निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार आशाबाई संजय डांगे ही रा. पोखरभोसी पो. पांगरा, ता. लोहा, जि. नांदेड येथील राहणारी असून मयत संजय शिवराम डांगे यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती मयत संजय हे दिनांक 15.08.2013 रोजी शेतीला पाणी देण्यासाठी बोअर वरील मोटार स्टाटर दाबून चालू करीत असतांना शॉक लागून मृत्यु पावला. पोलीस स्टेशन लोहा यांनी गुन्हा क्र. 17/2013 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे नोंदविला. अर्जदाराचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते. त्यांच्या नावे मौजे पोखरभोसी पो. पांगरा, ता. लोहा, जि. नांदेड येथे गट नं. 51 मध्ये 24 आर, गट नं. 57 मध्ये 16 आर, गट नं. 98 मध्ये 62 आर एवढी शेती होती. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार पतीच्या मृत्युपश्चात अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे दिनांक 12.11.2013 रोजी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह क्लेम फॉर्म भरुन दाखल केला. अर्जदाराने क्लेम दाखल केल्यानंतर गैरअर्जदार यांच्याकडे विमा रक्कम मिळण्यासाठी वेळोवेळी विनंती केली परंतू गैरअर्जदार यांनी अर्जदारास नुसते आश्वासन दिले परंतू विमा रक्कम दिलेली नसल्याने अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीद्वारे अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून विमा रक्कम रु. 1,00,000/- व्याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- इतक्या रक्कमेची मागणी केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अपघात विम्याची रक्कम मिळण्यासाठी मयत शेतक-यांचे वारस यांनी कार्यालयात त्वरीत 90 दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. आशाबाई संजय डांगे मयताच्या पत्नी यांनी या कार्यालयात दिनांक 13/11/22013 रोजी सदर प्रस्ताव दाखल केला. त्याच दिवशी जा.क्र. 1934 ने सदरील प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांचे कार्यालयात पुढील कार्यवाहीस्तव सादर करण्यात आला. त्यानंतर आजपर्यंत या कार्यालयात त्रुटी संदर्भात कुठलाही पत्रव्यवहार नाही त्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार 2 यांना नोटीस तामील होवूनही त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले नाही.
5. गैरअर्जदार क्र. 3 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
महाराष्ट्र शासनाने गैरअर्जदार क्र. 2 यांचे सोबत शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेंसंदर्भात करार केलेला असून सदर करारातील अटी व शर्ती दोन्ही पक्षावर बंधनकारक आहे. करारानुसार काही वाद निर्माण झाल्यास गैरअर्जदार ,महाराष्ट्र शासन व सल्लागार समिती यांचे प्रतिनिधी यांची जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सदरील समिती समोर सर्व पक्षाची बाजू एकून 15 दिवसाच्या आत समिती निर्णय घेईल असे ठरलेले आहे. त्यामुळे सदरील मंचास अर्जदाराची तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. गैरअर्जदार क्र. 3 फ्युचर जनरल इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड यांना अर्जदाराकडून कोणत्याही प्रकारचा क्लेम मिळालेला नाही म्हणून गैरअर्जदार विमा कंपनी अर्जदाराच्या क्लेमबाबत कुठलीही कार्यवाही करु शकलेली नाही. अर्जदाराने असा एकही कागद दाखल केलेला नाही की ज्यावरुन असे लक्षात येईल की, अर्जदाराने त्याचा क्लेम तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दाखल केलेला होता व तालुका कृषी अधिका-यामार्फत पुढे असे म्हणणे आहे की, तो योग्यरित्या गैरअर्जदारास मिळाला. यावरुन असे लक्षात येते की, अर्जदाराने कोणताही क्लेम दाखल केलेला नाही. त्यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज प्रि-मॅच्युअर आहे म्हणन गैरअर्जदाराने अर्जदारास कुठलीही त्रुटी दिलेली नाही.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
7. अर्जदार हिचा मयत पती संजय शिवराम डांगे हे व्यवसायाने शेतकरी असल्याचे दाखल सातबारा उतारा, 6-केलेला, फेरफार पत्रावरुन दिसून येते. अर्जदाराच्या पतीचा मृत्यु हा शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेला असतांना इलेक्ट्रीक शॉक लागून झालेला असल्याचे दाखल पोलीस पेपर्सवरुन व शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट होते. पतीच्या मृत्युनंतर अर्जदाराने विमा रक्कम मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी लोहा यांच्याकडे प्रस्ताव दाखल केलेला होता. तालुका कृषी अधिकारी यांनीही ही बाब आपल्या लेखी जबाबामध्ये मान्य केलेली आहे. अर्जदाराने तालुका कृषी अधिकारी यांचे दिनांक 28/04/2014 रोजीचे पत्र दाखल केलेले असून सदर पत्रामध्ये अर्जदारास त्रुटीची पूर्तता करणेसंदर्भात कळविलेले आहे. कृषी आयुक्तालयाकडून अर्जदाराचा बँकेचा तपशील आरटीजीएस चा नमुन्यात मागवण्यात आलेला होता. यावरुन कृषी आयुक्तालयापर्यंत अर्जदाराचा प्रस्ताव पोहचलेला असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार 3 विमा कंपनी यांनी आपल्या लेखी जबाबामध्ये अर्जदाराचा प्रस्ताव मिळालेला नाही तसेच अर्जदाराने तालुका कृषी अधिका-याकडे क्लेम फॉर्म दाखलच केलेला नाही असे नमूद केलेले आहे. परंतु तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्या लेखी जबाबामध्ये अर्जदाराने प्रस्ताव दाखल केलेला असल्याचे मान्य केलेले असल्याने गैरअर्जदार विमा कंपनी हिचे म्हणणे ग्राहय धरता येत नाही. महाराष्ट्र शासनाने शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर मयत शेतक-याच्या कुटूंबियांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने सदरील योजना चालू केलेली आहे. गैरअर्जदार 1 ते 3 यांच्या मार्फत सदरील योजना राबविली जाते. प्रस्तुत प्रकरणात गैरअर्जदार 3 यांनी यांनी अर्जदाराचा प्रस्ताव योग्यरित्या हाताळलेला असल्याचे दिसून येत नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन अर्जदाराचा मयत पती हा व्यवसायाने शेतकरी असून त्याचा मृत्यु अपघाती झालेला असल्याचे सिध्द होते. त्यामुळे सदर योजनेची अर्जदार ही लाभार्थी आहे असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास रक्कम रु.1,00,000/- आदेश कळाल्यापासून 30 दिवसाच्या आत दयावी.
3. गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,500/- आदेश कळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.