(घोषित दि. 20.02.2014 व्दारा श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे परतूर येथील रहीवाशी असून, त्यांनी गैरअर्जदार यांचेकडून घरगुती वापरासाठी वीज जोडणी घेतलेली आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक 524010035804 असा आहे. तक्रारदार हे सन 2000 साला पासून गैरअर्जदारांचे ग्राहक आहेत. ऑक्टोबर 2012 पर्यंत तक्रारदारांनी नियमित विद्युत देयकांचा भरणा केलेला आहे.
नोव्हेंबर 2012 च्या विद्युत देयकात 21,596/- युनिटचे देयक तक्रारदारांना देण्यात आले. त्यात एकूण 21,454/- समायोजित युनिट दाखवून एकूण युनिट 43,050 दर्शविले आहेत. त्याच देयकात मागील रिडींग 1 व चालू रिडींग 143 असेही दर्शवलेले आहे व एकूण 2,58,270/- रुपयांचे बिल तक्रारदारांना देण्यात आले आहे. तक्रारदारांचा वीज वापर प्रतिमाह 100 युनिट पेक्षा जास्त नाही. अर्जदाराच्या मीटरवर वाचन उपलब्ध असताना समायोजित युनिट कसे दाखवले याचा बोध होत नाही.
ऑक्टोबर 2012 मध्ये देण्यात आलेल्या देयकात मागील रिडींग 5230 व चालू रिडींग 6407 होते. त्यावेळी तक्रारदाराचा मीटर क्रमांक 900145437 असा होता तर नोव्हेंबर मध्ये मीटर क्रमांक 7601946554 असा दाखवला आहे. तक्रारदारांचे मीटर घराबाहेर बसवले आहे. गैरअर्जदारांनी त्यांचे मीटर नोव्हेंबरमध्ये बदललेले दिसते. गैरअर्जदारांनी कोणत्या कालावधीसाठी उपरोक्त समायोजित युनिट दर्शवले त्याचा खुलासा गैरअर्जदारांनी केलेला नाही.
तक्रारदारांनी विद्युत देयके दुरुस्त करुन मिळण्या बाबत गैरअर्जदारांकडे पाठपुरवा केला. परंतु त्यांनी देयक दुरुस्त करुन दिले नाही. परंतु तक्रारदारांचा वीज पुरवठा खंडित केला अशा त-हेने गैरअर्जदारांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत कसूर केलेला आहे. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. त्याची नुकसान भरपाई म्हणून रुपये 36,000/- एवढया रकमेची मागणी तक्रारदार करत आहेत. तसेच नोव्हेंबर 2012 व डिसेंबर 2012 या कालावधीचे विद्युत देयक रद्द करुन मागत आहेत. तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत ऑक्टोबर 2012 ते जानेवारी 2013 ची बिले, पैसे भरल्याची पावती, त्यांनी गैरअर्जदारांना दिलेले अर्ज, स्थळ तपासणी अहवाल, गैरअर्जदारांची पत्रे आदी कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदारांनी तक्रारी बरोबरच खंडित केलेला वीज पुरवठा सुरु करावा म्हणून अंतरिम अर्ज (नि.6) ही दाखल केला होता तो मंचाने मंजूर केला आहे.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे जबाबानुसार तक्रारदारांचे मीटर नोव्हेंबर 2011 मध्ये बदलण्यात आले. मीटर बदलताना जुन्या मीटरवर 27861 ऐवढे वाचन होते. त्याचा फोटो ही घेण्यात आला आहे व त्याच समायोजित युनिटचे बिल तक्रारदारांना देण्यात आले ते बरोबर आहे. तक्रारदारांनी वापर केलेल्या परंतु न भरलेल्या युनिटचेच विद्युत देयक तक्रारदारांना दिलेले आहे. तक्रारदारांनी केवळ विद्युत देयके न भरता विद्युत पुरवठा सुरु रहावा या हेतूने तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ती नामंजूर करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार करतात. त्यांनी आपल्या जबाबासोबत, तक्रारदारांचे सी.पी.एल, मीटरच्या वाचनाचा फोटो इत्यादि कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.विपुल देशपांडे व गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री.जी.आर.कड यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन खालील मुद्दे स्पष्ट होतात.
- तक्रारदारांचा मीटर क्रमांक 900145437 होता. ते मीटर नोव्हेंबर 2012 ला बदलण्यात आले व त्याजागी मीटर क्रमांक 7601946554 बसवण्यात आले.
- तक्रारदारांना फेब्रूवारी 2012 पासून सप्टेबर 2012 पर्यंत 70 युनिटचे सरासरी देयक दिले जात होते. ऑक्टोबर 2012 मध्ये चालू रिडींग 6407 व मागील रिडींग 5230 असे दर्शवून एकूण 1177 युनिटचे समायोजित देयक तक्रारदारांना देण्यात आले ते तक्रारदारांनी भरले आहे.
- नोव्हेंबर 2012 मध्ये तक्रारदारांचे मीटर बदलले गेले व नवीन मीटरचे तक्रारदारांना अचानक 2,58,269/- रुपयांचे विद्युत देयक आले त्या देयकात (नि.4/2) मागील वाचन – 1, चालू वाचन 143 एकूण वापर 21,596 व समायोजित युनिट 21,454 असे विसंगत आकडे दाखवून एकूण 43,050 युनिटचे वरील रकमेचे देयक तक्रारदारांना गैरअर्जदारांनी दिले. मागील वाचन 1 व चालू वाचन 143 असताना 21,596 युनिटचा वापर गैरअर्जदारांनी कसा दाखवलेला आहे ? याचा बोध होत नाही.
- तसेच ऑक्टोबर 12 मध्ये मीटरवर 1177 युनिट वाचन होते व ते देयक मागील महिन्यांचे समोयोजित देयक होते त्याचा तक्रारदारांनी भरणा केलेला असताना पुन्हा नोव्हेंबर 2012 च्या बिलात समायोजित युनिट म्हणून 21,454 गैरअर्जदारांनी दर्शवले आहेत.
गैरअर्जदारांच्या वकीलांनी युक्तीवादात सांगितले की तक्रारदारांच्या मीटरच्या फोटोनुसार (नि.15/1) वरील वाचन बरोबर आहे. परंतु गैरअर्जदारांनी तक्रारदारांचे मीटर केव्हा बदलले याची तक्रारदारांना कल्पना नाही. मीटर बदलल्याचा अहवाल मंचा समोर दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी दाखल केलेल्या स्थळ तपासणी अहवाल (नि.4/6) वर तक्रारदारांच्या घरातील विद्युत उपकरणांची नोंद गैरअर्जदार यांनी घेतली आहे. त्यावरुन देखील तक्रारदारांचा वीज वापर 100 ते 150 युनिट प्रतिमाह असावा असे दिसते.
वरील विवेचना वरुन तक्रारदारांना नोव्हेंबर 2012 मध्ये देण्यात आलेले 43,050 युनिटचे देयक अवाजवी व अयोग्य आहे. त्यामुळे ते रद्द करणे न्यायेचित ठरेल. परंतु उपरोक्त विद्युत देयक बघता त्या महिन्याच्या तक्रारदारांचा वीज वापर 143 युनिट झालेला आहे. त्यामुळे तक्रारदारांना तेवढया युनिटचे नवीन देयक देणे आवश्यक आहे असा निष्कर्ष मंच काढत आहे.
- तक्रारदारांना दिलेल्या जानेवारी 2013 च्या विद्युत देयकांचे अवलोकन करता त्यांच्या देयकांवर “Commercial” असे नमूद केलेले दिसते आहे. तक्रारदारांनी गैरअर्जदारांच्या अधिका-यांना त्यांना घरगुती दराने विद्युत देयके द्यावीत असा तक्रार अर्ज (नि.18/1) दाखल केला आहे. त्यावर परतूर येथील कनिष्ठ अभियंता यांनी दिनांक 20.02.2012 रोजी वरील अधिका-यांना पत्र पाठवली आहे. त्यात “Found no Commercial use” स्पष्ट नमूद केलेले आहे. त्यामुळे तक्रारदारांना घरगुती दराने विद्युत देयके देण्याचा आदेश देणे न्यायोचित ठरेल असे मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
- तक्रारदारांना दिलेले नोव्हेंबर 2012 चे विद्युत देयक रद्द करण्यात येत आहे. गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना नोव्हेंबर 2012 चे 143 युनिटचे विद्युत देयक आदेश प्राप्ती पासून तीस दिवसात द्यावे.
- गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी डिसेंबर 2012 पासून तक्रारदारांना त्यांच्या वीज वापरानुसारच व घरगुती दराने विद्युत देयके द्यावीत.
- खर्चा बाबत आदेश नाही.