ग्राहक तक्रार अर्ज क्र.1181/2009
दाखल दिनांक. 03/08/2009
अंतीम आदेश दि. 17/02/2014
कालावधी 04 वर्ष, 06 महिने, 14 दिवस
नि. 12
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
श्री. बाबुराव तोताराम वायकोळे तक्रारदार
वय- 74, वर्ष, धंदा – सेवानिवृत्त/शेती, (अॅड.एस.डी.वारुळकर)
रा. साधना नगर, वरणगांव,
ता. भुसावळ, जि. जळगांव.
विरुध्द
दशरथ बाबुराव कोळी, सामनेवाला
वय- 42 वर्ष, धंदा – व्यापार, (अॅड.एस.आर.सोनार)
रा. भोई वाडा, वरणगांव,
ता. भुसावळ, जि. जळगांव.
(निकालपत्र अध्यक्ष, मिलींद.सा.सोनवणे यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
प्रस्तुत तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 अन्वये, सामनेवाल्याने सेवेत कमतरता केली म्हणून दाखल केली आहे.
02. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, ते सेवानिवृत्त शेतकरी आहेत. सामनेवाला शेतमाल खरेदी करणारा व्यापारी आहे. त्यांनी सन 2008-09 मध्ये रु. 761/- प्रति क्विंटल या दराने 56 क्विंटल मका रक्कम रु. 42,616/- इतक्या रक्कमेस सामनेवाल्याला विकला होता. मात्र सामनेवाल्याने त्यांना रु. 20,000/- अदा केले होते. रक्कम रु. 22,616/- आजतागायत सामनेवाल्यांनी त्यांना अदा केलेले नाही. त्यामुळे ती रक्कम द.सा.द.शे 15 टक्के व्याजासह परत मिळावी तसेच, मानसिक व शारीरीक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- व अर्जखर्चापोटी रु. 5,000/- मिळावेत, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
03. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पुष्ठयर्थ, त्यांनी सामनेवाल्यास पाठविलेली नोटीस, त्या संबंधीची डाक विभागाची कागदपत्रे, व सामनेवाल्याने त्यांना दिलेली नोटीसीचे उत्तर इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदारांचे वकील यांनी तक्रार अर्जासोबत दाखल केलेले प्रतिज्ञापत्र पुराव्याचे प्रतिज्ञापत्र समजण्यात यावे, अशी पुरसीस नि. 11 ला दाखल केलेली आहे.
04. सामनेवाले नोटीस मिळून मंचात हजर झाले. मात्र, दि. 10/01/2011 रोजी पावेतो त्यांनी जबाब दाखल न केल्यामुळे आमच्या पुर्वाधिकारी मंचाने नि. 10 वर, प्रस्तुत अर्ज त्यांच्या विरुध्द विना जबाब चालविण्यात यावा, असे आदेश केलेले आहे.
05. निष्कर्षासाठींचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणमिमांसेसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारदार सामनेवाल्यांचे ग्राहक आहे काय ? नाही.
2. आदेशाबाबत काय ? -- अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
06. तक्रारदारांनी त्यांचा तक्रार अर्ज व त्यासोबत दाखल केलेले प्रतिज्ञापत्रात असे नमूद केले आहे की, सेवानिवृत्ती नंतर ते शेती व्यवसाय करतात. सन 2008-09 मध्ये त्यांनी मका उत्पादीत करुन सामनेवाल्याला विकला. रु.42,616/- पैकी सामनेवाल्यांनी त्यांना केवळ रु. 20,000/- अदा केले. उर्वरीत रक्कम रु. 22,616/- मिळण्यासाठी त्यांनी प्रस्तुत अर्ज दाखल केलेला आहे. तक्रारदारांच्या तक्रारीवरुन ही बाब स्पष्ट आहे की, ते सामनेवाल्यांचे विक्रेते आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2 (1) ड नुसार वस्तू खरेदी करणारा व्यक्ती ग्राहक ठरतो. वस्तू विकणारा व्यक्ती ग्राहक ठरू शकत नाही. त्यामुळे तक्रारदार सामनेवाल्यांचे ग्राहक नाहीत असे आमचे मत आहे. यास्तव मुदा क्र. 1 चा निष्कर्ष आम्ही नकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
07. मुद्दा क्र. 1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, तक्रारदारांनी सामनेवाल्यांना मका विकलेला असल्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2(1) ड नुसार ते सामनेवाल्यांचे ग्राहक नाहीत. त्यामुळे प्रस्तुत तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. प्रस्तुत केसच्या फॅक्टसचा विचार करता उभय पक्षांनी आपआपला खर्च सोसण्याचे आदेश न्यायसंगत ठरतील. यास्तव मुद्दा क्र. 2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात येते.
2. उभयपक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
3. उभय पक्षांना निकालपत्राच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
जळगांव.
दि. 17/02/2014
(चंद्रकांत एम.येशीराव) (मिलिंद सा.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष