तक्रार क्र. 108/2014.
तक्रार दाखल दि.17-10-2014.
तक्रार निकाली दि.08-03-2016.
श्री. दशरथ शामराव माने,
रा. झिरपवाडी,
ता.फलटण,जि.सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
श्री. दादासाहेब बाबासाहेब बुरुंगले
रा. सोनगांव बंगला, पो.सरडे,
ता.फलटण, जि. सातारा. .... जाबदार.
.....तक्रारदारतर्फे- अँड.पी.एम.जाधव.
.....जाबदार तर्फे- अँड.बी.जे.ननावरे.
न्यायनिर्णय
(मा.सौ.सविता भोसले,अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 12 नुसार दाखल केला आहे. प्रस्तुत तक्रार अर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे झिरपवाडी, ता.फलटण,जि.सातारा येथील रहिवाशी आहेत तर जाबदार हे सोनगांव बंगला ता.जि.सातारा येथे रहात आहेत. तक्रारदार व जाबदासर यांची ओळख व परिचय असलेने त्यांचे एकमेकांकडे जाणे-येणे होते. तक्रारदारास रहाणेकरीता जागेची जरुरी असलेने जाबदारांनी तक्रारदाराला त्यांचे मालकीची मौजे कोळकी, ता. फलटण, जि.सातारा येथील स.नं. 121/1 अ क्षेत्र 0.81 आर या जमीनीवर बांधकाम करणेत आलेल्या विजय विहार मध्ये संजिवनी इमारतीतील सदनिका क्र. 7 क्षेत्रफळ 788.0 चौ. फू. म्हणजे 45.35 चौ.मी. बिल्ट अप एरिया ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक 2215 यास इमारतीतील जीने, बाल्कनी, ड्रेनेज, पाणी, पाण्याची टाकी, प्लंबींग, इलेक्ट्रीक फिटींग, उजेड, फाऊंडेशन कॉलम भिंती, पंप्स, मोटार वगैरे ओनरशिपमधील सर्व हक्कातील फ्लॅट, जाबदाराचे मालकीचा असून सदरचा फ्लॅट तक्रारदाराने रक्कम रु.8,00,000/- (रुपये आठ लाख मात्र) ला खरेदी घेणेची जाबदाराने तक्रारदाराला विनंती केली. तक्रारदार हा एस.आर.पी. मध्ये नोकरीस आहे. जाबदाराने रेकॉर्डबाबत तुम्ही कोणतीच काळजी करु नका असे आश्वासन दिले व जाबदाराने तक्रारदाराकडून गोड बोलून रक्कम रु.8,00,000/- (रुपये आठ लाख मात्र) पैकी रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) तक्रारदाराकडून घेतले व दि.30/10/2012 रोजी नोंदणीकृत साठेखत करणेबाबत साठेखताचा लेख तयार केला. प्रस्तुत साठेखतासाठी तक्रारदाराला स्टँम्प करीता रक्कम रु.40,000/- व नोंदणी फी म्हणून दि.30/10/2012 रोजी रक्कम रु.8,600/- भरावी लागली. प्रस्तुत साठेखतात जाबदाराने दोन महन्यांची मुदत घातली आहे. सदर साठेखत नोंदणीकृत असून दि.30/ङ2/2012 रोजी अ.नं. 7525 ने दुय्यम निबंधक, फलटण येथे नोंदविलेले आहे. प्रस्तुत साठेखत नोंदवताना जाबदार यांनी तक्रारदार यांना खालील गोष्टींची कल्पना दिलेली नाही व नव्हती. त्यामुळे तक्रारदार यांची जाबदार यांनी फसवणूक करुन ग्राहकास सदोष सेवा दिली आहे.
अ. सदरील मिळकत फ्लॅटची जागा ही एन.ए. केलेली नाही.
ब. बांधकामास टाऊन प्लॅनिंग मंजूरी नाही.
क. सदर फ्लॅट विकणेचा जाबदाराला अधिकार नाही.
ड. कोळकी ग्रामपंचायतीस के.के. असोसिएटस् कन्स्ट्रक्शन नोंद नाही.
इ. बांधकामाचा दर्जा अतिशय निकृष्ठ आहे.
सर्व प्रकारात जाबदाराने तक्रारदाराकडून रक्कम रु.1,50,000/- (रुपये एक लाख पन्नास हजार मात्र) काढून घेऊन तक्रारदाराची फसवणूक केली आहे. प्रस्तुत फलॅटचा ताबा दस्ताने देणेचा होता. तसेच सदर कामी तक्रारदार कर्जप्रकरण करणेस बँकेत गेले असताना कर्जप्रकरणी बँकेत कायदेशीर अडचणी असलेने तक्रारदाराचे कर्जप्रकरण होऊ शकले नाही त्यास जाबदार स्वतः सर्वस्वी जबाबदार आहेत. तसेच जाबदार यांना या मिळकतीचा रजिस्टर दस्त होण्यास कायदेशीर अडचणी आहेत हे माहित असूनही तक्रारदार यांचेबरोबर जाबदाराने गोड बोलून बोगस साठेखताचा दस्त नोंदवला व जाबदाराने तक्रारदाराची फसवणूक केली आहे. तक्रारदाराने दि. 28/3/2013 रोजी जाबदार यांना वकीलांमार्फत नोटीस देऊन प्रस्तुत साठेखताचा व्यवहार रद्द करुन तक्रारदाराने जाबदाराला दिलेली रक्कम व साठेखतासाठी खर्च केलेली रक्कम जाबदाराकडे परत करावी अशी जाबदारांकडे मागणी केली. परंतू जाबदाराने प्रस्तुत तक्रारदाराची सदरची रक्कम परत अदा केली नाही. सबब तक्रारदाराने मे मंचात प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल केला आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने जाबदार यांचेकडून दि.30/10/2012 रोजी साठेखतासाठी जाबदाराला दिलेली रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) व नोंदणी फी व स्टँम्प करीता तक्रारदाराने दिलेली रक्कम रु.50,000/- तसेच नुकसानभरपाईसह रक्कम, अशी एकूण रक्कम रु. 1,77,100/- (रुपये एक लाख सत्त्याहत्तर हजार शंभर मात्र) जाबदार यांचेकडून वसूल होवून मिळावी तसेच रक्कम रु.1,50,000/- वर अर्ज दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 12 टक्के प्रमाणे व्याज जाबदारांकडून वसूल होऊन मिळावे अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने याकामी नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि. 5 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडे साठेखत करार, नि.5/2 कडे तक्रारदाराने जाबदाराचा वकीलामार्फत दिलेली नोटीस, नि. 17 चे कागदयादीसोबत नि. 17/1 ते नि.17/3 कडे अनुक्रमे मूळ साठेखत, ग्रामपंचायत कोळकी यांचा सदर बांधकामास परवानगी नसलेचा दाखला, जाबदाराने दिलेले नोटीस उत्तर, नि. 18 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार यांनी नि.15 कडे म्हणणे/कैफीयत, नि.16 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट दाखल केले आहे. प्रस्तुत जाबदार यांना पुरावा दाखल करणेसाठी वारंवार संधी देऊनही जाबदार यांनी प्रस्तुत कामी पुरावा दाखल केलेला नाही. सबब जाबदार यांना पुरावा देणेचा नाही असे गृहीत धरुन, तसेच तक्रारदार व जाबदार हे मे मंचात सातत्याने गैरहजर असलेने व तक्रार अर्ज हा सन 2014 मधील असलेने, प्रकरण आहे त्या कागदपत्रांचे अवलोकन करुन निकालावर ठेवणेत आले आहे.
याकामी जाबदाराने म्हणणे दाखल केले आहे. प्रस्तुत म्हणणे/कैफियतीमध्ये जाबदाराने तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहे. जाबदाराने त्यांचे म्हणण्यात पुढीलप्रमाणे आक्षेप घेतलेले आहेत.
i. तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील कथन मान्य व कबूल नाही. तक्रारदाराने दाखल केलेला तक्रार अर्ज कायद्याने चालणेस पात्र नाही.
ii. प्रस्तुत कामी वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे. जाबदार हे सोनगांव बंगला, ता. फलटण, जि.सातारा येथील कायमचे रहिवाशी आहेत व शेतकरी कुटूंबातील आहेत. तसेच जाबदार हे मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे क्लार्क म्हणून नोकरी करत होते. अंतिमतः जाबदार हे रजिस्ट्रार म्हणून निवृत्त झालेले आहेत. जाबदाराने सेवानिवृत्तीनंतर वादातीत सदनिका ही के.के.असोसिएट्स तर्फे प्रोप्रायटर सौ. कांचन काशिनाथ कडू, बांधकाम व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर यांचेकडून रजि. खूषखरेदी करुन घेतली होती व आहे. प्रस्तुत वादातीत मिळकतीचे मूळ मालकाने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन बांधलेली आहे. जाबदार यांना पेन्शन वेळेवर मिळत नव्हती. त्यामुळे मुलीच्या शिक्षणासाठी व घरातील आजारपण यासाठी रकमेची अत्यंत आवश्यकता असलेने तक्रारदार यांचेकडून उसनवार म्हणून रक्कम रु.50,000/- ची मागणी जाबदाराने केली होती. त्याप्रमाणे तक्रारदार रक्कम देणेस तयार झाले मात्र या उसनवार रकमेसाठी 2 महिन्याच्या अटीवर व्याजासह परत करणेच्या अटीवर रक्कम देणेस तयार झाले. त्यावेळी जाबदाराने अटी मान्य करुन रक्कम देणेची विनंती केली असता जाबदाराचे मजबुरीचा गैरफायदा घेऊन तक्रारदाराने जाबदारांकडून वर नमूद साठेखत दस्त लिहून घेतला. तसेच तक्रारदाराने जाबदाराला फक्त रक्कम रु.50,000/- दिले होते. तरीही रक्कम रु.1,00,000/- चा दस्त लिहून घेतला. तसेच साठेखतातील सर्व मजकूर तक्रारदाराने त्याचो सोईने लिहीला आहे. जाबदार हे तक्रारदाराकडून उसनवार घेतलेली रक्कम रु.50,000/- सदैव देणेस तयार होते व आहेत. प्रस्तुत बाबत दिवाणी स्वरुपाची असलेने तक्रार अर्ज या मे. मंचात चालणेस पात्र नाही. सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा व तक्रारदाराकडून जाबदार यांना कॉम्पेनसेटरी कॉस्ट म्हणून रक्कम रु.15,000/- देणेबाबत तक्रारदाराला हुकूम व्हावेत असे म्हणणे जाबदाराने दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ मे. मंचाने प्रस्तुत कामी पुढील मुद्दयांचा विचार केला.
मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार
असे नाते आहे काय ?- होय.
2. जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय ? होय.
3. अंतिम आदेश काय?- खाली नमूद केले
आदेशाप्रमाणे
विवेचन-.
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.1,00,000/- घेवून जाबदाराने तक्रारदार यांना वादातीत सदनिकेचे रजिस्टर साठेखत करार करुन दिला आहे. प्रस्तुत करार मूळप्रत तक्रारदाराने नि. 17 चे कागदयादीसोबत नि. 17/1 कडे दाखल केला आहे. तसेच नि.17/2 कडे प्रस्तुत बांधकामास नगररचना कार्यालयाकडून परवानगी नसलेचा दाखला दाखल केला आहे. तसेच नि. 17/3 कडे जाबदाराने तक्रारदाराचे नोटीसला दिलेली उत्तरी नोटीस दाखल केली आहे. तसेच नि.18 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. जाबदाराने याकामी म्हणणे व म्हणण्याचे अँफीडेव्हीट दाखल केले आहे. मात्र त्यांनी म्हणणेमध्ये घेतलेले आक्षेप किंवा जाबदाराने घेतलेला बचाव शाबीत करणेसाठी जाबदाराने कोणताही लेखी अथवा तोंडी पुरावा याकामी दाखल केलेला नाही. त्यामुळे जाबदाराने म्हणण्यामध्ये घेतलेले आक्षेप व बचाव सिध्द करणेस जाबदाराला यश आलेले नाही. सबब जाबदाराने त्याची बचावाची बाजू सिध्द केलेली नसलेने त्यांच्या म्हणण्यामधील आक्षेप विश्वासार्ह वाटत नाहीत व त्यामुळे जाबदाराचे म्हणण्यावर विश्वास ठेवणे न्यायोचीत होणार नाही असे मे मंचाचे स्पष्ट मत आहे.
परंतू तक्रारदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांचा ऊहापोह करता, तक्रारदाराने त्याचे तक्रार अर्जातील कथन पुराव्यानिशी सिध्द केलेले आहे. त्यामुळे तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथन विश्वासार्ह वाटते व त्यामुळे तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथने योग्य व बरोबर आहेत असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रार अर्जात नमूद केलेप्रमाणे जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.1,00,000/- घेवून तक्रारदाराला वादातीत फ्लॅटचे साठेखत नोंदणीकृत करुन दिले असून त्यासाठी स्टँम्प डयूटी व नोंदणी फीपोटी रक्कम रु.48,600/- तसेच इतर खर्च ही तक्रारदाराने केलेला आहे हे सिध्द होत आहे. त्यामुळे याकामी तक्रारदार यांना रजि.साठेखत करुन देऊन नंतर खरेदीपत्र करुन देतो असे सांगून तक्रारदारकडून रक्कम घेऊन व तक्रारदार यांना प्रस्तुत मिळकतीसंदर्भात योग्य ती खरी माहिती जाबदार यांनी न दिलेने तक्रारदाराची घोर फसवणूक केलेचे व सेवात्रुटी केलेचे स्पष्ट होत आहे. सबब या कामी आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
सबब प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी जाबदाराने फसवणूक केलेचे व योग्य ती माहिती तक्रारदार यांना न दिलेने व तक्रारदाराकडून वादातीत मिळकतीचेपोटी रक्कम स्विकारुन खोटी माहिती पुरवून तक्रारदाराचे घोर फसवणूक करुन तक्रारदाराला सेवेत कमतरता त्रटी दिलेचे स्पष्ट व सिध्द होत आहे.
7. जाबदाराला वारंवार संधी देऊनही जाबदाराने पुराव्यासाठी कोणतेही कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र असा लेखी व तोंडी पुरावा मे मंचात दाखल केलेला नाही. सबब सर्व कागदपत्रांचा व पुराव्याचा विचार करता जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविलेचे स्पष्ट व सिध्द झालेले आहे.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहेत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना साठेखताची रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) नोंदणी फी, स्टँम्प डयूटी साठी तक्रारदाराने भरलेली रक्कम रु.50,000/- अशी एकूण रक्कम रु.1,50,000/- (रुपये एक लाख पन्नास हजार मात्र) अदा करावेत व झालेस साठेकरार रद्द करुन घ्यावा.
3. प्रस्तुत रकमेवर जाबदाराने तक्रार अर्ज दाखल तारखेपासून रक्कम तक्रारदाराचे प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज अदा करावे.
4. तक्रारदाराला झाले मानसिकत्रासासाठी व अर्जाचे खर्चापोटी नुकसानभरपाई म्हणून जाबदाराने रक्कम रु.20,000/- (रुपये वीस हजार मात्र) अदा करावेत.
5. जाबदाराने तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- तक्रारदाराला अदा करावेत.
6. वर नमूद सर्व आदेशांचे पालन जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 60 दिवसात करावे.
7. विहीत मुदतीत आदेशाचे पालन करणेत जाबदारांनी कसूर केलेस अर्जदार यांना ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा राहील.
8. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
9. प्रस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 08-03-2016.
सौ.सुरेखा हजारे श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.