(घोषित दि. 20.09.2012 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, प्र.अध्यक्ष)
अर्जदार हे गैरअर्जदार महावितरण कंपनीचे ग्राहक असून गैरअर्जदार यांनी आकारलेल्या चुकीच्या वीज बिलाबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी घरगुती वापरासाठी गैरअर्जदार यांच्याकडून वीज पुरवठा घेतला आहे. त्यांच्या घराचे बांधकाम चालू असताना वीज मीटर चोरीस गेले, याबाबत त्यांनी संबंधित पोलीस स्टेशमध्ये तक्रार केली. गैरअर्जदार यांना नवीन मीटरची मागणी केल्यानंतर त्यांनी 1,120/- रुपये भरण्यास सांगितले. अर्जदाराने ही रक्कम भरल्यानंतर गैरअर्जदार यांनी नवीन मीटर बसविले. गैरअर्जदार यांनी त्यानंतर दिलेल्या वीज बिलात मागील थकबाकी 3,390/- रुपये दाखवली. याबाबत तक्रार केली असता त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. दिनांक 19.09.2008 रोजी गैरअर्जदार यांच्या लाईनमनने मीटर व्यवस्थित चालू नसल्याचे सांगितल्यामुळे यांनी कनिष्ठ अभियंता यांच्याकडे अर्ज केला व मीटर बदलून देण्याची मागणी केली. सप्टेबर ते ऑगस्ट 2011 या कालावधीत गैरअर्जदार यांनी त्यांना सरासरीवर आधारीत वीज बिल भरणा करावयास सांगितला. मागील तीन वर्षाच्या काळात अंदाजे 20,000/- रुपये व्याज व जुने 3,390/- रुपयाचे बिल भरण्यास गैरअर्जदार आग्रह करीत असून ते न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याची धमकी देत आहेत. गैरअर्जदार यांना हे बिल वसूल न करण्याचे आदेश तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्याची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने या चुकीच्या वीज बिलापोटी त्यांचा वीज पुरवठा खंडीत करु नये असा अंतरिम आदेश देण्याची विनंती करणारा अर्ज मंचात दाखल केला आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत, त्यांनी गैरअर्जदार यांना दिलेले पत्र, वीज बिलाच्या प्रती जोडल्या आहेत.
अर्जदाराने वीज पुरवठा खंडीत करु नये म्हणून दाखल केलेल्या अर्जावर मंचाने दिनांक 23.02.2012 रोजी सुनावणी घेऊन गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा वीज पुरवठा तक्रारीचा निकाल जाहिर होईपर्यंत खंडीत करु नये असा अंतरिम आदेश पारित केला.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी अर्जदारास घरगुती वापरासाठी वीज पुरवठा दिला असल्याचे मान्य केले आहे. अर्जदाराने स्वत: तक्रारीत वीज वापर हा घरबांधकामासाठी केलेला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्या काळाचे वीज बिल त्यांनी वाणिज्य दराप्रमाणे भरावयास पाहिजे. अर्जदाराचे मीटर व्यवस्थित काम करीत नसल्याचे आढळून आल्यामुळे त्यांनी मीटर बदलून दिले व अर्जदारास सरासरीवर अधारीत वीज बिल आकारणी केली आहे. अर्जदारास त्यांनी ऑगस्ट 2011 मध्ये 9539.35 व व्याजाचा 4834.57 रक्कम कमी करुन दिलेली आहे. अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी नसून अर्जदार नियमितपणे वीज बिलाचा भरणा करीत नसल्याचे सांगून अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्याचा ग्राहक क्रमांक 510030411844 असा असून त्यांच्याकडे 9001476462 क्रमांकाचे मीटर लावण्यात आले होते. दिनांक 01.06.2007 रोजी घराचे बांधकाम करीत असताना त्यांचे वरील क्रमांकाचे मीटर चोरीस गेले ज्याची नोंद संबंधित पोलीस स्टेशमध्ये केलेली दिसून येते. अर्जदाराने दिनांक 08.03.2007 रोजी 1,120/- रुपये भरल्यानंतर गैरअर्जदार यांनी 9004774195 या क्रमांकाचे नवीन मीटर दिले. गैरअर्जदार यांनी मंचात अर्जदाराचे जानेवारी 2007 नंतरचे सी.पी.एल दाखल केले आहे. या सी.पी.एल चे निरीक्षण केल्यावर जानेवारी 2007 ते फेब्रूवारी 2007 या महिन्यात आर.एन.ए स्टेटस दर्शवून अर्जदारास 30 युनिट प्रतिमाह या प्रमाणे सरासरीवर अधारीत वीज बिल देण्यात आलेले दिसून येते. जानेवारी 2007 च्या आगोदरचे सी.पी.एल दाखल करण्यात आलेले नसल्यामुळे अर्जदारास मागील किती महिन्यापासून सरासरीवर अधारीत बिल येत होते, किंवा मीटर रिडींग प्रमाणे केव्हा पर्यंत देण्यात आलेले आहे याचा अंदाज काढता येत नाही. गैरअर्जदार यांनी मार्च 2007 चे बिल आकारताना जानेवारी 2007 व फेब्रूवारी 2007 या महिन्याचे सरासरी वीज बिलाचे क्रेडीट दिलेले दिसून येत नाही. त्यामुळे मागील थकबाकी म्हणून दाखविण्यात आलेले 2863.08 रुपये व व्याजाचे 303.37 रुपये योग्य असल्याबाबत कोणताही पुरावा गैरअर्जदार यांनी दाखल केला नसल्यामुळे ते मान्य करता येत नाही.
एप्रिल 2007 ते मे 2008 या कालावधीत गैरअर्जदार यांनी अर्जदारास मीटर वरील रिडींग प्रमाणे वीज बिल आकारले आहे. अर्जदाराची देखील या बिला बाबत तक्रार नाही.
जून 2008 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास मागील रिडींग 2008 व चालू रिडींग 4102 दर्शवून 1894 युनिट वीज वापराचे बिल आकारले जुलै 2008 ते ऑक्टोबर 2008 या काळात आर.एन.ए स्टेटस दाखवून गैरअर्जदार यांनी अर्जदारास 430 युनिट वीज वापराचे सरासरीवर आधारीत बिल आकरल्याचे दिसून येते. अर्जदाराने या मीटरबाबत दिनांक 19.09.2008 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली. उप कार्यकारी अभियंता यांच्यातर्फे अर्जदाराच्या मीटरची तपासणी करुन ते अबनॉर्मल रिडींग दाखवित असल्याचे दिनांक 14.10.2008 च्या अहवालावरून स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी याची दखल घेऊन अर्जदाराचे जुने मीटर क्रमांक 9004774195 बदलून त्या जागी 9010134702 या क्रमांकाचे नवीन मीटर दिनांक 14.10.2008 रोजी बसविले. ऑक्टोबर 2008 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या वीज बिलात 28660.95 थकबाकी दाखविलेली दिसून येते. नोव्हेंबर 2008 च्या वीज बिलात गैरअर्जदार यांनी अर्जदारास 249 युनिट वीज वापराचे बिल आकाराताना 7783.66 रुपयाचे क्रेडीट दिले असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी सदरील क्रेडीट देताना जून 2008 ते सप्टेंबर 2008 या काळात 150 युनिट प्रतिमाह असा नवीन मीटर वरील वीज वापराप्रमाणे सरासरी नुसार रिडींग घेतल्याचे दिसून येते जे योग्य असल्याचे मंचाचे मत आहे. डिसेंबर 2008 ते फेब्रूवारी 2012 पर्यंत अर्जदाराकडे दिनांक 14.10.2008 रोजी लावण्यात आलेले 10134702 या क्रमांकाचे मीटर कार्यरत आहे व त्यावरील नोंद करण्यात आलेल्या वीज वापराबाबत दोन्ही पक्षात वाद नसल्याचे दिसून येते.
वरील सर्व निरीक्षणावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास जानेवारी 2007, फेब्रूवारी 2007 तसेच जून 2008 ते ऑक्टोबर 2008 या काळात सरासरीवर व वाढीव वीज बिल आकारणी केली असल्याचे स्पष्ट होते. अर्जदारास जरी सुधारीत बिल देण्यात आलेले नसले तरी त्यांनी वेळोवेळी वीज बिलाचा भरणा केलेला दिसून येतो त्यामुळे अर्जदार हे नियमित बिल भरत नाही व वीज बिल टाळण्याच्या उद्देशाने त्यांनी ही तक्रार केली आहे हे गैरअर्जदार यांची म्हणणे मंच मान्य करीत नाही. मार्च 2007 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास नवीन मीटर क्रमांक 9004774195 वर रिडींग नुसार बिल आकारणी केली आहे. परंतू या बिलामध्ये मागील काळातील सरासरीवर अधारीत वीज बिलाची रक्कम वजा केलेली दिसून येत नाही. त्यामुळे मार्च 2007 च्या वीज बिलात दाखविलेली थकबाकी रक्कम रद्द करण्यात येत आहे. सी.पी.एल नुसार मार्च 2007 पुढील काळासाठी अर्जदाराचा एकूण वीज वापर खालील प्रमाणे असल्याचे दिसून येते.
मार्च 2007 ते मे 2008 (मीटर क्रमांक 9004774195) | 2207 युनिट (15 महिने) |
जून2008 ते सप्टेबर 2008 (सरासरीवर आधारीत) | 150 * 4 = 600 (4 महिने) |
ऑक्टोबर 2008 ते फेब्रूवारी 2012 (मीटर क्रमांक) 9010134702 | 6492 |
वरील निरीक्षणावरुन अर्जदाराने मार्च 2007 ते फेब्रूवारी 2012 या काळात 2207 + 600 + 6492 = 9299 युनिट वीज वापर केला असल्याचे दिसून येते. अर्जदाराने आपल्या तक्रारीत दिनांक 25.07.2011 ते 23.02.2012 पर्यंत on Account रक्कम भरलेली असल्याचे म्हटले आहे व या भरलेल्या रकमेची सी.पी.एल मध्ये नोंद घेण्यात आलेली दिसून येते. वरील सर्व निरीक्षणावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेले मार्च 2007 मधील थकबाकी असलेले 2863.08 रुपयाचे बिल रद्द करण्यात येते.
- गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या वीज बिलात मार्च 2007 ते फेब्रूवारी 2012 पर्यंत आकारलेले एकूण व्याज 9478.57 रुपये रद्द करण्यात येते.
- मार्च 2007 ते फेब्रूवारी 2012 या काळात अर्जदाराने 9299 युनिट वीज वापर केला आहे व त्यापोटी on Accountरक्कम देखील भरलेली आहे. गैरअर्जदार यांनी या रकमेची वजावट करुन सुधारीत वीज बिल 30 दिवसात द्यावे.
गैरअर्जदार यांनी अर्जदारास खर्चा बद्दल रुपये 1,000/- 30 दिवसात द्यावे.