2013 या महिन्यात गैरअर्जदार यांनी आकारलेले वीज बिल व वीज बिल भरल्याची पावती जोडलेली आहे. यावरुन अर्जदार यांच्या नावे मीटर नसले तरी ते वीजेचा वापर करणारे आहेत हे स्पष्ट होते. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने 2005 मध्ये जाहिर केलेल्या अधिनियमात ‘ग्राहक’ याची व्याख्या देण्यात आली आहे. त्यानुसार ज्याच्या नावे वीज मीटर आहे तो तसेच त्या जागी वीजेचा उपभोग करणाराही ग्राहक या सज्ञेत मोडतो.
वरील सर्व निरीक्षणावरुन वीज मीटर जरी पूर्वीच्या मालकाच्या नावे असले तरी तक्रारदार हा वीज मीटर असलेल्या जागेचा ताबेदार आहे व वीजेचा वापर करीत आहे, त्यामुळे तक्रारदार हा ग्राहक नाही हे गैरअर्जदार यांचे म्हणणे मंच मान्य करीत नाही.
सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार मान्य करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या मीटरचा वीज पुरवठा 15 दिवसात कायम स्वरुपी बंद करावा.
- अर्जदाराने वीज पुरवठा खंडित करण्याची मागणी केलेल्या तारखे नंतरची सर्व बिले रद्द करण्यात यावी.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेतील त्रुटी व खर्चा बद्दल रुपये 2,000/- 30 दिवसात द्यावे.