::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 05.07.2016 )
आदरणीय अध्यक्ष श्री. व्ही.आर.लोंढे, यांचे अनुसार
1. तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये विरुध्दपक्ष यांनी सदोष भ्रमणध्वनी विक्री करुन द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली, म्हणून दोषरहीत नविन भ्रमणध्वनी व नुकसान भरपाई मिळण्यासाठी ही तक्रार दाखल केलेली आहे
2. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे..
तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या दुकानातून, विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी उत्पादित केलेला, एम.एम.एक्स.क्यु 37 मॉडलचा भ्रमणध्वनी संच बिल क्र. डी 778 नुसार रु. 5200/- किंमतीला, दि. 13/7/2015 रोजी खरेदी केला. विरुध्दपक्षांनी सदरील मोबाईलची एक वर्षाची वारंटी दिलेली आहे. वारंटी कालावधीत मोबाईल संच नादुरुस्त झाल्यास दुरुस्त करुन देण्यात येईल किंवा बदलून देण्यात येईल, असे आश्वासन विरुध्दपक्ष यांनी दिले होते, तसे बिलामध्ये सुध्दा नमुद आहे. तक्रारकर्ता हा सदरहू मोबाईल वापरु लागला व त्यानंतर दि. 24/8/2015 रोजी सदरील मोबाईल संच बंद पडला. तक्रारकर्त्याने सदरील मोबाईल संच ताबडतोब विरुध्दपक्ष क्र. 1 यांना दाखविला असता त्यांनी सदरहू मोबाईल फोन विरुध्दपक्ष यांचे अधिकृत सर्व्हीस सेंटर, विरुध्दपक्ष क्र. 2 कडे पाठविला. सदरील संच 10 ते 15 दिवसात दुरुस्त होईल, असे विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सांगितले. परंतु विरुध्दपक्षाकडून आजपर्यंत कोणताही निरोप आला नाही, म्हणून तक्रारकर्त्याने दि. 23/10/2015 रोजी रजिस्टर पोष्टाने वकीलामार्फत विरुध्दपक्षांना नोटीस पाठविली, ते त्यांना मिळाली, परंतु विरुध्दपक्षांनी नोटीसला जबाबही दिला नाही व नोटीसची पुर्तताही केली नाही. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास सदोष मोबाईल संच विकून द्यावयाच्या सेवेत त्रुटी दर्शविली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे. सबब तक्रारकर्त्यानेही तकार मंचासमक्ष दाखल करुन विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याला नवीन दोषरहीत भ्रमणध्वनी संच द्यावा, शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी तसेच तक्रारीचा खर्च मिळावा, अशी विनंती केली आहे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 05 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचा लेखी जवाब :-
3. विरुध्दपक्ष क्र. 1 हे मंचासमोर हजर, झाले व त्यांनी लेखी जबाब दाखल केला. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी लेखी जबाबात त्यांनी द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली किंवा अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, ही बाब नाकारलेली आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 चे कथन की, ते भ्रमणध्वनी संचाचे किरकोळ विक्रेते आहेत. तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 च्या दुकानातून भ्रमणध्वनी खरेदी केला, त्यावेळेस तक्रारकर्त्यास स्पष्ट सांगण्यात आले की, ते किरकोळ विक्रेते असून भ्रमणध्वनी संचात काही दोष निर्माण झाल्यास त्याची जबाबादारी विरुध्दपक्ष क्र. 3 चे अधिकृत सर्व्हीस सेंटर, विरुध्दपक्ष क्र. 2 यांचेवर आहे. भ्रमणध्वनीमध्ये काही बिघाड झाल्यास तो विरुध्दपक्ष क्र. 2 दुरुस्त करुन देतील व सदर भ्रमणध्वनीची वारंटी विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी दिलेली आहे. सदरील भ्रमणध्वनी बंद पडल्यानंतर तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र. 1 च्या दुकानात आला व तक्रारकर्त्यास सहकार्य करण्याच्या भावनेतून विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास सदरहू भ्रमणध्वनी विरुध्दपक्ष क्र. 2 कडून दुरुस्त करुन घ्यावा, असा सल्ला दिला. सबब विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचा लेखी जवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांना नोटीस मिळूनही ते मंचासमोर हजर झालेले नाहीत, म्हणून त्यांच्या विरुध्द दि. 22/2/2016 रोजी एकतर्फी आदेश पारीत करण्यात आला.
विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांचा लेखी जवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 3 यांना मंचाची नोटीस बजावणी झाल्यानंतर ते मंचासमक्ष हजर झाले, परंतु त्यांनी मुदतीत लेखी जबाब दाखल केला नाही त्यामुळे, विरुध्दपक्ष क्र. 3 त्यांच्या विरुध्द प्रकरण लेखी जबाबाशिवाय पुढे चालविण्याचा आदेश दि. 27/5/2016 रोजी पारीत करण्यात आला.
4. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त व विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी दाखल केलेले दस्त यांचे अवलोकन केले असता, न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे मंचासमक्ष उपस्थित होतात.
1. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास सदोष भ्रमणध्वनी विक्री
करुन, द्यावयाच्या सेवेत त्रुटी दर्शविली, ही बाब
तक्रारकर्त्याने सिध्द केली काय ? … होय
2. तक्रारकर्ता हा तक्रारीत केलेली मागणी मिळण्यास पात्र
आहे काय ? … अंशत: होय
3. आदेश काय ? .... अंतीम आदेशाप्रमाणे
:: कारणमिमांसा ::
5. तक्रारकर्ते यांचे वकील श्री अमानकर यांनी असा युक्तीवाद केलेला की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या दुकानातून विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी उत्पादित केलेला वादातील भ्रमणध्वनी रु. 5200/- ला दि. 13/7/2015 रोजी खरेदी केला. सुरुवातीस काही दिवस सदरील भ्रमणध्वनी समाधानकारक चालला, परंतु दि. 24/8/2015 रोजी सदरील भ्रमणध्वनी संच बंद पडला. तक्रारकर्त्याने सदरील भ्रमणध्वनी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे दाखविला असता, त्यांनी तो विरुध्दपक्ष क्र. 2 कडे पाठविला. परंतु सदरील भ्रमणध्वनी तक्रारकर्त्यास दुरुस्त होऊन मिळालेला नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांना नोटीस पाठविली, त्यावर कोणतीही कार्यवाही विरुध्दपक्षांनी केलेली नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास द्यावयाच्या सेवेत त्रुटी दर्शविली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला म्हणून भ्रमणध्वनी बदलून नविन भ्रमणध्वनी मिळण्याची व नुकसान भरपाई मिळण्याची मागणी तक्रारकर्त्याने केलेली आहे.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे वकील श्री. ए.व्ही.लव्हाळे यांनी असा युक्तीवाद केला की, विरुध्दपक्ष क्र. 1 हे भ्रमणध्वनी संचाचे किरकोळ विक्रेते आहेत. तक्रारकर्त्याने वादातील भ्रमणध्वनी विरुध्दपक्ष क्र. 1 च्या दुकानातून खरेदी केला. सदरील भ्रमणध्वनी विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी उत्पादित केलेला आहे. सदरील भ्रमणध्वनी मध्ये बिघाड झाल्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी, विरुध्दपक्ष क. 3 चे अधिकृत सर्व्हीस सेंटर विरुध्दपक्ष क्र. 2 कडे सदरील भ्रमणध्वनी दुरुस्तीसाठी घेऊन जाण्याबाबत तक्रारकर्त्यास सांगितले. विरुध्दपक्ष क्र. 1 हे विक्रेते असल्यामुळे त्यांनी द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी दर्शविलेली नाही.
तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तांचे अवलोकन केले असता, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 च्या दुकानातून वादातील भ्रमणध्वनी दि. 13/7/2015 रोजी बिल नं. डी-778, रक्कम रु. 5200/- ला विकत घेतला आहे. तक्रारकर्ते यांचे कथन लक्षात घेता, सदरील भ्रमणध्वनी दि. 24/8/2015 रोजी बंद पडला व तो विरुध्दपक्ष क्र. 2 कडे दुरुस्तीसाठी देण्यात आला. तक्रारकर्त्याचे कथन की, सदरील भ्रमणध्वनी दुरुस्त होऊन तक्रारकर्त्यास मिळालेलाच नाही. विरुध्दपक्ष क्र. 2 हे मंचासमोर हजर झालेले नाहीत व वादातील भ्रमणध्वनीचे काय झाले, या बाबत कोणताही खुलासा दाखल नाही. तक्रारकर्त्याचा पुरावा लक्षात घेता, त्याने विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी उत्पादित केलेला वादातील भ्रमणध्वनी हा विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या दुकानातून विकत घेतला आहे. त्याकामी तक्रारकर्त्याने रु. 5200/- अदा केलेले आहेत. सदरील मोबाईल वॉरंटी कालावधीमध्ये नादुरुस्त झाला व तो दुरुस्तीसाठी विरुध्दपक्ष क्र. 2 सर्व्हीस सेंटर कडे दिला, ही बाब स्पष्ट आहे. सदरील भ्रमणध्वनीमध्ये कोणता दोष होता, तो दुरुस्त होण्यालायक होता किंवा नाही, किंवा तो दुरुस्त करुन तक्रारकर्त्याला देण्यात आला, या बाबत विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांना रजिस्टर पोष्टामार्फत त्यांच्या वकीलातर्फे नोटीस पाठविली, त्याचे कोणतेही उत्तर विरुध्दपक्ष यांनी दिलेले नाही. तक्रारकर्त्याने दिलेल्या नोटीसचे अवलोकन केले असता, तक्रारकर्ते यांनी नविन मोबाईल संच देण्यात यावा, अशी मागणी केलेली आहे. सबब मंचाचे मत की, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी दर्शविलेली आहे व त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 कडून वादातील मोबाईलच्याच मॉडेलचा नविन दोषरहीत भ्रमणध्वनी संच मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी तक्रारकर्ता रु. 1500/- व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 1000/- विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 कडून मिळण्यास पात्र आहे.
सबब अंतीम आदेश खालील प्रमाणे ...
अं ति म आ दे श
- तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी आदेश प्रत प्राप्त तारखेपासून 30 दिवसांच्या आंत तक्रारकर्त्यास वादातील भ्रमणध्वनीच्याच मॉडेलचा नविन दोषरहीत भ्रमणध्वनी विनामुल्य द्यावा.
- विरुध्दपक्ष क्र. 1,2 व 3 यांनी संयुक्त व वैयक्तीकरित्या तक्रारकर्त्यास मानसिक, शारीरकि व आर्थिक त्रासापोटी रु. 1500/- ( रुपये एक हजार पांचशे ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 1000/- ( रुपये एक हजार ) आदेश प्रत प्राप्त तारखेपासून 30 दिवसात तक्रारकर्त्याला द्यावे.
उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.