Final Order / Judgement | ::: आ दे श ::: ( पारीत दिनांक :20.03.2017 ) आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार प्रकरणात उभय पक्षांतर्फे दाखल सर्व दस्तांचे बारकाईने अवलोकन करुन व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकुन काढलेल्या निष्कर्षाचा अंतीम आदेशाच्या वेळी विचार करण्यात आला. - दाखल कागदपत्रांवरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होत असल्याने, व यावर विरुध्दपक्षाचा आक्षेप नसल्याने तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असल्याचे ग्राह्य धरण्यात येत आहे.
- तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून घरगुती विद्युत पुरवठा वर्गवारी एल.टी.1, रहीवासी प्रयोजनाअंतर्गत दि. 21/3/1989 रोजी घेतला आहे. विद्युत पुरवठा देतांना विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या घरात दोन स्वतंत्र विद्युत मिटर, ज्याचे ग्राहक क्रमांक 310230652774 व 310230658853 प्रमाणे बसविले. वरील एका मिटर मधुन तीन खोल्यांसाठी व दुस-या मिटर मधुन दोन खोल्यांना विद्युत भार दिला होता. दि. 28/8/2013 पर्यंत दोन्ही मिटरचे तक्रारकर्त्याला नियमित देयके, योग्य वाचनाची येत होती व ती तक्रारकर्त्याने वेळेमध्ये भरली आहेत. दि. 28/8/2013 रोजी विरुध्दपक्ष यांचे कर्मचारी यांनी तक्रारकर्त्याच्या घरातील जुने मिटर काढून, त्या जागी दोन इलेक्ट्रानिक मिटर, ज्याचे क्रमांक 9801546100 व 9801526098 बसविले. त्यानंतर रिडींगमध्ये अनियमितता जाणविल्यामुळे तक्रारकर्त्याने दि. 25/10/2013 रोजी विरुध्दपक्ष यांचेकडे लेखी अर्ज देवून रिडींगनुसार बिले देण्यात यावी, अशी मागणी केली. दि. 18/1/2016 रोजी कौलखेड फ्युज कॉल सेंटरवरील कर्मचारी श्री गव्हाणकर यांनी तक्रारकर्त्याच्या घरी येवून मिटरची व विजेच्या उपकरणांच्या भाराची तपासणी केली. या बाबत चौकशी केली असता, सदर कर्मचा-याने सांगितले की, इलेक्ट्रानिक मिटर बसवितांना दोन्ही मिटरचे क्रमांक चुकून वेगळया ग्राहक क्रमांकावर नमुद केल्या गेले आहेत. त्यानंतर विरुध्दपक्ष यांचे अभियंता यांनी पुन्हा तक्राकरर्त्याच्या घरी येवून मिटरची तपासणी केल्यावर दोन्ही इलेक्ट्रानिक मिटर बसवितांना, चुकीच्या पध्दतीने जोडणी करण्यात आली आहे व एका मिटर मधुन आऊट गोइंग वायर न काढता दुस-या मिटरला टॅपींग करण्यात आली आहे व समांतर जोडणी केल्यामुळे प्रत्यक्ष विजेचा वापर हा एकाच मिटरवरुन संपुर्ण घराला सुरु झाला. त्यामुळे तक्रारकर्त्याकडून दुप्पट वापराची रक्कम