2. गैरअर्जदार यांचा ज्वेलरीचा व्यवसाय असून अर्जदाराने दि. 19/3/2018 रोजी गैरअर्जदार यांचेकडून 22 कॅरेट सोन्याचे, 26.100 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र व 2.710 ग्रॅम वजनाचे डोरले असे दागिने विकत घेतले. परंतु त्यावेळी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रतीग्रॅम रू.2500/-असूनही गैरअर्जदाराने प्रतीग्रॅम रू.3020/- किंमत लावून अर्जदाराकडून प्रतिग्रॅम रू.520/- या दराने एकूण रू.20,000/- अधिकचे वसूल केले आहेत. गैरअर्जदाराने अर्जदाराची आर्थीक फसवणूक करून अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे. सबब अर्जदाराने दि.23/4/2018 रोजी गैरअर्जदारांस पत्र देवून जास्तीच्या वसुल रकमेची मागणी केली, परंतु गैरअर्जदाराने सदर रक्कम परत न केल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्द मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि, अर्जदाराची आर्थीक फसवणूक केल्याबद्दल गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाईदाखल रु. 50,000/- त्यावर रक्कम प्राप्त होईपर्यंत व्याजासह मिळावी, तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई आणी तक्रार खर्च गैरअर्जदार यांनी अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली. 3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करून गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार यांनी मंचासमक्ष हजर होवून आपले लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे तक्रारीतील कथन नाकबुल करुन पुढे नमुद केले कि, अर्जदार दिनांक 19/3/2018 रोजी काळी पोत (मंगळसुत्र) विकत घेण्यासाठी त्यांचे प्रतिष्ठानात आला व त्याने 26.100 ग्रॅमचे मंगळसुत्र व 2.710 ग्रॅमचे डोरले असे दागिने त्यांनी पसंत केले. त्यावेळी सदर दागिने, 22 कॅरेट सोन्याचे असल्याचे तसेच त्याव्यतिरीक्त मंगळसुत्राच्या मजूरीचा दर रू.350/- प्रतिग्रॅम आणि डोरल्याचा मजूरीचा दर रू.400/- नेट असा लागेल हे गैरअर्जदाराने अर्जदारांस समजावून दिले आणी अर्जदाराच्या विनंतीवरून एकूण किंमत् किंमत रू.99,437/- होईल याचीही कल्पना दिली. अर्जदारांस सदर व्यवहार पटल्यानंतर अर्जदाराने त्यावेळी काहीही आक्षेप न घेता संपूर्ण रक्कम रू.99,437/- चुकते करून दागिने नेले. अर्जदाराला दागिन्याच्या गुणवत्ता व निर्मीतीबद्दल कोणतीही तक्रार नाही तर केवळ त्या दिवशी असलेल्या सोन्याच्या भावाबद्दल आहे. वास्तवीक सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर होणा-या व्यापारीक उलाढालींवर ठरत असतो व त्या भावात शेअरमार्केटप्रमाणे चढउतार होत असतात. अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे की खरेदीच्या दिवशी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रतीग्रॅम रू.2500/-असूनही गैरअर्जदाराने प्रतीग्रॅम रू.3020/- किंमत लावून अर्जदाराकडून प्रतिग्रॅम रू.520/- या दराने एकूण रू.20,000/- अधिकचे वसूल केले आहेत, व त्यामुळे ही बाब गैरअर्जदारांस अमान्य आहे. वास्तविकतः गैरअर्जदाराने दिनांक 19/3/2018 रोजी 22 कॅरेट सोन्याचे दागिने आर.बी.ज्वेलर्स मुंबई यांचेकडून रू.2997.84 प्रतिग्रॅम या दराने खरेदी केली व त्यामध्ये 3 टक्के वस्तुसेवा कर समाविष्ट नाही. वस्तुसेवाकर समाविष्ट केल्यानंतर सदर दर रू.3087.77 लागलेला आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदाराने अतिरीक्त रक्कम वसूल केली हा आक्षेप चुकीचा आहे. अर्जदाराला विकलेले दागिने हे उच्च प्रतीचे आहेत. मात्र अर्जदाराला ते नको असल्यास शासनाला जमा केलेल्या सेवाकराची 3 टक्के रक्कम रू.2896.24 वळती करून व दागिन्यांची शहानिशा करून दागिने परत घेवून रक्कम अर्जदाराला परत करण्यांस गैरअर्जदार तयार आहेत. सबब गैरअर्जदाराने कोणत्याही प्रकारे अर्जदाराची फसवणूक केलेली नाही तसेच अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नाही. सबब, तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. 4. अर्जदाराची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच अर्जदार व वि. प यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष 1. गैरअर्जदार यांनी अर्जदारांस त्रुटीपूर्ण सेवा पुरविल्याची वा अनुचीत व्यापार प्रथेचा अवलंब केल्याची बाब अर्जदार सिद्ध करतात काय ? नाही 2. आदेश काय ? तक्रार खारीज कारण मिमांसा मुद्दा क्र. 1 बाबत :- 5 अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दिनांक 19/3/2018 रोजी 22 कॅरेट शुध्दतेचे 26.100 ग्रॅमचे मंगळसुत्र व 2.710 ग्रॅमचे डोरले असे दागिने विकत घेतले असून सदर व्यवहाराबाबत गैरअर्जदाराने दिलेली पावती तक्रारीत दाखल केली आहे. शिवाय ही बाब गैरअर्जदाराने मान्य केलेली असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे ही बाब निर्विवाद आहे. मात्र खरेदीच्या वेळी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रतीग्रॅम रू.2500/-असूनही गैरअर्जदाराने प्रतीग्रॅम रू.3020/- किंमत लावून अर्जदाराकडून प्रतिग्रॅम रू.520/- या दराने एकूण रू.20,000/- अधिकचे वसूल केले व अर्जदाराची आर्थीक फसवणूक करून अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे असे अर्जदाराचे शपथपत्रावर म्हणणे आहे. यावरील उत्तरात शपथेवर नमूद केले की सोन्याचा भाव हा आंतरराष्ट्रीय स्तरावर होणा-या व्यापारीक उलाढालींवर ठरत असतो व त्या भावात शेअरमार्केटप्रमाणे चढउतार होत असतात व ते निर्धारीत करण्याचे अधिकार अर्जदार किंवा न्यायालयाला नाहीत. शिवाय सोन्याच्या किमतीव्यतिरीक्त मंगळसुत्राच्या मजूरीचा दर रू.350/- प्रतिग्रॅम आणि डोरल्याचा मजूरीचा दर रू.400/- नेट असा लागेल तसेच दागिन्यांची एकूण किंमत् रू.99,437/- होईल हे गैरअर्जदाराने अर्जदारांस समजावून दिले असूनही घडणावळीची रक्कम विचारात न घेता चुकीची तक्रार दाखल केली आहे. शिवाय सदर खरेदीच्या दिवशी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रतीग्रॅम रू.2500/- होता हे दर्शविणारा कोणताही पुरावा अर्जदाराने दाखल केलेला नाही. मात्र गैरअर्जदाराने दिनांक 19/3/2018 रोजी 22 कॅरेट सोन्याचे दागिने आर.बी.ज्वेलर्स मुंबई यांचेकडून रू.2997.84 प्रतिग्रॅम या दराने खरेदी केली व त्यामध्ये 3 टक्के वस्तुसेवा कर समाविष्ट केल्यानंतर सदर दर रू.3087.77 लागलेला आहे हे कागदोपत्री पुराव्यानिशी सिध्द केलेले आहे. सबब गैरअर्जदाराने अर्जदाराला अवाजवी जास्त किंमत आकारून दागिन्यांची विक्री केली ही बाब सिध्द करण्यांस अर्जदार असमर्थ ठरल्यामुळे गैरअर्जदाराने कोणत्याही प्रकारे अर्जदाराची फसवणूक केलेली नाही तसेच अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नाही या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. सबब प्रस्तूत तक्रारखारीज होण्यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क. 1 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 2 बाबत :- 6. मुद्दा क्र. 1 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.90/2018 खारीज करण्यात येते. (2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी . चंद्रपूर दिनांक – 31/12/2018 (श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |