निकाल
पारीत दिनांकः- 24/02/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी तीन वर्षांपूर्वी जाबदेणार क्र. 2 यांच्या कंपनीचा मायक्रोवेव्ह, मॉडेल WD900 AL 23-6 जाबदेणार क्र. 1 यांच्याकडून साधारणत: रक्कम रु. 4000/- ला खरेदी केला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार या मायक्रोवेव्हमध्ये एक कप पाणीही उकळत नव्हते, अशी परिस्थिती मायक्रोवेव्ह घेतल्यानंतर एकाच आठवड्यात झाली होती. त्यामुळे तक्रारदार शो-रुममध्ये जाऊन तक्रारदार नोंदविली. त्यानंतर जवळ-जवळ एक महिन्यानंतर जाबदेणारांचे प्रतिनिधी तक्रारदारांच्या घरी आले व त्यांनी मायक्रोवेव्हची तपासणी केल्यानंतर, त्यामध्ये बिघाड आहे व दुरुस्तीकरीता उत्पादकांकडे पाठविण्याची आवश्यकता आहे असे सांगितले व या तपासणीकरीता तक्रारदारांकडून रक्कम रु. 200/- घेतले. वास्तविक पाहता, तक्रारदारांनी याच कारणासाठी जाबदेणारांकडे तक्रार नोंदविली होती. अनेकवेळा शो-रुममध्ये विचारणा केल्यानंतर जवळ-जवळ एक वर्षानंतर जाबदेणारांनी तक्रारदारांना स्वत:च मायक्रोव्हेव्ह उत्पादकांकडे घेऊन जा, असे सांगितले व त्यानुसार तक्रारदारांनी रक्कम रु. 300/- खर्च करुन सदरचा मायक्रोव्हेव्ह उत्पादकांकडील श्री रवी यांच्याकडे नेऊन दिला. त्याचवेळेस श्री रवी यांनी सदरचा मायक्रोव्हेव्ह एका आठवड्यात दुरुस्त करुन देतो असे आश्वासन दिले, परंतु अद्यापपर्यंत तक्रारदारांना त्यांचा मायक्रोवेव्ह मिळालेला नाही. दि. 2/11/2010 रोजी श्री रवी यांनी तक्रारदारास फोन करुन रक्कम रु. 1200/- दुरुस्तीचा खर्च देऊन मायक्रोवेव्ह घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी मंचामध्ये तक्रार दाखल केली. तक्रारदार जाबदेणारांकडून सदोष मायक्रोवेव्ह घेऊन नविन मायक्रोवेव्ह मिळावा, तीन वर्षांपर्यंत मायक्रोवेव्ह मिळाला नाही, म्हणून मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च अशी मागणी करतात.
2] तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले.
3] जाबदेणार क्र. 1 यांना नोटीस पाठविली असता, त्यांची नोटीस “Left” या पोस्टाच्या शेर्यासह परत आली. जाबदेणार क्र. 2 मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांनी जाबदेणार क्र. 1 यांचे ऑफिस बंद पडले आहे, असे सांगितले. जाबदेणार क्र. 1 यांना योग्य सर्व्हिस झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. जाबदेणार क्र. 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांच्या मायक्रोवेव्हमध्ये कुठल्याही प्रकारचा उत्पादकिय दोष नव्हता, कारण ते संपूर्ण चाचण्या केल्यानंतरच उत्पादन विक्रीसाठी बाहेर देतात. तक्रारदारांनी डीलरची सही शिक्का असलेले योग्य वॉरंटी कार्ड दाखल केलेले नाही. वॉरंटी कार्डमधील एक अट म्हणजे, “product should be installed by the authorized person of the Company”. तक्रारदारांना अनेकवेळा, योग्य वॉरंटी कार्ड दाखल करण्याची विनंती केली होती, परंतु तक्रारदारांनी दाखल केले नाही, तसेच दुरुस्तीच्या खर्चासाठी मंजूरीही दिली नाही, कारण एका वर्षाची वॉरंटी संपलेली होती. तक्रारदारांचा मायक्रोवेव्ह दुरुस्त करुन ठेवला आहे, परंतु वॉरंटी संपल्यामुळे दुरुस्ती खर्च देऊन मायक्रोवेव्ह घेऊन जा असे त्यांना सांगण्यात आले. जाबदेणार क्र. 2 तक्रारदारांचे इतर आरोप अमान्य करीत तक्रार नामंजूर करावी अशी मागणी करतात.
तोंडी युक्तीवादाच्या वेळी जाबदेणार क्र. 2 यांनी, मायक्रोवेव्हच्या दुरुस्तीचा खर्च रक्कम रु. 1200/- होतो, परंतु तक्रारदारांनी कुठलीही रक्कम न देता मायक्रोवेव्ह घेऊन जावा असे सांगितले.
4] जाबदेणार क्र. 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबापुष्ठ्यर्थ शपथपत्र दाखल केले.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये, त्यांनी मायक्रोवेव्ह तीन वर्षांपूर्वी खरेदी केला होता असे असे नमुद केले आहे. सदरच्या मायक्रोवेव्हची वॉरंटी किती होती याकरीता तक्रारदारांनी योग्य वॉरंटी कार्ड दाखल केलेले नाही, तसेच त्यांनी जाबदेणार क्र. 2 यांनीही अनेकवेळा मागितल्यानंतरही त्यांच्याकडे दिले नाही. असे असूनही जाबदेणार क्र. 2 यांनी तक्रारदारांचा मायक्रोवेव्ह दुरुस्त करुन ठेवला, तो घेण्यास न जाता तक्रारदारांनी मंचासमोर प्रस्तुतची तक्रार दाखल केली. त्याचप्रमाणे जाबदेणार क्र. 2 यांनी अनेकवेळा तक्रारदारास त्यांचा मायक्रोवेव्ह घेऊन जाण्यास सांगूनही त्यांनी तो घेऊन गेले नाहीत. तसेच तोंडी युक्तीवादाच्या वेळी जाबदेणार क्र. 2 यांनी, तक्रारदारास मायक्रोवेव्हच्या दुरुस्तीचा खर्च रक्कम रु. 1200/- न घेता देण्याची तयारी दर्शविली आहे, म्हणून मंचाच्या मते तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडून कोणतीही रक्कम न देता त्यांचा दुरुस्त केलेला मायक्रोवेव्ह परत घेऊन यावा. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये त्यांनी जाबदेणारांकडून त्यांच्या मायक्रोवेव्ह ऐवजी नविन ब्रँडचा मायक्रोवेव्ह मिळावा अशी मागणी केलेली आहे, परंतु तक्रारदारांनी त्यांच्या मायक्रोवेव्हमध्ये उत्पादकिय दोष होता, यासाठी कुठलाही स्वतंत्र पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे मंचास तक्रारदारांची ही मागणी मान्य करता येणार नाही. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी स्वत:च जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे इतके दिवस मायक्रोवेव्ह ठेवला, म्हणून ते मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यासही पात्र नाहीत, असे मंचाचे मत आहे.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडून त्यांचा
दुरुस्त केलेला मायक्रोवेव्ह या आदेशाची प्रत
मिळाल्या पासून दोन आठवड्यांच्या आंत घेऊन
यावा व जाबदेणार क्र. 2 यांनी तक्रारदारांकडून
कोणतेही चार्जेस घेऊ नये.
2. जाबदेणार क्र. 1 यांच्याविरुद्ध कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.