निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 15/11/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 15/11/2011
तक्रार निकाल दिनांकः- 18 /03/2013
कालावधी 01 वर्ष 04 महिने 03 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर. B.Tech. MBA. DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
अड.कु.शांती पांडूरंग काळे (सेक्रेटरी वकील संघ परभणी) अर्जदार
वय 28 वर्षे. धंदा वकीली. स्वतः
रा.अहुजा कॉम्प्लेक्स,प्लॉट क्रमांक 11 वसमत रोड,परभणी.
विरुध्द
1 उप कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
शहरी भाग,परभणी. अड.एस.एस.देशपांडे.
2 कार्यकारी अभियंता, परभणी.
महाराष्ट्र स्टेट डि.कं.लि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराने तीच्या भावाच्या नावे असलेल्या मिटर वरील विद्युत पुरवठा गैरअर्जदारांनी खंडीत केला आहे व तो पुर्ववत सुरु करावा म्हणून ही तक्रार या मंचासमोर दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, नरहरी पांडुरंग काळे हे गैरअर्जदाराचे ग्राहक क्रमांक 446731 या नात्याने विज वितरण कंपनी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कं. यांचे ग्राहक आहेत.अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, नरहरी पांडुरंग काळे हे त्याचे भाऊ आहेत व संयुक्त कुटूंब पॉलिसी नुसार दावा दाखल करण्याचा अधिकार व हक्क तीला पोहचतो व तसेच अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, त्याचे भाऊ नरहरी पांडुरग काळे हे स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही, म्हणून अर्जदाराची बहीण या नात्याने सदरची तक्रार दाखल करण्याचा हक्क आहे. हे की, अर्जदाराचे हे म्हणणे की इलेक्ट्रीसिटी अक्ट नुसार कोणताही विद्युत पुरवठा खंडीत करण्या अगोदर ग्राहकास 15 दिवसांची मुदत देणे आवश्यक आहे व तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास नोटीस न देता दिवाळी पूर्वी दोन दिवसां अगोदर अनधिकृतपणे त्याच्या भावाचे नावे असलेल्या मिटरचा विद्युत पुरवठा खंडीत केला व गुन्हा घडविला, त्यामुळे अर्जदाराच्या धार्मिक भावना दुखावल्या असे म्हणणे आहे, तसेच मंचास विनंती केली आहे की, ताबडतोब विज पुरवठा सुरु करण्याचा आदेश द्यावा व दाव्याच्या खर्चापोटी रु.5,000/- व नुकसान भरपाई रु.10,000/- द्यावे,अशी विनंती केली आहे.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.क्रमांक 4 दाखल केलेले आहे.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गेरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी आपले लेखी म्हणणे नि.क्रमांक 12 वर दिनांक 03/04/2012 रोजी दाखल केले.व तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी लेखी म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 13 वर आपले शपथपत्र दाखल केले.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी आपले लेखी जबाबात असे म्हणणे दाखल केले आहे की, अर्जदारास कोणत्याही प्रकारची त्रुटीची सेवा दिलेली नाही व तसेच अर्जदार हे विज कंपनीचा ग्राहक नसल्यामुळे सदरील मंचास प्रस्तुतची तक्रार विचारात घेता येत नाही. म्हणून तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा, असे म्हंटले आहे,तसेच गैरअर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने अपुरी तक्रार दाखल केलेली आहे व विज पुरवठा कोणत्या तारखेस खंडीत झाला व त्याची जोडणी कोणत्या तारखेस झाली या विषयी कोणतीही माहिती वा पुरावा दाखल केलेला नाही, त्याचे असे ही म्हणणे आहे की, अर्जदाराने दिनांक 01/11/2008 पासून कधीही बील भरलेले नाही वारंवार सुचना देवुनही बील भरलेले नाही म्हणून गैरअर्जदार खर्चास पात्र नाही.
गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारची त्रुटी दिलेली नाही तरी प्रस्तुत तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
तक्रार अर्ज,अर्जदाराने दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व तसेच गैरअर्जदाराने दाखल केलेला जबाब याची पाहणी केली असता व युक्तीवाद ऐकला असता
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 अर्जदारास गैरअर्जदारा विरुध्द तक्रार करण्याचा अधिकार
आहे काय ? नाही.
2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणे
मुद्या क्रमांक 1 व 2
अर्जदार ही मुळ ग्राहक नरहरी पांडुरंग काळे यांची बहीण आहे अर्जदार ही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (1) (b) प्रमाणे तक्रारदार या संज्ञेत येत नाही. अर्जदारा जवळ तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी लागणारे ग्राहकांना दिलेले अधिकारपत्र व तसेच या कायद्याच्या कलम 2 (1) (d) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत येत नाही.अर्जदाराने तीच्या भावाच्या नावे असलेल्या मिटरवरुन गैरअर्जदारांनी विद्युत पुरवठा केंव्हा खडीत केला हे देखील आपल्या तक्रारीत म्हंटलेले नाही वा कोणताही पुरावा या मंचासमोर सादर केलेला नाही तसेच अर्जदाराने तक्रार दाखल करते वेळेस दिनांक 21/11/2011 रोजीच्या अर्जदाराच्या भावाच्या नावे असलेल्या विद्युत देयकावर असे आढळून येते की, अर्जदाराचे भाऊ नरहरी पांडुरंग काळे यांचे रु.6,880/- एवढे बील थकीत आहे, तसेच असे निदर्शनास येते की, अर्जदाराने त्याच्या तक्रारी सोबत कोणताही सबळ व ठोस पुरावा दाखल केलेला नाही, म्हणून सदरची तक्रार ही या मंचास योग्य वाटत नाही तसेच अर्जदार हा कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाही, असे या मंचास वाटते, सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत.
आदेश
1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे.
2 अर्जदार व गैरअर्जदारांनी तक्रारीचा खर्च आपापला सोसावा.
3 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
सदस्य अध्यक्ष