जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1574/2008
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-26/11/2008.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 30/11/2013.
नमित गोपाळ अग्रवाल,
रा.8, पहीला मजला, टुरिस्ट कॉम्प्लेक्स,
नेहरु चौक, जळगांव,ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. डाटा कॉम्प वेब टेक्नॉलॉजीज (इंडीया)प्रा.लि,
205/206, सी विंग क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड,
अंधेरी (वेस्ट) मुंबई 53.
2. जुझर शकीर,
अधिकृत एजंट, डाटा कॉम्प वेब टेक्नॉलॉजीज (इंडीया)प्रा.लि.,
रा.प्रिसाईज सॉफटवेअर सर्व्हीसेस, डी-51, पहीला मजला,
नवीन बी जे मार्केट, जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.आनंद एस.मुजुमदार वकील.
विरुध्द पक्ष 1 व 2 तर्फे श्री.पी.जी.मुंधडा वकील.
निकालपत्र
श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः तक्रारदारास सदोष सॉफटवेअर विक्री करुन सदोष सेवा दिल्याकामी प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदाराचा जळगांव येथे मनी केअर या नावाने गुंतवणूकदारांचे पैसे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सल्ला देण्याचा व्यवसाय असुन त्यावर तक्रारदाराची उपजिविका चालते. विरुध्द पक्ष क्र. 1 कंपनीकडुन विरुध्द पक्ष क्र.2 तक्रारदाराकडे दि.13/05/2008 रोजी आले व त्यांनी तक्रारदाराचे व्यवसायाशी संबंधीत असलेले फंडस मॅजीक सॉफटवेअर बाबत तक्रारदाराला माहिती देऊन तक्रारदारास सदरचे सॉफटवेअर घेण्यास प्रवृत्त केले. तसेच तक्रारदाराचे गरजेनुसार व मागणीनुसार विरध्द पक्ष कंपनी फंडस मॅजीक सॉफटवेअर मध्ये योग्य ते बदल करुन देतील असे आश्वासन दिले. विरुध्द पक्ष क्र. 2 चे आश्वासनांवर विश्वास ठेवुन तक्रारदाराने दि.13/05/2008 रोजी रक्कम रु.15,590/- या रक्कमेस विरुध्द पक्ष क्र. 2 कंपनीकडुन फंडस मॅजीक सॉफटवेअर विकत घेतले. त्यासोबत विरुध्द पक्ष क्र. 1 कंपनीने तक्रारदाराकडुन वार्षिक मेंटेनन्स म्हणुन रक्कम रु.5,618/- ची आकारणी केली व तक्रारदारास मागील तारीख 3/5/2008 रोजीचे बिल दिले. त्यानंतर तक्रारदाराने सदरचे सॉफटवेअर इन्स्टॉल केल्यानंतर कंपनीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ते काम करत नव्हते तसेच तक्रारदारास आवश्यक असलेले बदलही त्यात करुन देण्यात आलेले नव्हते. सदर बाबतीत तक्रारदाराने अनेक वेळा विरुध्द पक्ष क्र.2 कडे ई-मेल व्दारे तक्रारी केल्या तथापी त्यांनी तक्रारदाराच्या तक्रारीची काहीएक दखल घेतली नाही. परिणामी तक्रारदारास स्वतःचे हाताने हिशोब करुन त्याच्या पक्षकारांना आयकर विवरण पत्र भरण्याच्या तारखेपुर्वी द्यावा लागला त्यामुळे तक्रारदाराची सर्वत्र बदनामी होऊन व्यवसायावर परिणाम झाला. तक्रारदाराने अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर सरतेशेवटी विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारदारास दि.4/9/2008 रोजी ई-मेल पाठवुन रक्कम रु.18,990/- चा चेक परत घेऊन जाण्याबाबत सांगीतले तसेच तक्रारदारास दिलेली रोख सुट रु.1,000/- व रक्कम रु.700/- परत करावे असे कळविले. तक्रारदाराने नाईलाजाने विरुध्द पक्ष क्र.2 यास रु.1,400/- देऊन तक्रारदाराच्या लॅपटॉप वरुन सदरचे सॉफटवेअर अनइन्स्टॉल करुन रक्कम रु.18,990/- चा चेक तक्रार हक्क कायम ठेवुन दि.7/11/2008 रोजी स्विकारला व त्याबाबत विरुध्द पक्ष क्र.2 यास दि.7/11/2008 रोजी ई-मेल पाठवुन पोहोच दिली. अशा त-हेने विरुध्द पक्षाने सदरच्या सॉफटवेअर मध्ये दुरुस्ती न होण्यासारखा बिघाड होता हे मान्य केले आहे. सबब तक्रारदारास विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी सदोष सॉफटवेअर व सदोष सेवा दिल्याबद्यल नुकसान भरपाई म्हणुन रु.1,00,000/- देण्याचे आदेश व्हावेत, व्यवसायाच्या नुकसानीपोटी रु.6,00,000/-, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडुन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या.
4. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी याकामी हजर होऊन एकसारखेच म्हणणे दाखल केलेले असुन तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदाराने विरुध्द पक्ष कंपनीकडुन सॉफटवेअर खरेदी करतांना ऑर्डर फॉर्म व बिलामध्ये नमुद अटी नुसार जर काही वाद उदभवल्यास ते निवारण करण्याचे क्षेत्र मुंबई राहील असे नमुद असल्याने प्रस्तुतची तक्रार या मंचासमोर चालण्यास पात्र नाही. तक्रारदाराने विकत घेतलेले सॉफटवेअर हे व्यवसाईक कारणासाठी घेतलेले असल्याने त्यास सॉफटवेअर पासुन अतिरिक्त उत्पन्न मिळणार असल्याने सदरची तक्रार ही ग्राहक या संज्ञेत बसत नाही. तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे रु.15,590/- सॉफटवेअर करिता व रक्कम रु.5,515/- ही अपडेट सबस्क्रीप्शनसाठी भरणा केली असुन एकुण रु.21,105/- अदा केलेले आहेत. वार्षिक मेन्टेनन्स साठी रक्कम दिल्याचे विरुध्द पक्षाचे म्हणणे खोटे व लबाडीचे असुन ते विरुध्द पक्षास मान्य नाही. तक्रारदाराने वेळोवेळी केलेल्या तक्रार अर्जामध्ये नाराजी व्यक्त केली असल्याचे म्हटले आहे त्यामुळे सॉफटवेअर मध्ये दोष होता असे म्हणता येणार नाही. तक्रारदारास सॉफटवेअर मध्ये कोणत्या अडचणी निर्माण झाल्या याबाबत तक्रार अर्जात कुठेही नमुद नाही. तक्रारदाराने कोणतेही ई-मेल विरुध्द पक्षास पाठविले नाहीत. वस्तुतः तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 कंपनीस विनंती करुन सॉफटवेअरची अदा केलेली रक्कम परत मागीतलेली होती. तक्रारदाराचे सदर विनंतीस मान देऊन विरुध्द पक्ष क्र. 1 कंपनीने तक्रारदारास ऑर्डर फॉर्मच्या अट क्र.9 नुसार व्हॅट रक्कम रु.500/-, सर्व्हीस टॅक्स रु.515/- व व्यवस्थापन शुल्क रु.1,000/- अशी एकुण रक्कम रु.2,015/- सॉफटवेअरच्या मुळ किंमतीमधुन वजा करुन एकुण रक्कम रु.18,990/- चेकव्दारे अदा केलेले आहेत, सदर रक्कम घेतेवेळी तक्रारदाराने कोणतीही हरकत घेतलेली नाही व आता बेकायदेशीर वाद घालत आहेत. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी व तक्रारदाराने विरुध्द पक्ष कंपनीस नाहक त्रासात टाकल्यामुळे रक्कम रु.2500/- देण्याचा हुकूम व्हावा अशी विनंती विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी केलेली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे, व उभयतांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. तक्रारदार हे विरुध्द पक्षांचे ग्राहक आहेत काय ? होय.
2. विरुध्द पक्षांनी तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केली
आहे काय ? होय.
3. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे अंतीम आदेशानुसार
6 मुद्या क्र. 1 - तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक होतात काय,
याबाबत विरुध्द पक्षाने त्यांचे लेखी म्हणण्यातुन तक्रारदार हा वादातीत सॉफटवेअर वापर त्यांचे व्यवसायासाठी करीत असल्याने प्रस्तुत तक्रार या मंचासमोर चालण्यास पात्र नाही तसेच सदरचा वाद हा निवारण करण्याचे क्षेत्र मुंबई येथे असुन तक्रारदाराचे तक्रार अर्जास तिव्र आक्षेप घेतलेला आहे. तक्रारदाराने तक्रार अर्जाकामी दाखल केलेले कागदपत्रांचे अवलोकन करता विरुध्द पक्ष क्र. 1 कंपनीचे अधिकृत एजंट जुझर शकीर यांनी तक्रारदारास जळगांव येथे सेवा दिलेली असल्याने व विरुध्द पक्ष क्र.1 कंपनीकरिता जळगांव येथे काम करीत असल्याने तसेच तक्रारदाराचे सदरचे व्यवसायावर त्याचा चरितार्थ चालत असल्याचे तक्रार अर्जात नमुद असल्याने तक्रारदाराची तक्रार या मंचासमोर ग्राहक या संज्ञेत चालण्यास पात्र आहे. यास्तव मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7. मुद्या क्र. 2 - तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडुन घेतलेले सॉफटवेअर मध्ये एकाच गुंतवणूकीच्या डबल एंट्री होणे, डेटाबेस न घेणे यासारख्या अडचणी उदभवत असल्याचे तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना अनुक्रमे दि.4/7/2008, दि.9/6/2008, दि.17/7/2008, दि.21/07/2008, दि.26/7/2008, दि.27/7/2008, दि.1/8/2008, दि.4/9/2008 व दि.7/11/2008 चे ई-मेलव्दारे पाठविलेल्या तक्रार अर्जांवरुन स्पष्ट होते. त्यामुळे सॉफटवेअर मध्ये नेमक्या कोणत्या त्रृटया होत्या हे तक्रारदाराने कळविले नाही या विरुध्द पक्षाचे म्हणण्यास काहीएक अर्थ शिल्लक राहत नाही.
8. विरुध्द पक्षाने तक्रारदारास विक्री केलेल्या सॉफटवेअर मध्ये दोष असल्याने व त्यांचे निवारण विरुध्द पक्ष करु शकत नसल्याने तक्रारदाराने केलेल्या सततच्या तक्रारींना वैतागुन सरतेशेवटी विरुध्द पक्षाने तक्रारदारास रक्कम रु.18,990/- चा चेक देऊ केला तो तक्रारदाराने तक्रार हक्क कायम ठेवुन दि.7/11/2008 रोजी स्विकारला असे तक्रारदाराने तक्रार अर्जातुन व युक्तीवादातुन नमुद केले. विरुध्द पक्षाने मात्र तक्रारदाराने विनंती केल्यानुसार त्यास ऑर्डर फॉर्मच्या अट क्र.9 नुसार व्हॅट रक्कम रु.500/-, सर्व्हीस टॅक्स रु.515/- व व्यवस्थापन शुल्क रु.1,000/- अशी एकुण रक्कम रु.2,015/- सॉफटवेअरच्या मुळ किंमतीमधुन वजा करुन एकुण रक्कम रु.18,990/- चेकव्दारे अदा केलेले असल्याने तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी अशी विनंती लेखी म्हणणे व युक्तीवादातुन केली. तक्रारदाराने याकामी विरुध्द पक्षाकडुन सॉफटवेअरची रक्कम परत मिळाली असली तरी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती तक्रार अर्ज व युक्तीवादातुन या मंचासमोर केली.
9. उपरोक्त एकुण विवेचन विचारात घेता तक्रारदाराने सॉफटवेअरची रक्कम परत मागणी केली या विरुध्द पक्षाचे विधानार्थ त्यांनी तक्रारदाराचा विनंती अर्ज वगैरे काहीएक कागदपत्र लेखी म्हणण्यासोबत दाखल केलेले नाहीत. याउलट तक्रारदाराने वेळोवेळी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडे ई-मेल व्दारे तक्रारी करुन सॉफटवेअर सदोष असल्याचे कळविलेले आहे व त्या तक्रारींचे निवारण करता येणे शक्य नसल्यानेच विरुध्द पक्षाने सरतेशेवटी तक्रारदारास रक्कम रु.18,990/- चेकव्दारे अदा केले असल्याची वस्तुस्थिती आमचे समोर असल्याने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास सदोष सॉफटवेअर विक्री करुन त्यानंतर सदोष सेवा दिल्याचे निष्कर्षास्तव आम्ही मुद्या क्र. 2 उत्तर होकारार्थी देत आहोत.
10. मुद्या क्र. 3 - तक्रारदाराने तक्रार अर्जातून विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी सदोष सॉफटवेअर व सदोष सेवा दिल्याबद्यल नुकसान भरपाई म्हणुन रु.1,00,000/-, व्यवसायाच्या नुकसानीपोटी रु.6,00,000/-, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडुन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे. तक्रारदाराचे तक्रार अर्जातील परिच्छेद क्र. 2 मधील मजकुर असा की, गुंतवणुकदारांना नफा नुकसानीचे तसेच आयकराचे विवरण देणे अत्यंत आवश्यक असल्याने व आयकर विवरण पत्र भरण्याची शेवटची तारीख 31/07/2008 असल्याने तक्रारदाराने स्वतःच्या हाताने हिशोब करुन त्यांचे पक्षकारांना आयकर विवरण पत्र भरण्याचे तारखेपुर्वी सदरचे दाखले दिले असे स्वतःहुन नमुद केले असल्याने तक्रारदारास त्यापोटी संबंधीत पक्षकारांकडुन आवश्यक तो मेहनताना नक्कीच मिळाला असणार यात शंका नाही. फक्त याकामी फरक एवढाच की, सॉफटवेअर जर तंत्रशुध्द व चांगले असते तर तक्रारदारास तेच काम संगणकावर जलद गतीने करता येणे शक्य झाले असते व यात त्याचा वेळ व श्रम नक्कीच वाचले असते या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हा विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचेकडुन वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या टोकन दाखल रक्कम रु.50,000/- + तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास सॉफटवेअरची सेवा देतांना सेवा त्रृटी केल्याचे निष्पन्न झालेले असल्याने सदर सेवेपोटी विरुध्द पक्षाने तक्रारदाराची वजा केलेली सर्व्हीस टॅक्सची रक्कम रु.515/- व व्यवस्थापन शुल्काची रक्कम रु.1,000/- अशी एकुण रक्कम रु.51,515/- तक्रार दाखल दि. 26/11/2008 पासुन द.सा.द.शे.8 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र असल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदारास झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासादाखल रु.25,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.4,000/- देणे न्यायोचित होईल या निष्कर्षास्तव आम्ही आलो आहोत. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असे आदेशीत करण्यात येते की, तक्रारदारास नुकसानी दाखल रक्कम रु.51,515/- (अक्षरी रक्कम रु.एक्कावन्न हजार पाचशे पंधरा मात्र ) दि.26/11/2008 पासुन द.सा.द.शे.8 टक्के व्याजासह या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
3. विरुध्द पक्ष 1 व 2 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असे आदेशीत करण्यात येते की,त्यांनी तक्रारदार यांना शारिरिक व मानसिक त्रासा दाखल रु.25,000/- (अक्षरी रक्कम रु.पंचवीस हजार मात्र ) व तक्रार अर्जाचा खर्च रु.4,000/- (अक्षरी रु.चार हजार मात्र ) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 30/11/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.