जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/184. प्रकरण दाखल तारीख - 20/08/2009 प्रकरण निकाल तारीख – 24/12/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य प्रवीण पि. अवधुतराव मार्कड वय,28 वर्षे, धंदा शेती, रा. रुई ता.माहूर जि. नांदेड अर्जदार विरुध्द. 1. श्री दत्त कृषी सेवा केंद्र, माहूर ता. माहूर जि. नांदेड. 2. सिजेंटा इंडिया लि. सिडस विभाग, 1170/27, रेव्हयून्यू कॉलनी, शिवाजी नगर, पूणे. गैरअर्जदार 3. तालूका कृषी अधिकारी, माहूर ता. माहूर जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.सुरेश पन्नासवाड. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.प्रवीण अग्रवाल. गैरअर्जदार क्र. 3 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या ) गैरअर्जदार सिडस कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हे रुई ता. माहूर येथील रहीवाशी असून त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचे कडून दि.12.06.2009 रोजी राशी कंपनीचे सिझेंन्टा हे मिर्चीचे बियाण्याचे दोन पॉकेट खरेदी केले. ज्यांची पावती नंबर 587 असून त्यांचा लॉट नंबर 2461617 असून त्यांचा एक नग रु.550/- ला व लॉट नंबर 76416218 यांचा एक नग ज्यांचा दर रु.750/- ला खरेदी केला. त्यांची पावती अर्जदार क्र.1 यांनी रु.1300/- ची दिली. वरील बियाणे गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादित केलेले आहेत. गैरअर्जदार क्र.2 यांनी बनवलेल्या मार्गदशिकेप्रमाणे जमिनीची पूर्व मशागत करुन शेत सर्व्हे नंबर 4 मध्ये दि.20.06.2009 रोजी पाऊस पडल्यानंतर 2.6 x 2 फूट इतक्या अंतरावर एका ठिकाणी दोन ते तीन बियाण्यांची लागवड एक एकर जमिनीत केली. अर्जदार यांनी योग्य प्रकारे त्यांची काळजी घेतली तरी देखील दि.10.07.2009 पर्यत मिर्चीचे बियाण्याची उगवण झाली नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना तक्रार केली पण त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामूळे दि.10.07.2009 रोजी माहूर तालूका कृषी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार दिली. त्यांची एक प्रत पोस्टाने गैरअर्जदार क्र.1 यांना पाठविली व त्यांची प्रत गैरअर्जदार क्र.1 यांना दि.11.07.2009 रोजी मिळाली. तसेच दूसरी प्रत दि.11.07.2009 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांना फॅक्स द्वारे दिली. गैरअर्जदार क्र.3 यांनी दि.14.7.2009 रोजी अर्जदाराच्या शेतात जाऊन पंचासमक्ष शेत सर्व्हे नंबर 4 चा पंचनामा केला. त्यात त्यांना बियांवर विशिष्ट प्रकारची कोटींग आढळून आली तसेच त्यामध्ये बियाणे सडलेल्या अवस्थेत आढळून आले असा अहवाल दिला. त्यामूळे सदर बियाणेमध्ये सकृतदर्शनी दोष असल्याचे दिसून येते असा अहवाल व पंचनामा केला. ज्यावरुन सदरील बियाणे हे बोगस व निकृष्ट आहेत हे सिध्द होते. अर्जदाराचे त्यामूळे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नूकसान झाले आहे. अर्जदारास बियाण्याची किंमत रु.1300/- तसेच लागवडीचा खर्च रु.1000/- तसेच शेणखताचा खर्च रु.8000/- झालेला आहे. अर्जदाराचा शेती हा एकमेव व्यवसाय आहे त्यांचे कूटूंब शेतीवर चालते. उत्पन्न झाले असते तर अर्जदारास 35/40 क्विंटल मिर्ची झाली असती व मिर्चीचे प्रति क्विंटल बाजार मूल्य रु.8 ते 9 हजार आहे म्हणून रु.3,20,000/- चे अर्जदाराचे नूकसान झाले आहे त्यांस गैरअर्जदार क्र.1 व 2 हे जबाबदार आहेत. त्यामूळे अर्जदारास उत्पन्नाचे रु.3,20,000/-, बियाण्याची किंमत रु.1300/-, लागवड खर्च रु.1000/-, शेणखत रु.8000/-, मानसिक ञासापोटी रु.10000/- व दावा खर्च रु.6000/- असे एकूण रु.3,46,300/- व त्यावर 12 टक्के व्याज गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडून मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार ही अयोग्य आधारहीन व कायद्यांतर्गत बसत नाही म्हणून तक्रार खारीज करावी असे म्हटले आहे. सदर तक्रार मंचाला चालविण्याचा अधिकार नाही व सदर तक्रार ही ग्राहकवाद मध्ये बसत नाही. सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2(1)(ड) नुसार येत नाही. सदर तक्रारीमध्ये अर्जदाराने कोणत्याही तज्ञ व्यक्तीचा अहवाल दिलेला नाही. गैरअर्जदार क्र.3 यांनी केलेला पंचनामा चूकीचा आहे कारण पंचनामा करतेवेळेस गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस पाठविलेली नाही. सदर बियाणे हे शासनाच्या बियाणे प्रयोगशाळेमध्ये पाठवीणे आवश्यक होते तसे न केल्यामूळे तक्रार खारीज करावी. गैरअर्जदार यांनी मा. राष्ट्रीय आयोग दिल्ली यांचा दि.10.2.2005 रोजीचा सीपीजे-11 2005 पान क्र.94 वर सोनेकरण ग्लॅडोली गोवर्स विरुध्द बाबुलाल यात पुराव्याशिवाय बियाणे निकृष्ट दर्जाचे आहेत असा अनुमान काढता येत नाही. अर्जदार यांनी बियाण्याची लागवड करताना एक ते दोन वेळा जांभूळवाही करावी व सरी वरंबा काढून घ्यावा तसेच त्यांनी सांगितल्या प्रमाणे बियाण्याची लागवड करावी असे म्हटले आहे पण अर्जदार यांनी अशी लागवड केलेली नाही. कंपनीने जवळपास सदरील बियाणे 2000 पेक्षा जास्त नग विकलेले आहेत पण कूठूनही कूठल्याही प्रकारची शेतक-याची तक्रार आलेली नाही. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 13 (1)(सी) नुसार बियाण्याचा नमूना बियाणे प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवीणे आवश्यक आहे तसे अर्जदाराने केलेले नाही. त्यामूळे सदरची तक्रार ही खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदारांनी लागवडीसाठी केलेला खर्च त्यांचा मान्य नाही.हे म्हणणे खरे नाही की, अर्जदारास रु.3,20,000/- चा तोटा सहन करावा लागला. त्यामूळे त्यांना कोणताही मानसिक ञास झालेला नाही. त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्दची तक्रार रु.5000/- खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.3 हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी दि.10.7.2009 रोजी सीजेंटा कंपनीचे मीर्चीचे लॉट नंबर 2641617 व 26416218 चे बियाणे उगवण झाली नसल्याची तक्रार केली होती. त्यांनी अर्जदाराच्या सर्व्हे नंबर 4 मौजे रुई येथे जायमोक्यावर जाऊन दि.14.7.2009 रोजी पंचनामा केला व सदर लॉटचे बियाण्याच्या उगवण शक्तीमध्ये दोष असल्याचा अहवाल दिलेला आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार गैरअर्जदार क्र. 1 व 2 ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचे दूकानातून सिझेंडा कंपनीचे मिरचीचे बियाणे दि.12.06.2009 रोजी घेतलेले आहे त्याबाबतची पावती अर्जदार यांनी या मंचामध्ये दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादीत केलेले बियाणे गैरअर्जदार क्र.1 कडून खरेदी केले होते व ते स्वतःच्या शेतात पेरले होते पण त्या बियाण्याची उगवण झाली नाही. अर्जदार यांच्या निदर्शनास आलेवरुन प्रस्तूतची तक्रार अर्जदार यांनी दाखल केलेली आहे. सदरचे व्यवहारा बाबत अर्जदार यांनी बियाणे खरेदीची पावती, सातबारा व इतर कागदपञे दाखल केलेली आहेत. अर्जदार यांचा अर्ज शपथपञ व त्यांनी दाखल केलेले बियाणे खरेदीचे कागदपञ दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्यांचे लेखी जवाबामध्ये बियाणे विक्री केले नव्हते असे म्हटलेले नाही. यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मते आहे. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादीत केलेले मिरचीचे बियाणे खरेदी केलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी बनविलेल्या मार्गदशीकेप्रमाणे अर्जदार यांनी जमिनीची पूर्व मशागत करुन मिरचीचे बियाण्यांची लागवड केलेली आहे. परंतु अर्जदार यांनी पेरलेले मिरचीचे बियाणे उगवूनच आले नाही अशी अर्जदार यांची तक्रार आहे. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी कागदयादीने अर्जदार यांचे शेतात मिरचीच्या सदोष बियाणे बाबत केलेला पंचनामा दाखल केलेला आहे. सदर पंचनाम्याचे अवलोकन केले असता बियाण्याची उगवण 2 टक्के क्षेञावर झाल्याचे दिसून आले. ज्याठिकाणी उगवण झालेली नाही अशा फूलीवर बियाण्याचा शोध घेतला असता बियावर विशिष्ट प्रकारची कोंटीग आढळून आली व त्यामध्ये बियाणे सडलेल्या अवस्थेत आढळून आली. शेतीची मशागत लागवडीची पध्दत, टोकन पध्दतीने लागवड करावयाची कंपनीची शिफारस, पाणी देण्याची पध्दत यासर्व बाबीचा विचार करता सिझेंन्डा कंपनीच्या रोशनी या मिरची वाणांच्या उगवण शक्तीमध्ये दोष असल्याचे सकृतदर्शनी दिसून येते असे नमूद केलेले आहे. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी पंचनाम्याचे वेळी शेतातून उकरुन काढलेल्या बियाणांचे फोटो व ज्या क्षेञात मिरची बियाणे लागवड केली होती त्या शेताचा असे दोन फोटो या अर्जाचे कामी दाखल केलेले आहेत. सकृतदर्शनी अर्जदार यांच्या शेतात बियाणांची उगवण झाली नसल्याची बाब स्पष्ट दिसून येत आहे. तसेच बियाणेही सडलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. अर्जदार यांनी त्यांचे शेतामध्ये मिरची बियाणाची लागवड दि.20.06.2009 रोजी केलेली होती व अर्जदार यांचे शेतातील पंचनामा हा दि.14.07.2009 रोजी करण्यात आलेला आहे. म्हणजेच मिरची बियाणे लागवड केल्यानंतर जवळजवळ 24 दिवसांनी पंचनामा झालेला आहे. त्यावेळेला अर्जदाराने दाखल केलेल्या कंपनीच्या माहीतीपूस्तीके प्रमाणे 20 ते 25 दिवसानंतर रोपे येणे आवश्यक होते परंतु अर्जदार यांच्या शेतामध्ये उगवणच झालेली नाही. ही बाब पंचनाम्यावरुन व अर्जदार यांनी दाखल केलेल्या फोटोवरुन स्पष्ट होत आहे. अर्जदार यांची प्रस्तूतची तक्रार ही मिरची बियाण्यांच्या उगवण क्षमतेवीषयी आहे. गैरअर्जदारांनी सदर अर्जाचे कामी हजर झाले नंतर बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या गूणवत्तेवीषयीचा प्रयोगशाळेचा अहवाल या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी खरेदी केलेले बियाणे पूर्णपणे शेतात पेरले असतील अशा परिस्थीतीत गैरअर्जदार यांनी त्यांचेकडे संबंधीत लॉटचे प्रिझर्व्ह केलेले बियाणे प्रयोग शाळेकडे पाठवून बियांणाच्या उगवण क्षमतेबाबतचा अहवाल या मंचामध्ये दाखल करणे आवश्यक व गरजेचे असे होते परंतु गैरअर्जदार यांनी तसा कोणताही बियाण्यांच्या उगवण क्षमते बाबतचा अहवाल या मंचामध्ये या अर्जाचे कामी दाखल केलेला नाही. अगर त्यांचे कंपनीचा बियाणे उगवण क्षमते बाबतचा प्रयोग निरीक्षण अहवालही या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी मिरचीचे बियाणे उगवलेच नाहीत अशी तक्रार दाखल केलेली आहे. सदरची बाब अर्जदार यांनी दाखल केलेल्या फोटोवरुन व दाखल पंचनाम्यावरुन स्पष्ट झालेली आहे. अर्जदार यांच्या शेतातील मिरचीचे बियाणे हे निकृष्ट दर्जाचे असल्याने सदर अर्जदार यांचे नूकसान झालेले आहे. 2004 CPJ vol. II page no.37 SC H.N.Shankara Shastry Vs. Asst. Director of Agriculture, Karnataka, SEEDS : Defective : Supply of substandard paddy seeds to appellant : Appellant had to leave 7 acres of his land fallow and uncultivated : Refund of price of paddy seeds and damages caused to him as result of transaction : Respondent directed to pay sum of Rs.17,500/- to appellant by District Forum : State Commission modified order of District Forum directing respondent to pay and refund sum of Rs.1350/- price of seeds, to appellant with interest @ 18 % p.a. from date of its purchase : State Commission also awarded sum of Rs.1000/- as compensation to appellant : Reason for modifying amount of compensation to be paid to appellant is that it cannot be said sub-standard seeds were due to any act on part of opposite party : State Commission not kept in mind very object of Act enacted to better protect interest of consumers : Order of State Commission as affirmed by National Commission unsustainable : Impugned order set aside and order made by District Forum restored. या निकालपञाप्रमाणे अर्जदार यांना गैरअर्जदार यांनी निकृष्ट दर्जाचे बियाणे दिलेमूळे सेवेत कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी त्यांचे अर्ज क्र.3 मध्ये बियाण्याची लागवड एक एकर मध्ये केली असे नमूद केलेले आहे. अर्जदार यांनी 7/12 चा उतारा गट क्र.4 चा दाखल केलेला आहे. त्यावर ही क्षेञ 1.01.00 असे नमूद केलेले आहे. अर्जदार यांनी कंपनीच्या मार्गदर्शीका पूस्तीके प्रमाणे बियाण्यांची लागवड केलेली आहे परंतु बियाण्याची उगवण झालेली नाही त्यामूळे अर्जदार यांचे एकरी 35 ते 40 क्विंटल मिरचीचे उत्पन्न अपेक्षित होते असे नमूद केलेले आहे. परंतु अर्जदार यांनी एक एकर क्षेञामध्ये मागील वर्षी एकरी 35 ते 40 क्विंटल मिरचीचे उत्पन्न घेतले होते असे दर्शवीणारा कोणताही कागदोपञी पूरावा या अर्जाचे कामी दाखल केलेला नाही. त्यामूळे अर्जदार यांच्या शेतातील एक एकर क्षेञामध्ये सरासरी 10 क्विंटल इतके मिरचीचे उत्पन्न गृहीत धरणे योग्य व न्याय असे ठरणारे आहे. अर्जदार यांनी मिरचीला प्रति क्विंटलला बाजार दर रु.8 ते 9 हजार इतका धरल्यास रु.3,20,000/- मिरचीच्या उत्पन्नाचा तोटा सहन करावा लागला असे नमूद केलेले आहे. अर्जदार यांनी डेली प्रभात पूष्प या दैनिकाचे बाजारभाव 18 नोव्हेंबर 2009 चे दाखल केलेले आहेत. सदर दैनिकातील बाजारभावा प्रमाणे मिरचीचा क्विंटलचा दर रु.6000/- ते रु.6500/- असल्याचे स्पष्ट होत आहे. परंतु अर्जदार यांच्या एक एकर क्षेञामध्ये 10 क्विंटल उत्पन्न अपेक्षीत आहे त्याप्रमाणे अर्जदारास 10 क्विंटल x रु.6000/- = असे एकूण रु.60,000/- उत्पन्न होणे अपेक्षीत आहे. अर्जदार यानी सदर अर्जाचे कामी शेणखत घातले बाबतच्या पावत्या अनूक्रमे रक्कम रु.3200/-, रु.3200/- रु.1600/- आणि मजूरी बाबतच्या रु.200/- रु.200/- रु.200/- रु.200/- रु.200/- अशा पावत्या दाखल केलेल्या आहेत. त्यामूळे अर्जदार हे रु. 9000/- सदरची रक्कम गैरअर्जदार यांचेकडून वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांना गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी सदोष बियाणे पूरवले बाबत कळवून देखील गैरअर्जदार यांनी त्याबाबत कोणतीही पूर्तता केलेली नाही त्यामूळे अर्जदार यांना सदोष बियाण्याच्या नूकसान भरपाईची रक्कम मिळणेसाठी या मंचामध्ये अर्ज करावा लागलेला आहे व त्या अनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडून मानसिक ञासापोटी रक्कम वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यानी सदर अर्जाचे कामी 1986-2004 CONSUMER 7618 (NS) M/s National Seeds Corporation Vs Nemmipati Nagar Reddy, 1986-2005 CONSUMER 8806 (NS), Maharashtra Hybrid Seeds Co. Ltd. Vs. Annapureddu Vijender Reddy and another, 1986-2002 CONSUMER 5769 (NS) Bejo Sheetal Seeds Vs. Bolla Venkannna & others. In the Suprem Court of India , M/s Maharashtra Hybrid Seeds Co. Ltd. Vs. Alavalapati Chandra Reddy & others. 2008 (I) CPR page no.4,5,9 NC National Seeds Cor.Ltd. Vs. Bheem Reddy Mally Reddy, 2008 (III) CPR page no.59 NC M/s India Seeds House Vs. Ramjilal Sharma & others. सदर निकालपञातील व अर्जदार यांचे अर्जातील बाबीचा विचार केल्यास वरील सर्व निकालपञानुसार अर्जदार यांचा अर्ज खर्चासह मंजूर होण्यास पाञ आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी सदर अर्जामध्ये शेणखत व लागवड खर्च म्हणून रक्कम रु.9000/- ची मागणी अर्जामध्ये केलेली आहे. सदर मागणीच्या पृष्टयर्थ अर्जदार यांनी त्यांचे शेतामध्ये शेणखत घातले बाबत व सदर शेणखतापोटी दिलेल्या रक्कमाच्या व मजूरी बाबतच्या पावत्या या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेल्या आहेत. त्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून शेणखत रु.8000/-व लागवड खर्च रु .1000/- असे एकूण रक्कम रु.9000/- वसूल करुन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी श्री.पंढरीनाथ गंगाराम टोकले, श्री.शंकर इराप्पा धमनसूरे, हनमल्लू सखाराम सूरकूंटे, यांचे शपथपञ या कामी दाखल केलेले आहेत. सदरच्या व्यक्ती हया ता.देगलूर येथील राहणा-या आहेत व त्यांचे शेतामध्ये सिझेंटा कंपनीच्या मिरची बियाण्याची 15 दिवसांनी 90 टक्के उगवण झाल्याचे त्यांचे शपथपञामध्ये नमूद केलेले आहे. गैरअर्जदार यांच्या कंपनीच्या माहीती पूस्तीकेनुसार मिरची रोपाची 20-25 दिवसांनंतरची अवस्था दाखवण्यात आलेली आहे व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या शपथपञामध्ये बियाणे पेरल्यानंतर 15 दिवसांनी उगवण चांगली झाली असे नमूद केलेले आहे. गैरअर्जदार यांनी शेतक-याचे शपथपञ दिले म्हणजे अर्जदार यांच्या शेतात पेरलेले मिरचीचे बियाणे हे चांगल्या प्रतीचे होते ही बाब गैरअर्जदार शाबीत करु शकत नाहीत असे या मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र.3 यांना तालूका कृषी अधिकारी, माहूर जि. नांदेड सदर अर्जाचे कामी गैरअर्जदार म्हणून सामील केलेले आहे. त्यांनी त्यांचे म्हणणे या कामी दाखल केलेले आहे. अर्जदार यांच्या तक्रार अर्जानुसार अर्जदार यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांनी पंचनामा केलेला आहे. त्यामूळे त्यांचेकडून सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता झालेली नाही त्यामूळे त्यांचे विरुध्द कोणतेही आदेश नाहीत. गैरअर्जदार यांनी दाखल केलेले निकालपञ या अर्जाचे कामी लागू होत नाहीत. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ, त्यांनी दाखल केलेले कागदपञ तसेच वरिष्ठ कोर्टाचे निकालपञ, तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपञ व दोन्ही पक्षा तर्फे केलेला वकीलाचा यूक्तीवाद यांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. आजपासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात. 1. सदोष मिरची बियाणे उत्पादित केल्यामूळे अर्जदार यांचे मिरची पिकाचे झालेल्या नूकसान भरपाई पोटी रक्कम रु.60,000/- दयावेत, सदर रक्कमेवर अर्ज दाखल तारखेपासून म्हणजेच दि.20.08.2009 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरीपडेपर्यत 9 टक्के व्याजासह होणारी रक्कम दयावी. 2. शेतीची मशागती व मजूरी पोटी झालेला खर्च रु.9000/- दयावेत. 3. मानसिक ञासापोटी रु.5000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2000/- दयावेत. 4. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांचेकडून बियाण्यांचे खरेदीपोटी घेतलेली रक्कम रु.1300/-अर्जदार यांना दयावी. 5. गैरअर्जदार क्र.3 यांचे विरुध्द आदेश नाही. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |