Final Order / Judgement | :::नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये,सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक ११/०५/२०२३) - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,१९८६ चे कलम १२अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ता हा शेतकरी असून त्याची उपजिवीका ही शेती या व्यवसायावर चालते. विरुध्द पक्ष यांची स्वराज ट्रॅक्टरची डिलरशीप आहे व ते त्याची विक्री करतात. तक्रारकर्त्याकडे जुना महिंद्रा ट्रॅक्टर २६५(२००६) ज्याचा क्रमांक एम.एच.३४/एल २४१४ हा होता. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडून नवीन ट्रॅक्टर व मालवा थ्रेशर मशिन खरेदी करण्याकरिता जुना ट्रॅक्टर जमा केला. विरुध्द पक्षाने जुन्या ट्रॅक्टरची किंमत रुपये १,९०,०००/- दिली होती. विरुध्द पक्षाने दिनांक १२/१०/२०१६ रोजी तक्रारकर्त्यास नवीन ट्रॅक्टर व मालवा थ्रेशर मशिन दिले होते व तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडून नवीन ट्रॅक्टर व मालवा थ्रेशर मशिन रुपये ५,६७,०००/- मध्ये रोड टॅक्स पासींग व विम्यासह खरेदी केला होता. तक्रारकर्त्याने सदर ट्रॅक्टर व मालवा थ्रेशर मशिन खरेदी करण्याकरिता रुपये ४,४७,४८७/- चे कर्ज एच.डी.एफ.सी. बॅंकेकडून व रुपये १,३०,०००/- एस.बी.आय. ब्रम्हपूरी शाखा यांचेकडून घेतले होते. विरुध्द पक्ष यांनी जुने ट्रॅक्टरची किंमत रुपये १,९०,०००/- मधून काही रक्कम मालवा थ्रेशर मशिन खरेदी करण्याकरिता टाकण्यात आले होते व ती रक्कम विरुध्द पक्ष यांनी परस्पर जमा केली होती व उर्वरित रक्कम रुपये १,३०,०००/- चे एस.बी.आय. ब्रम्हपूरी शाखेमधून मधून देण्यात आले होते. तक्रारकर्त्याला नवीन ट्रॅक्टर खेरेदी करण्याबाबत कर्ज हे दिनांक २१/१०/२०१६ रोजी मंजूर करण्यात आले होते. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त ट्रॅक्टर व मालवा थ्रेशर मशिन खरेदी करण्यापूर्वी नवीन ट्रॅक्टरचे कागदपञ, पासींग, विमा इत्यादी खर्च करण्याची हमी दिली होती व तशी दिनांक ११/१०/२०१६ रोजी पावती सुध्दा दिली होती. नवीन ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर ट्रॅक्टर संदर्भातले कर्ज मंजूर झाल्यानंतर १० दिवसात पासींग करण्याची हमी विरुध्द पक्ष यांनी दिली होती परंतु तक्रारकर्त्याने वेळोवेळी ट्रॅक्टर ची पासींग करण्याची मागणी केली असता विरुध्द पक्षाने टाळाटाळ केली. तक्रारकर्त्याने दिनांक १३/०५/२०१८ रोजी ट्रॅक्टरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने दुरुस्ती करण्याकरिता विरुध्द पक्ष यांचेकडे गेले असता तेव्हा सुध्दा पासींग करुन देण्याची मागणी केली परंतु विरुध्द पक्षाने दुरुस्त केलेला ट्रॅक्टर देण्यास सांगितले परंतु पासींग करुन दिले नाही. विरुध्द पक्षाने उपरोक्त ट्रॅक्टरचे रजिस्ट्रेशन करुन न दिल्याने तक्रारकर्ता आजपर्यंत ट्रॅक्टरचा वापर करु शकला नाही तसेच मालवा थ्रेशर मशिन चा सुध्दा वापर करु शकला नाही. ट्रॅक्टरचे पासींग करुन न दिल्यामुळे तक्रारकर्ता शेतीकरिता ट्रॅक्टर चा वापर करु शकला नाही व त्यामुळे शेतीचे पीक घेण्यापासून वंचित राहिले तसेच ते महाराष्ट्र शासनाकडून ट्रॅक्टर खरेदी करण्याकरिता मिळणारी सवलत रुपये १,५०,०००/- सुध्दा घेऊ शकले नाही. तक्रारकर्त्याला उपरोक्त ट्रॅक्टर व थ्रेशर मशिनच्या किस्तीची रक्कम लोकांकडून घेऊन भरावी लागली. तक्रारकर्त्याला आजपर्यंत १० लाखाचे नुकसान सहन करावे लागले. या सर्व नुकसानीसाठी विरुध्द पक्ष हे जबाबदार आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास ट्रॅक्टरचे पासींग करुन न देऊन तक्रारकर्त्याप्रती अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करुन सेवेत न्युनता दर्शविल्याने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाविरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली की, विरुध्द पक्षाने नियमानुसार असलेली जबाबदारी व कर्तव्याचे पालन न केल्यामुळे तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई म्हणून रुपये १०,००,०००/- देण्यास तसेच नियमानुसार तक्रारकर्त्यास उपरोक्त ट्रॅक्टर पासींग करुन द्यावे, अशी प्रार्थना केली.
- तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्षाविरुध्द नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष हजर होऊन त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल करुन त्यामध्ये तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून जुना ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.३४/एल. २४१४ जमा करुन नवीन ट्रॅक्टर व मालवा थ्रेशर मशिन खरेदी केल्याचे आणि उपरोक्त ट्रॅक्टर व थ्रेशर मशिन दिनांक १२/१०/२०१६ रोजी तक्रारकर्त्यास दिले, या सर्व बाबी मान्य करुन आपल्या विशेष कथनामध्ये नमूद केले की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून जुना महिंद्रा ट्रॅक्टर २६५(२००६) देऊन स्वराज कंपनीचा नवीन ट्रॅक्टर आणि थ्रेशर मशिनची मागणी केली होती त्याकरिता विरुध्द पक्ष तयार झाले व त्यानुसार तक्रारकर्ता आणि विरुध्द पक्ष यांचेमधे दिनांक ११/१०/२०१६ रोजी बैठक होऊन ठराव झाला की, तक्रारकर्त्याने जुना महिंद्रा २६५ ट्रॅक्टर देऊन वरुन रुपये ५,६७,०००/- जमा करणे व विरुध्द पक्षाने नवीन ट्रॅक्टर स्वराज ८३४ व मालवा थ्रेशर मशिन देणे या अटीसह ट्रॅक्टर नेतेवेळी नगदी रुपये १०१ देऊन उर्वरित रक्कम फायनान्स ने भरणे व बाकी रक्कम लवकरात लवकर जमा करण्याचे मान्य करुन तसा लेखी मेमो तयार करुन त्यावर तक्रारकर्त्याने स्वाक्षरी दिली. दिनांक २१/१०/२०१६ रोजी एच.डी.एफ.सी. बॅंकेकडून ट्रॅक्टर शेती कर्ज रक्कम रुपये ४,४७,४८७/- मंजूर झाले आणि त्यामधून प्रोसेसिंग फी,पीडीडी चार्जेस, वाहन विम्याची रक्कम इत्यादी कपात करुन रुपये ४,०७,९३६/-हे विरुध्द पक्षाचे नावे दिनांक २५/१०/२०१६ रोजी खात्यामध्ये जमा करण्यात आले. तसेच थ्रेशर मशिन खरेदी करण्याकरिता एस.बी.आय. शाखा ब्रम्हपूरी यांचेकडून कर्ज रक्कम रुपये १,३०,०००/- देण्यात आले होते व विरुध्द पक्षास रुपये ५,६७,०००/- उपरोक्त ट्रॅक्टर व मशिन संदर्भातली देणे असलेल्या रकमेपैकी बाकी रक्कम रुपये ३०,०००/- राहिलेली आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दिनांक १२/१०/२०१६ रोजी उपरोक्त नवीन ट्रॅक्टर व थ्रेशर मशिन दिले व त्यानंतर तक्रारकर्त्यास उर्वरित रक्कम रुपये ३०,०००/- जमा करुन पासींग करुन घेण्याचे वारंवार सांगितले. परंतु तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास उर्वरित रक्कमही दिली नाही आणि ट्रॅक्टर सुध्दा पासींग करिता आणले नाही. तक्रारकर्त्याने दिनांक ८/४/२०१८ रोजी म्हणजेच १.५ वर्षाने विरुध्द पक्ष यांचेकडे येऊन उर्वरित रक्कम रुपये ३०,०००/- पैकी रुपये ७,०००/- जमा केले आणि रुपये २३,०००/- लवकरच जमा करुन पासींग करुन घेण्याची हमी दिली. तक्रारकर्त्याने दिनांक १३/०५/२०१८ रोजी विरुध्द पक्षाकडे उपरोक्त ट्रॅक्टर आणून सर्व्हिसींग करुन घेतले परंतु त्यावेळी सुध्दा उर्वरित रक्कम रुपये २३,०००/- देऊन ट्रॅक्टर पासींग करिता आणले नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे थकीत रक्कम रुपये २३,०००/- जमा करुन ट्रॅक्टर पासींग करुन घेण्याची कायदेशीर जबाबदारी असतांना सुध्दा विरुध्द पक्षाला रक्कम दिली नाही व ट्रॅक्टर पासींग करुन घेतले नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
- तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तिवाद आणि तक्रारकर्त्याने लेखी युक्तिवाद दाखल केल्या असल्याने त्याला कोणताही तोंडी युक्तिवाद करावयाचा नाही अशी पुरसीस, विरुध्द पक्षाचे लेखी उत्तर, दस्तावेज, लेखी उत्तरालाच विरुध्द पक्षाचा पुरावा समजण्यात यावा अशी पुरसीस, लेखी युक्तिवाद, उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद आणि परस्पर विरोधी कथनावरुन तक्रार निकालीकामी खालील मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले आणि त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्ष - विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ
२. काय आदेश ॽ अंतिम आदेशाप्रमाणे कारणमीमांसा मुद्दा क्रमांक १ बाबतः- - प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडून खरेदी केलेला नवीन स्वराज ट्रॅक्टर-८३४ एच.पी.-३४ मॉडेलचे पासींग करुन दिले नाही, याबाबत उभयपक्षात वाद आहे. प्रकरणात दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडे जुना महिंद्रा-२६५ (२००६) ट्रॅक्टर जमा करुन बदलीमध्ये स्वराज नवीन ट्रॅक्टर-८३४ आणि मालवा थ्रेशर मशिन विकत घेतले. तक्रारकर्त्याने जुना ट्रॅक्टर विरुध्द पक्षाकडे देऊन वरुन रुपये ५,६७,०००/- जमा करुन नवीन ट्रॅक्टर व मालवा थ्रेशर मशिन न्यायचे होते व ते नेतांना रुपये १००/- देऊन उर्वरित रक्कम फायनान्स करुन व बाकी रक्कम लवकरात लवकर जमा करावयाचे होते असे तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेल्या दिनांक ११/१०/२०१६ चे विरुध्द पक्षाने दिलेल्या डिलीवरी मेमोच्या नोट मध्ये नमूद आहे, यावरुन तक्रारकर्त्यास जुना ट्रॅक्टर बदलीमध्ये देऊन, परत वरुन रुपये ५,६७,०००/- नवीन ट्रॅक्टर व थ्रेशर मशिन खरेदी करण्याकरिता विरुध्द पक्षाला द्यावयाचे होते म्हणजेच तक्रारकर्त्याने जुने ट्रॅक्टरचे बदली उपरोक्त ट्रॅक्टर व थ्रेशर मशिन हे एकूण रक्कम रुपये ५,६७,०००/- मध्ये विरुध्द पक्षाकडून खरेदी केल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने ट्रॅक्टर खरेदी करण्याकरिता एच.डी.एफ.सी. बॅंकेकडून रुपये ४,४७,४८७/- चे कर्ज घेतले होते. बॅंकेने प्रोसेसिंग फी, वाहन विमा प्रिमीयम इत्यादी चे चार्जेस कपात करुन दिनांक २५/१०/२०१६ रोजी धनादेशाव्दारे रुपये ४,०७,९३६/- विरुध्द पक्षाच्या खात्यामध्ये जमा केले. खाते उतारामध्ये रक्कम रुपये ४०७९६३/- लोन डिस्बर्स केल्याची नोंद आहे तसेच तक्रारकर्त्याने त्याचे एस.बी.आय. शाखा ब्रम्हपूरी कडून कर्ज घेऊन व ते त्याच्याकडे असलेल्या खात्यातून दिनांक १२/११/२०१६ रोजी रुपये १,३०,०००/- विरुध्द पक्षाला ट्रान्सफर केल्याची नोंद आहे. तक्रारकर्त्याने एच.डी.एफ.सी. बॅंकेचा तसेच एस.बी.आय. बॅंकेचा खाते उतारा दाखल केलेला असून त्यामध्ये उपरोक्त दोन्ही कर्जाची नोंद आहे, यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याकडून उपरोक्त ट्रॅक्टर व थ्रेशर मशिन खरेदी करण्याकरिता दोन बॅंकेकडून कर्ज घेऊन अनुक्रमे रक्कम रुपये ४,०७,९३६/- दिनांक २५/१०/२०१६ रोजी व रुपये १,३०,०००/- दिनांक १२/११/२०१६ रोजी असे एकूण रक्कम रुपये ५,३७,९३६/- दिले आणि उर्वरित रक्कम रुपये २९,०३७/- देणे बाकी होते. त्यानंतर तक्रारकर्त्याने एक वर्षानंतर दिनांक ०८/०४/२०१८ रोजी रुपये ७,०००/- विरुध्द पक्षास दिले, तशी पावती अभिलेखावर दाखल आहे, यावरुन तक्रारकर्त्याने उपरोक्त ट्रॅक्टर व थ्रेशर मशिन खरेदी करण्याकरिता देणे असलेल्या एकूण रक्कम रुपये ५,६७,०००/- पैकी रुपये ५,४४,९३६/- विरुध्द पक्षास दिले आणि उर्वरित रक्कम रुपये २२,०६४/- अजुनही विरुध्द पक्षास देणे बाकी आहे. तक्रारकर्त्याने उपरोक्त ट्रॅक्टर व थ्रेशर मशिनची खरेदी करण्याकरिता संपूर्ण रक्कम विरुध्द पक्षास दिली होती तसेच विरुध्द पक्षाने जुन्या ट्रॅक्टरची किंमत रुपये १,९०,०००/- होती व त्यामधून काही रक्कम मालवा थ्रेशर मशिन खरेदी करण्याकरिता विरुध्द पक्षाने परस्पर जमा केली होती ही बाब कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल करुनसिध्द केली नाही त्यामुळे ग्राह्य धरणे योग्य नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास उर्वरित रक्कम दिली नाही आणि विरुध्द पक्ष यांनी सुध्दा उपरोक्त उर्वरित रकमेची आणि ट्रॅक्टरची नोंदणी करुन घेण्याकरिता ट्रॅक्टर व आवश्यक दस्तावेज तक्रारकर्त्यास मागितल्याबाबत कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल केला नाही. तक्रारकर्त्याने सुध्दा उर्वरित रक्कम भरुन उपरोक्त विवादीत ट्रॅक्टर नेऊन, दस्तावेज देऊन नोंदणी करुन घेणे आणि विरुध्द पक्ष यांनी नोंदणी करुन देणे ही उभयपक्षांची जबाबदारी आहे अशा परिस्थितीत वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास उर्वरित रक्कम रुपये २२,०६४/- तसेच नोंदणी शुल्क आणि आवश्यक दस्तावेज देऊन ट्रॅक्टर विरुध्द पक्षाकडे नोंदणी/पासींग करुन घेण्याकरिता घेऊन जाणे आणि विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून उर्वरित रक्कम स्वीकारुन ट्रॅक्टरची नोंदणी करुन देणे या निष्कर्षाप्रत आयोग आले आहे. तक्रारकर्त्याचे किती नुकसान झाले,याबाबत त्याने कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल केला नाही. परंतु ट्रॅक्टरची नोंदणी न झाल्याने तक्रारकर्ता ते चालवू शकला नाही त्यामुळे त्याला शारीरिक, मानसिक ञास झाला परंतु तक्रारकर्ता सुध्दा त्यास काही अंशी जबाबदार आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाकडून उचित नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ च्या विवेचनावरुन आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्रमांक १४७/२०१९ अंशतः मंजूर करण्यात येते.
- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना विवादीत स्वराज ट्रॅक्टर-८३४ एच.पी. ३४ मॉडेलच्या किंमतीपोटीची उर्वरित रक्कम रुपये २२,०६४/- द्यावे तसेच नोंदणी करिता लागणारे आवश्यक दस्तावेज देऊन ट्रॅक्टर नोंदणी करिता विरुध्द पक्षाकडे घेऊन जाणे आणि विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून उर्वरित रक्कम नोंदणी शुल्कासह स्वीकारुन विवादीत ट्रॅक्टरचे प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचेकडून नोंदणी करुन द्यावे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या आर्थिक, शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- द्यावे.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |