(घोषित दि. 23.01.2013 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, प्र.अध्यक्ष)
अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी दिलेल्या वाढीव वीज बिलाबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा सरासरी वीज वापर 150 ते 180 युनिट आहे. ऑक्टोबर 2012 मध्ये गैरअर्जदार यांनी त्यांना 6504.67 रुपयाचे वीज बिल आकारले. या बिला विरुध्द त्यांनी दिनांक 05.11.2012 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे तक्रारी केली. परंतू गैरअर्जदार यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. गैरअर्जदार यांच्या या कृती विरुध्द अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून सुधारीत वीज बिल व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत वीज बिल, गैरअर्जदार यांना केलेली तक्रार इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदार हे त्यांचे ग्राहक असल्याचे त्यांना मान्य आहे. दिनांक 02.08.2012 रोजी अर्जदाराचे जुने मीटर बदलून त्याजागी नवीन मीटर बसविण्यात आले त्यावेळेस जुन्या मीटरवरील अंतिम रिडींग 4243 होते. अर्जदारास देण्यात आलेले वीज बिल योग्य असून त्यांना देण्यात आलेल्या सेवेत त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक 510030017623 असा आहे. गैरअर्जदार यांनी जानेवारी 2012 ते नोव्हेंबर 2012 या कालावधीचे सी.पी.एल. मंचात दाखल केलेले आहे. या सी.पी.एल. चे निरीक्षण केल्यावर असे आढळून येते की, अर्जदाराकडे लावण्यात आलेल्या जुन्या मीटरचा क्रमांक 65/04423906 असा आहे व या मीटरवरील नोंदी प्रमाणे त्यांना ऑगस्ट 2012 पर्यंत वीज बिल आकरण्यात आले आहे. ऑगस्ट 2012 मध्ये गैरअर्जदार यांनी आर.एन.ए.(RNA)स्टेटस दर्शवून अर्जदारास 150 युनिट सरासरीवर वीज बिल आकारणी केली आहे. सप्टेंबर 2012 मध्ये मागील रिडींग 1 व चालू रिडींग 359 असे दर्शवून 358 युनिट अधिक वीज मीटर बदल्यानंतरचा वापर 716 युनिट वापराचे वीज बिल दिले आहे. गैरअर्जदार यांनी जरी 2 ऑगस्ट 2012 रोजी मीटर बदलले असल्याचे म्हटले असले तरी मीटर बदली पुरावा दिलेला नाही. अर्जदाराच्या सी.पी.एल. वरुन जानेवारी 2012 ते जुलै 2012 या सात महिन्याच्या वीज वापरावरुन त्यांचा सरासरी वीज वापर 152 युनिट प्रतिमाह असल्याचे दिसून येते. अर्जदाराचा ऑक्टोबर 2012 व नोव्हेंबर 2012 या महिन्याच्या वीज वापराची सरासरी देखील या सरासरी एवढी असल्याचे दिसून येते.
वरील सर्व निरीक्षणावरुन व गैरअर्जदार यांनी जुन्या मीटर वरील अंतिम रिंडींगबाबत योग्य तो पुरावा दाखल न केल्यामुळे सप्टेबर 2012 या महिन्याचे 716 युनिट वापराचे वीज बिल चुकीचे असल्याचे मंचाचे मत आहे. सप्टेबर 2012 या महिन्याच्या वीज बिलाची आकारणी ही सरासरी वीज वापराच्या आधारावर करणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे.
आदेश
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेले सप्टेंबर 2012 चे वीज बिल रद्द करण्यात येते.
- गैरअर्जदार यांनी सप्टेंबर 2012 या महिन्याचे वीज बिल 152 युनिट प्रमाणे आकारावे व अर्जदारास 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे.
- वरील प्रमाणे देण्यात येणा-या सुधारीत वीज बिलात व्याज व दंड आकारण्यात येऊ नये.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेतील त्रुटी बद्दल व खर्चा बद्दल रुपये 500/- तिस दिवसात द्यावे.