निकाल (घोषित दि. 28.10.2010 व्दारा सौ.ज्योती ह.पत्की, सदस्या) या तक्रारीची हकीकत थोडक्यात खालील प्रमाणे आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीज जोडणी घेतलेली असून वीज वितरण कंपनीने फेब्रूवारी 2010 मधे रुपये 2,240/- चे देयक दिले. दिनांक 18.08.2010 पासून आजपर्यंतचा वीज वापर 355 युनिट असताना वीज वितरण कंपनीने मीटर रिडींग प्रमाणे देयके न देता अंदाजे बिल दिले. तिने नियमित वीज देयकांचा भरणा केलेला आहे. तिने अशी मागणी केली आहे की, तिच्या मीटरची तपासणी करुन युनिटप्रमाणे देयक देण्याचा आदेश गैरअर्जदार वीज वितरण कंपनीला द्यावा. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीचे म्हणणे असे आहे की, त्यांनी तक्रारदाराला कोणतेही अवाजवी देयक दिलेले नसून तक्रारदार नियमित देयके भरीत नव्हती. तक्रारदाराने कोणतेही कारण नसताना ही तक्रार दाखल केली असून तिला त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे व शपथपत्राचे अवलोकन केले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकण्यात आला. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने दाखल केलेले सी.पी.एल.आणि तक्रारदाराने दाखल केलेली देयके पाहता असे दिसून येते की, वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला ऑगष्ट 2009 पासून सतत सरासरीवर आधारीतच देयके दिलेली आहेत. वास्तविक तक्रारदाराकडील मीटर चालू स्थितीत आहे ही बाब वीज वितरण कंपनीने सी.पी.एल. मधे मीटर स्टेटस संदर्भात नमूद केलेली आहे. तक्रारदाराचे मीटर जर चालू स्थितीत असेल तर वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला सतत सरासरीवर देयके देण्याचे कोणतेही कारण नाही. तक्रारदाराचे घर बंद असल्यामुळे मीटर रिडींग घेता आली नाही असे जर वीज वितरण कंपनीला म्हणायचे असेल तर त्यांचा मीटर रीडर तक्रारदाराच्या घरी कधी गेला होता आणि त्याने त्यादिवशी तक्रारदारा व्यतिरिक्त कोणत्या ग्राहकांचे मीटर रिडींग घेतले याबाबत संबंधित मीटर रीडरची साक्ष या मंचासमोर नोंदविणे आवश्यक होते. वीज वितरण कंपनीने तक्रारदारास सातत्याने प्रत्यक्ष मीटर रिडींग न घेता देयके देऊन निश्चितपणे त्रुटीची सेवा दिलेली आहे. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास ऑक्टोबर 2010 पर्यंतची प्रत्यक्ष मीटर रिडींग घेऊन तिला मीटर बसविल्याच्या दिनांका पासून ऑक्टोबर 2010 पर्यंत तिच्या मीटरमधे नोंदल्या गेलेल्या प्रत्यक्ष मीटर रिडींग नुसार सुधारीत देयक तिने ऑगष्ट 2009 पासून ऑक्टोबर 2010 पर्यंत भरलेली रक्कम विचारात घेऊन सुधारीत देयक निकाल कळाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावे.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला त्रुटीची सेवा व मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 500/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 500/- असे एकूण रक्कम रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त.) निकाल कळाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावेत किंवा तिच्या पुढील देयकात समायोजित करावेत.
- दोन्ही पक्षांना आदेश कळविण्यात यावा.
| | HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |