निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 14/09/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 26/09/2012
तक्रार निकाल दिनांकः- 13/06/2013
कालावधी 08 महिने. 18 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
संगीता भ्र.शिवशंकर मुंढे. अर्जदार
वय 30 वर्षे. धंदा.घरकाम. अड.डी.यु.दराडे.
रा.बडवणी ता.गंगाखेड जि.परभणी.
विरुध्द
डाक अधिक्षक, गैरअर्जदार.
मुख्य पोष्ट ऑफीस,शनिवार बाजार,परभणी. अड.ए.के.दुर्राणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराची तक्रार गैरअर्जदारा विरुध्द विमादावा 50,000/- रुपये देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे या बद्दलची आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराचे मयत पती शिवशंकर कोडींबा मुंढे यांनी गैरअर्जदाराकडे स्वतःचा 50,000/- रुपयांचा विमा दिनांक 24/02/2005 रोजी घेतला होता.सदरच्या पॉलिसीचा क्रमांक इ.ए. 892360 असा असून मासिक हप्ता रुपये 186/- चा ठरला होता. सदर पॉलिसीची अंतीम तारीख जानेवारी 2026 ही होती. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, मयत विमा धारकाने त्याचे विमा हप्ते वेळेच्या वेळी भरणा केले, सदर पॉलिसी घेतले तारखे पासून विमा धारकाच्या मृत्यू तारखे पर्यंत म्हणजेच दिनांक 27/09/2009 पर्यंत पुर्ण हप्ते भरणा केलेले आहे. विमा धारकाचा मृत्यू दिनांक 27/09/2009 रोजी झाला, त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विमादावा सादर केला. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जावुन विमा रक्कम देणे बाबत विनंती केली, परंतु गैरअर्जदाराने कोणताही प्रतीसाद दिला नाही.शेवटी दिनांक 01/07/2011 रोजी गैरअर्जदार यांचे पत्र मिळाले ज्यामध्ये गैरअर्जदारांनी अर्जदाराचा विमादावा नामंजूर केल्याचे कळविले व त्यामध्ये असे कारण दर्शविले होते की, विमा धारकाने मार्च 2005 चा हप्ता भरणा केला नाही, म्हणून विमादावा नामंजूर केला, सदर पत्र मिळाल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांचे वरिष्ट अधिकारी औरंगाबाद यांच्याकडे पुन्हा दावा पाठवला व सदर दाव्यांत अर्जदाराने योग्य ते चौकशी करुन विमादावा मंजूर करावा अशी विनंती केली, परंतु औरंगाबाद कार्यालयाने देखील दिनाक 14/06/2012 रोजी विमादावा प्रकरणी फक्त जमा हप्ता रक्कम 10,230/- रुपये ईतकीच रक्कम प्रदान करण्याचा आदेश केला.
अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, सदर विमा पॉलिसी ही दिनांक 24/02/2005 रोजी सुरु झालेली आहे गैरअर्जदाराचे कर्मचारी यांनी मासिक हप्ता जमा करण्यासाठी पासबुक दिले होते, जर मासिक हप्ता भरण्यास उशीर झाला तर द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह नंतरच्या तारखेस स्वीकारण्यांत येईल असे ठरले हाते. विमा धारकाने 30/04/2005 रोजी 202 रुपयांचा हप्ता भरणा केला होता. त्या वेळी गैरअर्जदाराच्या कर्मचा-याने तो हप्ता मार्च महिन्याच्या व्याजासह भरणा करुन घ्यावयास हवा होता. कारण विमा धारकाने मासिक हप्ता 186 + 16 रुपये असे 202 रुपये जमा केले होते. त्याचा अर्थ तो हप्ता मार्च महिन्याचा होता, परंतु संबंधीत कर्मचा-याने तो हप्ता चुकीने एप्रिल महिन्याचा म्हणून जमा केला. सदर पॉलिसीत पुन्हा कधीही सप्टेंबर 2009 पर्यंत एकही हप्ता राहिला नाही.गैरअर्जदाराने एकदा पुढील हप्ते स्वीकारल्यानंतर त्याना मागील हप्ता भरणा केला नाही. असे म्हणता येणार नाही. तसेच मार्च 2005 चा हप्ता राहिला अशी कोणतेही सुचनापत्र गैरअर्जदाराने अर्जदाराचे पती विमा धारकास दिलेले नाही.
अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, पॉलिसी सुरु होवुन गैरअर्जदार यांनी मार्च 2005 नंतर पॉलिसीचे एकुण 55 हप्ते स्वीकारले आहेत.सदर पॉलिसीचा मासिक हप्ता 186 रुपये असतांना गैरअर्जदाराने मासिक हप्ता 194 रुपये वसुल केले म्हणजेच 55 X 8 = 440 रुपये जास्तीचे जमा करुन घेतले आहेत. जर गैरअर्जदाराने सदरची जादा रक्कम वेळोवेळी मागील हप्त्यांत जमा जरी केली असती तर कोणताही हप्ता राहिला नसता तसे जरी असले तरी एकदा गैरअर्जदाराने सतत 4 ½ वर्ष पुढील हप्ते स्वीकारल्यावर त्यांना मागील हप्ता आला नाही, असे म्हणता येणार नाही. म्हणून गैरअर्जदार यास पॉलिसीची पुर्ण रक्कम अर्जदाराला द्यावी लागेल. म्हणून अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, कोणतेही संयुक्तिक कारण नसतांना गैरअर्जदाराने विमादावा 3 वर्ष प्रलंबीत ठेवला व कोणतेही सबळ कारण नसताना विमादावा फेटाळला, म्हणून तक्रारदारास मानसिकत्रास झाला आहे,म्हणून गैरअर्जदाराने मंजूर केलेली हप्ता परतीची रक्कम 10,230/- हि अर्जदारास मंजूर नाही म्हणून ती अद्याप स्वीकारली नाही.
अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन मयत विमाधारक शिवशंकर कोंडीबा मुंढे यांचे R.P.L.I. No E.A. 892360 पॉलिसीची रक्कम 50,000/- रुपये ही 27/09/2009 पासून पुर्ण रक्कम मिळे पर्यंत द.सा.द.शे. 15 टक्के व्याजासह गैरअर्जदाराकडून मिळावे व तसेच मानसिकत्रासापोटी 25,000/- व तक्रारीचा खर्च 5,000/- रुपये गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले नि.क्रमांक 4 वर 5 कागदपत्रांच्या यादीसह 5 कागदपत्रे दाखल केली ज्यामध्ये 4/1 वर पॉलिसी कव्हरनोट, 4/2 वर विमाधारकाने गैरअर्जदाराकडे दिनांक 30/04/2005 पासून सप्टेंबर 2009 पर्यंत हप्ते भरल्याचे पासबुक, 4/3 वर मृत्यू नोंदणी रजिस्टरची झेरॉक्स प्रत, 4/4 वर अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 16/03/2012 रोजी लिहिलेल्या तक्रार अर्जाची कॉपी, नि. 4/5 वर डाक विभाग औरंगाबाद यांनी गैरअर्जदारास लिहिलेले दावा नामंजूर आदेश. इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदरास नोटीस काढण्यांत आल्या गैरअर्जदार वकीला मार्फत मंचासमोर हजर होवुन नि.क्रमांक 8 वर आपला लेखी जबाब सादर केला व त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरच्या पॉलिसीत हप्ता नियमित भरणे बंधनकारक आहे व तसेच पॉलिसी नियम 56 (1) प्रमाणे सदरची पॉलिसीत विमाधारकाने मार्च 2005 चा हप्ता न भरल्यामुळे सदरची पॉलिसी ही बेकायदेशिर व Void झाली आहे. व तसेच हप्ता भरणे राहिल्यास पॉलिसी नियम 56 (3) प्रमाणे 6 महिन्याच्या आत सर्व एरिअर्स भरणे आवश्यक आहे. तसे न केल्यास भरलेली सर्व रक्कम सस्पेंस अकाऊंटला जमा होते. व म्हणून विमाधरकाच्या मृत्यूचा क्लेम देणे गैरअर्जदारावर बंधन कारक राहात नाही.तसेच सस्पेंस अकाऊंटला जमा असलेली रक्कम जेव्हा अर्जदार / त्याचा नॉमिनी किंवा त्याचे वारस मागतील तेव्हा देण्यांत येते. तसेच गैरअर्जदाराचे असे ही म्हणणे आहे की, Void झालेल्या पॉलिसीचा क्लेम देण्याचा प्रश्नच येत नाही, तसेच गैरअर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराच्या विनंती नुसार गैरअर्जदार यांचे मुख्य कार्यालयाने दिनांक 14/06/2012 रोजी नियमा प्रमाणे अर्जदारास रु.10,230/- देण्याचे आदेश गैरअर्जदारास केले तसेच गैरर्जदाराचे हे म्हणणे आहे की, विमा हप्ता 186 रुपये असतांना 198 रुपये हे अर्जदाराने गैरअर्जदाराच्या निदर्शनास आणुन दिली नाही की, पॉलिसी Premium Receipt बुक वर 198 चा हप्ता लिहिला आहे आणि पॉलिसी मध्ये 186 रुपयेचा हप्ता लिहीला आहे.म्हणून जादा पैसे भरण्यास विमा धारक स्वतः जबाबदार आहे, व गैरअर्जदार हा त्यास जबाबदार नाही. म्हणून मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावे. गैरअर्जदाराने आपल्या लेखी म्हणण्याच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र दाखल केलेले आहे तसेच गैरअर्जदाराने नि.क्रमांक 9 वर 2 कागदपत्राच्या यादीसह 2 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये 9/1 वर पासबुक कॉपी, 9/2 वर पॉलिसी रुल दाखल केलेले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदाराने हे सिध्द केले आहे की, अर्जदाराचे मयत पती शिवशंकर कोंडीबा मुंढे यांने गैरअर्जदाराकडे बचत विमा पॉलिसी व्दारे 50,000/- रुपये विमा संरक्षण असलेली विमा पॉलिसी दिनाक 24/02/2005 रोजी खरेदी केली व सदरच्या पॉलिसीचा क्रमांक इ.ए.892360 असा आहे. व तसेच सदर पॉलिसीसाठी विमा धारकाने गैरअर्जदाराकडे दरमहा 186/- रुपायांचा हप्ता भरण्याचे ठरले होते, आणि सदरच्या पॉलिसीचे अंतिम तारीख जानेवारी 2026 ही होती, या सर्व बाबी अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/1 वरुन सिध्द होते, तसेच अर्जदाराचे पती दिनांक 27/09/2009 रोजी मयत झाले ही बाब नि.क्रमांक 4/3 वर दाखल केलेल्या गंगाखेड जिल्हा परभणी यांचे महसुली गाव ग्रामपंचायत अंतर्गत मृत्यू नोंदणीचे रजिष्टर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते तसेच विमा तारीख शिवशंकर कोंडीबा मुंढे यांच्या मृत्यू नंतर पॉलिसी क्रमांक इ.ए.892360 अन्वये सदरच्या पॉलिसीची रक्कम मिळावी, म्हणून गैरअर्जदाराकडे दावा अर्ज अर्जदाराने दाखल केला होता ही बाब नि.क्रमांक 4/4 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते व तसेच गैरअर्जदाराच्या मुख्य कार्यालय औरंगाबाद यांनी सदरच्या पॉलिसी रक्कमेच्या देयका पैकी फक्त 10230/- रुपये देण्याचा आदेश गैरअर्जदारास दिला ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/5 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते तसेच विमा धारकाने विमा पॉलिसीच्या नियमा प्रमाणे 186/- रुपये हप्ता गैरअर्जदाराकडे भरणे बंधन कारक असतांना विमा धारकाने गैरर्जदाराकडे दिनांक 30/04/2005 रोजी 202/- आणि 31/08/2008 पासून ते 24/09/2009 पर्यंत 198/- दर महिन्यास हप्ता या स्वरुपात भरल्याचे दिसून येते ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/2 वरील प्रिमीयम रिसीट वरुन सिध्द होते, वास्तविक 4/1 वरील विमा पॉलिसीच्या कव्हरनोटवरुन हे सिध्द होते की, सदरच्या पॉलिसीचा हप्ता 186/- रुपये ठरला होता, परंतु गैरअर्जदाराच्या कार्यालयाने प्रिमीयम रिसिटबुक विमा धारकाच्या नावे दिनांक 24/02/2005 रोजी जारी केला व त्यामध्ये गैरअर्जदाराने सदर पॉलिसीचा हप्ता 198/- रुपये असे दर्शवुन विमा धारकास 198/- रुपये हप्ता भरण्यास भाग पाडले. व ही सर्व चुक गैरअर्जदाराची आहे हे स्पष्टपणे दिसून येते व तसेच ती चुक लपविण्यासाठी हप्त्याच्या अधीक रक्कम भरण्यास अर्जदार जबाबदार आहे हे गैरअर्जदाराचे म्हणणे मंचास योग्य व कायदेशिर वाटत नाही, व तसेच अर्जदाराने विमा प्रस्ताव दाखल केल्यानंतर गैरअर्जदाराच्या मुख्य कार्यालयाने मार्च 2005 चा हप्ता थकीत राहिल्याने सदरची पॉलिसी ही बेकायदेशिर झाली व बेकायदेशिर पॉलिसीमध्ये विम्याचे पैसे मिळत नसून केवळ हप्त्याच्या स्वरुपात जमा झालेली रक्कम ही विमा धारकास वा त्याच्या वारसास वा त्याच्या नॉमिनीस देण्यात येते, व सदरची पॉलिसी बेकायदेशिर झाल्यानंतर सदरील हप्त्याची रक्कम ही सस्पेंस अकाऊंटमध्ये ठेवण्यात येते हे म्हणणे नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरोधात तर आहेच आहे तसेच तर्क विसंगत व सदसदविवेक बुध्दीला न पटणारे आहे. व ग्राहक संरक्षण कायदा 1986 ने ग्राहकास प्रदान केलेल्या हक्काच्या / अधिकाराच्या विरोधात आहे. म्हणून गैरअर्जदाराचे सदरचे बेकायदेशिर म्हणणे मंचास अजीबात मान्य करता येणार नाही. तसेच गैरअर्जदाराचे हे म्हणणे की,
जमा झालेली रक्कम 10230/- गैरअर्जदाराच्या मुख्य कार्यालयाने गैरअर्जदारास अर्जदाराकडे देण्याचा आदेश केला हे देखील बेकायदेशिर वाटते, कारण सदरची पॉलिसी बेकायदेशिर झाली ही बाब गैरअर्जदाराने विमा धारकास नोटीसव्दारे कळवुन सदरची पॉलिसी बंद झाली हे कळवणे आवश्यक होते, परंतु याबाबतचा पुरावा गैरअर्जदारानी मंचासमोर आणला नाही हे गैरअर्जदाराचे कृत्य बेकायदेशिरच आहे व तसेच अर्जदाराचा विमा दावा नाकारुन गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी दिली आहे.कारण जरी मार्च 2005 चा हप्ता भरला नाही हे कारण दाखवुन गैरअर्जदार अर्जदाराचा विमा प्रस्ताव नाकारत असेल तर गैरअर्जदाराने विमाधारकाकडून 30 एप्रिल 2005 पासून ते 24 सप्टेंबर 2009 पर्यंत सदरच्या पॉलिसीबद्दल हप्ता स्वीकारला गैरअर्जदाराने त्याच वेळेस हप्त्याची रक्कम स्वीकारण्यास इनकार करणे गरजेचे होते, वा मार्च 2005 चा हप्ता आपला थकीत आहे असे विमा धारकास कळवणे गरजेचे होते, परंतु गैरअर्जदाराने तसे काहीही केल्याचे आढळून येत नाही, म्हणून मंचास असे वाटते की, गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे. जवळ – जवळ 55 हप्ते विमा धारकाकडून गैरअर्जदाराने स्वीकारुन परत विमा धारकाच्या मृत्यू नंतर त्याच्या वारसास विमादावा नाकारुण ही गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी दिलेली आहे. कायद्याने अर्जदार हा विमा धारकाची पत्नी असल्यामुळे सदरच्या विमा पॉलिसी अंतर्गत पॉलिसी रक्कम रु. 50,000/- गैरअर्जदाराकडून मिळणेस पात्र आहे. व गैरअर्जदाराने सदरच्या पॉलिसी अंतर्गत 50,000/- रुपये अर्जदारास देणे बंधनकारक आहे तसेच मरेपर्यंत पॉलिसी धारक ग्राहकास त्याचे हप्ते संस्पेंस अकाऊंटला जमा होत आहे याबद्दलची माहिती द्यायची नाही आणि मेल्यावर त्याच्या वारसास किंवा त्याच्या नॉमिनीस पॉलिसी धारक ग्राहकाचे हप्ते सस्पेंस अकाऊंटला जमा आहेत असे सांगून पॉलिसी नाकारायची ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 व्दारा ग्राहकाला दिलेल्या हक्काच्या पुर्णपणे विरोधात आहे. ( The right to be informed about the quality, quantity, potency, purity standard and price of goods to protect the consumer against unfair trade practices:) या सर्व गोष्टीवरुन हे सिध्द होते की, अर्जदार गैरअर्जदाराकडून विमादाव्याच्या प्रलंबित पॉलिसी अंतर्गत 50,000/- रुपये घेण्यास पात्र आहे.
म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 सदरचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास मयत शिवशंकर कोंडींबा मुंढे यांची पॉलिसी क्रमांक
इ.ए.892360 अन्वये अर्जदार पत्नीस रु. 50,000/- फक्त
(अक्षरी रु.पन्नासहजार फक्त) दिनांक 28/09/2009 पासून ते देय तारखेपर्यंत
सदरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह निकाल कळाल्या पासून 30
दिवसांच्या आत द्यावे.
3 याखेरीज गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिकत्रासापोटी रु. 5,000/- फक्त ( अक्षरी
रु.पाचहजार फक्त) व तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- फक्त
(अक्षरी रु.दोनहजार फक्त ) द्यावे.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष