(घोषित दि. 24.03.2014 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असून त्यांनी घरगुती वापरासाठी 2003 मध्ये वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी नवप्रकाश योजने अंतर्गत लाभार्थी म्हणून जुन्या थकबाकीपोटी 5,000/- रुपये भरले. गैरअर्जदार यांनी फेब्रूवारी 2012 मध्ये त्यांचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे अर्जदाराने पुनर्रजोडणीसाठी अर्ज केला. गैरअर्जदार यांनी पुनर्रजोडणी करुन न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी 2003 मध्ये गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी आधी दिलेला ग्राहक क्रमांक (R-038502) बदलून नवीन ग्राहक क्रमांक (510030385029) अर्जदारास दिला. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी नियमितपणे वीज बिलाचा भरणा केला असताना देखील गैरअर्जदार यांनी त्यांना ऑगस्ट 2008 मध्ये 43,991/- रुपयाचे वीज बिल आकारले. गैरअर्जदार यांनी थकबाकी वसुलीसाठी नवप्रकाश योजना सुरु केली होती. या योजने अंतर्गत 10,000/- रुपयापेक्षा अधिक रकमेची थकबाकी असणा-या ग्राहकाने 5,000/- रुपये भरल्यास त्यांचा वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्यात येईल. या योजने अंतर्गत अर्जदारास लाभार्थी म्हणून समावून घेण्यात आले. या योजनेतील अटीनुसार अर्जदाराने पुढील काळातील वीज बिल भरले. एप्रिल 2012 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा वीज पुरवठा मागील थकबाकी भरली नसल्याचे कारण दाखवून खंडित केला. याबाबत केलेल्या तक्रारीची गैरअर्जदार यांनी दखल न घेतल्यामुळे व अद्यापर्यंत वीज पुरवठा खंडित असल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्याची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत नवप्रकाश योजने अंतर्गत 5,000/- रुपये भरल्याची पावती व त्या पुढील काळातील वीज बिल भरल्याची पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदार नियमितपणे वीज बिलाचा भरणा करीत असल्याचे व ऑगस्ट 2008 मध्ये चुकीचे वीज बिल आकारण्यात आल्याचे त्यांना मान्य नाही. नवप्रकाश योजने अंतर्गत लाभार्थी असणा-या ग्राहकांनी या योजनेतील अटी व शर्ती नुसार वीज बिलाचा भरणा नियमितपणे करणे बंधनकारक आहे. या योजनेतील लाभार्थीने जर नियमितपणे वीज बिल भरणा केला नाही तर मूळ थकबाकी वसूल करण्यात येईल असे या योजनेत म्हटले आहे. अर्जदाराने या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुढील वर्षभरात नियमितपणे वीज बिलाचा भरणा केलेला नसल्यामुळे त्यांना जुन्या थकबाकीचे बिल आकारण्यात आले व ते योग्य असल्याचे गैरअर्जदार यांनी जवाबात म्हटले आहे. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार मुदतबाहय असून वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे ते ग्राहक होऊ शकत नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
गैरअर्जदार यांनी जवाबासोबत नवप्रकाश योजनेची प्रत जोडली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की,
गैरअर्जदार यांनी अर्जदारास डिसेंबर 2003 मध्ये घरगुती वापरासाठी वीज पुरवठा दिलेला आहे त्यांचा ग्राहक क्रमांक 510030385029 असा असून मीटर क्रमांक 9001599663 असा आहे.
वीज पुरवठा घेतल्यानंतर अर्जदाराने जून 2004 या कालावधीचे 430/- रुपयाचे वीज बिल दिनांक 02.07.2004 रोजी भरल्याचे सी.पी.एल वरुन दिसून येते. पण त्यानंतर 2004 ते जानेवारी 2008 या काळात अर्जदाराने वीज बिल भरलेले नाही. त्यामुळे फेब्रूवारी 2008 मध्ये त्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आल्याचे व अर्जदाराकडे एकूण थकबाकी 43915=87 रुपये असल्याचे सी.पी.एल वरुन दिसून येते.
वीज ग्राहकाकडून जुनी थकबाकी वसूल करण्याच्या हेतूने गैरअर्जदार यांनी नवप्रकाश योजना सुरु केली. या योजनेनुसार 10,000/- रुपयाच्यावर थकबाकी असल्यास ग्राहकाने 5,000/- रुपये भरल्यास ते या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात. परंतु पुढील एका वर्षाच्या कालावधीचे वीज बिल नियमितपणे भरणे लाभार्थी ग्राहकास बंधनकारक आहे. अर्जदाराने या योजने अंतर्गत दिनांक 27.08.2008 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे 5,000/- रुपयाचा भरणा केला व इतर बाबींची पूर्तता करुन त्यांचा वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला. अर्जदाराचा नवीन मीटर क्रमांक 76/1 0132926 असा आहे.
अर्जदाराने या योजनेचा लाभ घेतल्यानंतर सप्टेंबर 2008 ते जानेवारी 2009 या पाच महिन्यात वीज बिलाचा भरणा केलेला नाही हे सी.पी.एल वरुन स्पष्ट होते. फेब्रूवारी 2009 मध्ये अर्जदाराने 690/- रुपयाचा वीज बिल भरणा केल्यानंतर पुन्हा मार्च 2009 ते जून 2009 या काळात वीज बिल भरले नसल्याचे दिसून येते. अर्जदाराने जुलै 2009 ते मार्च 2010 या कालावधीचा मासिक बिलाचा भरणा केल्यानंतर एप्रिल 2010 नंतर वीज बिल भरले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे फेब्रूवारी 2012 मध्ये त्यांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला.
अर्जदार यांनी नवप्रकाश योजने अंतर्गत लाभार्थी होण्यासाठी गैरअर्जदार यांना हमीपत्र दिलेले आहे. त्यामध्ये पुढील एका वर्षाच्या कालावधीचे वीज बिल नियमितपणे भरण्याचे व ते न भरल्यास जुनी थकबाकी भरण्याची तयारी असल्याचे मान्य केले आहे. या योजनेतील अट क्रमांक 7 मध्ये या बाबीचा उल्लेख करण्यात आलेला दिसून येतो.
अर्जदाराने वीज बिल दुरुस्त करुन देण्याबाबत दिनांक 10.01.2012 व 24.02.2013 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार दाखल केलेली दिसून येते. ही तक्रार वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर केलेली दिसून येते. अर्जदाराच्या सी.पी.एल वरुन त्यांनी वीज पुरवठा घेतल्या नंतर वीज बिलाचा भरणा कधीच नियमितपणे केला नसल्याचे स्पष्ट होते.
वरील सर्व बाबीचे निरीक्षण केल्यावर अर्जदार हे जरी नवप्रकाश योजनेचे लाभार्थी असले तरी या योजनेतील अटी प्रमाणे त्यांनी पुढील एका वर्षाच्या कालावधीचा नियमितपणे भरणा केला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा वीज पुरवठा खंडित करण्याची केलेली कारवाई योग्य असल्याचे मंचाचे मत आहे.
मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत आदेश नाही.