वसुल केल्या गेलेली आहे. कंत्राटदारामार्फत हलगर्जीपणाने मिटर बसविण्याचे काम केल्यामुळे व विरुध्दपक्ष यांनी दुर्लक्ष केल्यामुळे तक्रारकर्त्यास प्रचंड शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास झालेला आहे. विरुध्दपक्षाने आपली चुक लपविण्याकरिता मिटर रिडींग उपलब्ध असल्यानंतरही आरएनए/आरएनस सी सी असे शेरे मारले आहेत. त्यानंतर ग्राहक क्रमांक 310230652774 याचे एका महिन्याच्या विज वापराचे, म्हणजे जानेवारी 2016 च्या बिलासाठी 8440 एवढया प्रचंड युनिटचे वापराचे रु.1,30,000/- चे बिल दि. 12/2/2016 चे तक्रारकर्त्याला दिले. या बिलावर तक्रारकर्त्याने आक्षेप नोंदविल्यानंतर विरुध्दपक्ष यांनी बिल कमी करुन रु.68585/- भरण्यास तक्रारकर्त्याला सांगीतले. सदर देयक सुध्दा चुकीचे असल्याचे विरुध्दपक्षाला सांगितले असता, त्यांनी दि. 22/2/2016 रोजी तक्रारकर्त्याकडून एक अर्ज लिहून घेतला, ज्यात विज देयकाची विभागणी करुन द्यावी, असे तक्रारकर्त्याकडून लिहून घेतले. त्यानंतर पुन्हा सुधारीत / दुरुस्त बिल रु. 57710/- चे दि. 23/2/2016 रोजी तक्रारकर्त्याला दिले. सदरहु सुधारित देयक सुध्दा तक्रारकर्त्याला मान्य नव्हते. विरुध्दपक्ष यांनी कुठलाही तपशिल पुरविण्यास स्पष्टपणे नकार दिला. तक्रारकर्त्याने दुस-या मिटरचे देयक पुर्णपणे भरलेले आहे. चुकीच्या पध्दतीने मिटरची जोडणी करणे, एकाच मिटरवर संपुर्ण घराचा विद्युतभार जोडून दोन मिटर नुसार त्याची देयके वसुल करणे, मिटरची देखभाल न करणे, कुठलीही माहीती व तपशिल न पुरविणे, चुकीचे देयक भरण्याचा तगादा लावणे व गैरकायदेशिरित्या विद्युत पुरवठा खंडीत करण्याची धमकी देणे, इत्यादि सेवेतील त्रुटी व हयगय विरुध्दपक्ष यांनी केली असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी व अनुचित व्यापर पध्दतीचा अवलंब केला, असे घोषीत करावे. विरुध्दपक्षाने निर्गमित केलेले माहे जानेवारी 2016 चे ग्राहक क्र. 310230652774 चे चुकीचे देयक व त्यानंतर दुरुस्ती देयक हे पुर्णपणे रद्द करण्यात यावे. तक्रारकर्त्याकडून वसुल करण्यात आलेली दुप्पट रक्कम पुर्ण हिशोब देवून तक्रारकर्त्याला परत करण्यात यावी. मिटरची जोडणी ही निर्दोष करुन विज देयकामध्ये दर्शविलेल्या चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यात याव्या. इलेक्ट्रानिक मिटर बसविल्यापासूनच्या देयकांचा संपुर्ण लेखाजोखा तक्रारकर्त्याला पुरविण्यात यावा. तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. 1,00,000/- देण्याचा आदेश व्हावा.
- यावर, विरुध्दपक्षाने त्यांच्या जबाबात असे नमुद केले की, तक्रारकर्त्याच्या इमारतीवर मिटर क्रमांक 6402129 इएडब्ल्यु कंपनीचे उभारण्यात आले होते. सदरचे मिटर दि. 28/8/2013 रोजी अंतीम वाचन 27484 वर बदली करुन, त्या जागी नवीन मिटर क्रमांक 1526098 फ्लश कंपनीचे एक युनीटवर उभारण्यात आले. सदरचा विद्युत पुरवठा घेतल्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षकडून ग्राहक क्र. 310230658853 अन्वये दि. 6/11/1989 रोजी नव्याने अधिकचा विज पुरवठा त्याच इमारतीमध्ये घेतला होता. सदर विज पुरवठयाचा वापर नोंदविण्याकरिता तक्रारकर्त्याच्या इमारतीवर मिटर क्र. 4584577 केडब्ल्युएच कंपनीचे अंतीम वाचन 75249 वर बदली करुन त्या जागी नवीन मिटर क्र. 1526100 फ्लश कंपनीचे 1 युनिटवर उभारण्यात आले. सदर मिटर बदलीचे काम कंत्राटदारामार्फत करुन घेण्यात येत होते. त्यामध्ये कंत्राटदाराच्या कर्मचा-याने नजर चुकीने ग्राहक क्र. 310230652774 मधील मिटर क्र. 1526100 वर हे जोडले असून त्यावर इमारतीमधील सर्व जोडभार जोडला गेलेला होता, तसेच ग्राहक क्र. 310230658853 करिता मिटर क्र. 1526098 हे लावण्यात आले असून त्यामधील बाह्य स्त्रोतामधील विज पुरवठा हा विद्युत भारात न जाता, ग्राहक क्रमांक 310230652774 चे बाह्य स्त्रोतात जोडल्या गेला. अशा प्रकारामुळे ग्राहक क्रमांक 310230658853 हयावर कोणत्याही प्रकारचा विजेच्या वापराची नोंद मिटरमध्ये होत नव्हती. दि. 27/2/2016 रोजी विरुध्दपक्ष यांचे कर्मचा-यांनी सदरच्या विज पुरवठयाची तपासणी केली असता, सदरची बाब ही उघडकीस आली, त्यानुसार ग्राहकाचे मिटरमध्ये झालेली चुकीची दुरुस्ती ग्राहक व त्यांचा कंत्राटदार यांचे समक्ष विरुध्दपक्ष कर्मचा-यांनी दि. 27/2/2016 रोजी करुन दिली. सदरच्या तपासणीच्या वेळी मिटर क्र. 1526100 यावर 10077 असे मिटर वाचन आढळून आले तसेच मिटर क्रमांक 1526098 यावर 1475 असे मिटर वाचन आढळून आले. तक्रारकर्त्याने देयक दुरुस्त करुन देण्याबाबत दिलेल्या अर्जाचे अनुषंगाने विरुध्दपक्षाने ग्राहक क्रमांक 310230658853 हया ग्राहक क्रमांकाकरिता माहे ऑगस्ट 2013 ते फेब्रुवारी 2016 या कालावधीत आकारण्यात आलेल्या देयकामधील विद्युत शुल्क व इतर आकार हा पुर्णतः रद्दबादल करुन संबंधीत कालावधीकरिता फक्त स्थीर आकाराचे आकारणी केली. तसेच सदरच्या ग्राहक क्रमांकासंबंधी भरणा केलेली रक्कम ही त्या बिलाध्ये कमी केले. ग्राहक क्र. 31023065274 च्या देयकामध्ये वजावट केलेली आहे. तसेच ग्राहक क्र. 310230652774 हया ग्राहक क्रमांकासंबंधी मिटरवर नोंदविलेले वाचन हे एकुण 30 महिन्याच्या कालावधीत विभागून ग्राहकाने भरणा केलेली रक्कम व ग्राहक क्र. 310230658853 मधील अतिरिक्त रक्कम रु. 12005/- जिचा भरणा केला होता, ती रक्कम ग्राहक क्रमांकाच्या देयकामधुन वजा करुन तक्रारकर्त्यास रु. 76380/- ची वजावट विरुध्दपक्षाने यापुर्वीच करुन दिलेली आहे. दि. 21/1/2016 चे रु. 1,30,355/- चे देयकाबाबत तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार 50 टक्के रक्कम भरण्यास संमती दर्शविली होती व त्यानुसार देयकाचे अंतीम आकारणी करेस्तोवर भरणा करण्यास संमती दिली होती व त्यानुसार सदरचे देयक तयार करण्यात आले. परंतु देयकामधील रक्कम विचारात घेता, तक्रारकर्त्याने त्याचा भरणा करण्यास नकार दिल्याने विरुध्दपक्षाचे कर्मचा-यांनी सदरच्या देयकाला अंतीम स्वरुप दिले नाही व त्यावर कोणत्याही संबंधीत अधिका-याने आपली स्वाक्षरी केलेली नाही, परंतु देयकावर रक्कम नमुद होऊन रक्कम स्विकारण्याबाबत शिक्का लावला गेलेला आहे. तक्रारकर्त्याने दिलेल्या नोटीसला खुलासेवार जबाब विरुध्दपक्षाने यापुर्वीच दिलेला असून, दुरुस्त करण्यात आलेले देयक हे तक्रारकर्त्याच्या विनंतीनुसार करण्यात आले आहे. देण्यात आलेले देयक हे कंत्राटदाराच्या कर्मचा-याच्या चुकीच्या वायरींगमुळे उदभवलेले हेाते व त्याबाबतची दुरुस्ती विरुध्दपक्षाने यापुर्वीच करुन दिली आहे. देयकाचा भरणा टळावा या उद्देशाने सदरचे प्रकरण दाखल केले आहे, सबब ते खर्चासह खारीज करण्यात यावे.
- उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकल्यावर मंचाने दाखल दस्तांचे अवलोकन केले.
- तक्रारकर्त्याने त्यांच्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे दि. 25/10/2013 रोजीच विरुध्दपक्षाकडे तक्रार करुन, मिटर क्र. 9801546100 या मिटरवरील रिडींग बद्दल आक्षेप नोंदविला होता. तक्रारकर्त्याच्या सदर अर्जाची दखल दि. 18/1/2016 पर्यंत, म्हणजे जवळपास सव्वा दोन वर्षे, विरुध्दपक्षाने घेतली नसल्याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. विरुध्दपक्षातर्फे दाखल प्रतिज्ञालेखात तक्रारकर्त्याच्या देयकाबाबत आलेल्या तकारीनुसार व त्याच्या मिटरच्या उभारण्याच्या वेळी विजेच्या वापराची चुकीची उभारणी, यामुळे झालेली देयकाची चुक ही दुरुस्त करण्यात आली. परंतु तक्रारकर्त्याच्या दि. 25/10/2013 च्या तक्रारीची दखल विरुध्दपक्षाने दि. 18/1/2016 रोजी, म्हणजे अती विलंबाने घेतल्याचे स्पष्ट होते.
- विरुध्दपक्षाने त्यांच्या जबाबात, प्रतिज्ञालेखात, युक्तीवादाच्या वेळी, तक्रारकर्त्याचे मीटर बदली करतेवेळी कंत्राटदाराच्या कर्मचा-याच्या नजरचुकीने ग्राहक क्र. 310230652774 करीता मिटर क्र. 1546100 हे जोडले असून, त्यावर इमारतीतील तळमजला व पहील्या मजल्यावरील सर्व उपकरणांचा जोडभार जोडल्या गेल्याचे, तसेच ग्राहक क्र. 310230658853 करीता मिटर क्र. 1526098 लावले असून, त्यातील बाह्य स्त्रोत मध्ये विज पुरवठा हा विद्युत भारात न जाता दुस-या ग्राहक क्रमांकाचे बाह्य स्त्रोत्र जोडल्या गेले व त्यामुळे ग्राहक क्रमांक 310230658853 मध्ये विजेचा वापराची नोंद मिटर मध्ये होत नव्हती, हे स्पष्टपणे कबुल केले आहे. त्यामुळे एकुण परिस्थिती बघता, झाल्या प्रकरणात तक्रारकर्त्याची कुठलीही चुक नसल्याचे स्पष्ट होते. या उलट एकाच मिटरवर दोन्ही मजल्यावरचे सर्व उपकरणांचा जोडभार जोडल्या गेला असतांना, तक्रारकर्ता हा वेगवेगळया दोन मिटर वरुन येणा-या समान देयकांचा भरणा मागील दोन – सव्वादोन वर्षापासून करीत असल्याचे पृष्ठ क्र. 21 ते 26 वरील देयकांवरुन दिसून येत आहे. तक्रारकर्त्याच्या दि. 25/10/2013 च्या अर्जाची दखल घेऊन तक्रारकर्त्याच्या मिटरची तातडीने पाहणी विरुध्दपक्षाने केली असती तर तक्रारकर्त्याला झालेला आर्थिक भुर्दंड व नाहक त्रास सोसावा लागला नसता, असे मंचाचे मत आहे.
- विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार 3100230658853 या ग्राहक क्रमांकाकरिता आकारण्यात आलेले माहे ऑगस्ट 2013 ते फेब्रुवारी 2016 हया कालावधीचे विद्युत शुल्क व इतर आकार हा पुर्णतः रद्दबातल करुन संबंधीत कालावधीकरिता फक्त स्थिर आकाराची आकारणी केली, तसेच सदरच्या ग्राहक क्रमांकासंबंधी भरणा केलेली रक्कम ही देयके दुरुस्तीचे वेळी ग्राहक क्र. 210230652774 च्या देयकामध्ये समायोजीत केली आहे. ग्राहक क्र. 310230652774 हया ग्राहक क्रमांकासंबंधी मिटरवर नोंदविलेले वाचन हे 30 महिन्यात विभागुन, ग्राहकाने भरणा केलेली रक्कम मधील अतिरिक्त रु. 12005/- रक्कम या ग्राहक क्रमांकाच्या देयकामधुन वजा करुन तक्रारकर्त्याला रु. 76,380/- ची वजावट करुन दिलेले आहे.
- परंतु तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार चुकीच्या पध्दतीने मिटरची जोडणी करणे, एकाच मिटरवर संपुर्ण घराचा विद्युत भार जोडून, दोन मिटरनुसार त्याची देयके वसुल करणे, मिटरची देखभाल न करणे, कुठलीही माहीती व तपशिल न पुरवणे, चुकीचे देयक भरण्याचा तगादा लावणे व गैरकायदेशिररित्या विद्युत पुरवठा खंडीत करण्याची धमकी देणे ईत्यादी, विरुध्दपक्षाच्या सेवेतील त्रुटी व सेवा देण्यातील हयगय दिसून येते.
परंतु तक्रारकर्त्यानेच दाखल केलेल्या पृष्ठ क्र. 15 वरील दि. 22/6/2016 च्या पत्रावरुन मिटर वाचन 9791, मिटर क्र. 1526100 व जुन्या मिटरचे 343 युनिट, असे जे एकूण 10,134 युनिट विज देयके तक्रारकर्त्याला 30 महिन्यात विभागणी करुन, देयक दुरुस्ती करण्याची विनंती तक्राकरर्त्याने विरुध्दपक्षाला केल्याचे दिसून येते व हा मुद्दा विरुध्दपक्षाने युक्तीवादाच्या वेळी मंचाच्या निदर्शनास आणून दिला होता. यावरुन तक्रारकर्ता, तक्रार दाखल करण्यापुर्वी, त्याला दुरुस्त करुन दिलेले देयक 30 महिन्यात विभागुन भरण्यास तयार होता, असे निदर्शनास येते. - या सर्व बाबींचा विचार करता विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्ट होत असल्याने, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाकडून नुकसान भरपाईसह प्रकरणाचा खर्च मिळण्यास पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे. तसेच विरुध्दपक्षाने केलेल्या तपासणीच्या वेळी मिटर वाचनाची घेतलेली नोंद तक्रारकर्त्याला मान्य असल्याचेही दिसून येते.
सबब अंतीम आदेश येणे प्रमाणे... - तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला सेवा पुरविण्यामध्ये त्रुटी व हयगय केल्याचे घोषीत करण्यात येते.
- तक्रारकर्त्याने दि. 22/2/2016 रोजीच्या पत्राद्वारे दाखविलेल्या संमतीनुसार, विरुध्दपक्षाने रु. 57,710/-, 30 महिन्यात समान विभागणी करुन, त्यानुसार देयके तक्रारकर्त्याला द्यावीत.
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- ( रुपये पांच हजार फक्त ) व रु. 3000/- ( रुपये तिन हजार फक्त ) प्रकरणाच्या खर्चापोटी द्यावेत.
- सदर आदेशाचे पालन, निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत करावे.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.
| |