निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार सयाबाई भ्र.मारोती सुर्यवंशी ही राहणार हुंडा(ग.प.) ता.उमरी ता.उमरी , जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून ती मयत मारोती गंगाराम सुर्यवंशी यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती मारोती गंगाराम सुर्यवंशी हे दिनांक 09.03.2013 रोजी आपल्या राहत्या घरी झोपले असातंना रात्री 1.30 वाजेच्या दरम्यान विषारी सापाने चावा घेतला व त्यानंतर त्यांना सरकारी दवाखाना नांदेड येथे उपचारासाठी शरीक केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. पोलीस स्टेशन उमरी यांनी अपघाती मृत्यु प्रमाणपत्र 6/2013 अन्वये कलम 174 सी.आर.पी.सी. प्रमाणे अपघाताची नोंद घेतली. मयत मारोती गंगाराम सुर्यवंशी हे व्यवसायाने शेतकरी होते,त्याचे नावाने हुंडा(ग.प.) ता.उमरी ता.उमरी,जिल्हा नांदेड शिवारात गट क्रमांक 14 मध्ये क्षेत्रफळ 0 हे. 25 एवढी शेतजमीन होती. शेतकरी या नात्याने तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता, ज्याची पॉलिसी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे महाराष्ट्र शासनाने घेतली होती. अर्जदाराने त्यांचे पतीचे मृत्यु पश्चात तालुका कृषि अधिकारी यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रानुसार दिनांक 22.11.2013 रोजी क्लेम दाखल करुन विमा रक्कम देण्याची विनंती केली. अर्जदाराने अनेक वेळा विनंती करुनही अर्जदारास गैरअर्जदाराने विमा रक्कम दिलेली नाही व शेवटी दिनांक 06.03.2014 रोजी विमा कंपनीचे पत्राव्दारे कळविले की, अर्जदाराचा विमा प्रस्ताव 90 दिवसांच्या आत दाखल केलेला नसल्यामुळे परत केला. अर्जदार ही ग्रामीण भागात राहणारी असल्याने कागदपत्रांची जमवाजमव करण्यास अर्जदारास उशीर झालेला आहे. तरीही गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या विमा प्रस्तावाचा सहानुभूतीपूर्वक विचार केलेला नाही. म्हणुन अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी विम्याची रक्कम रु.1,00,000/- व्याजासह दिनांक 01.04.2013 पासून रक्कम वसूल होईपर्यंत गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. मयत मारोती गंगाराम सुर्यवंशी यांच्या वारसदार सयाबाई यांनी अपघात विमा योजनेसाठी विमा प्रस्ताव दिनांक 05.11.2013 रोजी या कार्यालयात सादर केला. दिनांक 06.03.2014 रोजी अर्जातील त्रुटीसाठी संबंधीत अर्जदारास परत करण्यात आला. परंतु त्रुटींची दुरुस्ती न करता प्रस्ताव दिनांक 05.11.2014 रोजी दाखल करण्यात आला. दिनांक 07.11.2014 नुसार कृषी पर्यवेक्षक सिंधी यांना अर्जदारास प्रस्ताव परत करणसाठी देण्यात आला. अपघात दिनांक 09.03.2013 रोजी झालेला आहे. अर्जदाराने प्रस्ताव उशीरा दाखल केल्यामुळे संबंधीतास प्रस्ताव परत करण्यात आलेला आहे.
गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
5. दावेदारने सदर विमा दाव्याची कागदपत्रे थेट विमा कंपनीकडे पोस्टाने पाठवून दिली. सदर कागदपत्रे विमा कंपनीने डेक्कन इंशुरन्स यांना दिनांक 06.11.2014 रोजी पाठविली. त्याच दिवशी दाव्यातील कागदपत्रांची शहानिशा करुन कागदपत्रे पुन्हा विमा कंपनीकडे पुढील कारवाईसाठी पाठवून दाव्यास झालेला उशीर माफ करुन दावा निकाली काढावा असे पत्र दिले. दिनांक 30.01.2015 विमा कंपनीने योजनेत नमूद कालावधीनंतर दावा आला त्यामुळे नाकारलेला आहे.
गैरअर्जदार क्र. 3 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
6. महाराष्ट्र शासनाने गैरअर्जदार क्र. 3 यांचे सोबत शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेंसंदर्भात करार केलेला असून सदर करारातील अटी व शर्ती दोन्ही पक्षावर बंधनकारक आहे. करारानुसार काही वाद निर्माण झाल्यास गैरअर्जदार ,महाराष्ट्र शासन व सल्लागार समिती यांचे प्रतिनिधी यांची जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सदरील समिती समोर सर्व पक्षाची बाजू एकून 15 दिवसाच्या आत समिती निर्णय घेईल असे ठरलेले आहे. त्यामुळे सदरील मंचास अर्जदाराची तक्रार चालविण्याचा अधिकार नाही.
गैरअर्जदार क्र. 3 विमा कंपनीस अर्जदाराचा विमा प्रस्ताव मिळालेला आहे. परंतु काही कागदपत्रे मिळालेली नाही. त्यामुळे गैरअर्जदार अर्जदाराच्या क्लेम बाबत कुठलीही कारवाई करु शकलेली नाही. याउलट विमा कंपनीने दिलेल्या पत्राचे वाचन केले असता अर्जदारास प्रस्ताव दाखल करण्यास 8 ते 9 महिन्यांपेक्षा जास्तीचा विलंब झालेला होता. त्यामुळे अर्जदाराचा विमा प्रस्ताव परत केलेला आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी सेवेत त्रुटी दिलेली नाही.
7. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
8. अर्जदार यांचे पती मयत मारोती गंगाराम सुर्यवंशी हे शेतकरी होते हे अर्जदाराने दाखल सातबारा उता-यावरुन स्पष्ट होते. मयत मारोती गंगाराम सुर्यवंशी याचा मृत्यु साप चावून झालेला असल्याचे अर्जदाराने दाखल केलेल्या पोलीस पेपर्सवरुन व शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट होते. अर्जदाराने विमा रक्कम मिळावी म्हणुन नियमाप्रमाणे गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे दावा दाखल केला होता ही बाब दोन्ही बाजूस मान्य आहे. परंतु प्रस्ताव दाखल करणेस उशीर झालेला आहे या कारणामुळे तालुका कृषि अधिकारी यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराचा प्रस्ताव परत केलेला आहे. वास्तविक पाहता तालुका कृषि अधिकारी यांनी सदर प्रस्ताव पुढील कारवाईसाठी सादर करणे योजनेनुसार बंधनकारक होते. परंतु तसे न करुन गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे. त्यानंतर अर्जदाराने सदर विमा प्रस्ताव विमा कंपनीस पोस्टाव्दारे पाठविलेला होता. विमा कंपनीने गैरअर्जदार क्र. 2 डेक्कन इंशुरन्स कंपनी यांचेकडे विमा प्रस्ताव छाननीसाठी पाठविल्यानंतर गैरअर्जदार क्र. 2 यांनी प्रस्ताव योग्य असल्याबाबत व प्रस्ताव दाखल करण्यास झालेला विलंब माफ करावा असे विमा कंपनीस म्हणजेच गैरअर्जदार क्र. 3 यांना कळविलेले आहे. ही बाब दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. असे असतांनाही विमा कंपनीने अर्जदाराचा प्रस्ताव विलंबाने दाखल झाला या कारणामुळे नाकारलेला आहे. याचाच अर्थ विमा कंपनीस सर्व कागदपत्रे मिळालेली होती असे असतांनाही विमा कंपनीने लेखी जबाबामध्ये अर्जदाराने प्रस्तावासोबत अपूर्ण कागदपत्रे दिली असल्याने विमा कंपनी प्रस्तावावर कारवाई करु शकलेली नाही असे परिच्छेद क्रमारंक 7 ( अतिरिक्त जबाब ) मध्ये नमुद केलेले आहे. यावरुन गैरअर्जदार क्र. 3 विमा कंपनी यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव अत्यंत निष्काळजीपणाने हाताळलेला असल्याचे निदर्शनास येते. सदर योजना ही शासनाने शेतकरी कुटूंबातील प्रमुख व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यानंतर शेतक-यांच्या कुटूंबांना अडचणी निर्माण होत असल्याने मयताच्या कुटूंबीयांना मदत व्हावी या हेतूने सादर केली आहे. त्यामुळे विमा कंपनीने तांत्रीक मुद्यावर दावे निकाली काढू नये अशी सूचनाही दिलेली आहे. मा. वरिष्ठ न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयानुसार गैरअर्जदार विमा कंपनीकडून अर्जदाराचा विमा प्रस्ताव मर्यादीत वेळेनंतर मिळालेला आहे या तांत्रिक कारणामुळे परत करु नये. असे असतांना, गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदाराचा प्रस्ताव नाकारुन सेवेत त्रुटी दिलेली आहे. अर्जदाराच्या पतीचा मृत्यु हा साप चावून अपघाती झालेला असल्याने व अर्जदाराचे पती हे शेतकरी होते. त्यामुळे सदरील योजनेनुसार अर्जदार ही योजनेची लाभार्थी आहे. सबब अर्जदार विमा रक्कम मिळणेस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 3 फ्युचर जनरल इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड विमा कंपनी यांनी अर्जदारास रक्कम रु.1,00,000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावी.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु.2000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.