निकाल
(घोषित दि. 15.03.2017 व्दारा श्रीमती एम.एम.चितलांगे, सदस्य)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये दाखल केली.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे. तक्रारदार हा संभाजी नगर जालना येथील रहिवासी आहे. तक्रारदार याचे विजय विलास या नावाने मामा चौक जालना येथे हॉटेल आहे. हॉटेल व्यवसाय करुन तक्रारदार हा उदरनिर्वाह करतो. गैरअर्जदार यांनी दि. 26/1/1963 रोजी तक्रारदारास वाणिज्य (कमर्शियल) प्रयोजनाकरीता वीज पुरवठा दिला असुन त्याचा ग्राहक क्र. 5100300000674 असा आहे. तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा वीज ग्राहक आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दि. 25/5/2016 रोजीचे 2748 युनिट वीज वापराचे रक्कम रु.27,290/- चे अवाजवी वीज देयक दिले. गैरअर्जदार यांच्या मागणीनुसार तक्रारदार याने पार्ट पेमेंट म्हणुन रक्कम रु. 18,000/- दि. 23/7/2016 रोजी वीज देयकापोटी गैरअर्जदार यांच्याकडे भरणा केला आहे, त्याबाबतची पावती मंचासमोर दाखल केली आहे. तक्रारदार याचा सरासरी वापर 700 ते 800 युनिटचा आहे. गैरअर्जदार यांनी अवाजवी व चुकीचे वीज देयक देऊन सेवा देण्यात त्रुटी निर्माण केली आहे. त्यामुळे तक्रारदारास शारीरीक,मानसिक व आर्थिक त्रास झाला. तक्रारदार याने गैरअर्जदार याच्याकडे भरणा केलेली रक्कम रु. 18,000/- हे पुढील वीज देयकामध्ये समायोजित करण्यात यावी व गैरअर्जदार यांनी दि. 25/5/2016 व त्यानंतरचे सर्व वीज देयके रद्द करुन दुरुस्त वीज देयक मिळण्याची विनंती केली आहे.
गैरअर्जदार हे मंचासमोर हजर झाले त्यांनी त्यांचे लेखी निवेदन नि.क्र.8 अन्वये दाखल केले आहे. लेखी निवेदनासोबत जितेंद्र विठोबा महाजन, कार्यकारी अभियंता यांचे शपथपत्र दाखल केले. गैरअर्जदार यांच्या कथनानुसार तक्रारदार हा वाणिज्य (कमर्शियल) ग्राहक असुन त्याचे विजय विलास या नावाने हॉटेल आहे. तक्रारीतील उर्वरीत मजकूर गैरअर्जदाराने स्पष्टपणे नाकारलेला आहे. गैरअर्जदार यांचे पुढील कथन की, तक्रारदारास दिलेला वीज पुरवठा हा व्यवसायीक स्वरुपाचा आहे, त्यामुळे तक्रारदार हा ग्राहक या संज्ञेमध्ये बसत नसुन तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा. तक्रारदार याचे रिडींग उपलब्ध नसल्याने तक्रारदारास सरासरी वीज देयके देण्यात आली. रिडींग उपलब्ध झाल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा तक्रारदारास दिला आहे. तक्रारदारास दिलेले वीज देयक हे तक्रारदार याने वापर केलेल्या वीजेचे आहे. नियमाप्रमाणे तक्रारदारास पुरेपूर लाभ देवून योग्य ती रक्कम तक्रारदाराचे वीज देयकातून वजा करण्यात आली आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कोणतीही त्रुटी ठेवली नाही. तक्रारदार याची तक्रार रद्द करण्यात यावी.
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याकामी शपथपत्र याचे अवलोकन केले. गैरअर्जदार यांनी दाखल केलेले पुराव्याकामीचे शपथपत्र व कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदार व गैरअर्जदार यांच्या वकीलाचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) तक्रारदार याचा समावेश ग्राहक या संज्ञेत येतो काय? नाही
2) तक्रारदार हा तक्रारीतील मागणी मिळण्यास
पात्र आहे काय? नाही
2) काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
कारणमीमांसा
मुददा क्र.1 ः तक्रारदार यांनी त्यांच्या हॉटेल व्यवसायाकरीता गैरअर्जदाराकडून वीज पुरवठा घेतला असून त्याचा ग्राहक क्र. 5100300000674 असा आहे. तक्रारदार हा नियमित वीज भरणा करीत आहे. दि. 25/5/2016 रोजी तक्रारदारास अवाजवी व चुकीचे वीज देयक दिले. सदर वीज देयक न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी दिली. त्यामुळे तक्रारदार यानी दि. 23/7/2016 रोजी पार्ट पेमेंट म्हणुन रक्कम रु. 18,000/- चा भरणा गैरअर्जदार यांच्याकडे केला, त्याची पावती प्रकरणात जोडली आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास अवाजवी व चुकीचे वीज देयक देऊन सेवा देण्यात कसूर केला आहे. त्यामुळे तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. या मुद्यावर ही तक्रार दाखल आहे.
तक्रारदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्र व पुरावाकामीचे शपथपत्र याचे आम्ही अवलोकन केले. तक्रारदार याचे विजय विलास या नावाने मामा चौक, जालना येथे हॉटेल आहे. तक्रारदार हे हॉटेल व्यवसाय करतात. तक्रारदार याने दाखल केलेले वीज देयक हे नंदकिशोर हरीचंद सहानी यांच्या नावे असुन सदर वीज पुरवठा हा वाणिज्य प्रयोजनासाठी घेतला आहे. तक्रारदार याने वीज ग्राहक नंदकिशोर हरीचंद सहानी यांचे कोणतेही अधिकार पत्र सदर तक्रार ग्राहक मतंचासमोर चालविण्याकरीता दाखल केलेले नाही. सबब तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक होत नाही. सदर वीज पुरवठा हा नंदकिशोर हरीचंद सहानी यांच्या नावे आहे. वीज पुरवठा हा व्यवसायीक कारणासाठी घेतला असल्याची नोंद वीज देयकावर आहे. सदरील वीज पुरवठा हा व्यवसायीक कारणासाठी घेतला असल्यामुळे तसेच तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक नसल्यामुळे सदरील तक्रार ही ग्राहक मंचापुढे चालु शकत नाही. सदरील वीज पुरवठा हा व्यवसायीक कारणाकरीता वापरात असल्याने तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2(1) (डी) नुसार ग्राहक या संज्ञेत येत नाही, असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदार हा तक्रारीतील मागणी मिळण्यास पात्र नाही. सबब तक्रारदाराची तक्रार नामंजुर होण्यास पात्र आहे.
वरील कारणास्तव मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजुर करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना