जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 28/2012 तक्रार दाखल तारीख – 15/02/2012
तक्रार निकाल तारीख– 30/04/2013
बंडू पिता जिजाबा राऊत,
रा.नाळवंडी रोड, बीड ता.जि.बीड. ... अर्जदार
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण
कंपनी म. शहर उपविभाग, बीड
मार्फत-कार्यकारी अभियंता. ... गैरअर्जदार
समक्ष - श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
अर्जदारातर्फे अड.डी.एम.डबडे,
गैरअर्जदारातर्फे अड.ए.एस.पाटील.
---------------------------------------------------------------------------------------
निकाल
दिनांक- 30.04.2013
(द्वारा- श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून दि.20.01.2006 रोजी वीज कनेक्शन घेतले. तक्रारदार नियमितपणे विद्युत देयके भरत आला आहे. दि.09.11.2011 रोजी तक्रारदारास अचानक रुपये अकरा हजार सातशे वीस बिल आले व त्या महिन्याचा त्याचा वीज वापर केवळ 20 युनिट असताना तो 100 युनिट दाखवला आहे.
तक्रारदाराने दि.20.01.06 रोजी कोटेशन भरताना दुकानासाठी भरलेले होते व आवश्यक रक्कम दिली होती असे असताना सप्टेंबर 2011 पर्यंत त्याला गैरअर्जदार यांच्या चुकीमुळे घरगुती वापराप्रमाणे बिल आले. तक्रारदाराला गैरअर्जदार कोणत्या प्रकारची बिले देत आहेत याची माहिती नव्हती, नंतर अचानक दि.09.11.11 रोजी
(2) त.क्र.28/12
11,720/- रुपयांचे बिल तक्रारदाराला आले. तक्रारदाराने नोटीस देवून सदरचा प्रकार गैरअर्जदार यांच्या निदर्शनास आणला त्यावर गैरअर्जदारांनी उत्तर दिले की, त्यांना दि.02.12.2011 रोजी समजले की तक्रारदार हा वीज वापर व्यवसायासाठी करत आहे. परंतू त्याला घरगुती वापराप्रमाणे विद्युत बिल आकारण्यात आले, म्हणून त्यास फरक बिल दिले आहे.
तक्रारदाराने दुकानासाठी कनेक्शन घेतले असताना गैरअर्जदारांनी निष्काळजीपणाने त्याला घरगुती वापराप्रमाणे वीज देयक दिले. तसेच वापर केवळ 20 युनिट असताना 100 युनिटचे बिल दिले म्हणून तक्रारदाराची तक्रार आहे.
गैरअर्जदार मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यात त्यांनी तक्रारदाराने व्यवसायाकरता विजेचे कनेक्शन घेतले व वीज देयक मात्र घरगुती वापराचे दिले ही गोष्ट मान्य केली आहे. तक्रारदाराचे विद्युत मीटर बंद पडल्यामुळे मीटर रिडींग प्रमाणे त्यास सरासरी देयके देण्यात आली. तक्रारदारास 100 युनिटचे देण्यात आलेले देयक फेब्रुवारी 2012 मध्ये कमी केले आहे.
तक्रारदाराने व्यावसायिक वापरासाठी विजेचे कनेक्शन घेतले व त्याला घरगुती वापराने वीज बिल देण्यात येत आहे हे दि.20.12.11 रोजी तपासणीत लक्षात आले. त्याप्रमाणे कागदपत्रांची पाहणी करुन व्यवसायाप्रमाणे विद्युत बिल आकारणी करुन फरक देयक 10,847.00 पैसे देण्यात आले, त्यावर काहीही दंड आकारलेला नाही. तसेच ऑक्टोबर 11 ते डिसेंबर 11 चे सरासरी 100 युनिटचे देयक हे फेब्रुवारी 2012 च्या बिलात कमी करण्यात आले आहे. तक्रारदाराला नियमित देयके दिली आहेत, सबब तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदारातर्फे विद्वान वकील श्री.डबडे व गैरअर्जदारांतर्फे विद्वान वकील श्री.पाटील यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदाराच्या वकीलांनी सांगितले की, त्यांनी योग्य ते कोटेशन भरलेले असताना त्यांना घरगुती वापराचे बिल आले ही पूर्णपणे गैरअर्जदार यांची चूक आहे व ती सेवेतील त्रुटी आहे. तक्रारदार गरीब असून एवढे बिल आलेले बघून त्यांना मानसिक त्रास झाला. अर्जदारांनी वारंवार विनंती करुनही गैरअर्जदारांनी बिल कमी केले नाही, अत्यंत
(3) त.क्र.28/12
नाईलाजाने तक्रारदारांना सदरचे बिल भरावे लागले हे बिल त्यांनी तक्रार मंचात प्रलंबित असताना भरलेले आहे. त्यामुळे त्यांना जो मानसिक त्रास झाला त्याची भरपाई, तक्रारीचा खर्च, व्यवसायातील नुकसान म्हणून नुकसान भरपाई मिळावी म्हणून विनंती केली.
गैरअर्जदाराचे विद्वान वकील श्री.पाटील यांनी सांगितले की, व्यावसायिक वापरासाठी कोटेशन भरलेले असताना त्यांना घरगुती वापराचे बिल दिले ही गोष्ट मान्य आहे. त्यामुळेच सदरचा फरक भरुन काढण्यासाठी त्यांना जास्त बिल दिले, हे बिल आकारताना कोणताही दंड अथवा व्याज लावलेले नाही. तसेच ऑक्टोबर 11 ते डिसेंबर 11 चे सरासरी 100 युनिटचे देयक फेब्रुवारी 2012 च्या बिलात कमी केले आहे, सदरचे देयक तक्रारदारांनी भरले आहे. त्यामुळे देयकाबाबतचा वाद संपला आहे. त्यांनी तक्रारदाराने व्यावसायिक वापरासाठी वीज कनेक्शन घेतले आहे, त्यामुळे तक्रारदार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (i) (d) प्रमाणे ‘ग्राहक’ या संज्ञेत येत नाही, म्हणून तक्रारदाराची तक्रार खारीज करावी अशी विनंती केली.
तक्रारदार हा ‘माऊली’ या नावाने हेअर कटींग सलून चालवतो. त्याच्या व्यवसायाच्या स्वरुपावरुनच तो स्वतःची उवजिवीका करण्यासाठी सदरचा व्यवसाय करतो हे स्पष्ट आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (i) (d) च्या कक्षेत तो येतो असे मंचाला वाटते. तक्रारदाराला दिलेले जास्तीचे बिल हे केवळ घरगुती वापर व व्यावसायिक वापर यातील फरकापोटी होते ही गोष्ट गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या सीपीएल वरुन स्पष्ट दिसते. तसेच सरासरीने जास्तीचे दिलेले बिल फेब्रुवारी 2012 च्या बिलात कमी केले आहे तेव्हा बिलातील वाद संपलेला आहे. परंतू तक्रारदाराने व्यावसायिक वीज वापराचे कोटेशन दिलेले असताना त्याला घरगुती वापराचे बिल देणे ही गैरअर्जदाराची चूक असून ती सेवेतील कमतरता आहे असे या मंचाचे मत आहे. एकदम जास्त बिल आले व ते एकदम भरावे लागल्याने तक्रारदाराला जो मानसिक त्रास झाला त्याची भरपाई म्हणून त्याला रु.500/- एवढी रक्कम तसेच सदरच्या तक्रारीचा खर्च म्हणून रु.500/- एवढी रक्कम देणे न्यायोचित ठरेल असे मंचाला वाटते.
सबब, मंच खालील आदेश पारीत करत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(4) त.क्र.28/12
2) गैरअर्जदाराने तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम
रु.500/- आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावेत.
3) गैरअर्जदाराने तक्रारदाराला सदर तक्रारीचा खर्च रु.500/- द्यावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड