जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, भंडारा.
तक्रार दाखल दिनांकः 12/04/2016
आदेश पारित दिनांकः 10/11/2016
तक्रार क्रमांक. : 38/2016
तक्रारकर्ता : श्री ज्ञानेश्वर राजाराम दिपटे
वय – 41 वर्षे, धंदा – नोकरी,
रा. मोहाडी, ता.मोहाडी
जि. भंडारा.
-: विरुद्ध :-
विरुध्द पक्ष : 1) डी.आर.विश्वकर्मा,वाहक
महाराष्ट्र राज्य परिवहण मंडळ,तुमसर
ता.तुमसर जि.भंडारा
2) आगार व्यवस्थापक
मार्फत महाराष्ट्र राज्य परिवहण मंडळ,तुमसर ता.तुमसर जि.भंडारा
तक्रारकर्ता : स्वतः
वि.प.1 : स्वतः
वि.प.2 तर्फे : अॅड.विजय एस.रेहपाडे
गणपूर्ती : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष.
श्री. एच. एम. पटेरीया - सदस्य.
श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
-// आ दे श //-
(पारित दिनांक – 10 नोव्हेंबर 2016)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
- . तक्रारकर्ता ज्ञानेश्वर दिपटे यांनी दिनांक 15/1/2015 रोजी सकाळी 11 वाजुन 15 मिनीटांनी तुमसर आगाराची एसटी बस क्र.7068 मधुन मोहाडी ते वरठी असा प्रवास केला. सदर प्रवासाचे भाडे 13 रुपये होते. तक्रारकर्त्याकडे सुटे पैसे नसल्याने त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1, बस वाहक कु. डी.आर.विश्वकर्मा यांच्याकडे 100 रुपयाची एक नोट आणि सुटे 3 रुपये दिले. वाहकाने त्यावेळी सुटे पैसे नसल्याचे सांगुन वरठी येथे तक्रारकर्त्यास उतरतांना सुटे पैसे देण्याचे कबुल केले. वरठी स्थानक आल्यानंतर तक्रारकर्त्याने वाहकाकडे रुपये 90 ची मागणी केली असता त्यांनी पैसे परत न करता, तुम्ही सुटे पैसे सोबत ठेवावयास पाहिजे, प्रत्येकवेळी तुम्हाला सुटे पैसे दयावयाचे का? असे म्हणुन तुमसर आगारात येवून पैसे घेवून जा असे उध्दटपणे म्हणून तक्रारकर्त्याला 90 रुपये परत न करता वरठी स्थानकावर उतरवून दिले.
दुस-या दिवशी दिनांक 16 जाने 2015 रोजी तक्रारकर्ता विरुध्द पक्ष क्र.2, आगार व्यवस्थापक, तुमसर यांना भेटला आणि विरुध्द पक्ष क्र. 1 ने परत न केलेले रुपये 90 आणि मोहाडी ते तुमसर जाणे येण्यासाठी आलेल्या तिकीटाचा खर्च रुपये 26 दयावा म्हणुन मागणी केली. त्यावेळी आगार प्रमुख विरुध्द पक्ष क्र.2 यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांना आगारात 90 रुपये जमा केले आहेत ते अर्ज करुन घेवून जाण्याचे सांगितले. मात्र तक्रारकर्त्याच्या मागणीप्रमाणे मोहाडी ते तुमसर प्रवासाच्या खर्चाची रक्कम रुपये 26 देण्यास नकार दिल्याने तक्रारकर्त्याने आगारातून 90 रुपये घेतले नाही.
तक्रारकर्त्याने दिनांक 8/2/2015 रोजी पुन्हा विरुध्द पक्ष क्र.2 कडे लेखी स्वरुपात अर्ज देवून एकुण रुपये 210 ची मागणी केली. परंतु विरुध्द पक्ष क्र.2 यांनी सदर मागणीची पुर्तता केली नाही आणि आगारात जमा असलेले 90 रुपये फक्त तक्रारकर्त्याने घेवून जावे असे दिनांक 9/2/2015 रोजी तक्रारकर्त्याला लेखी कळविले. ग्राहकाला सुटे पैसे व सौजण्याची वागणूक देण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष क्र.1 ची आहे. मात्र तिने तक्रारकर्त्याला प्रवास संपल्यानंतर देणे असलेली रक्कम रुपये 90 परत केली नाही म्हणून सदर रक्कम मिळविण्यासाठी तक्रारकर्त्यास तुमसर येथे जावे लागले. त्याबाबतच्या खर्चाची रक्कम देण्यास विरुध्द पक्ष क्र.2 ने नकार दिला. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 ची सदरची कृती ही सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे म्हणुन तक्रारकर्त्याने खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास रुपये 210 जानेवारी 2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 18 % व्याजासह परत करण्याचा आदेश व्हावा.
2) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास मागणी केलेली खर्चाची रक्कम न दिल्याने झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 10,000/- नुकसान भरपाई आणि तक्रार खर्च रुपये 10,000/- देण्याचा आदेश व्हावा.
तक्रारकर्त्याने तक्रारीच्या पुष्ट्यर्थ दिनांक 15/1/2015 रोजी मोहाडी ते वरठी दरम्यान केलेल्या प्रवासाचे प्रिंटेड तिकीट, आगार प्रमुख, तुमसर यांना सादर केलेला दिनांक 16/1/2015 चा अर्ज, आगार व्यवस्थापक, तुमसर यांनी अर्जदारास दिलेले लेखी पत्र दिनांक 9/2/2015 इ. दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
- . वि.प.क्र.1 वाहक डी.आर.विश्वकर्मा यांनी दिनांक 20/5/2016 आणि विरुध्द पक्ष क्र.2 आगार व्यवस्थापक, तुमसर यांनी दिनांक 10/8/2016 रोजी लेखी जबाब दाखल करुन तक्रारीस सक्त विरोध केला आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांचे म्हणणे असे की दिनांक 15/1/2015 रोजी तक्रारकर्ता त्यांच्या बसमध्ये मोहाडी वरुन वरठी येथे जाण्यासाठी चढला आणि त्याने 100 रुपयाची नोट व 3 रुपये सुटे दिले. यावर विरुध्द पक्ष क्र.1 ने माझ्याकडे सुटे नाही, तुम्ही तिकीटाचे 13 रुपये दया, असे म्हटले असता तक्रारकर्त्याने सुटे होतील तेव्हा दया असे म्हणुन वाहनात बसला. वरठी स्थानकापर्यंत विरुध्द पक्ष क्र.1 कडे सुटे पैसे आले नाहीत. तेव्हा तक्रारकर्त्यास सुटे पैसे आणुन देण्यास सांगितले असता त्याने तसे न करता त्यांच्यासोबत भांडण केले. विरुध्द पक्ष क्र.1 कडे तक्रारकर्त्यास परत करण्यासाठी सुटे पैसे नसल्याने तिने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या नियमाप्रमाणे कामगिरी संपल्यानंतर त्याच दिवशी म्हणजेच दिनांक 15/1/2015 रोजी तक्रारकर्त्याची देणे राहिलेली रक्कम रुपये 90 आगारात जमा केली आहे. त्यांनी उध्दटपणाची भाषा वापरली आणि तक्रारकर्त्यास अपमानास्पदरित्या वरठी स्थानकावर उतरवून दिल्याचे नाकबूल केले आहे.
विरुध्द पक्ष क्र.2 ने देखील वरीलप्रमाणे घटनेचा सारांश नमुद केला आहे. त्यांचे पुढे असे म्हणणे असे की तक्रारकर्त्याने दिनांक 16/1/2015 रोजी आगार व्यवस्थापक विरुध्द पक्ष क्र.2 यांना पत्र देवून रक्कमेची मागणी केली तेव्हा त्यांस कळविण्यात आले की, तक्रारकर्त्याची रक्कम रुपये 90 आगारात रोकड विभागात जमा आहे ती घेवून जावी. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याच्या अर्जावर देखील लिहून दिले. परंतु अधिकचे पैसे उकळण्याच्या हेतूने तक्रारकर्त्याने सदरची रक्कम स्विकारण्यास इन्कार केला. तुमच्याकडून अधिकचे पैसे घेतल्याशिवाय राहणार नाही, तुम्हास पाहून घेईन अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दिनांक 9/2/2015 रोजी देखील तक्रारकर्त्यास पत्र दिले. परंतु तक्रारकर्ता पैसे घेवून गेला नाही आणि अधिकचे पैसे उकळण्याच्या हेतूने सदरची खोटी तक्रार दाखल केली आहे. अशाप्रकारे लोकांना धमकी देवून अधिकचे पैसे उकळण्याची तक्रारकर्त्याला सवय आहे. विरुध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्युनतापुर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापारपध्दतीचा अवलंब झाला नसल्याने सदरची तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.
- . उभय पक्षांच्या कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालिलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने न्यूनतापूर्ण व्यवहार केलेला आहे काय? – नाही.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहे काय? नाही.
3) अंतीम आदेश काय? तक्रार खारीज
कारणमिमांसा
- मुद्दा क्र.1 बाबत – सदरच्या प्रकरणात तक्रारकर्ता ज्ञानेश्वर दिपटे याने दिनांक 15/1/2015 रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान तुमसर आगाराची बस क्रमांक 7068 मध्ये मोहाडी ते भंडारा रोड(वरठी) असा प्रवास केला, हे उभय पक्षांना मान्य आहे. तसेच सदर प्रवासाचे भाडे रुपये 13 होते आणि तक्रारकर्त्याने बसच्या वाहक डी.आर.विश्वकर्मा यांच्याकडे बसच्या भाडयापोटी दयावयाच्या रक्कमेसाठी 100 रुपयाची एक नोट आणि सुटे पैसे 3 रुपये दिले होते हे देखील उभय पक्षांना मान्य आहे. बसचे वाहक विरुध्द पक्ष क्र.1 डी.आर.विश्वकर्मा यांच्याकडे तक्रारकर्त्यास परत करण्यासाठी 90 रुपये सुटे नसल्याने वरठी स्थानक आल्यावर तिने तक्रारकर्त्याला सुटे पैसे देण्याची मागणी करुन देखील त्याने न दिल्याने तक्रारकर्त्याला वरठी स्थानकावर परत करावयाची रक्कम रुपये 90 वाहक देवू शकली नाही. तिने तुमसर आगारातून परत करावयाची रक्कम रुपये 90 घेवून जावे असे तक्रारकर्त्यास सांगितले ही बाब देखील उभय पक्षांना कबुल आहे. सदर प्रवासाचे तिकीट तक्रारकर्त्याने दस्त क्र.1 वर दाखल केले आहे. त्यावर तिकीटाच्या मागच्या बाजुस विरुध्द पक्ष क्र.1 ने परत करावयाची रक्कम रुपये 90 लिहून दिली आहे.
दिनांक 16/1/2015 रोजी तक्रारकर्ता तुमसर आगारात विरुध्द पक्ष क्र.2 कडे गेला आणि विरुध्द पक्ष क्र.1 कडून परत घ्यावयाची रक्कम रुपये 90 तसेच पैसे परत घेण्यासाठी मोहाडी ते तुमसर प्रवासाचा येण्याजाण्याचा खर्च दयावा म्हणुन दस्त क्र.2 प्रमाणे अर्ज केला. त्यावर विरुध्द पक्ष क्र.2 ने तुमचे पैसे रोकड विभागात जमा आहेत, अर्ज करुन पैसे घेवून जावे असे लेखी लिहून दिले. परंतु तक्रारकर्त्याने तुमसर आगाराच्या रोकड विभागातून जमा असलेली रक्कम रुपये 90 परत घेतली नाही. त्यानंतर दिनांक 8/2/2015 रोजी तक्रारकर्त्याने दस्त क्र.3 प्रमाणे आगारात जमा असलेली रक्कम रुपये 90 आणि मोहाडी ते तुमसर जाण्यायेण्याचा खर्च मिळून रुपये 210 दयावी म्हणून विरुध्द पक्ष क्र.2 कडे अर्ज केला. विरुध्द पक्ष क्र.2 ने सदर पत्रास दिनांक 9/2/2015 रोजी उत्तर देवून वाहक डी.आर.विश्वकर्मा यांनी रोकड शाखेत 90 रुपये जमा केलेले आहेत ते घेवून जावे म्हणून विनंती केली तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या त्रासाबाबत दिलगिरी व्यक्त केली. परंतु तरीही तक्रारकर्त्याने आगारात जमा असलेली सदरची रक्कम रुपये 90 आगारातून नेली नाही.
तक्रारकर्त्याने 10 रुपयासाठी 100 रुपयाची नोट देवून विरुध्द पक्ष क्र.1 ला 90 रुपये सुटे परत मागितले. जर वाहकाकडे प्रवाशास देण्यासाठी सुटी रक्कम नसेलतर तिकीटावर लिहून देणे आणि प्रवास संपण्याचे स्थानकावर पैसे परत करणे ही वाहकाची जबाबदारी आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी लेखी जबाबात सांगितले की तक्रारकर्ता बस मधून वरठी स्थानकावर उतरला त्यावेळी त्याला सुटे पैसे देण्यास सांगितले परंतु त्याने दिले नाही. तिच्याकडे तक्रारकर्त्याला परत करण्यासाठी सुटी रक्कम रुपये 90 उपलब्ध नसल्याने तिने तक्रारकर्त्याला आगारात येवून रक्कम परत घेवून जावे असे सांगितले. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 ने तिची कामगिरी संपल्यानंतर तक्रारकर्त्यास देणे असलेली रक्कम रुपये 90 तुमसर आगारात जमा केली. तक्रारकर्त्याने दिनांक 16/1/2015 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 ची भेट घेतली असता त्यांनी देखील आगारात जमा असलेली सदरची रक्कम घेवून जाण्यास तक्रारकर्त्यास विनंती केली. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांची वरील कृती ही राज्य परिवहन मंडळाच्या नियमानुसार असल्याने त्याद्वारे त्यांच्याकडून सेवेत कोणताही न्युनतापुर्ण व्यवहार झालेला नाही. याउलट तक्रारकर्ता दिनांक 15/1/2015 रोजी तुमसर आगारात गेला असता विरुध्द पक्ष क्र.2 ने तक्रारकर्त्यास देणे असलेली रक्कम रुपये 90 परत नेण्यास सांगुनही तक्रारकर्त्याने ती नेली नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.2 कडे मोहाडी ते तुमसर जाण्यायेण्याच्या खर्चासह जमा रक्कमेची मागणी केली परंतु नियमानुसार जाण्यायेण्याचा खर्च देवू शकत नसल्याने आगारात जमा असलेली रक्कम रुपये 90 घेवून जाण्याची विरुध्द पक्ष क्र.2 ने केलेली विनंती करुन देखील तक्रारकर्त्याने ती मानली नाही. उपलब्ध दस्तऐवजावरुन विरुध्द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्यास देय असलेली रक्कम रुपये 90 तुमसर आगारात जमा केली असून ती घेवून जाण्यास विरुध्द पक्ष क्र.2 ने विनंती करुनही तक्रारकर्त्याने नेली नसल्याने विरुध्द पक्षाकडून ग्राहक सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार आणि सदरच्या तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही म्हणून मुद्दा क्र.1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र.2 व 3 बाबत – मुद्दा क्र.1 वरील निष्कर्षाप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 ची कार्यवाही ही राज्य परिवहन मंडळाच्या नियमाप्रमाणे असल्याने त्यावर ग्राहक असलेल्या तक्रारकर्त्याच्या सेवेत कोणताही न्युनतापुर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झालेला नाही म्हणून तक्रारकर्ता तक्रारीतील मागणीप्रमाणे कोणतीही दाद मिळण्यास पात्र नसल्याने मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
सदरच्या प्रकरणात विरुध्द पक्ष क्र.1 व 2 कडून सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार झालेला नाही तसेच तक्रारकर्त्याची रक्कम रुपये 90 ही विरुध्द पक्ष क्र.2 कडे जमा आहे आणि ती तक्रारकर्त्यास परत करण्याची त्यांनी यापुर्वीही तयारी दर्शविली आहे. म्हणुन विरुध्द पक्ष क्र.2 यांना निर्देशित करण्यात येते की त्यांनी आगारात जमा असलेली रक्कम रुपये 90 तक्रारकर्त्याने तक्रारीत दिलेल्या पत्त्यावर आदेशाची प्रत मिळाल्यापासून 15 दिवसांचे आंत पाठवावी आणि मनिऑर्डरची पावती हीच तक्रारकर्त्याकडून रक्कम मिळाल्याबाबतची पोच गृहित धरावी.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
- आ दे श -
- तक्रारकर्त्याची तक्रार खारीज.
- खर्च ज्याचा त्याने सहन करावा.
- आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य पुरवावी.
- प्रकरणाची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.