(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार हा गंगाखेड येथील रहिवाशी असून तक्रारदार हा गंगाखेड येथे सोलार साहित्याची विक्री करुन उपजिवीका करत आहेत.
तक्रारदाराचे म्हणणे की, अर्जदारास सोलार पॅनलची आवश्यकता असल्याने गैरअर्जदाराकडून अर्जदाराने रु. 8,584/- व रु. 2,294/- चे पॅनल खरेदी केले.
तकारदाराचे म्हणणे की, तक्रारदाराने आर.के.सोलार सेवा या दुकानाचे लायसेंन्स काढून सोलार साहित्य विक्रीचा व्यवसाय सुरु केला. गैरअर्जदाराने दिनांक 21 ऑगस्ट 2012 रोजी पॅनलच्या किंमती व कंपनीच्या अटी व शर्ती E Mail व्दारे तक्रारदारास पाठविली ज्यात 100 टक्के अॅडव्हांस व पॅनेलचे किमतीतच ट्रान्सपोर्ट खर्च समाविष्ट अशी अट होती. अर्जदाराने गैरअर्जदार यांचे बँक खात्यात गंगाखेड येथून रक्कम जमा केली. व अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे 14,386/- एवढी रक्कम जमा केली. गैरअर्जदाराने प्रथम 620/- रु. चे पॅनेल पाठवले. व TCR कंपनी मार्फत 13,748/- एवढया रक्कमेचे पॅनेल पाठविले व रु. 18 चे पॅनल कमी पाठविले. या वेळी वाहतुकीचा खर्च 1,200/- रु. वाहतुकदाराने तक्रारदारास मागीतले व ही बाब कंपनीस कळविली असता, आपण वाहतूक खर्च द्या असे म्हंटले व सदरची रक्कम तुमच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
तकारदाराचे म्हणणे की, दिनांक 05/12/2012 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडीया येथे गैरअर्जदाराच्या खात्यात 18,065/- रु. जमा करुन गैरअर्जदारास कळविले व त्याप्रमाणे गैरअर्जदाराने पॅनल पाठविले व वाहतूक कंपनीने 660/- रु.खर्च मागीतला. या वेळेस कंपनीने 18,065/- रु. चे पॅनल ऐवजी 17,050/- रु. चे पॅनल पाठवीले.
तक्रारदाराचे म्हणणे की, दिनांक 16/04/2013 रोजी कंपनीकडे 43,382/- रु. गैरअर्जदाराच्या खात्यावर जमा केली व गैरअर्जदाराने सदर रक्कमेचे पॅनल तक्रारदारास पाठविले नाही, व रु. 2,007/- एवढया कमी रक्कमेचे पॅनल पाठवीले.
तकारदाराचे म्हणणे की, अर्जदाराने 12 V, 100 W च्या पाच पॅनल पाठवीणे बाबत गैरअर्जदारास फोन करुन रक्कम विचारली त्यावर कंपनीकडून 24,000/- रु. भरा असे सांगीतले, परंतु सदर खरेदीत गैरअर्जदाराने वाहतूक खर्च लावल्यामूळे तक्रारदाराने सदर खरेदी थांबवीली. व लेजरच्या नोंदी बाबत माहिती मागवीली, त्यावर गैरअर्जदाराने तक्रारदारास Go to Hell असा मॅसेज पाठवीला. अर्जदाराने 4 मे 2014 रोजी गैरअर्जदारास मेल करुन 60,000/- पेक्षा कमी रक्कम जमा आहे व लेजर अकाऊंटची प्रत मागीतली, त्यावर गैरअर्जदाराने 21 मे 2014 ला तक्रारदारास मेल करुन दोन पानी नोंदी पाठविल्या, ज्याचे अवलोकन केले असता, गैरअर्जदाराने नियम व अटीचे पालन न केल्याचे दिसून येते.
अर्जदाराने 21/06/2014 पर्यंत पाठपुरावा केल्यानंतर गैरअर्जदाराने 25/06/2014 ला अर्जदाराकडे 43,625/- एवढी बाकी असल्याचे कळवीले, व सदरची बाब चुकीची होती. वास्तविक गैरअर्जदाराने तक्रारदाराकडून वाहतूक खर्च वसुल केलेले नियमा प्रमाणे तक्रारदारास परत करणे आवश्यक होती, परंतु त्यांनी वापस केली नाही. व सेवेत त्रुटी दिली. म्हणून सदरची तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले, व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारास आदेश द्यावा की, गैरअर्जदाराने पॅनलचे पाठवीलेली रक्कम स्विकारुन कमी रकमेचे पॅनल पाठवुन उर्वरित रक्कम 3,040/- आणि वाहतुक खर्चापोटी कंपनीच्या वतीने अदा केलेले 1,860/- असे एकुण 4,900/- रु. अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा, तसेच मानसिक त्रासापोटी एकुण 2 लाख व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा. अशी मागणी केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ तक्रारदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
तक्रारदाराने पुराव्या बाबत नि.क्रमांक 5 वर 31 कागदपत्राच्या यादीसह 31 कागदपत्राच्या प्रती दाखल केल्या आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली.
गैरअर्जदार नोटीस तामील होवुनही मंचासमोर हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदाराच्या तक्रार अर्जावरुन व कागदपत्रावरुन व कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदार ग्राहक म्हणून या मंचासमोर दाद मागण्यास
पात्र आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2.
सदरच्या प्रकरणात निर्णय घेताना कायदेशीर मुद्दा मंचासमोर असा उपस्थित होतो की, ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 2 ( 1 ) ( d ) ( 1 ) प्रमाणे अर्जदार ग्राहक म्हणून मंचासमोर दाद मिळवणेस पात्र आहे काय ? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल, कारण ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 2 ( 1 ) (d) ( 1 ) प्रमाणे ग्राहक म्हणजेः- अशी व्यक्ती की, अंशतः अगर पूर्णतः मोबदला देऊन किंवा देण्याचा करार करुन वस्तू विकत घेते किंवा अस्तीत्वात असलेल्या प्रथे प्रमाणे भावी काळात मोबदला देण्याचा करार करुन वस्तुचा ताबा घेते किंवा मोबदला दिलेल्या व्यक्तीच्या संमतीने वापर करते, परंतु यात वस्तुची फेरविक्री करणारी किंवा व्यापारी कारणासाठी वस्तुचा वापर करणा-या व्यक्तीचा समावेश होणार नाही.
सदर प्रकरणात अर्जदाराने गैरअर्जदाराकडून पॅनलचे खरेदी करुन सदरचे पॅनल फेरविक्री करण्यासाठी खरेदी केले होते, त्यामुळे त्याला ग्राहक म्हणून मंचासमोर दाद मागता येणार नसल्याचे मंचाचे ठाम मत आहे. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी करावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. प्रदीप.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.