(घोषित दि. 07.10.2013 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांनी विजय गार्डन, जुना जालना ही मिळकत घर नंबर 3-1-96 व 3-1-97 नगर भूमापन क्रमांक 10510 श्री.अली सालेम बादाम व हसीना अहमद अली यांनी खरेदी केली त्यानंतर तक्रारदारांनी त्यांचेकडून दिनांक 07.07.2010 रोजी खरेदी केली. सदर मिळकतीमध्ये बसवलेल्या ग्राहक क्रमांक 510030006010 बसवले असून तक्रारदार सदर ग्राहक क्रमांकद्वारे विजेचा वापर करतात तसेच विज बिलाचा नियमितपणे भरणा करतात. तक्रारदारांनी दिनांक 13.09.2012 रोजी रुपये 3,960/- एवढया रकमेचा भरणा केला असूनही दिनांक 16.11.2012 ते 16.12.2012 या कालावधीचे रक्कम रुपये 23,867.99 एवढे विज बिल गैरअर्जदार यांनी जास्तीचे दाखवले आहे. तक्रारदारांनी या संदर्भात वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार केली. गैरअर्जदार यांनी हरीशचंद्र गोपीचंद सहाणी यांच्या कायमस्वरुपी बंद झालेल्या ग्राहक क्रमांक 510030006028 वरील जून 2001 पूर्वीची थकबाकी तक्रारदारांच्या बिलावर टाकली असल्याबाबत गैरअर्जदार यांना कळवले आहे. तक्रारदार दिनांक 07.07.2010 पासून गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना जून 2001 पूर्वीची थकबाकी रुपये 23,867.99 एवढया रकमेची केलेली मागणी चूकीची व बेकायदेशीर आहे. अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानूसार ग्राहक क्रमांक 510030006010 अन्वये श्री हरिशचंद्र गोपीचंद सहाणी विजय गार्डन, जालना या ठिकाणी दिनांक 20.01.1963 रोजी विद्युत पुरवठा घेतला असून ग्राहकाने जेवढया विजेचा वापर केला त्या यूनिटचे देयक नियमाप्रमाणे दिले आहे. तसेच त्यांनी ग्राहक क्रमांक 510030006028 अन्वये विद्यूत पुरवठा घेतला असून ग्राहकाने विद्यूत देयकाचा भरणा न केल्यामूळे विद्यूत पुरवठा कायम स्वरुपी खंडीत करण्यात आला. त्यांचेकडे रक्कम रुपये 22,374/- थकबाकी असून या ग्राहकांचा त्याचप्रिमायसेसमध्ये त्याच नावाने विद्यूत पुरवठा चालू असल्यामूळे सप्टेबर 2012 च्या देयकामध्ये थकबाकीची रक्कम समायोजित म्हणून नियमाप्रमाणे नमूद केली आहे. महाराष्ट्र विद्यूत नियामक आयोग विद्यूत पुरवठा संहिता आणि पुरवठयाच्या इतर अटी विनियम 2005 अन्वये मृत ग्राहक किंवा पूर्वीच्या मालकाचे/वहीवाटदाराची देय असलेली थकबाकीची रक्कम कायदेशीर प्रतिनिधी, वारस अथवा जागेचा नविन मालक/वहीवाटदार यांचेकडून वसूली करता येते. ग्राहकांना दिलेली विद्यूत देयक वसूली योग्य व बरोबर आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री एस.रहेमतली व गैरअर्जदारांचे विद्वान वकील श्री.जी.आर.कड यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता हसीना गार्डन, जूना जालना येथील सदरची मिळकत मोहमंद जावेद अब्दूल करीम, मोहमंद वाजेद अब्दूल करीम, मोहमंद अब्दूल मतीन यांनी दिनांक 06.07.2010 रोजी खरेदीखताद्वारे अली सालेम बादाम व हसीना अहमद अली यांचेकडून विकत घेतली.
तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी सदर मिळकती खरेदी केल्या पासून म्हणजेच जून 2010 पासून ग्राहक क्रमांक 510030006010 अन्वये विद्यूत वापर करतात, नियमितपणे विद्यूत देयकाचा भरणा करतात. परंतू सदर ग्राहक क्रमांकाचा विद्यूत पुरवठा हरीशचंद्र गोपीचंद सहाणी यांचे नावावर आहे. गैरअर्जदार यांनी ग्राहक क्रमांक 510030006010 चे दिनांक 16.11.2012 ते 16.12.2012 या कलावधीचे विद्यूत देयकामध्ये रुपये 23,733.00 ही समायोजित रक्कम थकबाकी असल्याचे दर्शविले. तक्रारदारांनी या दिनांक 15.01.2013 रोजी गैरअर्जदार यांचेकडे सदर रकमेचा तपशिल संदर्भात माहीती मिळण्याकरीता अर्ज केला. त्यानंतर माहितीच्या अधिकार अधिनियम 2005 अन्वये दिनांक 04.02.2013 रोजी गैरअर्जदार यांचेकडे अर्ज केला. गैरअर्जदार यांनी दिनांक 14.02.2013 रोजीच्या पत्रान्वये ग्राहक क्रमांक 510030006010 हा हरिशचंद्र गोपीचंद सहाणी यांचे नावावर असून त्यांचेच नावे असलेल्या परंतू कायम स्वरुपी बंद झालेल्या ग्राहक क्रमांक 510030006028 ची थकबाकी रक्कम रुपये 22,374/- न भरल्यामुळे त्यांच्या 510030006010 या ग्राहक क्रमांकाच्या नावे टाकण्यात आली. सदरची थकबाकी हि माहे जून 2001 पूर्वीची आहे, असे नमूद केल्याचे दिसून येते.
तक्रारीत आलेल्या पुराव्यानूसार रक्कम रुपये 22,374/- ही थकबाकीची रक्कम ग्राहक क्रमांक 510030006028 या विद्यूत पुरवठयाबाबत असून सदर थकबाकी जून 2001 पूर्वीची आहे. सदरचा विद्यूत पुरवठा कायम स्वरुपी बंद झाल्याबाबत गैरअर्जदार यांच्या दिनांक 14.02.2013 च्या पत्रावरुन स्पष्ट होते.
गैरअर्जदार यांनी ग्राहक क्रमांक 510030006028 जून 2001 पूर्वीच कायम स्वरुपी (Permanent disconnection)खंडीत केला आहे. तक्रारदारांनी सदरची मिळकत 2010 मध्ये खरेदी केल्यानंतर सदर बिलाची मागणी नियमितपणे केल्या बाबतचा कोणताही पुरावा न्याय मंचासमोर नाही. गैरअर्जदार यांनी सन 2001 पूर्वीची थकबाकी नविन ग्राहक क्रमांकावर सूमारे 12 वर्षानंतर दर्शवून अयोग्यरित्या वसूलीची कार्यवाही केल्याचे दिसून येते. महाराष्ट्र विद्यूत कायदा कलम 56 नूसार गैरअर्जदार यांना फक्त 2 वर्षाच्या कालावधी पर्यंत मागील थकबाकीची वसूली करता येते. त्यामुळे गैरअर्जदार यांनी केलेली सदरची वसूलीची कार्यवाही अयोग्य, मुदतबाह्य असल्याचे स्पष्ट होते असे न्याय मंचाचे मत आहे.
वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता गैरअर्जदार यांनी दिलेले रक्कम रुपये 22,374/- चे विद्यूत देयक मुदतबाह्य, विद्यूत कायद्यातील तरतूदी नूसार नसल्याचे, तसेच नियमानुसार नसल्याचे कारणास्तव रद्द करणे योग्य होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी ग्राहक क्रमांक 510030006010 दिनांक 24.12.2012 रोजीचे दिनांक 16.11.2012 ते 16.12.2012 या कालावधीच्या दिलेल्या बिलातील दर्शवलेली समायोजित रक्कम रुपये 23,857/- (अक्षरी तेवीस हजार आठशे सत्तावन्न रुपये फक्त) आदेश मिळाल्यानंतर 30 दिवसात विद्यूत देयकातून वगळण्यात येवून पुढील दुरुस्ती बील विज वापरानुसार नियमाप्रमाणे देण्यात यावे.
- खर्चा बाबत आदेश नाही.
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच अर्जदाराला परत करावेत.