द्वारा :-मा. सदस्या, श्रीमती.सुजाता पाटणकर // निकालपत्र // तक्रारदारांची तक्रार संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :- (1) तक्रारदार यांचे जाबदार या बँकेकडे खाते नंबर 7486 असून ते जाबदार यांचे ग्राहक आहेत. सदरहू खात्यामध्ये तक्रारदारांनी दि.22/8/2008 रोजी रक्कम रु.25,000/- व रक्कम रु.22,000/- व रक्कम रु.25,000/- अशी एकूण रक्कम रु. 72,000/- जाबदारांकडे जमा केली. तसेच दि.22/8/2008 रोजी रक्कम रु.86,473/- एवढी रक्कम तक्रारदारांच्या खात्यामध्ये शिल्लक होती. तथापि दि.4/10/2008 रोजी तक्रारदारांनी जाबदार बँक यांचेकडे त्यांचे खात्यातील रक्कम काढण्यासाठी रक्कम रु.55,000/- ची विड्रॉल स्लिप व खात्याचे पासबुक बँकेकडे दिले त्यावेळी जाबदार यांचे संबंधित क्लार्क यांनी तक्रारदार यांना सांगितले की तुमचे खात्यामध्ये एवढी रक्कम शिल्लक नाही. याबाबत तक्रारदार यांनी त्यांचे खात्यातील रकमेची चौकशी केली असता त्यांचेपरस्पर व तक्रारदार यांचे सही शिवाय व बँक पासबुका शिवाय त्यांचे खात्यातून दि.26/8/2008 रोजी रक्कम रु.10,000/-, दि.01/9/08 रोजी रक्कम रु.20,000/-, दि.9/9/08 रोजी रक्कम रु.20,000/-, दि.13/9/08 रोजी रक्कम रु.10,000/-, दि.21/9/08 रोजी रक्कम रु.5,000/-, दि.23/9/08 रोजी रक्कम रु.4,000/-, दि.3/10/08 रोजी रक्कम रु.1,000/- अशी एकूण रककम रु.70,000/- काढण्यात आली. सदरच्या अपहाराबाबत जाबदार बँक यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती व त्याप्रमाणे दौंड पोलीस यांनी गुन्हयाचा तपास करुन आरोपी विरुध्द भा.दं.वि. कलम 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्हा दौंड कोर्टात पेंडींग आहे. तक्रारदार यांनी त्यांचे खात्यामधील रक्कम त्यांना परत मिळण्याकामी जाबदार यांचेकडे ब-याचवेळा हेलपाटे मारले व जाबदार बँक यांचेकडे त्यांचे पैसे परत मागितलेले आहेत. परंतु जाबदार यांनी प्रत्येकवेळी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची रककम त्यांना देण्याची टाळाटाळ केली. सबब तक्रारदार यांनी विधिज्ञांद्वारे दि.29/11/2008 रोजी नोटीस पाठवून रकमेची मागणी केली परंतु सदर नोटीस जाबदार बँकेस मिळूनदेखील जाबदार यांनी तक्रारदार यांची रक्कम दिली नाही म्हणून तक्रारदार यांना जाबदारांविरुध्द तक्रार दाखल करावी लागल्याचे तक्रारदारांनी तक्रार अर्जात म्हंटले आहे. जाबदार बँकेने तक्रारदार यांचे बँक खात्यामधील रक्कम परस्पर ति-हाईत इसमास देऊन तक्रारदार यांचे रक्कम रु.70,000/- चे नुकसान झालेले आहे. सबब रककम रु.70,000/- व रककम गहाळ झालेल्या तारखेपासून म्हणजेच दि.26/8/2008 पासून रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. 24 टक्के दराने व्याज तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.4,000/- देण्याचे हुकुम होणेबाबत तक्रारदारांनी मंचाकडे विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत निशाणी 2 अन्वये प्रतिज्ञापत्र तसेच निशाणी 5 अन्वये कागदपत्रांची यादी दाखल केलेली आहे. कागदपत्रांच्या यादीमध्ये स्टेटमेंट ऑफ अकाऊंट, एफ्.आय्.आर. ची प्रत, जाबदार बँकेला तक्रारदार यांनी पाठविलेली नोटीस, आर.पी.ए.डी. पोहोचपावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) मंचाने पाठविलेल्या नोटीशीस अनुसरुन जाबदार यांनी त्यांची लेखी कैफियत सादर केली. जाबदार यांनी तक्रार अर्ज मान्य नसल्याचे म्हंटले आहे. दि.4/10/2008 रोजी जाबदारांकडे तक्रारदार आले होते व त्यांनी रक्कम रु.55,000/- विड्रॉवलस्लीप व पासबुकसोबत काढली ही बाब जाबदारांनी चुकीची असल्याचे म्हंटले आहे. तथापि त्याचदिवशी तक्रारदार जाबदार बँकेकडे आल्याबाबत व बचत खात्यातील शिलकीची विचारणा केल्याबाबतचे विधान जाबदारांना मान्य आहे. तसेच तक्रारदारांच्या विनंतीवरुन जाबदार बँकेने खात्यातील जमा असणा-या शिलकेबाबत माहिती दिली. तक्रारदारांना त्यांच्या बचत खात्यातील शिल्लक असणा-या रकमेची माहिती दिल्यानंतर तक्रारदारांनी ही रक्कम न काढल्याबाबत तक्रार करण्यास सुरुवात केली. याबाबत जाबदारांनी आवश्यक ती सर्वसाधारण शहानिशा करुन घेतल्याचे म्हंटले आहे. जाबदारांनी तक्रारदारांच्या सहीची शहानिशा करुनच बचत खात्यातून रक्कम काढण्यासाठी परवानगी दिली. तसेच तक्रारदार हे जाबदारांचे ब-याच कालावधीपासूनचे खातेधारक असल्यामुळे काही वेळेस तक्रारदारांतर्फे त्यांचा नोकरवर्ग किंवा कर्मचारी बँकेमध्ये येऊन बचत खात्यातून रकमा विड्रॉ करत असल्याचे नमुद केले आहे. जाबदारांनी तक्रारदारांच्या आग्रहाखातर पोलीस केस दाखल केल्याचे मान्य केले आहे. तथापि जाबदार बँकेची कुठलीही चुक नसल्याचे तसेच जाबदार बँकेने आर.बी.आय्. बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे किंवा निकषांचे उल्लंघन केलेले नसल्याचा उल्लेख केला आहे. तथापि जाबदार बँक यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती व त्याप्रमाणे दौंड पोलीस यांनी गुन्हयाचा तपास करुन आरोपी विरुध्द भा.दं.वि. कलम 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्हा दौंड कोर्टात पेंडींग असल्याचे तक्रारदारांचे कथन जाबदारांना मान्य आहे. परंतु तक्रारदारांनी जाबदारांकडे रकमेची मागणी केली व जाबदारांनी रक्कम देण्यास नकार दिला हे तक्रारदारांचे कथन जाबदारांना मान्य नाही. जाबदारांनी तक्रारदारांना सेवा देण्यात कुठलीही त्रुटी ठेवली नसल्याचे नमुद करुन तक्रारदारांनी जाबदारांचे विरुध्द दाखल केलेला सदरचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा अशी जाबदारांनी मे. मंचास विनंती केली आहे. लेखी कैफियतीसोबत जाबदारांनी स्वतंत्र प्रतिज्ञापत्र निशाणी 19 अनव्ये दाखल केले आहे. जाबदारांची लेखी कैफियत दाखल झाल्यानंतर तक्रारदारांनी त्यांचे रिजॉईंडर व लेखी युक्तिवाद प्रतिज्ञापत्रासह निशाणी 20 वर दाखल केला आहे. . (6) सदरहू प्रकरणातील तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे व युक्तिवाद यांचा साकल्याने विचार करता खालील मुद्ये (points for consideration) मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात. मंचाचे मुद्ये व त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे :- मुद्या क्र . 1:- जाबदारांनी तक्रारदार यांना सेवेत कमतरता दिली ही बाब सिध्द होते का ? ... होय. मुद्या क्र. 2 :- काय आदेश ? ... अंतिम आदेशाप्रमाणे विवेचन :- तक्रारदार यांचे जाबदार बँकेमध्ये बचत खाते क्र.7486 असे आहे. सदर बचत खात्याची झेरॉक्स प्रत तक्रारदार यांनी निशाणी 25/1 ते 25/4 येथे दाखल केलेली आहे. सदरची बाब जाबदार यांनी त्यांच्या लेखी म्हणणे व शपथपत्रामध्ये नाकारलेली नाही याचा विचार होता तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत ही बाब निर्विवाद आहे. तक्रारदार यांच्या तक्रार अर्जातील कथनानुसार तक्रारदार हे दि.4/10/2008 रोजी जाबदार बँकेमध्ये रककम रु.55,000/- काढण्यासाठी गेले होते व त्यावेळी त्यांनी विड्रॉवल स्लीप व खात्याचे पासबुक संबंधित क्लार्ककडे दिले त्यावेळी तक्रारदार यांच्या खात्यातील रक्कम खात्यामधून परस्पर तक्रारदारांच्या सहीशिवाय व बँक पासबुकाशिवाय काढल्याचे त्यांना सांगण्यात आले. सदर रकमा दि.26/8/2008 रोजी रक्कम रु.10,000/-, दि.01/9/08 रोजी रक्कम रु.20,000/-, दि.9/9/08 रोजी रक्कम रु.20,000/-, दि.13/9/08 रोजी रक्कम रु.10,000/-, दि.21/9/08 रोजी रक्कम रु.5,000/-, दि.23/9/08 रोजी रक्कम रु.4,000/-, दि.3/10/08 रोजी रक्कम रु.1,000/- अशी एकूण रककम रु.70,000/- याप्रमाणे काढल्याचे तक्रारदार यांना सांगण्यात आले. तक्रारदार यांच्या तक्रार अर्जातील कथनानुसार तक्रारदार यांचे बँक खाते क्र.7486 मध्ये दि.22/8/2008 रोजी रक्कम रु.86,473/- एवढी रक्कम शिल्लक होती व तक्रारदार हे दि.4/10/2008 रोजी रककम काढण्यासाठी गेले असता त्यांच्या खात्यामधून रक्कम परस्पर काढल्याचे जाबदार बँकेकडून त्यांना सांगण्यात आले. जाबदार यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचा कर्मचारी व सेवकवर्ग काहीवेळेस खात्यातून पैसे काढण्यासाठी येत असत असे म्हंटलेले आहे आणि बँकेचा बँकींग व्यवहार हा आर.बी.आय्.च्या विहित निर्देशानुसार चाललेला आहे असे म्हंटलेले आहे. तक्रारदार हे बँकेचे विरुध्द रक्कम रु.70,000/- बाबत तक्रार घेऊन आलेले आहेत म्हणजेच तक्रारदार यांनी त्यांच्या जाबदार यांचेकडे असणा-या बँक खात्यामधून रक्कम रु.70,000/- एवढी रक्कम त्यांचे सहीशिवाय काढली असल्याची तक्रार घेऊन या मे. मंचामध्ये आलेले आहेत. तक्रारदार यांनी त्याच्या कथनाच्या पृष्टयर्थ शपथपत्र दाखल केले आहे. परंतु वास्तविकरित्या जाबदार यांनी तक्रारदार यांच्या खात्यामधून वेळोवेळी काढण्यात आलेल्या रकमांविषयीचा तपशिल दर्शविणारा कोणताही कागदोपत्री पुरावा या तक्रार अर्जाचे कामी या मे.मंचामध्ये दाखल केलेला नाही. वस्तूत: जाबदार यांनी तक्रारदार यांचे खात्यामध्ये रक्कम काढल्याविषयी तपशिल दर्शविणारा कागदोपत्री पुरावा म्हणजेच बँकेचे दैनंदिन व्यवहार रजिस्टर, विड्रॉवल स्लीप्स असा कोणताही कागदोपत्री पुरावा जाबदार बँकेने मे. मंचासमोर या तक्रार अर्जाचे कामी दाखल केलेला नाही. ज्यावेळी तक्रारदार जाबदार बँकेविरुध्द तक्रार घेऊन येत असतील तर त्या तक्रारीबाबत जाबदार कसे जबाबदार नाहीत हे सिध्द करण्याची पूर्णपणे जबाबदारी जाबदार बँकेची होती परंतु जाबदार बँकेने तसा तदनुषंगिक कागदोपत्री पुरावा या अर्जाचे कामी दाखल केलेला नाही. तक्रारदार यांच्या अर्जातील कथन हे फक्त नाकारल्याने सिध्द होत नाही तर ते पुराव्यानिशी सिध्द करण्याची जबाबदारी संपूर्णपणे जाबदार बँकेची होती. परंतु सदर अर्जाचे कामी जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता ठेवलेली नाही ही बाब ते सिध्द करु शकले नाहीत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या एफ्.आय्.आर. वरुन तक्रारदार यांचे जाबदार बँकेमध्ये असणा-या खात्यातील रक्कम ति-हाईत माणसाने काढली असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच जाबदार बँकेने तक्रारदार यांच्या खात्यामधून रक्कम रु.70,000/- एवढी रक्कम ति-हाईत इसमास अदा केल्याचे दिसून येत आहे. वरील सर्व विवेचनाचा विचार होता जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या न्यायमंचाचे मत आहे. वरील सर्व परिस्थितीचा विचार करता तक्रारदारांना जाबदार यांनी सेवा देण्यात कमतरता केल्यामुळे तक्रारदार हे रक्कम रु.70,000/- व दि.4/10/2008 पासून त्यावरील व्याज द.सा.द.शे. 9% दराने होणारी एकूण रक्कम जाबदार बँकेकडून वसुल करुन मिळण्यास पात्र आहेत. जाबदार यांनी त्यांच्या लेखी म्हणणे व शपथपत्रामध्ये तक्रारदार दि.4/10/2008 रोजी बँकेत आल्याचे मान्य केले आहे. सदरची रककम वसुल करुन मिळणेसाठी तक्रारदार यांना मे. न्यायमंचामध्ये तक्रार अर्ज करावा लागलेला आहे व त्याअनुषंगे खर्चही करावा लागला आहे. तक्रारदार यांना रककम रु.70,000/- एवढया मोठया रकमेस आजअखेर वंचित राहावे लागले आहे त्यामुळे तक्रारदार हे नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- जाबदार बँकेकडून वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. वरील सर्व विवेचनाचा आढावा घेऊन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहे. // आ दे श // (1) तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे. (2) जाबदार यांनी सदर निकालपत्राची प्रत मिळालेपासून पंचेचाळीस दिवसांचे आत खालीलप्रमाणे पूर्तता करावी. (2-i) यातील जाबदार बँकेने तक्रारदार यांना रक्कम रु.70,000/- द्यावेत व सदर रकमेवर दि.4/10/2008 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरी पडेपर्यंत त्यावरील द.सा.द.शे.9% दराने व्याजासहित होणारी एकूण रक्कम द्यावी. (2-ii) यातील जाबदार बँकेने तक्रारदारांना नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.5,000/- द्यावेत. (2-iii) यातील जाबदार बँकेने तक्रारदारांना तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. (3) निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात. (श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत) सदस्या अध्यक्षा अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे पुणे.
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |