::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 22/01/2015 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून विज पुरवठा घेतला असून, त्याचा ग्राहक क्रमांक 310071418595 असा आहे. तक्रारकर्ता नियमितपणे विज देयक भरीत होता, परंतु मागील वर्षी विद्युत मिटरमध्ये बिघाड उत्पन्न झाला व सदर मिटर जोराने फिरायला लागले होते व त्यामुळे तक्रारकर्त्याला जास्त देयक यायला लागले म्हणून तक्रारकर्त्याने दि. 27/8/2013 ला विरुध्दपक्षाकडे मिटर संबंधी तक्रार केली व त्यावरुन विरुध्दपक्षाचे कर्मचा-यांनी सदर मिटर काढून नेले व दुसरे मिटर लावून दिले. जानेवारी 2014 ला विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला एकदम रु. 92860/- चे दि. 24/12/2013 चे देयक पाठविले. सदर देयकामध्ये मे व जुन 2013 चा विज वापर केवळ 245 युनिट प्रतिमहा दाखविला आहे व जुलै चा वापर एकदम 4048 युनिट दाखविला आहे. वास्तविक तक्रारकर्त्याचा एवढा विज वापर कधीही झालेला नाही. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला अवास्तव देयक दिले व ते भरण्याची सक्ती विरुध्दपक्ष करीत आहे, अशा प्रकारे विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे व म्हणून ही तक्रार मंचासमोर दाखल करुन तक्रारकर्त्याने मंचास विनंती केली आहे की, विरुध्दपक्षाला आदेश द्यावा की त्यांनी तक्रारकर्त्याच्या मिटरची तपासणी करुन योग्य ते देयक द्यावे व दि. 24/12/2013 रोजीचे दिलेले देयक रु. 92860/- ते रद्दबातल करावे तसेच अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करीत असल्याने विरुध्दपक्षाला रु. 10,000/- चा दंड करावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 04 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष यांनी आपला लेखीजवाब शपथेवर दाखल केला, त्यानुसार त्यांनी तक्रारकर्त्याचे सर्व आरोप फेटाळले व असे नमूद केले आहे की,…
तक्रारकर्त्याने घरगुती वापराकरिता दि 28/8/2007 रोजी 0.50 के.डब्ल्यू जोड भाराचा विद्युत पुरवठा घेतलेला आहे. विजेचा वापर नोंदविण्याकरिता तक्रारकर्त्याच्या इमारतीवर मिटर क्र. 78/07146448 एमको कं.चे उभारण्यात आले हेाते. सदर मिटर दि. 28/8/2013 रोजी बदलून त्याजागी नविन मिटर क्र. 98/01155055 उभारण्यात आले, जुने मिटर बदली करतेवेळी त्यावर 6527 के.डब्ल्यु.एच. असा विज वापर नोंदविलेला होता. माहे एप्रिल 2013 मध्ये सदर मिटरवर 113 युनिट असा वापर नोंदविला हेाता, माहे मे, जुन 2013 मध्ये मिटर वाचनाचे वेळी इमारत कुलूपबंद असल्याने मिटर वाचन नोंदविता आले नाही म्हणून विरुध्दपक्षातर्फे ग्राहकास सरासरी देयक निर्गमित करण्यात आले. माहे जुलै 2013 मध्ये सदरचे मिटरवर 1266 ते 5314 असा एकूण 4045 युनीट विज वापर नोंदविलेला आढळून आला. सदरचा विज वापर हा मे 13 ते जुलै 2013 या कालावधीचा असल्याने तिन महिन्याच्या कालावधीत विभागून, सरासरीच्या देयकाची वजावट माहे जुलै 2013 च्या देयकात करुन देण्यात आली होती. तक्रारकर्त्याने माहे जानेवारी 2013 चे देयकाचा भरणा दि. 22/2/2013 रोजी केल्यापासून देयकाचा भरणा करणे बंद केले, त्यामुळे ग्राहकाकडे थकीत असलेली रक्कम ही पुढील देयकामध्ये थकीत म्हणून समाविष्ठ करण्यात येत होती. तक्रारकर्त्याच्या जुन्या मिटरची चाचणी केली असता सदर मिटर हे सुस्थितीत काम करीत असल्याचे आढळून आले,तसेच तक्रारकर्त्याच्या इमारतीवर लावलेले नविन मिटर क्र. 1155055 हे दि. 10/2/2014 रोजी चाचणी केली असता सदरचे मिटरही सुस्थितीत काम करीत असल्याचे आढळून आले. दि. 26/2/2014 रोजी तक्रारकर्त्याचे इमारतीवर विद्युत पुरवठ्याला जोडलेल्या उपकरणांची तपासणी केली असता विद्युत पुरवठ्यामध्ये एकूण 9.460 के.डब्ल्यु जोड भाराचा विद्युत पुरवठा घेणारी उपकरणे जोडलेली आढळून आली, तसेच मिटर क्र. 1155055 मधील महत्तम वापराबाबतची नोंदीची तपासणी केली असता ती 7.04 के.डब्ल्यू अशी नोंदविलेली आढळून आली. तक्रारकर्त्याच्या इमातीवरील मिटर हे सुस्थितीत असून त्यास देण्यात आलेले देयक हे मिटर वाचनानुसार निर्गमित करण्यात आले आहे. त्यामध्ये विरुध्दपक्षाची सेवेतील कोणतीही त्रुटी नाही.
सदर लेखी जबाब, विरुध्दपक्षाने शपथेवर दाखल केला आहे.
3. त्यानंतर तक्रारकर्त्यातर्फे प्रतीउत्तर दाखल करण्यात आले व उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षाचा लेखी जवाब, उभय पक्षाने दाखल केलेले दस्तऐवज, तक्रारकर्त्याने दाखल केलेले प्रतिउत्तर व उभय पक्षाचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून पारीत केला, तो येणे प्रमाणे….
सदर प्रकरणात तक्रारकर्ते यांचा असा युक्तीवाद आहे की, त्यांच्या विद्युत मिटरमध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे देयक जास्त येत होते. म्हणून त्यासंबंधी तक्रारकर्त्याने तशी तक्रार दि. 27/8/2013 रोजी केली असता, विरुध्दपक्षाने मिटर काढून नेले व त्या जागी दुसरे मिटर लावून दिले. तसेच विरुध्दपक्षाने नियमितपणे देयके सुध्दा दिली नाही. जानेवारी 2014 ला विरुध्दपक्षाने एकदम रु. 92860/- चे दि. 24/12/2013 तारीख असलेले देयक पाठविले. या बद्दल चौकशी केली असता, विरुध्दपक्षातर्फे जे विश्लेषण दिले ते कुठेही जुळत नाही. कारण तक्रारकर्त्याचा विज वापर कमी आहे, तसेच विरुध्दपक्ष देयक कमी करुन देण्यास तयार नाहीत व विद्युत पुरवठा खंडीत करण्याची धमकी देतात. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या मिटरची तपासणी करुन योग्य ते देयक द्यावे व दि. 24/12/2013 रोजीचे देयक रद्दबातल करावे.
तक्रारकर्त्याच्या या युक्तीवादानुसार विरुध्दपक्षातर्फे दाखल केलेले Cosumer personal Ledger व इतर दस्तऐवज तसेच त्या बद्दलचे विश्लेषन पाहीले असता, असे आढळते की, विरुध्दपक्षातर्फे तक्रारकर्ते यांचे मिटर दि. 28/8/2013 रोजी बदलण्यात आले होते, त्यावेळेस त्यावर नोंदविलेला विज वापर, तसेच एप्रिल 2013 चा विज वापर, व त्यानंतर मे,जुन 2013 मध्ये मिटर वाचन Lock असा शेरा असल्यामुळे उपलब्ध झालेले दिसत नाही, नंतर जुलै 2013 चा विज वापर, असे मे 2013 ते जुलै 2013 ह्या कालावधीचा विज वापर व वरील मिटरचा विज वापर हे तिन महिन्यांच्या कालावधीत विभागून तक्रारकर्त्यास निर्गमित केले होते. तसेच मे व जुन 2013 मध्ये आकारण्यात आलेल्या सरासरी देयकाची वजावट जुलै 2013 च्या देयकात करुन दिली होती, असे C.P.L. या दस्तावरुन दिसून येते. विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या तपासणी अहवाल, या दस्तावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याकडील जोडलेल्या विद्युत भाराप्रमाणे त्याचा सरासरी मासिक विजेचा वापर हा 1206 युनिट प्रतिमहा दिसतो. तसेच तक्रारकर्त्याने दि. 22/2/2013 पासून विज देयकाचा भरणा विरुध्दपक्षाकडे केलेला दिसत नाही, असे सुध्दा कागदपत्रांवरुन दिसून येते. त्यामुळे सहाजिकच थकीत असलेली रक्कम ही पुढील देयकात थकीत बाकी म्हणून समाविष्ठ करण्यात येत होती, असे उपलब्ध कागदपत्रांवरुन दिसून येते. तक्रारकर्त्याकडील नविन मिटरची चाचणी देखील/ O.K. असल्याचे दिसून येते. सबब विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला मिटर वाचनानुसार देयके निर्गमित केल्याचे सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्ते यांची विनंती मान्य करता येणार नाही.
सबब अंतिम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे….
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.
( कैलास वानखडे ) (श्रीमती भारती केतकर ) (सौ.एस.एम.उंटवाले )
सदस्य सदस्या अध्यक्षा
AKA जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,अकोला