निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार अनिता नागोराव जाधव, ही राहणार हिप्परगा(माळ),ता.बिलोली, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून ती मयत नागोराव विठ्ठलराव जाधव यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती नागोराव जाधव यांचा दिनांक 03.08.2013 रोजी गावातील व्यक्तीने खुन केल्यामुळे खून होऊन अपघाती मृत्यु झाला आहे. पोलीस स्टेशन रामतीर्थ ,जिल्हा नांदेड यांनी गुन्हा क्र. 68/2013 अन्वये कलम 302 भा.द.वि.प्रमाणे प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हयाची नोंद करुन घटनास्थळ पंचामा केला. मयत नागोराव हे व्यवसायाने शेतकरी होते,त्याचे नावाने हिप्परगा(माळ),तालुका बिलोली,जिल्हा नांदेड शिवारात गट क्रमांक 74 मध्ये क्षेत्रफळ 1 हे.10 आर व गट क्रमांक 90 मध्ये 1 हेक्टर एवढी शेतजमीन होती. शेतकरी या नात्याने तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता, ज्याची पॉलिसी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे महाराष्ट्र शासनाने घेतली होती. अर्जदाराने त्यांचे पतीचे मृत्यु पश्चात तालुका कृषि अधिकारी यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रानुसार दिनांक 01.11.2013 रोजी क्लेम दाखल करुन विमा रक्कम देण्याची विनंती केली. परंतु गैरअर्जदार यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली व शेवटी दिनांक 30.12.2014 रोजी विमा रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिला. म्हणुन अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी विम्याची रक्कम रु.1,00,000/- व्याजासह दिनांक 01.04.2013 पासून रक्कम वसूल होईपर्यंत गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदाराचा विमा प्रस्ताव दिनांक 01.11.2013 रोजी या कार्यालयास प्राप्त झाला. त्यानंतर दिनांक 01.11.2013 रोजी सदर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आला. दिनांक 28.11.2013 रोजी वरिष्ठ कार्यालयाने त्रुटीची पुर्तता करण्यास कळविले. दिनांक 07.12.2013 रोजी तालुका कृषि अधिकारी यांनी अर्जदारास त्रुटींची पुर्तता करण्यासंदर्भात पत्र दिले. परंतु अर्जदाराने त्रुटीची पुर्तता केलेली नाही. तसेच विमा प्रस्तावाबाबत कसलाही पत्रव्यवहार केलेला नाही.
गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
5. अर्जदाराचा विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार क्र. 2 डेक्कन इंशुरन्स यांनी प्रस्तावाची छाननी करुन दिनांक 28.11.2013 रोजी पत्राव्दारे अपूर्ण कागदपत्रांची यादी दिली. (सदरील कागदपत्रे पोष्टमॉर्टेम रिपोर्ट,मरणोत्तर पंचनामा, प्रथम माहिती अहवाल, फेरफार क्र. 1347 व व्हीसेरा रिपोर्ट) परंतु संबंधीत ता किंवा विमा दावेदार यांचेकडून परिपूर्ण प्रस्ताव अद्याप आलेला नाही. त्यामुळे पुढील कारवाई करुन शकत नाही.
गैरअर्जदार क्र. 3 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
6. महाराष्ट्र शासनाने गैरअर्जदार क्र. 3 यांचे सोबत शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेंसंदर्भात करार केलेला असून सदर करारातील अटी व शर्ती दोन्ही पक्षावर बंधनकारक आहे. करारानुसार काही वाद निर्माण झाल्यास गैरअर्जदार ,महाराष्ट्र शासन व सल्लागार समिती यांचे प्रतिनिधी यांची जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सदरील समिती समोर सर्व पक्षाची बाजू एकून 15 दिवसाच्या आत समिती निर्णय घेईल असे ठरलेले आहे. त्यामुळे सदरील मंचास अर्जदाराची तक्रार चालविण्याचा अधिकार नाही.
गैरअर्जदार क्र. 3 विमा कंपनीस अर्जदाराचा विमा प्रस्ताव मिळालेला आहे. परंतु काही कागदपत्रे मिळालेली नाही. त्यामुळे गैरअर्जदार अर्जदाराच्या क्लेम बाबत कुठलीही कारवाई करु शकलेली नाही. त्यामुळे सेवेत त्रुटी देण्याचा प्रश्न उदभवत नाही.
7. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
8. अर्जदार यांचं पती मयत नागोराव जाधव हे शेतकरी होते हे अर्जदाराने दाखल सातबारा उता-यावरुन स्पष्ट होते. मयत नागोराव जाधव यांचा खून झालेला असल्याचे अर्जदाराने दाखल केलेल्या पोलीस पेपर्सवरुन स्पष्ट होते. अर्जदाराने विमा रक्कम मिळावी म्हणुन नियमाप्रमाणे गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे दावा दाखल केला होता ही बाब दोन्ही बाजूस मान्य आहे. तालुका कृषि अधिकारी यांनी योजनेप्रमाणे सदरील प्रस्तावावर योग्य ती कारवाई केलेली असल्याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. डेक्कन इंशुरन्स कंपनीने प्रस्तावाची छाननी करुन दिनांक 28.11.2013 रोजी अर्जदारास शवविच्छेदन अहवाल , प्रथम माहिती अहवाल, फेरफार क्र. 1397 ची प्रत व व्हीसेरा रिपोर्ट इत्यादी कागदपत्रांची पुर्तता करणेसंदर्भात सांगितलेले होते. परंतु अर्जदाराने त्रुटींची पुर्तता केलेली नसल्यामुळे अर्जदाराचा विमा प्रस्ताव विमा कंपनीडे पाठविलेला नाही. अर्जदाराने त्रुटींची पुर्तता केलेली असल्याचा पुरावा मंचासमोर दिलेला नाही. परंतु तक्रारीसोबत वरील सर्व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेनुसार अर्जदाराचे मयत पती नागारोव जाधव हे शेतकरी होते व त्यांचा मृत्यु अपघाती असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सदरील योजनेनुसार अर्जदार ही विमा रक्कम मिळणेस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. अर्जदार ही सदर योजनेची लाभार्थी असल्याचे मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 3 फ्युचर जनरल इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड विमा कंपनी यांनी अर्जदारास रक्कम रु.1,00,000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावी.
3. खर्चाबद्दल आदेश नाही.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.