(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदार हे गैरअर्जदार महावितरण कंपनीचे ग्राहक असून, त्यांना देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाबाबत मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. जानेवारी 10 पर्यंत त्यांना नियमितपणे वीज बिल देण्यात येत होते, त्याचा भरणा त्यांनी केला आहे. जानेवारी नंतर त्यांना वीज बिल देण्यात आले नाही. एप्रिल 20 मध्ये त्यांना, गैरअर्जदार यांनी 17,670/- रुपयाचे वीज बिल दिले. अर्जदाराने या बिलाबाबत तक्रार केली असता, त्याची दखल न घेता, त्यांना जून 10 मध्ये 21,420/- रुपयाचे बिल आकारण्यात आले आहे. अर्जदाराने मीटर चाचणीसाठी फी भरली. त्यांचे मीटर व्यवस्थित असतांना देखील गैरअर्जदार यांनी, त्यांना सुधारीत बिल दिले नाही. गैरअर्जदार यांनी सुधारीत बिल देण्याची व नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार यांनी चुकीच्या वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडीत करु नये यासाठी अंतरिम आदेशाची विनंती अर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी अर्जदारास नियमितपणे वीज बिले दिलेली आहेत. रिडींग उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी जानेवारी 10 मध्ये 785/- रुपये कमी करुन दिलेले आहेत. अर्जदाराचे मीटर चाचणी केल्यानंतर ते योग्य असल्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व मंचासमोर झालेल्या सुनावणीवरुन असे दिसून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला असून, त्याचा ग्राहक क्रमांक 490011876401 असा आहे. गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या सी.पी.एल. चे निरीक्षण केल्यावर असे आढळून येते की, अर्जदाराकडे लावण्यात आलेल्या मीटरचा क्रमांक 65101680246 असा असून, ते दि.05.08.2010 पर्यंत कार्यरत होते. गैरअर्जदार यांच्यातर्फे अर्जदारास मे 2009 पर्यंत मीटरवरील रिडींगप्रमाणे बिल आकारण्यात आले, पण जून 2009 ते डिसेंबर 2009 या काळात मागील रिडींग 321 व चालू रिडींग 321 असे दर्शवून अर्जदारास 39 युनिट वीज वापराचे सरासरीवर आधारीत बिल देण्यात आले. जानेवारी 10 मध्ये रिडींग उपलब्ध झाल्यानंतर अर्जदारास सरासरी वीज बिलाचे 785-19 रुपये वजा करुन बिल देण्यात आले. फेब्रुवारी 10 चे मीटर रिडींगप्रमाणे बिल आकारल्यानंतर मार्च 10 ते जून 10 या काळात पुन्हा 316 युनिट, सरासरीवर बिल आकारणी करण्यात आली. जुलै 10 मध्ये रिडींग उपलब्ध झाल्यानंतर सरासरीवर आधारीत आकारलेल्या बिलाची रक्कम रु.5633=41 वजा करण्यात आलेले दिसून येते. दि.05.08.2010 रोजी अर्जदाराचे मीटर (क्र.01680246) बदलून त्याजागी 13419535 या क्रमांकाचे मीटर बसविण्यात आले. दि.05.08.2010 रोजी मीटर बदली अहवालात जुन्या मीटरचे रिडींग 04107 असे दर्शविण्यात आले असून, दि.06.08.2010 रोजी मीटर चाचणी अहवालात ते 04107 असे नमूद केलेले आहे. अर्जदाराच्या मीटरची चाचणी केल्यानंतर ते योग्यप्रकारे कार्यरत असल्याचे अहवालावरुन स्पष्ट होते. वरील सर्व निरीक्षणावरुन असे आढळून येते की, अर्जदाराच्या मीटरचे नियमितपणे रिडींग घेण्यात न आल्यामुळे त्यांना सरासरीवर आधारीत वीज बिलाची आकारणी करण्यात आली. अर्जदाराचे जुने मीटर योग्यप्रकारे चालत असल्याचे आढळून आल्यामुळे गैरअर्जदार यांनी केलेली बिल आकारणी योग्य असल्याचे मंचाचे मत आहे. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |