जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 91/2011 तक्रार दाखल तारीख- 02/07/2011
नामदेव पि. गणपती बांगर,
वय – 61 वर्ष, धंदा – सेवानिवृत
रा.आशा टॉकीजचे पाठीमागे,
धानोरा रोड,ता.जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
उपकार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,
माळीवेस,बीड ता.जि.बीड ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – आर.बी.धांडे
सामनेवालेतर्फे – वकील – ए.एस.पाटील
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे बीड येथील रहिवाशी असुन सर्व कागदपत्राची पूर्तता करुन घरगुती वापरासाठी विद्युत कनेक्शन घेतले आहे. त्याचा ग्राहक क्रं.576010176581 असा आहे. जानेवारी,2011 मध्ये सामनेवाले यांनी तक्रारदाराचे जुने मीटर काढून नविन मिटर बसविले. जुने मिटर काढतेवेळी त्यावर 2826 इतके युनिट रिडींग होती. फेब्रुवारी,2011 चे बील रु.190/- मार्च,2011 चे बील रु.320/- असे एकुन रु.520/- सामनेवाले यांचेकडे जमा केले. एप्रिल,2011 मध्ये 1235 युनिटचे दाखवून रक्कम रु.5,760/- चे बील दिले. त्यामुळे तक्रारदारास मानसि त्रास झाला. तक्रारदाराची यापूर्वीचे कोणतेही देयक बाकी नाही. त्यामुळे फेब्रुवारी,2011 मार्च,11 व मे,2011 या बीलात अचानक 1042 युनिट जास्तीचे बिल दिले ते रद्द करुनमिळावे. याबाबत सामनेवाले यांचेकडे दि.16.5.2011 रोजी अर्ज दिला होता व वारंवार प्रत्यक्ष भेटून तोंडी विनंती केली होती परंतु सामनेवाले यांनी तक्रारदाराचे तक्रारीचे निरसन केले नाही. तक्रारदार हा जेष्ठ नागरीक असताना सुध्दा त्यांचे तक्रारीची दखल सामनेवाले यांनी घेतली नाही. म्हणून तक्रारदाराने सदरची तक्रार ही या न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने मे,2011 मध्ये आलेले विज बील रु.6,200/- रद्द करुन मिळावे, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- सामनेवाले यांचेकडून मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्ठयार्थ एकुन 6 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले यांनी आपले लेखी म्हणणे दि.11.11.2011 रोजी दाखल केले असुन तक्रारदार हा त्यांचा ग्राहक असल्याचे मान्य आहे. तक्रारदाराचे मिटर दि.28.1.2011 रोजी बदलले त्यावेळी जुने मिटरची रिडींग 3868 युनिट होती. जुने मिटर नं.9001637714 याची रिडींग डिसेंबर,10 पर्यन्त 2826 युनिटचे बीलावर दिले आहे त्यामुळे एप्रिल,2011 मध्ये या बीलातील युनिटच्या फरकाचे युनिट 1042 चे दिले वीज बील योग्य व बरोबर आहे. त्यामुळे तक्रारदारास द्यावयाचे सेवेत कोणताही कसूर केला नाही म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी, अशी मागणी केली आहे.
सामनेवाले यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्ठयार्थ एकुण 2 कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदाराची तक्रार, सोबतची कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे, कागदपत्रे, तक्रारदार व सामनेवाले यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर त्याचे बारकाईने आवलोकन केले असता,
सामनेवाले यांनी दाखल केलेला मिटर रिप्लेसमेंट रिपोर्ट व सीपीएल यांचे आवलोकन केले असता जुने मिटर रिप्लेसमेंट मिटरवरील रिडींग ही 3868 दाखविण्यात आली आहे. परंतु त्यावर तक्रारदाराची सही घेतली नाही. सामनेवाले यांनी सदर मिटर बदण्याबाबत खाजगी एजन्सीला काम दिले गेले आहे असा तोंडी युक्तीवादात म्हंटले आहे. त्यांनी तसा पंचनामा व ग्राहकांच्या सहया घेतल्या आहे असे म्हणंटले आहे, परंतु सदर मिटर रिप्लेसमेंटचा मुळ रिपोर्ट या न्यायमंचात सामनेवाले यांनी दाखल केलेला नाही. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे सीपीएल दाखल केले असुन त्यातील चालू व मागील रिडींग याचे आवलोकन केले असता, डिसेंबर,2010 अखेरची रिडींग जानेवारी,2011 फेब्रुवारी,2011 यावरुनही 2826 युनिट दर्शवित आहे व सामनेवाले यांनी मार्च मध्ये मिटर बदलल्याचे दर्शवित आहे.
म्हजेच तक्रारदारानी मागणी केलेले एप्रिल,2011 मधील 1042 युनिट हे चुकीचे पध्दतीने सामनेवाले यांनी बिल देवून सेवेत त्रूटी केली आहे हे सिध्द होते.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास एप्रिल,2011 मध्ये दिलेले बील 1042 युनिटचे रद्द करणत येत आहे.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हाजार फक्त) व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.1,000/- (अक्षरी रुपये एक हाजार फक्त) आदेश मिळाल्या पासुन 30 दिवसाचे आत अदा करावीत.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड