(घोषित दि. 15.07.2014 व्दारा श्रीमती. माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची पत्नी रुखमनबाई साहेबराव कालवणे यांच्या मालकीची शेतजमिन मौ.किनगाव ता.अंबड जि.जालना येथे असून त्यांचे कुटूंबाचा उदरनिर्वाह शेती व्यवसायातून करतात. तक्रारदारांची पत्नी दिनांक 17.12.2010 रोजी शेतीची कामे संपवून घरी परत येत असता रोहीलागड ते अंबड या रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक देवून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्यांना वैद्यकीय उपचारा करिता शासकीय रुग्णालय औरंगाबाद येथे नेले असता उपचारा दरम्यान दिनांक 18.12.2010 रोजी त्यांचे निधन झाले. मयताचे प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलीसांनी अपघाताच्या ठिकाणी येवून चौकशी केली, घटनास्थळ पंचनामा, इनक्वेस्ट पंचनामा करुन अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हयाची नोंद केली.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह विहित मुदतीत दिनांक 28.01.2011 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल केला. त्यानंतर तक्रारदारांचा प्रस्ताव गैरअर्जदार 1 व 2 यांचेकडे मंजूरीस्तव पाठविण्यात आला. परंतू गैरअर्जदार 1 यांनी दिनांक 26.03.2012 रोजीच्या पत्रानुसार सदर प्रस्तावाची विमा पॉलीसी दिनांक 15.08.2010 ते 14.08.2011 या कालावधीची असून विमा कालावधीची मुदत संपूष्टात आल्यानंतर दाखल केला. तक्रारदारांना विहीत मुदतीत विमा प्रस्ताव दाखल करुनही मुदतीच्या अयोग्य कारणास्तव परत पाठवला अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार यांचे लेखी म्हणण्यानुसार त्रिपक्षीय करारानुसार विमा पॉलीसीचा कालावधी दिनांक 15.08.2010 ते 14.08.2011 असून दाव्याची सुचना देण्याची अंतिम मुदत दिनांक 14.11.2011 पर्यंत होती व पुढे दिलेल्या दावा सूचनांची मूळ कागदपत्रे देण्याची अंतिम मुदत दिनांक 21.12.2011 पर्यंत होती. तक्रारदारांनी विमा प्रस्तावाची कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी यांना दिनांक 28.01.2011 रोजी सादर केली हे म्हणणे चुकीचे असून मा.तलाठी यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर दिनांक 24.01.2012 तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्या पत्रावर दिनांक 23.02.2012 अशी आहे. यावरुन तक्रारदारांनी कागदपत्रे दिनांक 23.02.2012 किंवा त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार 2 यांचे लेखी म्हण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव मुदतबाहय असल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम देता येत नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विव्दान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे विव्दान वकील श्री.आर.यु.बनछोड यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे व वकीलांचा युक्तीवाद यावरुन खालील मुद्दे स्पष्ट होतात.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांचा विमा प्रस्ताव मंडळ कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाने जाक्र/ता.कृ.अ/ता/261/2012 दिनांक 23.02.2012 अन्वये तालुका कृषी अधिकारी अंबड जि.जालना यांचेकडे पाठवल्याचे दिसून येते.
गैरअर्जदार 2 विमा कंपनीच्या दिनांक 23.03.2012 रोजीच्या पत्रानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव मुदतीनंतर म्हणजेच दिनांक 23.12.2011 नंतर प्राप्त झाल्यामुळे गैरअर्जदार 1 यांचेकडे परत पाठवल्याचे दिसून येते.
तसेच गैरअर्जदार 1 डेक्कन इन्शुरन्स कंपनीने दिनांक 26.03.2012 रोजीच्या पत्रान्वये “दावा अपूर्ण असून तो मुदत संपल्यामुळे स्विकारता येत नाही” अशा शे-यासह जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालना यांचेकडे पाठवला.
त्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालना यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे परत पाठवला.
वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांचा विमा प्रस्ताव मुदतीच्या व अपूर्ण असल्याचे कारणास्तव परत पाठवल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजना ही शेतक-यांकरीता कल्याणकारी योजना राबवलेली आहे. त्यामुळे मुदतीच्या तसेच अपूर्ण कागदपत्रांच्या कारणास्तव विमा प्रस्ताव फेटाळणे उचित होणार नाही.
तक्रारदारांनी सदर अपघाता बाबतचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे आवश्यक कागदपत्रासहीत पाठवल्यानंतर विमा कंपनीने गुणवत्तेवर निकाली करणे न्यायोचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसात पाठवावा.
- गैरअर्जदार 2 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांचा विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 60 दिवसात विलंबाचा तांत्रिक मुद्दा वगळून प्रस्ताव गुणवत्तेवर निकाली करावा.