निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार संजय किशनराव कदम हा पिंपळगांव /नायगांव (बा) जि. नांदेड येथील रहिवाशी असून तो गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. अर्जदाराचा ग्राहक क्र. 55505000 -0020 असा आहे व विदयुत मिटर क्र. 7613497918 असा आहे. अर्जदाराच्या घरात 2-3 15 व्हॅटचे सी.एफ.एल. बल्ब 2-3 पंखे आहेत. अर्जदार हा विजेचा वापर काटकसरीने करतो. अर्जदाराचा माहे जानेवारी 2012 ऑक्टोंबर 2012 मध्ये सरासरी विदयुत वापर हा 20 ते 48 युनीटच्या दरम्यान आहे हे दिनांक 29.12.2012 च्या बिलावरुन दिसून येते. गैरअर्जदाराने अर्जदारास अचानक 56,508.77 रुपयाचे बिल दिले जे की, अवास्तव व चुकीचे आहे. गैरअर्जदाराच्या निदर्शना सदर बाब लक्षात आणून दिल्यावर तात्पुरता तोडगा म्हणून सदर बिलातून रक्कम रु. 13,393/- रुपये कमी करुन दिनांक 29/12/2012 रोजी प्रचंड असे रक्कम रु. 44,690/- चे अवाजवी व बेकायदेशीर बिल दिले. जे की, अर्जदारावर अन्याय करणारे आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जावून त्याचा वापर कमी असल्याचे दाखवून दिले. तरी पण गैरअर्जदाराने त्यास फारसा प्रतिसाद दिला नाही. अर्जदाराचा वापर फक्त 20-40 युनीट्स असतांना अर्जदारास प्रचंड रक्कमेचे बिल देवून अर्जदारास मानसिक त्रास दिलेला आहे. म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे व मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेले रक्कम रु. 44,690/- चे दिनांक 29/12/2012 चे बिल रद्द करण्यात यावे. तसेच सदर बिलाच्या वसुलीपोटी अर्जदाराचा विज पुरवठा खंडीत करु नये. असा गैरअर्जदार यांना चिरकालीन मनाई हुकूम, आदेश पारीत करावा. तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 12,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास देण्याबाबत आदेश करावा.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार 1 व 2 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले.
गैरअर्जदार 1 यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे.
4. प्रस्तुत प्रकरणात अर्जदारास देण्यात आलेले बिल हे प्रत्यक्ष वापराप्रमाणे देण्यात आलेले होते. नोव्हेंबर 2012 मध्ये प्रत्यक्ष वापराचे एकक 4655 इतके असतांना व ते अर्जदाराने प्रत्यक्षरित्या उपभोगले असतांना देखील अर्जदाराने ती रक्कम भरलेली नव्हती. सदर देयकाची नोव्हेबर 2012 मध्ये दुरुस्ती करण्यात आली व 58,231.12 पैसे ऐवजी रक्कम रु. 44,837.36 पैसे चे विज बिल 12 हप्त्यात विभागून स्लॅब व बेनीफीटसह देण्यात आले. त्यामुळे रक्कम रु. 13,393.76 पैसे इतके विज बिल कमी झाले. वरील प्रमाणे कमी करण्यात आलेले विज बिल हे ग्राहकास उच्चत्तम दर लागल्यामुळे पुन्हा एकदा 12 महिन्यात विभागणी करुन नियमीत विज बिल देण्यात आले. त्यामुळे 11,021.76 पैसे कमी होऊन रु.33,848.16 पैसे इतकेच विज बिल शिल्लक राहिलेले आहे. यापूर्वी अर्जदारास देण्यात आलेले बिल हे प्रत्यक्ष वापराचे नव्हते कारण नोव्हेंबर 2012 मध्ये जेव्हा पहिल्यांदा रिडींग घेण्यात आले तेव्हा 5395 इतकी नोंद झालील व त्यापूर्वी नोंदविलेले 740 युनीटस त्यातून वजा करुन 4665 युनीटसचे वापर झालेले आहे व त्यामुळे सदर वापराची विज बिले अर्जदारास भरणे आवश्यक आहे. गैरअर्जदाराने डिसेंबर 2012 ते जुन 2013 पर्यंतचे अर्जदाराचे सी.पी.एल. दाखल केलेले आहे. त्यावरुन अर्जदाराचा विज वापर जानेवारी 2013 ते जुन 2013 मध्ये तीन आकडी असून जवळपास 400 युनीटस एकाच महिन्यात वापरण्यात आलेले आहे. म्हणून अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराचा विज वापर 20 ते 40 युनीट प्रती महा आहे हे खोटे आहे. म्हणून अर्जदाराचा अर्ज सपशेट खोटा असून खारीज करण्यायोग्य आहे. गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज रु.10,000/- खर्चासह फेटाळण्यात यावा.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
6. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या बिलावरुन स्पष्ट आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 29/12/2012 रोजी दिनांक 15/11/2012 ते 15/12/2013 या कालावधीचे विज वापराचे बिल रक्कम रु. 44,690/- इतके दिलेले आहे. सदर बिलाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, चालू रिडींग 5638 युनीट आहे व मागील रिडींग 5395 युनीट असून विज वापर 243 युनीटचा आहे. सदर बिला मध्येच जानेवारी 2012 ते ऑक्टोंबर 2012 पर्यंत अर्जदाराचा विज वापर हा किमान 20 युनीटस व कमाल 48 युनीटस असल्याची नोंद आहे म्हणून अर्जदाराचे म्हणणे आहे की, त्याचा सरासरी विज वापर हा 20 ते 48 युनीटचा आहे व त्यास दिलेले माहे नाव्हेंबरचे बिल रु.44,690/- हे अयोग्य व बेकायदेशीर आहे. माहे नोव्हेंबरच्या बिलाचे अवलोकन केले असता त्यांत विजेचा वापर हा नोव्हेंबर 2012 साठी 243 युनीटचा असून त्याबद्दलचे विज बिल हे 1578.33 पैसे असून सदर बिलांत मागील थकबाकी 43,115.01 अशी आहे. गैरअर्जदाराने दाखल केलेल्या अर्जदाराच्या पी.एल.अे. चे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात. माहे जुलै 2012 ते सप्टेंबर 2012 पर्यंत मिटर स्टेटस नॉर्मल दर्शवलेले असून मीटर रिडींग ही 659 पासून 740 पर्यंत वाढलेली आहे. माहे ऑक्टोबर मध्ये आर.एन.टी. आहे व 33 युनीटचे बिल दिलेले आहे. परंतू नोव्हेंबर 2012 मध्ये मिटर स्टेटस नॉर्मल दर्शवलेले असून चालू रिडींग 5395 व मागील रिडींग 740 दर्शविलेले आहे. माहे डिसेंबर 2012 चे मागील रिडींग 5395 व चालू रिडींग 5638 दर्शवून विज वापर हा 243 युनीटचा आहे. पुढे जानेवारी 2013, फेब्रुवारी 2013, मार्च 2013, एप्रिल 2013, मे 2013, जुन 2013 चे अनुक्रमे 198, 200, 244, 59, 398, 251 युनीटसचा विज वापर आहे. यावरुन असे दिसते की, अर्जदाराचा विज वापर हा सरासरी 225 युनीटस प्रती महा चा आहे. याचाच अर्थ असा आहे की, वर्ष 2012 मध्ये सप्टेंबर 2012 पर्यंत घेतलेली रिडींग ही चुकीची होती व त्यास अर्जदार देखील तेव्हडाच जबाबदार आहे. ऑक्टोबर 2012 मध्ये वापरानुसार योग्य रिडींग घेतलेली आहे व त्यात मागील वापर एकदाच दर्शवण्यात आला. त्यामुळे रिडींग ही 5395 एव्हडी दिसून आली. गैरअर्जदारांनी अर्जदारास नंतर योग्य पध्दतीने दुरुस्त करुन दिल्याचे गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दुरुस्तीच्या हिशोबाच्या तपशीला वरुन दिसून येते. अर्जदार हा त्याच्या वापराप्रमाणे विज बिल भरण्यास जबाबदार आहे. असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.