(मा.अध्यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून टोमॅटो बियाणे दि.11/06/2010 रोजी खरेदी केलेले असून अर्जदार यांना सदर बियाण्यातील दोषामुळे पिकाचे झालेल्या नुकसान भरपाईपोटी रु.1,50,000/-, सदर पिकासाठी खत, फवारणी, निंधणी, खुरपणी साठी झालेला खर्च रक्कम रु.30,000/-, बियाण्याचा खर्च रु.1200/-, मानसिक, शारिरीक व आर्थीक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.19 लगत म्हणणे, पान क्र.20 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.29 लगत लेखी म्हणणे, पान क्र.30 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय
2) सामनेवाला क्र.1 यांनी खराब व दोषयुक्त बियाण्याचे उत्पादन करुन
त्याची विक्री सामनेवाला क्र.2 मार्फत अर्जदार यांना करुन अवैध
व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे काय?- होय
3) अर्जदार हे सामनेवाला नं.1 यांचेकडून नुकसान भरपाई पोटी रक्कम
वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय
4) अर्जदार हे सामनेवाला नं.1 यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे
खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय
5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला नं.1
यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे व सामनेवाला क्र.2
यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचनः
या कामी अर्जदार यांनी पान क्र.39 लगत, सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.40 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. तसेच सामनेवाला तर्फे अँड.तिपोळे यांनी युक्तीवाद केलेला आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये “अर्जदार यांनी सामनेवाला क्र.2 कडून बियाणे खरेदी घेतले आहे हे मान्य आहे. टोमॅटोची फळे ही कमी लांबट चक्री पध्दतीची तिरंगी सडणारी कुजणारी नव्हती. जिल्हा तक्रार निवारण समितीचा पंचनामा अहवाल हा मान्य नाही. सदर बियाण्यात दोष नाही. सबब अर्जदाराचा अर्ज रद्द करावा.” असे नमूद केले आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांच्या जबाबामध्ये “अर्जदार यांना लॉट नं.जीएस 0330 या टोमॅटो बियाण्याची विक्री दि.11/06/2010 रोजी केलेली आहे. सदर बियाणे हे सामनेवाला क्र.1 यांनी उत्पादन केलेले असून त्या बियाण्याची पॅकबंद पाकीटे विक्री केलेले आहे. त्यामुळे समितीने घेतलेल्या बियाण्यातील दोषास जबाबदार नाही. सबब नुकसान भरपाई अर्जदारास मागता येणार नाही.” असे नमूद केले आहे.
या कामी अर्जदार यांनी त्यांना सामनेवाला क्र.2 यांनी दि.11/06/2010 रोजी दिलेल्या रक्कम रु.1200/- च्या बिलाची छायांकीत प्रत पान क्र.5 लगत दाखल केलेली आहे. सदर बिल व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे याचा विचार करता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी पान क्र.7 लगत त्यांचे नावावरील शेतजमीन भुमापन क्र.19 चा अर्जदार यांचे वडीलांचे नावाचा 7/12 उतारा दाखल केलेला आहे. सदर उतारा पहाता अर्जदार यांनी 0.40 आर क्षेत्रात टोमॅटो या पिकाची लागवड केलेली दिसत आहे. पान क्र.8 व पान क्र.8ए लगत अर्जदार यांनी कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक तथा जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती, नाशिक यांचा पंचनामा व अहवालची मुळ अस्सल प्रत दाखल केलेली आहे.
या कामी शास्त्रज्ञ साक्षीदार श्री.विजय श्री.पाटील यांचे प्रतिज्ञापत्र पान क्र.33 लगत दाखल केलेले आहे व श्री.पाटील यांनी त्यांचे प्रतिज्ञापत्रासोबत पान क्र.34 व पान क्र.35 लगत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती यांचा अहवालाची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. सदर अहवालामध्ये “अर्जदार यांनी लागवड केलेले टोमॅटोच्या पिकास 100% झाडावरील फळे कमी लांबट आकाराची चक्री पध्दतीची, तिरंगी रंगाची दिसून आली. सदरच्या फळांची पिकण्याची प्रक्रीया संथगतीने असून फळे पिकतांना लाल ठिकाणी कुजण्याची प्रक्रिया होवून फळे सडतांना दिसत होते. समितीच्या निष्कर्षाप्रमाणे कंपनीने नमूद केलेल्या नमूद लॉटच्या बियाण्याची पिकाची लक्षणे संपुर्णतः विसंगत दिसून आली. सदर बियाणे सदोष असून त्यामध्ये 100% अनुवंषिक भेसळ दिसून आली. त्यामुळे शेतक-यांचे 90% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.” असे समितीने स्पष्ट नमूद केले आहे. अर्जदार यांचे शेताची प्रक्षेत्राची पाहणी करीत असतांना सामनेवाला क्र.1 यांचे प्रतिनीधी हजर होते. सदर अहवाल त्यांना मान्य असून त्यांनी तशी सही केल्याचे सदर अहवालावर दिसून येत आहे. पान क्र.8 व पान क्र.8ए लगतचा व पान क्र.34 व पान क्र.35 लगतचा अहवाल चुकीचा आहे किंवा योग्य व बरोबर नाही हे दर्शवण्याकरीता सामनेवाला यांनी कोणताही योग्य तो पुरावा दाखल केलेला नाही. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या जबाबातील परिच्छेद 19 खरी परिस्थिती यामध्ये केवळ सदर अहवाल नाकारला आहे.
सदर अहवालाबाबत शास्त्रज्ञ श्री.पाटील यांनी त्यांचे प्रतिज्ञापत्र पान क्र.33 लगत दाखल केलेले आहे. सदर प्रतिज्ञापत्र पहाता त्यामध्ये साक्षीदार यांनी शेतक-यांची सर्व माहिती घेवून पाहणी करुन अहवाल तयार केलेला आहे व सदर वाणामध्ये 100% अनुवंषीक भेसळ असून बियाण्यात दोष आहे. सामनेवाला क्र.1 यांचे प्रतिनीधी श्री.नितीन सोनवणे हे हजर होते व त्यांनी कोणत्याही प्रकारे हरकत घेतलेली नाही असे नमूद केलेले आहे.
सामनेवाला यांनी सदर साक्षीदार यांची प्रश्नावलीद्वारे उलटतपास घेतलेला आहे. या प्रश्नावलीचे प्रतिज्ञापत्रावर उत्तरे पान क्र.37 लगत दाखल आहे. सदर प्रश्नावलीमधील प्रश्न पहाता यामध्ये पंचनामा करतांना शेतकरी हजर होते का, परीपत्रकाप्रमाणे कंपनीची साक्ष घेणे, प्रतिनीधींचा जबाब अहवाल व पंचनाम्यामध्ये नोंदविणे, फळांची तपासणी करणे, टोमॅटो सॉफ्ट स्किन होवून कुजण्याची प्रक्रीया, बियाण्यात दोष इत्यादी बाबत काही मुख्य प्रश्नावर साक्षीदार यांना प्रश्न विचारलेले आहेत. साक्षीदार यांनी, शेतक-यांकडून शहानिशा करुन, पाहणी करुन, बिलाची तपासणी करुन, फळांची सडण्याच्या प्रक्रियेबाबत तपासणी करुन अहवाल केला तसेच कंपनीचे प्रतिनीधी उपस्थित होत व त्यांनी अहवालावर स्वाक्षरी केली आहे, सदर बियाण्यात दोष आहे असे उत्तर नमूद केलेले आहे. संपुर्ण उलटतपासणीतील प्रश्नांचा व उत्तरांचा विचार करता सामनेवाला यांनी त्यांच्या जबाबात बियाण्यात दोष नसल्याबाबत घेतलेल्या बचावाची बाब कुठेही सिध्द होत नाही.
सामनेवाला यांनी ग्राहक तक्रार क्र.314/10 मध्ये पान क्र.59 लगत परीपत्रक दाखल केलेले आहे. सदर पान क्र.8 व पान क्र.8ए लगतचा अहवाल व साक्षीदारांची उत्तरे पहाता कृषी अधिकारी यांनी पान क्र.8 व पान क्र.8ए चा अहवाल हा परीपत्रकाप्रमाणेच तयार केलेला असल्याचे दिसत आहे. सदर परीपत्रकातील कलम 11(च) प्रमाणे उगवणशक्ती किंवा अनुवंषीक शुध्दतेबाबत तक्रारी आल्यास ग्राहक मंचाकडे जाण्यास शेतक-यांना उद्युक्त करावे असे नमूद आहे.
तसेच सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.24 लगत स्टेटमेंट II हे सर्टिफिकेट दाखल केलेले आहे. सदर स्टेटमेंट चे अवलोकन केले असता सदरचे स्टेटमेंट हे बियाण्याच्या उगवणक्षमतेबाबतचे दि.14/4/2010 रोजीचे आहे. परंतु अर्जदार यांची तक्रार आल्यानंतर नमूद लॉटचे बियाण्याची सामनेवाला यांनी पुन्हा चाचणी करुन स्टेटमेंट किंवा अहवाल दाखल केलेला नाही किंवा तशी मागणी मंचाकडे केलेली नाही. याचा विचार होता सदर सर्टिफिकेट या कामी लागु होत नाही असे मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी ग्राहक तक्रार क्र.314/10 मध्ये टोमॅटो पिकाचे माहिती लेख यांच्या पान क्र.63 लगत झेरॉक्स प्रती हजर केलेल्या आहेत. परंतु सदर लेखाचे अवलोकन केले असता त्यामध्ये टोमॅटो हे चक्री तिरंगा पध्दतीने व फळे पिकतांना का कुजतात ? याबाबत कोणताही खुलासा दिसत नाही.
पान क्र.8, पान क्र.8ए व पान क्र.34, पान क्र.35 लगतचा अहवाल व त्यामधील संपुर्ण मजकूर, पान क्र.33 चे प्रतिज्ञापत्रामधील मजकूर, व पान क्र.37 वरील प्रश्नावलीचे उत्तरे यांचा एकत्रीतरित्या विचार करता सामनेवाला यांनी अर्जदार यांना हलक्या प्रतीचे व अनुवंषीक भेसळीचे बियाणे विक्री केलेले असल्यामुळे अर्जदार यांचे टोमॅटो पिकाचे संपूर्णपणे नुकसान झालेले आहे हे स्पष्ट होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला क्र.1 यांनी खराब दोषयुक्त टोमॅटो बियाण्याचे उत्पादन करुन त्याची विक्री अर्जदार यांना सामनेवाला क्र.2 यांचेमार्फत केलेली आहे व त्यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी अवैध व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी ग्राहक तक्रार क्र.314/10 मध्ये पान क्र.58 चे यादीसोबत पान क्र.60 लगत पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे दाखल केलेली आहेत.
1) 4(2010) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 119. सिन्जेटा इं.लि.
विरुध्द वेलगानरसिंहराव
2) 2(2007) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 148. इंडो अमेरीकन
हायब्रीड सिडस. विरुध्द विजयकुमार शंकरराव.
3) 1(2000) सि.पी.जे. आंध्र प्रदेश आयोग. पान 439. केसरी
वेंकटारेड्डी विरुध्द आन्ना प्रथी वेंकटचलपथीराव.
4) मा.राज्य आयोग मुंबई यांचेसमोरील प्रथम अपील क्र.857/2002.
निकाल तारीख 4/12/2007. नाथ बायोटेक्नॉलॉजीस लि. विरुध्द
जयंत सोपान गिराने.
5) ए.आय.आर. 1999 सर्वोच्च न्यायालय. पान 3318. स्टेट ऑफ
हिमाचल प्रदेश विरुध्द जयलाल व इतर.
6) 2011(2) सि.पी.आर. राष्ट्रीय आयोग. पान 35. महिको सिडस लि.
विरुध्द जी वेकटा सुब्बा रेड्डी
परंतु सामनेवाला यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतचे तक्रार अर्जातील हकिकत यामध्ये फरक आहे. या कामी पान क्र.8 व पान क्र.8ए चा अहवाल तयार करणा-या अधिका-यांचे प्रतिज्ञापत्र तसेच प्रश्नावलीची उत्तरे दाखल आहेत. तसेच पान क्र.8 व पान क्र.8ए लगतचे अहवालानुसार सामनेवाला नं.1 यांनी हलक्या प्रतीच्या बियाण्याचे उत्पादन करुन त्याची विक्री सामनेवाला क्र.2 मार्फत अर्जदार यांना केलेली आहे ही बाब स्पष्ट झालेली आहे. यामुळे सामनेवाला यांनी दाखल केलेली व वर उल्लेख केलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे या कामी लागु होत नाहीत.अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये “सामनेवाला यांचेकडून घेतलेल्या टोमॅटो बियाण्याची 40 आर क्षेत्रात लागवड केलेली होती. या टोमॅटो पिकापासून 500 ते 600 कॅरेट टोमॅटो उत्पादन मिळाले असते, याकामी त्यावेळचा टोमॅटो बाजारभाव प्रती कॅरेट रु.300/- असा होता. त्याप्रमाणे उत्पन्न रक्कम रु.1,50,000/- ते रु.1,80,000/-मिळाले असते.” असा उल्लेख अर्जदार यांनी केलेला आहे. या पिकाच्या नुकसान भरपाईपोटी सामनेवाला यांचेकडून रु.1,80,000/- ची मागणी अर्जदार यांनी केलेली आहे. परंतु टोमॅटो पिकाचा नक्की भाव काय होता? व अर्जदार यांना नक्की किती उत्पादन मिळाले असते? याबाबतचा कोणताही योग्य तो पुरावा सामनेवाला यांनी दिलेला नाही.
या कामी अर्जदार यांनी, ग्राहक तक्रार क्र.317/10 मध्ये पान क्र.12 लगत दाखल केलेला कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील ऑगष्ट 2010 ते सप्टेंबर 2010 या कालावधीतील टोमॅटोचा बाजारभावाबाबतचा तक्ता या तक्रारीत वाचण्याबाबतची पुरसीस पान क्र.42 लगत दाखल केलेली आहे. या तक्त्यामधील टोमॅटोच्या बाजारभावाचा विचार करता प्रती कॅरेट टोमॅटोचा सरासरी भाव रु.250/- इतका होत आहे.
वरील कारणाचा विचार होता अर्जदार यांचे 500 कॅरेट टोमॅटोचे उत्पादनाची किंमत रु.1,25,000/- इतकी होत आहे, व इतकी किंमत अर्जदार यांना बाजारभावाप्रमाणे मिळाली असती, याचा विचार होता अर्जदार यांना टोमॅटो पिकाचे नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,25,000/- देण्यास सामनेवाला नं.1 हे जबाबदार आहेत.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात “सामनेवाला क्र.1 यांनी उत्पादीत केलेले टोमॅटोचे बियाणे सिलबंद पाकिटात विक्री केलेली आहे.” असे नमूद केलेले आहे. याबाबत विचार करता अर्जदार यांनी सदर बियाण्याच्या पाकिटाचे सिल तोडले असल्याबाबत किंवा त्यात भेसळ असल्याबाबत अर्जदार यांची तक्रार नाही व बियाणे समितीच्या अहवालातही सामनेवाला क्र.2 यांनी भेसळ केल्याबाबत निष्कर्ष आढळून येत नाही. यामुळे सामनेवाला क्र.2 यांना या नुकसानभरपाई कामी जबाबदार धरता येणार नाही असे मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागली आहे यामुळे अर्जदार यांना निश्चीतपणे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे.
2011 सि.टी.जे. राष्ट्रीय आयोग पान 60. पी.एच.आय. सिड्स लि.
विरुध्द रघुनाथ रेड्डी.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद व वकिलांचा युक्तीवाद तसेच मंचाचे वतीने आधार घेतलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
आ दे श
1) सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्दची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 यांचेविरुध्द अंशतः मंजूर
करण्यात येत आहे.
3) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला क्र.1 यांनी अर्जदार यांना
पुढीलप्रमाणे रकमा दयाव्यात
अ) टोमॅटो पिकाचे नुकसानीपोटी रक्कम रु.1,25,000/- दयावेत.
ब) मानसिक त्रासापोटी रु.15,000/- दयावेत.
क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- दयावेत.