नि. 20 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 148/2010 नोंदणी तारीख – 4/6/2010 निकाल तारीख – 21/8/2010 निकाल कालावधी – 77 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री ज्ञानदेव माधवराव मुळीक मु.पो. सोनगाव, ता.जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री.डी.डब्ल्यू.देशपांडे) विरुध्द 1. मराठा सहकारी पतसंस्था लि.सातारा मराठा भवन, 506/10, प्लॉट नं.8, एस.टी.स्टँडमागे, सदरबझार, मु.पो.ता.जि. सातारा तर्फे जाबदार क्र.2 श्री नरेंद्र मोहनराव पाटील 2. श्री नरेंद्र मोहनराव पाटील, चेअरमन, मराठा भवन, 506/10, प्लॉट नं.8, एस.टी.स्टँडमागे, सदरबझार, मु.पो.ता.जि. सातारा 3. श्री बाळासाहेब गंगाराम जाधव, शाखाधिकारी मराठा सहकारी पतसंस्था लि.सातारा राजवाडा शाखा, जनावरांच्या सरकारी दवाखान्याजवळ, मु.पो.ता.जि.सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री विलासराव भोईटे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये दोन वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदरच्या ठेवींवरील व्याज अर्जदारचे बचत खात्यामध्ये जमा होत होते. सदरच्या मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली असता जाबदार यांनी सदरच्या रकमा अर्जदारचे बचत खात्यामध्ये जमा केल्या व त्यापैकी फक्त रु.30,000/- अर्जदारांना रोख दिली व उर्वरीत रक्कम देण्यास असमर्थतता दाखविली. सबब अर्जदार यांनी जाबदार यांना वकीलांचेमार्फत रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. सदरची नोटीस जाबदार यांना मिळाली. तथापि जाबदार यांनी नोटीशीला उत्तर दिले नाही अथवा अर्जदार यांची रक्कमही परत दिलेली नाही. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून बचत खात्यातील रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी एकूण रक्कम रु.31,930/- व त्यावरील व्याज, तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- ची मागणी केलेली आहे. 2. प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामी जाबदार क्र.1 ते 3 यांनी नि.12 ला लेखी म्हणणे व कैफियत दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी अर्जदारची रक्कम दर्शविण्यास असमर्थतता दर्शविलेली नाही. त्यांचे इच्छेनुसार अर्जदारची ठेवरक्कम त्यांचे बचत खात्यामध्ये जमा केलेली आहे. अर्जदार यांनी बचत खाते बंद करण्यासाठी कोणताही अर्ज जाबदार यांना दिलेला नाही. अर्जदार यांनी पूर्तता केलेस त्वरित बचत खात्याचे पैसे देण्यास जाबदार तयार आहेत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. अर्जदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. ते शपथपत्र पाहिले. अर्जदार यांनी नि.5 सोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच नि.19 चे म्हणणे पाहिले. जाबदार यांचे शपथपत्र नि.13 पाहिले. 4. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, अर्जदार यांनी बचत खाते बंद करण्यासाठी अर्ज दिल्यास त्यांचे खाते बंद करुन खात्यातील शिल्लक रक्कम अर्जदार यांना देण्यास आजही ते तयार आहेत. परंतु अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहिल्यास अर्जदार यांनी जाबदार यांना वकीलांचे मार्फत नोटीस पाठविली होती. सदरची नोटीस जाबदार यांना प्राप्त झाल्याच्या पोचपावत्या अर्जदार यांनी दाखल केल्या आहेत. सदरची नोटीस मिळालेनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना ते बचत खात्यातील रक्कम देण्यास तयार आहेत असे लेखी कळविणे आवश्यक होते. परंतु तसे कळविल्याबाबत जाबदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. जर अर्जदार यांना त्यांचे बचत खात्यातील रक्कम देण्यास जाबदार तयार होते, तर त्यांनी नोटीस मिळालेनंतर अर्जदार यांना त्याबाबत का कळविले नाही याबाबत कोणताही खुलासा जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये केलेला नाही. वरील सर्व कारणांचा विचार करता अर्जदार यांनी मागणी करुनही जाबदार यांनी अर्जदार यांना त्यांचे बचत खात्यातील रक्कम दिलेली नाही हे स्पष्ट दिसून येते. सबब जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देणेमध्ये त्रुटी केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. 5. अर्जदार यांनी नि.19 ला म्हणणे दाखल करुन त्यांना वादातील बचत खात्यातील रक्कम जाबदार यांनी दि. 29/7/2010 रोजी दिल्याचे मान्य केले आहे. परंतु सदरची रक्कम अर्जदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केल्यानंतर व सदरच्या तक्रारअर्जाच्या नोटीसा जाबदार यांना मिळालेनंतर जाबदार यांनी दिलेली आहे. त्यामुळे अर्जदार यांना वेळेत रक्कम न मिळाल्याबद्दल जो मनःस्ताप झाला त्याची भरपाई म्हणून रु.5,000/- व खर्चापोटी रु.2,000/- मिळावेत असे कथन केले आहे. अर्जदार यांनी जाबदार यांचेविरुध्दचा प्रस्तुतचा तक्रारअर्ज दि.4/6/2010 रोजी दाखल केला आहे व जाबदार यांनी अर्जदार यांना दि.29/7/2010 रोजी त्यांची बचत खात्यातील रक्कम अदा केलेली आहे. यावरुन तक्रारअर्ज दाखल केल्यानंतर जाबदार यांनी अर्जदार यांना त्यांची रक्कम दिलेली आहे हे स्पष्ट दिसून येते. वरील कारणांचा विचार होता जाबदार यांनी अर्जदार यांना वेळेवर रक्कम न दिल्याने अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल करावा लागलेला आहे हे दिसून येते. सबब अर्जदार हे जाबदार यांचेकडून मानसिक त्रासापोटी व प्रस्तुत तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. 6. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- द्यावेत. ब. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 500/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 21/8/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |