निकालपत्र
( दिनांक 28-07-2015 )
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार सौ. अश्विनी विश्वनाथ कुटेमाटे, यांनी गैरअर्जदार यांची वर्तमानपत्रातील फ्लॅट संबंधीची जाहीरात वाचली. सदर जाहीरात वाचून अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या कार्यालयात जावून चौकशी केली असता गैरअर्जदार यांनी अर्जदारास सर्व माहिती व अटीची माहिती दिली. तसेच फ्लॅट चे ठिकाण दाखविले. अर्जदारास सर्व बाबी पसंत पडल्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याशी दिनांक 14/11/2011 रोजी करार केला. सदर करारानुसार अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना रु.2,60,000/- दिनांक 14/11/2011 रोजी दिले व सदर रक्कम मिळाल्याबाबत गैरअर्जदार यांनी दिनांक 14/11/2011 रोजी सौदा चिठ्ठी करुन दिली.
3. सदर सौदाचिठ्ठीमध्ये मौजे पुयनी ता. जि. नांदेड येथील गट नं. 149 येथील जमीनीवर बांधण्यात येणा-या ‘अदित्यसिटी’ इमारतीमधील ‘C’ विंग मधील रो हाऊस नं. 10 ज्याचे क्षेत्र 15x45 असून त्याची 14/11/2011 रोजी बुकींग करण्यात आली असून एकूण किंमत रु.15,95,000/- आहे.
4. अर्जदाराने बांधकामाची पाहणी केली असता कामामध्ये वाढ दिसून आली नाही. त्यासंदर्भात गैरअर्जदार यांचेकडे चौकशी केली असता गैरअर्जदार यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गैरअर्जदार यांनी घर बांधून दिलेले नाही त्यामुळे अर्जदारास मानसिक त्रास झाला. अर्जदार गैरअर्जदार यांचे कार्यालयात गेला असता गैरअर्जदार यांनी इमारतीचे काम करणार नाही व पैसेही परत करणार नाही असे सांगितले. त्यामुळे अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी कराराचा भंग केलेला असल्याने अर्जदारास गैरअर्जदार यांच्याकडून रु. 2,60,000/- 20 टक्के व्याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,00,000/- तक्रारीचा खर्च रु.20,000/- इत्यादी रक्कमेची मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे.
5. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर प्रकरणामध्ये वकीलामार्फत हजर झाले व त्यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला. त्यांचा लेखी जबाब खालील प्रमाणे आहे.
6. अर्जदाराने प्रस्तुतचे प्रकरण हे गृहीतकावर आधारुन दाखल केलेले आहे. सौदा चिठ्ठीचे नियम व अटीप्रमाणे सदरील फ्लॅटचे बांधकाम 2 वर्षाच्या आत पूर्ण होईल असे उल्लेखीलेले आहे परंतू तांत्रिक बाबी व लेबरची कमतरता यामुळे सदर बांधकामास उशीर झालेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास कोणत्याही प्रकारचा नकार दिलेला नाही. गैरअर्जदार आजही उर्वरीत रक्कम स्विकारुन फ्लॅटचा ताबा देण्यास तयार आहेत. सदर फलॅटचे बांधकाम करण्याचा कालावधी 2 वर्षाचा होता परंतू काही तांत्रिक कारणामुळे बांधकामास उशीर झालेला आहे, त्यामुळे गैरअर्जदार फ्लॅटचे बांधकाम करुन देवू शकलेला नाही, त्यामुळे गैरअर्जदार यांच्याकडून दुसरी कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा निष्काळजीपणा झालेला नाही. त्यामुळे रक्कम रुपये 10,000/- च्या खर्चासह अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती लेखी जबाबाद्वारे गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
7. अर्जदाराने पुराव्याकामी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. गैरअर्जदार यांनी शपथपत्र व कागदपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
8. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सौदाचिठ्ठी दिनांक 14/11/2011 रोजी करुन दिलेली आहे. सदरील सौदाचिठ्ठी अवलोकन केले असता गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम रु.15,95,000/- एवढया किंमतीमध्ये अर्जदारास मौजे पुयनी ता. जि. नांदेड येथील गट नं. 149 येथील जमीनीवर बांधण्यात येणा-या अदित्य सिटी मधील बिल्डींग C विंग, घर नं. 10 रो हाऊस विक्री करण्याचा करार केलेला आहे. सदरील करारानुसार गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्याकडून रक्कम रु. 2,60,000/- घेतलेले आहेत. सदरील कराराच्या नियम व अटी मधील अट क्र. 8 नुसार बिल्डींगचे काम हे अंदाजे 2 वर्षात पूर्ण होईल असे गैरअर्जदार यांनी सांगितलेले आहे. सदरील करार हा दिनांक 14/11/2011 रोजी झालेला आहे. तसेच अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना रोजी रक्कम रु. 2,60,000/- करारापोटी दिलेले आहेत. तक्रार दाखल तारीख 02/03/2015 पर्यंत सदरील जागेवर कोणतेही बांधकाम झालेले नाही. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये मान्य केले आहे की, गैरअर्जदार यांच्याकडून काही तांत्रिक कारणामुळे बांधकामास उशीर झालेला आहे त्यामुळे गैरअर्जदार यांनी फ्लॅटचे बांधकाम करुन देवू शकलेले नाही. यावरुन सदरील जागेवर गैरअर्जदार यांनी बांधकाम आजपर्यंत केलेलेच नाही ही बाब स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी लेखी जबाबामध्ये बांधकाम करण्यास तांत्रिक अडचण आहे असे मान्य केलेले आहे परंतू सदरील अडचण भविष्यात दूर होईल व इमारतीचे बांधकाम गैरअर्जदार हे सुरु करतील यावर प्रश्नचिन्ह उभा रहातो. ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 2(4)(1) ( r ) “unfair trade practice” means a trade practice which, for the purpose of promoting the sale, use or supply of any goods or for the provision of any service, adopts any unfair method or unfair or deceptive practice including any of the following practices, namely:- (1) the practice of making any statement, whether orally or in writing or by visible representation which,- यावरुन बांधकाम करण्यास अडचण असतांनाही ग्राहकांना इमारतीचा अदयावत तपशील देवून इमारत लवकरच पूर्ण होईल असे भासविणे, म्हणजेच गैरअर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदयानुसार अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला असल्याचे सिध्द होते. अर्जदारास सदरील रक्कम परत न दिल्यामुळे तक्रार दाखल करणे भाग पडलेले आहे. ज्या इमारतीच्या बांधकामासाठी अडचण आहे त्या इमारतीतील फ्लॅटच्या विक्रीपोटी गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्याकडून रक्कम रु. 2,60,000/- एवढी मोठी रक्कम स्विकारलेली आहे, ही बाब बेकायदेशीर आहे. अर्जदार ही गैरअर्जदार यांना दिलेली रक्कम रु. 2,60,000/- व्याजासह परत मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे. आ दे श
1. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम रु. 2,60,000/- दिनांक 14/11/2011 पासून
द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह रक्कम अदा होईपर्यंत आदेश तारखेपासून 30
दिवसांचे आत दयावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व तक्रारीच्या
खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- दयावेत.
4. वरील आदेशाच्या पूर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45
दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पूर्ततेच्या
अहवालासाठी ठेवण्यात यावे.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.