जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 139/2011 तक्रार दाखल तारीख –12/08/2011
श्रीमती सत्यभामा भाऊसाहेब कुंडगर
वय 35 वर्षे धंदा घरकाम व शेती .तक्रारदार
रा.दगडवाडी ता.अंबाजोगाई जि.बीड
विरुध्द
1. डेक्कन इन्शुरन्स अँण्ड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
एन स्क्वेअर, ऑफिस क्र.13, तिसरा मजला,
संघवी नगर, परिहार चौकाजवळ, औंध, पुणे सामनेवाला
2. दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड
विभागीय कार्याजलय क्र.153400 .
सावकर भवन, शिवाजी नगर,
कॉंग्रेस हाऊस रोड, पुणे 422 005
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.एस.पावसे.
सामनेवाला 1 तर्फे :- कोणीही हजर नाही.
सामनेवाला 2 तर्फे ः-अँड.एस.एल.वाघमारे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे पती भाऊसाहेब हनुमंत कुंडगर हे शेतकरी होते. त्यांचा मृत्यू दि.11.10.2010 रोजी साप चावल्याने झालेला आहे. भाऊसाहेब यांचे मृत्यूनंतर तक्रारदारांनी तालूका कृषी अधिकारी यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रासह दावा अर्ज दाखल केला. त्यांनी तो सामनेवाला क्र.1 कडे पाठवीला. सामनेवाला क्र.1 यांनी सदरचा दावा सामनेवाला क्र.2 कडे पाठवणे आवश्यक आहे. सामनेवाला क्र.2 विमा कंपनीने प्रस्ताव अर्ज प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे कालावधीत विमा रक्कम अदा करणे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकाप्रमाणे बंधनकारक आहे. परंतु सामनेवाला क्र.1 व 2 यांनी सदरचा दावा आजपर्यत मंजूर केलेला नाही. ही त्यांचे सेवेतील त्रूटी आहे. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक शारीरिक त्रासापोटी रु.10,000/-, दाव्याच्या खर्चापोटी रु.5,000/- ची मागणी केली आहे.
विनंती की, विमा रक्कम रु.1,00,000/- सामनेवाला यांनी 18 टक्के व्याजासहीत तक्रारदारांना देण्या बाबत आदेश व्हावेत, सामनेवाला क्र.2 यांनी विमा दावा सामनेवाला क्र.1 कडे पाठवून त्वरीत निर्णय घ्यावा, मानसिक शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु.5,000/- देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांना नोटीस बजावल्याचा अहवाल नाही व त्यांचे लेखी म्हणणे दाखल नाही.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.9.1.2012 रोजी दाखल केले. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदारांनी सामनेवालाकडे कोणतेही कागदपत्र पाठविले नाहीत. तक्रारदाराची सदर कृती हा नैसर्गिक न्यायाचे विरुध्दची आहे. त्यामुळे तक्रारदार कोणतीही नूकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही.
तक्रारदारानी तक्रारीत नमूद केले आहे की, सामनेवाला यांनी सदरचा दावा स्विकारला नाही किंवा नाकारला नाही.या मुददयावरुन तक्रारदारांना तक्रार करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. सदरची तक्रार अपरिपक्व आहे.कायदयाने चालू शकत नाही. सदर प्रकरणात अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे तक्रारदारांना तक्रार दाखल करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यात सेवेत कसूर नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र. 2 यांचा खुलासा,सामनेवाला क्र.2 चे शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.पावसे व सामनेवाला क्र.1 यांचे विद्वान वकील श्री.एस.एल.वाघमारे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदाराची तक्रार दाखल दि.12.9.2011 रोजी केली. त्यापुर्वीच दि.13.4.2011 रोजी तक्रारदाराचा दावा सामनेवाला क्र.2 यांनी मयताचे नांवावर शेत जमिन नसल्याचे कारणावरुन नाकारला आहे. सदरचे पत्र तक्रारदारांनी तक्रार दाखल करतेवेळी दाखल केलेले नाही. ते यूक्तीवादाचे वेळी दि.1.3.2012 रोजी दाखल केले.
या संदर्भात सामनेवाला यांनी ज्या कारणाने तक्रारदाराचा दावा नाकारला त्याचा विचार करता दि.13.4.2011 रोजीचे पत्रात सामनेवाला यांनी नमूद केले आहे की, फेरफाराप्रमाणे दिसून येते की, “ भाऊसाहेब हनुमंत कुंडगर यांचे नांवावर दि.31.8.2010 रोजी जमिन लावण्यात आलेली आहे. यावरुन हे दिसून येते की, दि.15.8.2010 रोजी मयत व्यक्ती ही 7/12 उताराधारक नव्हती. त्यामुळे विमा पत्राप्रमाणे दावा करण्यास पात्र ठरत नाही. ” या संदर्भात दाखल 7/12 उतारा व फेरफार नोंद बाबत दि.8.8.2010 रोजी मयत भाऊसाहेब कूंडगर यांना त्यांचे वडील मयत झाल्याचे त्यांचे वारस लावण्यासाठी अर्ज दिला होता.त्यानुसार दि.25.8.2010 रोजी सदरची नोंद फेरफार म्हणून 93/2008 ची घेण्यात आली व सदरची नोंद ही दि.31.8.2010 रोजी मंजूर करण्यात आली.
दाखल कागदपत्रावरुन मयत भाऊसाहेब यांनी दि.5.10.2010 रोजी संर्पदंश झाला.ही बाब तक्रारदार सत्यभामा कूंडगर यांचे जवाब दि.11.10.2010 मध्ये नमूद आहे. त्यानंतर त्यांना सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले. त्यांचा मृत्यू दि.11.10.2010 रोजी झालेला आहे. ही बाब सदर जवाबात नमूद करण्यात आलेली आहे. दि.11.10.2010 रोजी पोलिसाकडे तिने जवाब दिलेला आहे व त्यात सदर वरील बाब नमूद करण्यात आलेली आहे. या संदर्भात घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन पंचनामा करण्यात आलेला आहे. शवविच्छेदन अहवाल दाखल आहे. मयत भाऊसाहेब यांचे मृत्यू बाबत सामनेवाला क्र.2 यांचा कोणताही आक्षेप नाही. त्यामुळे ते संर्पदशांने त्यांचा मृत्यू झाल्याची बाबत बांधा नाही. परंतु मृत्यूचे वेळी त्यांचे नांव 7/12 ला नव्हते या कारणावरुन सामनेवाला क्र.2 यांनी सदरचा दावा नाकारलेला आहे. या बाबतही विचार करता मयताचा मृत्यू दि.15.8.2010 रोजी ही दिनांक कोठून शोधून काढली यांचा बोध होत नाही. मयताचा मृत्यू दि.11.10.2010 रोजी झालेला आहे. असेच वरील सर्व कागदपत्रावरुन दिसते. तसेच वर नमूद केल्याप्रमाणे 7/12 उता-यास मयत भाऊसाहेब यांचे नांवाची नोंद दि.31.8.2010 रोजी झालेली आहे. त्यामुळे निश्चितच सामनेवाला यांनी योग्य रितीने तक्रारदाराचा दावा नामंजूर केला आहे असे याठिकाणी म्हणणे उचित होणार नाही असे न्यायमचाचे मत आहे.
दावा सामनेवाला क्र.2 कडे आल्यानंतर नामंजूर सामनेवाला क्र.2 यांनी केलेला आहे. परंतु त्यांचे खुलाशात या बाबतचा कूठलाही उल्लेख नाही. ही खेदाची बाब आहे. दावा आला किंवा नाही किंवा तो कूठल्याही परिस्थितीत आहे हे सर्व सांगण्याची जबाबदारी सामनेवाला क्र.2 चीच आहे परंतु ती त्यांनी योग्य रितीने बरोबर पार पाडली नाही. त्यामुळे खुलासा व वास्तव स्थिती यात जमिन आसमानचे अंतर आहे. म्हणून निश्चितच सामनेवाला क्र.2 यांनी बचावात म्हटल्याप्रमाणे सदरचा दावा अपरिपक्व आहे ही बाब स्पष्ट होत नाही. सामनेवाला क्र.2 ने तक्रारदाराचा दावा नाकारुन तक्रारदाराचा दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होत असल्याने सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना रक्कम रु.1,00,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.5,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मयत
भाऊसाहेब हनुमंत कुंडगर यांचे अपघाती मृत्यू दाव्याची रक्कम
रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख फक्त) आदेश मिळाल्यापासून
एक महिन्याचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत
न दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार
दाखल दि.12.09.2011 पासून पूर्ण रक्कम पदरीपडेपर्यत सामनेवाला
क्र.1 जबाबदार राहतील.
4. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची
रक्कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची
रककम रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून
30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड