(घोषित दि. 30.10.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, त्या जालना येथील रहीवाशी असून गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या ग्राहक आहेत. तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडून घराच्या बांधकामासाठी घरगुती वापरासाठीचे मीटर कनेक्शन मागितले. गैरअर्जदारांनी त्यांना दिनांक 02.03.2010 रोजी ग्राहक क्रमांक 510030492089 अन्वये मीटर कनेक्शन दिले. त्यांना जास्त रकमेचे बिल आले म्हणून त्यांनी चौकशी केली असता गैरअर्जदारांनी त्यांना तुमचे मीटर व्यापारी कनेक्शन म्हणून दिलेले आहे. म्हणून तुम्हाला व्यापारी दराने वीज देयक देण्यात आले आहे असे उत्तर दिले. तक्रारदार म्हणतात की त्यांनी घरगुती वापरासाठी वीज कनेक्शन मागितले असताना त्यांना गैरअर्जदारांनी व्यापारी वापरासाठीचे कनेक्शन दिले. तक्रारदारांनी दिनांक 08.05.2012 रोजी बिल दुरुस्त करण्यासाठी गैरअर्जदार यांचेकडे अर्ज दिला. परंतू त्यांनी नगर पालिकेचे कम्पलीशन सर्टीफिकेट द्या असे सांगितले. तक्रारदारांनी घरगुती वापरासाठी मीटर कनेक्शन मागितले असताना गैरअर्जदारांनी त्यांना जाणिवपुर्वक व्यापारी वापराचे मीटर कनेक्शन दिले व त्या दराने वीज देयके दिली. प्रस्तुत देयके देखील तक्रारदारांना वेळेवर मिळालेली नाहीत व ती सरासरी वापरावर आधारित आहेत. तक्रारदारांनी रुपये 65,000/- इतकी रक्कम वीज जोडणी तोडली जाईल या भितीने नाराजीने गैरअर्जदार यांचेकडे भरलेली आहेत.
तक्रारदारांना व्यापारी दराने दिलेली सर्व वीज देयके दुरुस्त करुन मिळावीत व त्यांना घरगुती दराने देयके देण्यात यावीत अशी प्रार्थना तक्रारदार या तक्रारीद्वारे करत आहेत. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत तक्रारदारांचे प्रमोद तोतला यांचे नावाने केलेले मुखत्यारपत्र, तक्रारदारांनी दिनांक 08.05.2012 रोजी केलेला अर्ज, विद्युत देयके, देयके भरल्या बाबतच्या पावत्या, तक्रारदारांच्या गृहप्रवेशाची पत्रिका, गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना दिलेले उत्तर, गृहनिर्माण सोसायटीचे नाहरकत प्रमाणपत्र, बांधकाम परवाना, रचना आसोसियटस् चे खाजगी “work complication certificate” इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या लेखी जबाबानुसार तक्रारदारांनी कमर्शिअल उपयोगासाठी वीज पुरवठा घेतलेला होता व ते वीजेचा वापर व्यापारी उपयोगासाठीच करत होते. त्यांना दिलेली वीज देयके त्यांनी उपभोग घेतलेल्या वीजेबाबतचीच आहेत. तक्रारदारांनी घरगुती वीज वापर सुरु केल्याबद्दल दिनांक 08.05.2012 रोजी गैरअर्जदारांकडे अर्ज दिला. त्याचेवर लगेचच म्हणजे कनिष्ठ अभियंता यांचेकडून तपासणीकरुन तक्रारदारास घरगुती वापराचे वीज देयक देण्यात आले व तसा लेखी खुलासा दिनांक 24.05.2012 रोजी पत्र लिहून तक्रारदारांना देण्यात आला. अशा प्रकारे गैरअर्जदारांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत काहीही त्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी. त्यांनी तक्रारी सोबत सी.पी.एल दाखल केले आहे.
तक्रारदारां तर्फे विद्वान वकील श्री. आनंद एन.झा व गैरअर्जदारां तर्फे विद्वान वकील श्री.जी.आर.कड यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.
मुद्दा उत्तर
1.तक्रारदारांनी गैरअर्जदारांनी त्यांना द्यावयाच्या
सेवेत काही कमतरता केली ही गोष्ट सिध्द
केली आहे का ? नाही
2.काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी –1. तक्रारदार ही गैरअर्जदार यांची ग्राहक आहे त्यांचा ग्राहक क्रमांक 510030492089 असा आहे. ही गोष्ट उभय पक्षी मान्य आहे. तक्रारदारांनी गैरअर्जदार यांना लिहीलेल्या दिनांक 08.05.2012 च्या पत्रावरुन (नि.4/2) वर तक्रारदार म्हणतात की, तक्रारदारांनी दिनांक 02.03.2010 रोजी विद्युत कनेक्शन घेतले होते. त्याचा वापर त्यांनी दिनांक 03.12.2010 पर्यंत बांधकामासाठी केला व नंतर तो घरगुती कारणासाठी केला. त्यांना मीटर कमर्शिअल दराने दिले होते ही गोष्ट माहिती नव्हती. त्यांना दिनांक 21.02.2012 रोजी 41,560/- रुपयाचे बिल आले त्यावेळी चौकशी केली असता त्यांना ही गोष्ट समजली त्यामुळे दिनांक 03.12.2010 पासून त्यांना घरगुती दराने विद्युत देयके देण्यात यावी.
2. दिनांक 24.05.2012 रोजी गैरअर्जदारांनी तक्रारदारांना पत्र पाठवून (नि.4/10) कळवले की त्यांच्या दिनांक 08.05.2012 च्या अर्जाप्रमाणे जागेची पाहणी केली व अहवालानुसार आपल्याला पुढील देयके घरगुती दराने देण्यात येतील. आपल्याला मागील देयके घरगुती दराने हवी असतील तर नगर पालिकेचा बांधकाम पूर्ण झाल्याचा परवाना दाखल करावा.
3. तक्रारदारांच्या सी.पी.एल वरुन असे दिसले की, तक्रारदारांना मार्च 2010 पासून कमर्शिअल दराने वीज देयके देण्यात आली होती. मे 2012 नंतर त्यांना घरगुती वापराने देयके देण्यात आलेली आहेत.
4. तक्रारदारांनी दाखल केलेली कागदपत्रे बघता त्यात त्यांचा गृहप्रवेश पत्रिकेची झेरॉक्स प्रत (दिनांक 03.12.2010), जय महेश गृह निर्माण सहकारी संस्थेचे घर बांधकाम करण्यासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र व रचना असोसिएटसचे या खाजगी संस्थेचे घरकाम पूर्ण झाल्याबद्दलचे दिनांक 25.11.2010 चे पत्र व नगर पालिकेच्या बांधकाम परवाना पत्र अशी कागदपत्रे आहेत.
या कागदपत्रात कोठेही नगर पालिकेचे बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (complication certificate) नाही. त्याच प्रमाणे दिनांक 08.05.2012 पूर्वी कधीही तक्रारदारांनी गैरअर्जदारांना त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे व त्यांना घरगुती दराने विद्युत देयके द्यावीत असे कळवले असल्याबाबतचा कोणताही पुरावा मंचा समोर आलेला नाही.
5. वरील विवेचनावरुन तक्रारदारांनी मार्च 2010 मध्ये घराच्या बांधकामासाठीच विद्युत पुरवठा घेतलेला होता. त्यामुळे त्यांना व्यापारी दराने विद्युत जोडणी देण्यात आली होती. त्यांनी दिनांक 08.05.2012 रोजी गैरअर्जदारांना त्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यांना घरगुती दराने देयक द्यावे असे लेखी कळविले. तक्रारदारांनी दिनांक 08.05.2012 रोजी गैरअर्जदारांना अर्ज दिल्यानंतर लगेचच मे 2012 च्या सी.पी.एल मध्ये गैरअर्जदारांनी तक्रारदारांना घरगुती दराने वीज देण्यास सुरुवात केली अशी नोंद आहे व तक्रारदारांना तसे लेखी पत्र देखील गैरअर्जदारांनी पाठवले. थोडक्यात तक्रारदारांनी बांधकामासाठी विद्युत जोडणी मागितल्यामुळे ती व्यापारी दराने देण्यात आली व बांधकाम पूर्ण झाल्याचे पत्र मिळाल्याबरोबर गैरअर्जदारांनी घरगुती दराने वीज देयके देण्यास सुरवात केली. यात गैरअर्जदारांनी तक्रारदारांना द्यायच्या सेवेत काहीच कमतरता केलेली नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाही.