निकाल
(घोषित दि. 25.07.2016 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार हे महावितरण वीज कंपनीचे ग्राहक असून त्यांना वाढीव वीज बिले देण्यात आले. या बिलाबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे आहे.
अर्जदार हे सर्वे नं.488 म्हाडा कॉलनी, जालना येथील रहिवासी असून त्यांनी महावितरण वीज कंपनीकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या घरी 2 सी.एफ.एल.बल्ब व एक टि.व्ही.असून सरासरी वीज बिल 150 ते 200 रुपये प्रतीमाह असे येते. गैरअर्जदार यांनी डिसेंबर 2015 मध्ये 14260/- रुपये, जानेवारी 2016 व फेब्रुवारी 2016 मध्ये अनुक्रमे 170 व 4178/- रुपये वीज बिल आकारणी केली. सदरील वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे गैरअर्जदार यांनी दि.05.01.2016 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केला. गैरअर्जदार यांना मीटर बदलून देण्याची विनंती केली असता त्यांनी मीटर तपासणी न करता वीज पुरवठा खंडित केला. अर्जदाराने वीज बिल रदद करण्याची व सेवेतील त्रुटीबददल नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारीसेाबत वीज बिलाच्या प्रती, महावितरणला दि.18.12.2015 रोजी दिलेल्या तक्रारीची प्रत इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
अर्जदाराने दि.26.02.2016 रोजी गैरअर्जदार यांनी त्यांचा वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्याचा आदेश देण्याची मागणी करणारा अंतरीम अर्ज दाखल केला. यावर दि.16.02.2016 रोजी सुनावणी घेतली व अर्जदाराच्या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य आढळून आल्यामुळे अर्जदाराने रु.3000/- गैरअर्जदार यांच्याकडे भरावे व गैरअर्जदार यांनी त्यांचा वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्याचा अंतरीम आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार यांनी लेखी जबाब दाखल केला असून त्यांच्या जबाबानुसार अर्जदारास देण्यात आलेले बिल योग्य आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये तांत्रिक कारणामुळे रिडींग उपलब्ध न झाल्यामुळे अर्जदारास सरासरीवर आधारीत वीज बिल देण्यात आले. नोव्हेंबर 2015 मध्ये रिउींग उपलब्ध झाल्यानंतर अर्जदारास 1283 युनिट वीज वापराचे बिल देण्यात आले व मागील महिन्याचे 776.67 रुपये कमी करुन देण्यात आले. जानेवारी 2016 मध्ये अर्जदारास देण्यात आलेले 18883.94 रुपयाचे बिल योग्य आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती गैरअर्जदार यांनी मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी जबाबासोबत अर्जदाराचे सी.पी.एल. दाखल केलेले आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी दि.24.01.2015 रोजी वीज पुरवठा घेतला आहे. अर्जदाराचा ग्राहक क्रमांक 510038514324 असा असून मीटर क्रमांक 9803411044 असा आहे.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या सी.पी.एल.चे निरीक्षण केल्यावर असे आढळून येते की, गैरअर्जदार यांनी मार्च 2015 मध्ये 75 युनिट व एप्रिल 2015 ते जून 2015 या कालावधीत सरासरीवर आधारीत 75 युनिट वीज वापराची आकारणी केली आहे. जुलै 2015 चे 623 युनिट वीज वापराचे बिल हे चार महिन्याचे आहे. त्यावरुन अर्जदाराचा फेब्रुवारी 2015 ते जुलै 2015 या कालावधीचा सरासरी वीज वापर हा 698 – 6 = 116 युनिट प्रतिमाह असल्याचे स्पष्ट होते. ऑगस्ट 2015 व सप्टेंबर2015 या कालावधीत अर्जदाराचा वीज वापर हा अनुक्रमे 135 व 100 युनिट दिसून येतो. गैरअर्जदार यांनी ऑक्टोबर 2015 मध्ये मीटर रिडींग न घेता सरासरीवर आधारीत 130 युनिट वीज वापराची आकारणी केलेली दिसून येते.
नोव्हेंबर 2015 मध्ये मागील रिडींग 933 व चालू रिडींग 2216 दर्शवून अर्जदारास 1283 युनिट वीज वापराचे बिल देण्यात आल्याचे दिसून येते. या वीज बिलाविरुध्द अर्जदाराने दि.18.12.2015 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली असल्याचे दिसून येते ज्यामध्ये वीज बिल जास्त असून मीटर तपासणी करण्याची मागणी केलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीची दखल घेतलेली दिसून येत नाही तसेच पाहणी किंवा मीटर तपासणी केलेली नाही. गैरअर्जदार यांनी वीज कायदा 2003 मधील कलम 56 चे उल्लंघन करुन अर्जदाराचा वीज पुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित केला त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार केली आहे.
वरील सर्व निरीक्षणावरुन गैरअर्जदार यांच्या सेवेत त्रुटी असल्याचे दिसून येते. वीज नियामक आयोगाचे अधिनियम व कायद्याच्या तरतुदी नुसार अर्जदारास मागील वीज वापराच्या सरासरीवर आधारीत वीज बिल आकारणी करणे अपेक्षित होते.
मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशतः मान्य करण्यात येते.
2) गैरअर्जदार यांनी अर्जदारास नोव्हेंबर 2015 व त्यापुढील कालावधीत देण्यात
आलेले वीज बिल रदद करण्यात येत आहे.
3) गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे मीटर बदलून त्याची तपासणी करावी व नोव्हेंबर
2015 पुढील कालावधीचे वीज बिल हे मागील वीज वापराच्या सरासरीवर
आधारीत (933 – 9) = 104 युनिट प्रतिमाह याप्रमाणे द्यावे.
4) गैरअर्जदार यांनीअर्जदारास सेवेतील त्रुटीबददल व खर्चाबददल 1000/- रुपये
30 दिवसात द्यावे.
श्री. सुहास एम.आळशी श्रीमती रेखा कापडिया श्री. के.एन.तुंगार
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना