नि. 23 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 232/2010 नोंदणी तारीख – 1/10/2010 निकाल तारीख – 21/1/2011 निकाल कालावधी – 101 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री मधुकर हरी जोशी रा.कल्पशिल्प अपार्टमेंट, पिरवाडी खेड सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री.एल.एम.भोसले) विरुध्द व्यवस्थापक, दादासाहेब साखवळकर सहकारी पतसंस्था एकसळ, विलीनीकरणानंतर व्यवस्थापक सतिश कर्णे शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई शाखा विसावा नाका, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री संदीप चव्हाण) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे जाबदार संस्थेचे सभासद असून त्यांनी जाबदर संस्थेकडून रु.25,000/- इतके कर्ज घेतले होते. सदरचे कर्ज फेडण्याचा अर्जदार यांनी वेळोवेळी प्रयत्न केला आहे. तसेच अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया रक्कम ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये काही रकमा या शेअर्स पोटी, दामपाचपटीपोटी व बचतखात्यामध्ये ठेवलेल्या आहेत. परंतु सदरच्या रकमा जाबदार यांनी अर्जदार यांचे कर्जखात्यावर जाणीवपूर्वक वर्ग न केल्यामुळे अर्जदार यांचे व्याज वाढत गेले व सदरचे कर्जाचे थकबाकीसाठी जाबदार यांनी अर्जदार यांचेविरुध्द सहकार न्यायाधीश यांचे कोर्टात दावा दाखल केला आहे. अर्जदार यांनी कर्जखात्याचा उतारा मागितला असता त्यामध्ये वर नमूद रकमा जाबदार यांनी कर्ज खात्यात वर्ग न केल्याचे दिसून आले. अर्जदार यांनी त्याबाबतचा तपशील मागितला असता जाबदार यांनी तो देणेस नकार दिला. सबब वर नमूद रकमा कर्जखात्यात वर्ग करुन कर्ज खाते बंद केल्याचा दाखला मिळावा, वरील रकमांवर व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. 2. जाबदार यांनी याकामी नि.11 कडे लेखी म्हणणे देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. अर्जदार यांनी तक्रारअर्जात संदिग्ध कथने केली आहेत. पतसंस्थेच्या विलिनीकरणाच्या आदेशानुसार शेअर्सची रक्कम गोठविण्यात आली आहे. तसेच ठेवीदारांचे ठेवींचे 20 टक्के रकमेचे इरोजन केले आहे. अर्जदारचे बचत खात्यातील रक्कम रु.12,500/- पैकी अर्जदार यांनी रु.12,000/- काढून घेतले आहेत. तसेच दुस-या बचत खात्यातील रक्कम रु.10,000/- ही रक्कम अर्जदारचे कर्जखात्यात वर्ग केली आहे. जाबदार यांनी अर्जदार यांचेविरुध्द दाखल केलेला वसुलीचा दावा मंजूर झाला आहे. जाबदारचे कर्जवसुलीस अडथळा निर्माण करण्यासाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अर्जदारचे व्यवसायाशी संबंधीत सदरची तक्रार या मंचासमोर चालणेस पात्र नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदारचे कथन आहे. 3. अर्जदार व जाबदार यांचे अभियोक्त्यांनी केलेला युक्तिवाद ऐकला तसेच दाखल कागदपत्रे पाहिली. 4. अर्जदार यांनी दाखल केलेली वर नमूद कागदपत्रे पाहिली असता असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये शेअर्सपोटी, दामपाचपट मुदत ठेव योजनेमध्ये तसेच बचत खात्यामध्ये काही रकमा ठेवलेल्या आहेत व सदरच्या रकमांची मागणी प्रस्तुत तक्रारअर्जामध्ये केली आहे. परंतु अर्जदार यांना या मंचासमोर शेअर्स व कर्ज शेअर्सच्या रकमांची मागणी करता येणार नाही. अर्जदार यांनी सभासदत्व मिळण्यासाठी शेअर्सच्या रकमा जाबदार यांचेकडे भरल्या आहेत. सदरच्या शेअर्सच्या रकमांचा ठेवीदार ग्राहक या नात्याने जाबदार यांचेकडे ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे शेअर्सच्या रकमा परत करण्याचे आदेश करण्याचे अधिकारक्षेत्र या मंचास नाही असे या मंचाचे मत आहे. 5. अर्जदार यांनी दोन बचत खात्यातील रकमांची मागणी केली आहे. परंतु सदरचे दोन्ही बचत खात्यांचे मूळ पासबुक अर्जदार यांनी याकामी दाखल केलेले नाही. जाबदार यांनी यांचे कथनानुसार एका बचत खात्यातील रक्कम अर्जदार यांनी रु.11,000/- व रु.1,000/- याप्रमाणे दोन वेळा काढून घेतली आहे. जाबदार यांनी अर्जदार यांनी काढून घेतलेल्या रकमांबाबत योग्य ती कागदपत्रे दाखल केली आहेत. सदरची कागदपत्रे पाहता अर्जदार यांनी रु.12,000/- काढून घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तसेच जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे स्पष्ट कथन केले आहे की अर्जदारचे दुस-या बचत खात्यातील रक्कम जाबदार यांनी अर्जदारचे कर्ज खात्यावर वर्ग केली आहे. त्यामुळे सदरची रक्कमही अर्जदार यांचा प्रस्तुत तक्रारअर्जाद्वारे मागता येणार नाही. 6. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जामध्ये दामपाचपटीपोटी रु.2,500/- ची मागणी केली आहे. तसेच दैनंदिन ठेवीपोटी रु.1,800/- ची मागणी केली आहे. सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ अर्जदार यांनी मूळ ठेवपावती दाखल केली आहे. परंतु सदरचे रकमेबाबत जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये काहीही कथन केलेले नाही अगर सदरची रक्कम अर्जदार यांना अदा केलेबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही किंवा सदरची ठेवपावती अर्जदारचे कर्जखात्यास तारण असलेबाबतही कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सदरचे ठेवपावतीचे अवलोकन केले असता अर्जदार हे मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.2,500/- मिळण्यास पात्र आहेत हे स्पष्टपणे दिसून येते. तसेच दैनंदिन ठेव योजनेमधील अर्जदारची शिल्लक रक्कम अर्जदार यांना दिल्याबाबतही जाबदार यांनी काहीही पुरावा दाखल केलेला नाही. सबब सदरची ठेवरक्कम व दैनंदिन ठेव योजनेतील शिल्लक रक्कम अर्जदार हे जाबदार यांचेकडून मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. 7. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. ठेवपावती क्र. 2513 वरील मुदत संपल्यानंतर मिळणारी रक्कम ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केंप्रमाणे व्याजासह द्यावी. ब. अल्पबचत पासबुक खाते क्र.37 वरील शिल्लक रक्कम सदरचे खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. क. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.500/- द्यावेत. ड. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.500/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 21/2/2011 (सुनिल कापसे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य अध्यक्ष
| Mr. Sunil K Kapse, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | , | |