निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 06/09/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 06/09/2011
तक्रार निकाल दिनांकः- 02/01/2014
कालावधी 02वर्ष. 03 महिने. 27 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
हनुमानदास पिता व्दारकादास सोनी. अर्जदार
वय 68 वर्षे, धंदा. व्यापार. अॅड. जे.बी.गिरी.
रा.कच्छी बाजार,परभणी.ता.जि.परभणी.
विरुध्द
उप अभियंता. गैरअर्जदार.
कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. अॅड.एस.एस.देशपांडे.
जिंतूर रोड, जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीची बिले देवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा परभणी येथील रहिवाशी असून अर्जदाराच्या आईच्या नावे घरगुती वापरासाठी तिन फेजचे विद्युत पुरवठा ग्राहक क्रमांक 530010021447 अन्वये गैरअर्जदाराकडून घेतला होता, सदरील विद्युत पुरवठा घेतल्यानंतर अर्जदार गैरअर्जदाराकडे नियमितपणे विद्युत बिल भरत आलेले आहे. अर्जदाराची आई मयत झाली आहे व सदरील लाईट पुरवठा अर्जदाराच्या नावे हस्तांतर करुन घेणे बाकी आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, तो सप्टेंबर 2010 पर्यंत अर्जदाराने संपूर्ण बिलाची थकबाकी नियमित भरलेली आहे. अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने अर्जदारास ऑक्टोबर 2010 मध्ये चुकीचे मिटर रिडींग दाखवुन समायोजित बिलाची रक्कम म्हणून 2,79,939/- चे चुकीचे बिल दिले व ते अर्जदाराने न भरल्यास विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येईल असे गैरअर्जदाराने अर्जदारास सुचविले.
अर्जदाराने सदरचे चुकीचे बिल दुरुस्त करुन द्यावे म्हणून गैरअर्जदाराकडे विनंती केली, परंतु गैरअर्जदाराने कोणतेही तक्रार ऐकुन घेतले नाही, उलट अर्जदाराचा ऑक्टोबर 2010 मध्ये विद्युत पुरवठा खंडीत केला. विद्युत पुरवठा खंडीत केल्यानंतर अर्जदाराने उपरोक्त बिलाच्या दुरुस्ती संदर्भात वेळोवेळी विनंती केली, त्यानंतर गैरअर्जदाराने दिनांक 30/07/2011 रोजी अर्जदारास थकीत बिलापोटी 1 लाख रु. भरल्यास त्याचा पुरवठा चालू करुन देण्यात येईल. असे गैरअर्जदाराने सांगीतले त्याप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे 1 लाख रु. जमा केले व त्याच दिवशी अर्जदाराचा विद्युत पुरवठा चालू करुन देण्यात आला.
अर्जदाराचे म्हणणे की, ऑक्टोबर 2010 मध्ये लाईट कट केल्यानंतर गैरअर्जदाराने चुकीच्या पध्दतीने ऑक्टोबर 2010 पासून ते जुलै 2011 पर्यंतचे अर्जदारास 31,453/- रु. चे चुकीचे बिल दिले. म्हणून सदर बिल रद्द होणे आवश्यक आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराकडून चुकीच्या पध्दतीने 1 लाख रु. भरुन घेतले आहे व ती रक्कम अर्जदारास परत करणे आवश्यक आहे. म्हणून सदरची तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश करावा की, गैरअर्जदाराने ऑक्टोबर 2010 मध्ये समायोजित बिल म्हणून 2,79,939/- रु. चे बिल रद्द करावे, व तसेच गैरअर्जदाराने विद्युत पुरवठा खंडीत केल्यानंतर ऑक्टोबर 2010 ते जुलै 2011 पर्यंतचे चुकीचे बिल रु. 31,453/- रद्द करावे. असा आदेश करावा व तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 30/07/2011 रोजी 1 लाख रु. भरलेले गैरअर्जदाराकडून अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा. व तसेच गैरअर्जदाराने तक्रारदारास नुकसान भरपाई म्हणून 5,000/- रु. व अर्जाचा खर्च म्हणून 2000/- देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने नि.क्रमांक 7 वर 4 कागदपत्रे दाखल केले आहेत. ज्यामध्ये दिनांक 26/07/2011 चे लाईट बिलाचे झेरॉक्स प्रत, व अर्जदाराने दिनांक 30/07/2011 रोजी गैरअर्जदाराकडे 1 लाख रु. भरल्याचे पावतीची झेरॉक्स प्रत दाखल केले आहे, तसेच 30/07/2011 रोजीचे 1 लाख रु. चे प्रोव्हिजनल बिलची झेरॅाक्स प्रत व तसेच जुलै 2011 चे लाईट बिलाची झेरॅाक्स प्रत दाखल केले आहे. तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 18 वर 3 कागदपत्रे दाखल केले आहेत. ज्यामध्ये 30/07/2011 रोजी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे 1 लाख रु. भरल्याची झेरॉक्स पावती, सप्टेंबर 2012 चे बिल, व अर्जदाराचे शपथपत्र दाखल केले आहे व अर्जदाराने नि.क्रमांक 21 वर जुलै 2011 पासूनचे सी.पी.एल.ची प्रत दाखल केले आहे.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 14 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे.गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक नाही. कारण जो पर्यंत अर्जदार हा स्वतःच्या नावावर मिटर नोंद करुन घेत नाही तो पर्यंत अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक होवु शकत नाही व याच मुद्यावर अर्जदाराची तक्रार फेटाळावी. अर्जदार हा नियमित विज बिल भरण करत नव्हता. गैरअर्जदाराने प्रत्यक्ष मिटर रिडींग प्रमाणेच विज बिल दिेलेले आहे. सदरील बिल हे मागील 93 महिन्याचे असून त्या काळात लावलेले बिल वजा करुन तसेच स्लॅब देवुन योग्यच बिले अर्जदारास दिलेली आहेत.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराच्या विनंती वरुन अर्जदारास थकीब बिलापोटी पैकी 1 लाख रु. चा हप्ता करुन देण्यात आला, त्यावेळी अर्जदाराने उर्वरित रक्कम भरतो म्हणून गैरअर्जदारास आश्वासन दिले होते, परंतु अर्जदाराने उर्वरित बिल न भरता विद्यमान मंचासमोर सदरची खोटी तक्रार दाखल केली आहे.
गैरअर्जदाराने अर्जदारास कधीच चुकीचे बिल दिलेले नाही, त्यामुळे कोणतेही बिल रद्द होणे योग्य होणार नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदाराने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होवु शकत नाही कारण अर्जदाराने त्यांच्या तक्रारीमध्ये परिच्छेद क्रमांक 1 मध्ये स्वतः म्हंटले आहे की, अर्जदाराच्या आईच्या नावे घरगुती वापरसाठी तिन फेजचे विद्युत कनेक्शन गैरअर्जदाराकडून घेण्यात आले होते व अर्जदाराची आई मयत झाली आहे. व विद्युत पुरवठा अर्जदाराच्या नावे करुन घेणे बाकी आहे. याबाबत अर्जदाराने आई मयत केव्हा झाली व तो केव्हा पासून सदर विद्युत पुरवठ्याचा वापर करतो, याबद्दल अर्जदाराने आपल्या तक्रारी मध्ये स्पष्टपणे कोठेही म्हंटले नाही. अर्जदाराने त्याच्या संपूर्ण तक्रारी मध्ये तो गैरअर्जदाराचा ग्राहक आहे, असे कोठेही नमुद केलेले नाही. तसेच गैरअर्जदाराने सदरचा विद्युत पुरवठा अर्जदाराच्या नावे करुन द्यावा या बद्दल अर्जदाराने तक्रार दाखल केल्यापासून ते आजतागयत पर्यंत प्रयत्न केल्याचे कोठेही दिसून येत नाही. व तसेच या बाबत कोणताही कागदोपत्री पुरावा अर्जदाराने मंचासमोर आणला नाही, व तसेच नि.क्रमांक 21 वर दाखल केलेल्या सी.पी.एल. चे अवलोकन केले असता, जानेवारी 2010 पासून ते एप्रिल 2013 पर्यंत सदरचा विद्युत पुरवठा हा अर्जदाराच्या आईच्याच नावे आहे. यावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराने सदरचा विद्युत पुरवठा त्याच्या नावावर करुन घेण्याचा कोठेही प्रयत्न केलेला नाही. म्हणून अर्जदारास ग्राहक या नात्याने Consumer Protection Act 1986 अंतर्गत सदरची तक्रार दाखल करता येत नाही, व सदरची तक्रार मंचास चालवण्याचा अधिकार नाही, असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.