(आदेश पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या)
-/// आ दे श ///-
(पारीत दिनांक – 27 मार्च, 2012)
तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदाराचे म्हणण्यानुसार तक्रारदाराने त्याच्या मौजा किरणापूर, प.ह.नं.46, भूमापन क्र.79/1अ, आराजी 0.67, धारणा प्रकार भो.वर्ग—1 या शेतीच्या पोटहिस्सा मोजणीसाठी गैरअर्जदार नं.1 यांचेकडे रुपये 2,000/- भरले, परंतू गैरअर्जदार नं.1 यांनी सदर शेताची मोजणी करुन दिली नाही. त्यानंतर दिनांक 12/1/2009 रोजी मौजा खोडगाव भू.क्र.69/1 या शेताचे साधारण मोजणीकरीता रुपये 2,000/- भरले. त्यानंतर दिनांक 25/5/2010 रोजी मोजणी झाली व दिनांक 20/5/2010 ला मोजणीच्या खुणा दाखविण्यात आल्या. मोजणीनंतर पुर्नमोजणी नकाशा व वहिवाट यामध्ये तफावत असल्याने पोटहिस्सा कायम करता आला नाही असे गैरअर्जदार नं.2 यांनी तक्रारदारास लिहीलेत्या पत्रात नमूद केले व त्यांनी सिमांकन करुन दिले नाही, म्हणुन हद्दीच्या खुणा दाखविण्याचा प्रश्नच येत नाही. तक्रारदाराने गैरअर्जदार नं.1 यांना नोटीस पाठवून सदर पत्रातील चूक त्यांचे निदर्शनास आणून दिली. त्यानंतर उप—अधिक्षक, भूमी अभीलेख, रामटेक यांनी 6/12/2010 ला पत्र पाठवून त्यामध्ये दिनांक 25/5/2010 ला मोजणी झाली व मोजणी नकाशाची ‘क’ प्रत कार्यालयीन पत्राद्वारे तक्रारदारास पोस्टाद्वारे पाठविण्यात आली व सदर छापील पत्रामध्ये दिनांक मागेपुढे लिहीण्यात आलेला आहे असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. गैरअर्जदार नं.2 यांनी तालुका निरीक्षक भूमी अभीलेख रामटेक यांनी केलेल्या दिनांक 6/12/2010 चे पत्रान्वये तक्रारदाराने त्यांनी सूचविलेली संपूर्ण कागदपत्रे दिनांक 22/12/2010 रोजी गैरअर्जदार नं.3 यांना पाठविली. गैरअर्जदार नं.3 यांनी अंदाजे दिनांक 11/1/2011 ला तक्रारदाराची संपूर्ण कागदपत्रे जशीच्या तशी परत पाठविली. त्यानंतर ते कधीही तक्रारदाराचे शेतात मोजणीसाठी आले नाहीत किंवा मोजणी करुन दिलेली नाही. गैरअर्जदार यांचे हलगर्जीपणामुळे तक्रारदाराचे लगतचे शेतक-यांनी त्यांचे शेतात अतिक्रमण केले, त्यामुळे तक्रारदाराला ठरल्यानुसार वेळेवर मोजणी करता आली नाही, म्हणुन तक्रारदाराचे नुकसान होत आहे. गैरअर्जदार यांची सदरची कृती ही त्यांनी तक्रारदारास दिलेल्या सेवेतील कमतरता आहे. म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार मंचासमक्ष दाखल केली असून, तीद्वारे भूमी अभिलेख रामटेक यांनी तक्रारदाराने अगोदर भरलेल्या रकमेत शेताची मोजणी करुन द्यावी, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- आणि तक्रारीचा खर्च रूपये 10,000/- मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
तक्रारदाराने सदर तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत पावत्या, गैरअर्जदार व तक्रारदार यांचेतील सर्व पत्रव्यवहार, नोटीस, पोस्टाची पावती, माहिती अधिकारात दिलेला अर्ज, पोस्टाची पावती व पोचपावती इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस बजाविण्यात आल्या, त्यावरुन हजर होऊन गैरअर्जदार नं.1 व 2 यांनी आपला लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार नं.1 व 2 यांनी तक्रारदाराने त्यांच्या जमिनीच्या पोटहिस्स्याची मोजणी करण्याकरीता रक्कम भरल्याचे तक्रारदाराचे म्हणणे मान्य केलेले आहे, परंतू इतर आरोप अमान्य केलेले आहेत.
गैरअर्जदार यांचे कथनानुसार गैरअर्जदार नं.2 यांचे कार्यालय हे सेवा देणारे कार्यालय नाही, म्हणुन ते ग्राहक संरक्षण कायद्याच्या सेवा या सदरात मोडत नाहीत. त्यामुळे सदरची तक्रार चालविण्याचा मंचास अधिकार नाही. गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पूष्ठ्यर्थ महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई (अपील क्र. 49/94) यांचे आदेशाचा अप्रकाशित निवाड्याचा उल्लेख केलेला आहे. तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर यांनी तक्रार क्र. 54/2000 चाही उल्लेख केलेला आहे. गैरअर्जदार यांनी सदरची तक्रार ही मंचाची दिशाभूल करुन अनुचित लाभ मिळविण्याचे हेतूने दाखल केलेली आहे. वास्तविक, तक्रारदाराने महाराष्ट्र राज्य जमिन महसूल अधिनियम 1966 च्या प्रावधानीक तरतूदींचा वापर न करता संबंधित महसूल अधिकारी किंवा संबंधित वरीष्ठ अधिकारी यांचेकडे रितसर तक्रार दाखल करावयास पाहिजे होती. गैरअर्जदाराचे मते त्यांनी त्यांचे कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या अर्ज प्रकरणातील अभिलेखाचे अवलोकन केले असता, गैरअर्जदार यांनी मौजा खेडगाव येथील भूमापन क्र. 79 चे मोजणीकरीता आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली आहेत. अर्जात नमूद केलेल्या किरणापूर गावाच्या बाबत मोजणीची कोणतीही कार्यवाही करावयाची नाही व मौजा खोडगाव मोजणी दिनांक 20/5/2010 ला केलेली आहे व संबंधित प्रकरणाचा निपटारा झालेला आहे. सदर मोजणीचे दिवशी मोजणीअंती पूर्नमोजणी नकाशा व वहिवाट यामध्ये तफावत असल्यामुळे पोटहिस्सा कायम करता आला नाही व सिमांकन करुन दिले नाही हे तक्रारदाराचे म्हणणे खोटे आहे.
वरील सर्व बाबी लक्षात घेता, गैरअर्जदार यांनी तक्रारदाराचे मोजणीचे अर्जावर मोजणी पूर्ण करुन व सिमांकन करुन ‘क’ प्रत दिलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराचे तक्रारीत तथ्य दिसून येत नाही व त्यांचे सेवेत कुठलिही कमतरता नाही, म्हणुन सदरची तक्रार निकाली काढण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
गैरअर्जदार नं.3 यांना मंचातर्फे नोटीस बजाविण्यात आली, परंतू त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब मचासमक्ष दाखल केलेला नाही व आपला बचाव केला नाही.
// का र ण मि मां सा //
. प्रस्तूत प्रकरणातील एकंदरीत वस्तूस्थिती, दाखल दस्तऐवजे व युक्तीवाद पाहता या मंचाच्या असे निदर्शनास येते की, तक्रारदाराने त्याच्या मौजा खोडगाव येथील प.ह.नं.46, भूमापन क्र.79/1अ, आराजी 0.67, धारणा प्रकार भो.वर्ग—1 या शेताचे पोटहिस्सा मोजणीसाठी दिनांक 17/7/2008 रोजी गैरअर्जदार नं.1 यांचेकडे रुपये 2,500/- (कागदपत्र क्र.9) अदा केले होते. तसेच इतर दस्तऐवजांवरुन गैरअर्जदार यांनी सदर शेताची मोजणी दिनांक 20/5/2010 रोजी केल्याचे निदर्शनास येते. तसेच दिनांक 6/12/2010 रोजीचे पत्रावरुन, त्याचबरोबर तक्रारदारास मोजणी नकाशाची ‘क’ प्रत पाठविल्याचे दिसून येते व ही बाब तक्रारदाराने आपल्या तक्रारीत मान्य केलेली आहे. सदर मोजणी नकाशाच्या प्रतीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदर प्रकरणातील पूर्नमोजणी नकाशा व वहिवाट यामध्ये तफावत असल्यामुळे पोटहिस्सा कायम करता आला नाही अशी नोंद सदर नकाशामध्ये असल्याचे दिसून येते. तसेच गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिनांक 6/12/2010 रोजी पाठविलेल्या पत्रानुसार यास पुष्टी मिळते. त्यामुळे तक्रारदाराचे हे म्हणणे की, मोजणीची रक्कम अदा करुनही गैरअर्जदारांनी मोजणीबाबत कुठलिही कार्यवाही केली नाही, हे या मंचाला मान्य करता येणार नाही. त्याचबरोबर गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या परीपत्रकाचे अवलोकन करता, तसेच गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिनांक 6/12/2010 रोजी पाठविलेल्या पत्रावरुन असे दिसते की, प्रकरण तफावतीत असेल तर जमिनधारकाना आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख नागपूर यांचेकडे अर्ज करावयास पाहिजे होता. तक्रारदाराचे मते गैरअर्जदार नं.2 यांच्या सूचनेवरुन त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज गैरअर्जदार नं.1 यांचेकडे केला होता, परंतू त्यासंदर्भात कुठलिही कार्यवाही केली नाही आणि सदरची मोजणी देखील पूर्ण केली नाही. परंतू तक्रारदाराने गैरअर्जदार नं.1 यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज केल्याचा सुस्पष्ट पूरावा त्यांनी मंचासमक्ष सादर केलेला नाही. त्यांनी यासंदर्भात दाखल केलेले कागदपत्र क्र.11 व 17 वरुन देखील काहीही निष्पन्न होत नाही. त्यामुळे गैरअर्जदार नं.3 यांनी त्यांचेकडे अर्ज करुनही त्याबाबत कुठलिही कार्यवाही अथवा मोजणी केली नाही हे तक्रारदाराचे म्हणणे या मंचाला मान्य करता येणार नाही.
वरील सर्व बाबी लक्षात घेता, गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिलेल्या सेवेत कमतरता आहे असे दिसून येत नाही. परंतू तक्रारदाराने योग्य त्या कागदपत्रांसह संबंधित अधिका-याकडे अर्ज करावा व संबंधित अधिका-याने त्यावर योग्य ती कार्यवाही करावी असे या मंचाचे मत आहे. म्हणुन त्यांचेविरुध्द सदर तक्रार खारीज करणे योग्य होईल असेही मंचाचे मत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
-/// अं ती म आ दे श ///-
1) वरील निरीक्षणासह तक्रारदाराची तक्रार निकाली काढण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.