जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ३३४/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ०२/१२/२०१०
तक्रार निकाली दिनांक – २६/०२/२०१४
मुकूंद दगडू घरटे ----- तक्रारदार.
उ.व.५० वर्षे, कामधंदा – नोकरी
राहणार- दत्त कॉलनी,दोंडाईचा,
ता.शिंदखेडा,जि.धुळे
विरुध्द
(१)आगार व्यवस्थापक साो ----- सामनेवाले.
राज्य परिवहन महामंडळ,दोंडाईचा,
ता.शिंदखेडा,जि.धुळे
(२) आगार प्रमुख साो
राज्य परिवहन महामंडळ,धुळे
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.आर.ए.पवार)
(सामनेवाले तर्फे – वकील श्री.एस.बी.पाटील)
--------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) सामनेवाले यांनी सेवेत कमतरता ठेवली म्हणून, नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदारांचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्याकडून दि.२८-०६-२०१० रोजी रात्री ९.३० वाजता सूटणा-या गाडीचा रु.५००/- भरुन पास घेतलेला होता. त्यांचा सीट नं.२८ होता. त्याप्रमाणे सदर पासची मुदत ही दि.२८-०६-२०१० ते दि.०१-०७-२०१० अशी होती. त्याप्रमाणे तक्रारदार हे पुणे येथे जाण्यासाठी दि.२८-०६-२०१० रोजी दोंडाईचा बस स्टॅण्डवर रात्री ९.०० वाजता बसची वाट पाहत होते, परंतु सामनेवाले यांनी ज्या गाडीचा पास दिला होता ती ९.३० ची गाडी न आल्याने व सामनेवाले यांच्याकडून कोणतीही सूचना न आल्याने, चौकशी केल्यावर सदर गाडी रद्द झाली आहे त्यामुळे शेवटची शहादा-पुणे या बसने जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे रात्री १०.३० च्या शहादा-पुणे या गाडीत तक्रारदार बसल्यानंतर त्यातील बस कंडक्टरला पास दाखविला असता त्यांनी सदर पास हा चालत नाही व तुम्हाला नवीन तिकीट काढावे लागेल, तिकीट काढावयाचे नसल्यास गाडीतून उतरून जा असे सांगितले. तक्रारदारांना गाडीतून उतरणे शक्य नसल्याने, त्यांनी रक्कम रु.५८/- चे धुळे येथे येण्याकामी तिकीट काढले. सामनेवालेंच्या या कृत्यामुळे तक्रारदार हे त्या रात्री पुण्यास जावू शकले नाहीत. तक्रारदारांना दि.२९-०६-२०१० रोजी रात्री पुण्यास जाण्यास निघावे लागले. त्यामुळे तक्रारदारांना त्यांच्या कामास उशीर झाला. तक्रारदार यांची गैरसोय होवून त्यांना मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागला. त्याकामी होणा-या नुकसानीस सामनेवाले जबाबदार आहेत. सामनेवाले यांनी राखीव जागेचे तिकीट कोणत्या गाडीत चालेल याची कल्पना दिलेली नव्हती. अशा प्रकारे सामनेवाले यांनी सदोष सेवा देवून अनुचित ग्राहक प्रथेचा अवलंब केला आहे. त्यामुळे सदरची तक्रार या मंचात दाखल करावी लागली आहे.
तक्रारदारांची अशी विनंती आहे की, तक्रारदारांची सदर तक्रार खर्चासह मंजूर करुन त्यांना मानसिक व शारीरिक नुकसानीपोटी रक्कम रु.५,००,०००/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.१०,००,०००/- सामनेवाले यांच्याकडून मिळावा.
तक्रारदारांनी त्यांच्या म्हणण्याचे पृष्टयर्थ नि.नं.३ वर शपथपत्र तसेच नि.नं.५ वर पास व तिकीटाची छायांकीत प्रत दाखल केली आहे.
(३) सामनेवाले क्र.१ व २ यांनी त्यांचा एकत्रीत खुलासा नि.नं.८ वर दाखल केला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, सदर अर्ज खोटा व लबाडीचा असून कबूल व मान्य नाही. तक्रारदारांनी दि.२८-०६-२०१० रोजी “आवडेल तेथे कोठेही प्रवासी पास” चार दिवस मुदतीकरिता घेतलेला होता. सदरचा पास हा साध्या गाडीचा होता. दि.२८-०६-२०१० रोजी रात्री तक्रारदार हे २२.३० वाजता बसमध्ये बसले असता त्यातील बस वाहकाने तक्रारदाराकडील, रक्कम रु.५००/- चा पास क्रमांक बीएन२९९३१६ बघीतल्यावर तो पास कमी मुल्याचा असल्याने निमआराम गाडीस चालणार नाही असे सांगितले. सदरची बाब ही सदोष सेवा या मध्ये येत नाही. त्याकामी नवीन तिकीट काढणे हा आग्रह योग्य व कायदेशीर होता. तक्रारदार हे दि.२८-०६-२०१० पासून ते दि.०१-०७-२०१० पावेतो कोणत्याही साध्या बसने महाराष्ट्रभर प्रवास करीत होते. व त्यास कोणत्याही साध्या बसच्या वाहकाने तक्रारदार यांना प्रवास करण्यास प्रतिबंध केलेला नाही. तक्रारदार यांना दोंडाईचा येथून साधारणपणे अर्ध्या-अर्ध्या तासाच्या अंतराने पुणे येथे जाण्यासाठी साध्या बसेस आहेत. त्या बसने तक्रारदारांनी प्रवास केलेला नसून, तक्रारदारांनी निम आराम गाडीने प्रवास केल्यामुळे, सदर बस वाहकाने प्रवास करण्यास प्रतिबंध केला. ही बाब सेवेतील कमतरता व दोष नाही. तक्रारदार यांनी राखीव जागेच्या तिकीटाने प्रवास केलेला आहे. सदर पासवर मागिल बाजूस सूचना असतांना तक्रारदाराने त्या लक्षात घेतलेल्या नाहीत. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे कोणतीही लेखी तक्रार केलेली नाही. याचा विचार होता सामनेवाले हे कोणतीही नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. सबब सदर तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी अशी सामनेवाले यांनी शेवटी विनंती केली आहे.
सामनेवाले यांनी, त्यांच्या खुलाशाचे पुष्टयर्थ शपथपत्र अथवा कोणतीही कागदपत्रे प्रकरणात दाखल केलेली नाहीत.
(४) तक्रारदार हे सदर प्रकरणी नेमलेल्या तारखांना सतत गैरहजर आहेत. तसेच त्यांच्या वकीलांनी युक्तिवाद केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांचा अर्ज, शपथपत्र व दाखल कागदपत्रे पाहता तसेच सामनेवाले यांचा लेखी खुलासा, शपथपत्र व दाखल कागदपत्रे पाहता आणि सामनेवालेंच्या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब) सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : नाही |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(५) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी दि.२८-०६-२०१० रोजी सामनेवाले यांच्याकडून बस प्रवासाचा पास घेतलेला आहे. सदर पासची छायांकीत प्रत नि.नं.५/१ वर दाखल आहे. या पासचे अवलोकन केले असता त्यावर तक्रारदाराचे नांव मुकूंद दगडू घरटे असे नमूद असून सदर पास क्रमांक बीएन २९९३१६ हा दि.२८-०६-२०१० ते दि.०१-०७-२०१० पावेतो “आवडेल तेथे कोठेही प्रवासी पास” असा प्रौढांसाठी मुल्य रु.५००/- चा असल्याचे नमूद केलेले आहे. सदर पास सामनेवाले यांनी मान्य केलेला आहे. याचा विचार होता तक्रारदार हे या सामनेवालेंचे ‘‘ग्राहक’’ असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(६) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी आवडेल तेथे कोठेही प्रवास पास हा चार दिवसांचे कालावधी करिता काढलेला होता. या प्रमाणे तक्रारदारांना दि.२८-०६-२०१० रोजी रात्री ९.३० चे गाडीने पुणे येथे जावयाचे होते. परंतु सदर बस रद्द झाल्याने तक्रारदार हे रात्री १०.३० वाजता शहादा-पुणे या बसने प्रवासाकामी बसले. परंतु त्यातील बस वाहकाने त्यांना प्रवास करण्याकामी तिकीट काढण्यास सांगितले व त्याप्रमाणे तक्रारदारांनी रु.५८/- चे दोंडाईचा-धुळे असे तिकीट काढलेले आहे. यावरुन तक्रारदार यांना पास काढलेला असतांना देखील नव्याने तिकीट काढावे लागले आहे असे दिसते.
या कामी सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाशाचे कलम चार मध्ये, दि.०२-०५-२०१० पासून आवडेल तेथे कोठेही प्रवासासाठी चार दिवसांच्या पासचे दर नमूद केलेले आहेत. यामध्ये साधी वाहतूक सेवेमध्ये प्रौढ प्रवाशांसाठी गर्दीच्या हंगामात रु.५५०/- व कमी गर्दीच्या हंगामात कमी रु.५००/- असे मुल्य नमूद केलेले आहे. या मुल्याचा विचार होता तक्रारदार यांनी काढलेला पास हा प्रौढ प्रवाशांसाठी रक्कम रु.५००/- कमी गर्दीच्या हंगामासाठीचा आहे. याप्रमाणे सदर पास हा कमी मुल्याच्या साध्या वाहतूक बसच्या सेवेच्या प्रकारात मोडतो हे दिसून येते. या प्रमाणे तक्रारदार यांना या पासच्या आधारे कोणत्याही साध्या बसची वाहतूक सेवा घेवून प्रवास करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. दि.२८-०६-२०१० रोजी तक्रारदार हे रात्री १०.३० वाजता शहादा-पुणे या गाडीने प्रवास करण्यासाठी बसले होते. परंतु सदर गाडी ही निम आराम गाडी असल्याने त्यामध्ये सदरचा साधा मुल्याचा व साध्या गाडीचा प्रवासी पास हा लागू होत नाही. त्यामुळे त्यातील बस वाहकाने तिकीट काढण्यास तक्रारदारास सांगितले आहे. सदरची बाब ही योग्य व रास्त आहे.
(७) थोडक्यात तक्रारदार यांनी चार दिवसासाठी आवडेल तेथे कोठेही प्रवास पास या कामी साध्या वाहतूक सेवेच्या गाडीचा पास घेतलेला आहे. तक्रारदार यांनी वाढीव दराच्या मुल्याचा पास घेतलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांना साध्या प्रवासी बसने प्रवास करणे क्रमप्राप्त आहे. परंतु तक्रारदारांनी निम आराम गाडीत बसून साध्या पासने प्रवास करणे ही बाब नियमास धरुन नाही. यावरुन तक्रारदार यांनी साधा प्रवासी पास घेतला असतांना त्या पासवर नमूद असलेल्या सूचना वाचून त्यांचे पालन करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदार यांनी तसे केलेले दिसत नाही. त्यामुळे तक्रारदार हे, गैरसमजाने साध्या प्रवासी पासचा वापर करुन निमआराम प्रवासी बसमध्ये प्रवास करण्यासाठी बसले आहेत हे स्पष्ट होत आहे. सदरची घटना ही तक्रारदारांच्या चूकीने घडलेली आहे असे आमचे मत आहे.
तक्रारदार यांना पुणे येथे जावयाचे असल्याने, जरी रात्री ९.३० वाजेची गाडी रद्द झाली असे गृहित धरले तरी, त्यानंतर त्यांचा पास ज्या बसमध्ये चालू शकेल अशा अनेक साध्या वाहतूक सेवेच्या बसेस होत्या असे सामनेवालेंचे कथन आहे. या कथनाचे खंडन तक्रारदाराने केलेले नाही. त्यामुळे एक साधी प्रवासी बस रद्द झाल्यानंतर त्यानंतर असलेल्या दुस-या साध्या बसची प्रतिक्षा न करता तक्रारदारांनी निम आराम या प्रकारच्या बसने प्रवास केला आहे. सदर पासचे वैध कालावधीत तक्रारदारास साध्या बसने प्रवास करण्यास सामनेवाले यांनी प्रतिबंध केलेला नाही व तसे घडलेले नाही. त्यामुळे सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी दिसून येत नाही. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील सर्व बाबीचा विचार होता, खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः २६/०२/२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य)