::: आ दे श :::
( पारित दिनांक : 27/01/2015 )
मा. अध्यक्षा सौ.एस.एम.उंटवाले, यांचेनुसार :-
1) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 27 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर फीर्याद प्रकरणातील मजकूराचा, थोडक्यात आशय,
आढळून येतो, तो येणेप्रमाणे -
फीर्यादी यांनी वि. मंचात दाखल केलेली मुळ तक्रार क्र. 10/2012 मध्ये पारित केलेल्या दिनांक 18/06/2013 रोजीच्या आदेशाप्रमाणे गैरअर्जदार यांनी पालन केलेले नाही. गैरअर्जदाराने दिलेला हिशोब पूर्णपणे खोटा असल्याचे तसेच फीर्यादीमध्ये विवरण दिल्याप्रमाणे एकूण रुपये 6,239/- गैरअर्जदाराकडून घेणे असल्याचे अर्जदाराचे कथन आहे. त्यामुळे गैरअर्जदारास कलम-27 प्रमाणे 10,000/- रुपयाचा दंड व तीन महिन्यांची सजा ठोठवावी व अर्जदारास खर्च मिळावा अशी विनंती अर्जदार यांनी प्रस्तुत फीर्यादीच्या शेवटी केलेली आहे.
अर्जदार यांनी सदर फीर्याद शपथेवर दाखल केली.
2) गैरअर्जदार वीज वितरण कंपनीचे ऊत्तर -
गैरअर्जदार यांनी सदर फीर्याद/दरखास्त चे अनुषंगाने, त्यांचे लेखी ऊत्तर ( निशाणी-16 प्रमाणे )प्रकरणात सादर केले आहे. त्यामध्ये अर्जदाराच्या खाते ऊता-याचे माहे जानेवारी-2013 ते सप्टेंबर-2013 या कालावधीचे विवरण दर्शविलेले आहे. अर्जदारास एकूण रुपये 3,100/- व त्यावरील व्याज रुपये 100/- अशी रुपये 3,200/- ची वजावट लेजरशिटमध्ये मार्च 2012 च्या खाते उता-यात देण्यांत आलेली आहे आणि ही बाब आदेशामध्ये मंचाने विचारात घेतलेली आहे. तसेच मंचाचे आदेशाप्रमाणे रुपये 1,290/- तसेच रुपये 2,000/- खर्चाचे व नुकसान भरपाईचे व इतर व्याजापोटी धरुन एकूण रुपये 3,340/- ची वजावट ऑगष्ट 2013 चे बिलामध्ये केली. त्यामुळे मंचाचे आदेशाचे पालन मुदतीमध्ये केले आहे. अशा परिस्थितीमध्ये अर्जदाराने दाखल केलेली दरखास्त ही कपोलकल्पीत असुन ती खर्चासह खारिज करण्यांत यावी. आणि वस्तुस्थितीची माहिती दिल्यानंतरही अर्जदाराने, गैरअर्जदारा विरुध्द खोटी तक्रार दाखल केल्यामुळे त्यांचेविरुध्द कार्यवाही करण्यात यावी.
३) कारणे व निष्कर्ष ::
तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम-27 अन्वये दाखल करुन असे कथन केले आहे की, विरुध्द पक्षाने तक्रार क्र. 10/2012 मधील मंचाचा निर्णय दिनांक 18/06/2013 च्या आदेशाचा भंग केलेला आहे. सदर फीर्याद शपथेवर दाखल केली असून त्यासोबत दस्तऐवज पुरावे म्हणून जोडलेले आहेत. तसेच स्वत:चा पुरावा देखील दिलेला आहे. सदर फीर्यादीची दखल घेत मंचाने गैरअर्जदारा विरुध्द ‘ इशू प्रोसेस ’ चा आदेश जारी केला होता. तसेच त्या नंतर सदर प्रकरणात गैरअर्जदारांना गुन्हयाचे पर्टीकुलर वाचून दाखवून, त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले आहे. या प्रकरणात गैरअर्जदाराने त्यांना गुन्हा कबूल नाही असे सांगितल्यामुळे, तक्रार मंचाने पूर्ण तपासली. गैरअर्जदाराने दाखल केलेले बचावाचे कथन व दस्तऐवज मंचाने काळजीपूर्वक तपासले.
तक्रारकर्त्याची मुळ तक्रार क्र. 10/2012 मध्ये दिनांक 18/06/2013 रोजी या मंचाचा खालीलप्रमाणे आदेश पारित झालेला आहे.
१) विरुध्द पक्ष क्र.१ - वीज वितरण कंपनीने तक्रारकर्त्याला माहे ऑक्टोबर-२०११ ते ऑक्टोबर-२०१२ चे वीज देयक खाते उता-यात तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.१ - वीज वितरण कंपनीकडे दिनांक १२/११/२०११ चे १,४४०/- रुपये, दिनांक ०५/०१/२०१२ चे १,७१०/- रुपये, दिनांक ०३/०७/२०१२ चे १,२९०/- रुपये व दिनांक ३१/०८/२०१२ चे ९५०/- रुपये एकूण ५,३९०/- रुपये रक्कम समाविष्ट करावी. त्यानंतर उपरोक्त कालावधीमध्ये तक्रारकर्त्या कडून जास्तीची जमा करुन घेतलेल्या रक्कमेबाबत सविस्तर हिशोब खाते उतारा तपासुन विरुध्द पक्ष क्र.१ ने तक्रारकर्त्याला द्यावा.
२) ऑक्टोबर-२०११ ते ऑक्टोबर-२०१२ या कालावधीसाठी विरुध्द पक्ष क्र. १ ने तक्रारकर्त्याला व्याजाची आकारणी करु नये. विरुध्द पक्ष क्र. १ ने तक्रारकर्त्या कडून विज देयकाचे रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा करुन घेतलेली असल्यास तक्रारकर्त्याला यापुढे देण्यात येणा-या सुधारीत विज देयकाचे रकमेत समाविष्ट करावी. व यापुढे विरुध्द पक्ष क्र. १ ने तक्रारकर्त्याला नियमीतरित्या विज देयक भरण्याचे अंतिम दिनांकापूर्वी १५ दिवस अगोदर न चुकता द्यावे.
३) विरुध्द पक्ष क्र. १ ने तक्रारकर्त्याला गैरसोय, शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई एकत्रित १,०००/- रुपये व सदर तक्रार प्रकरणाचा खर्च १,०००/- रुपये एकूण २,०००/- रुपये द्यावे किंवा यापुढील तक्रारकर्त्यास द्यावयाचे सुधारीत वीज देयकाचे रकमेत समाविष्ट करावे.
४) उपरोक्त निर्देशाचे पालन विरुध्द पक्ष क्र.१ ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसाचे आत करावे.
५) विरुध्द पक्ष क्र. २ ते ४ यांचेविरुध्दची तक्रार खारीज करण्यांत येते.
६) सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्याव्या.
मंचाच्या या आदेशानुसार गैरअर्जदाराने त्याची पूर्तता केली आहे की नाही ? हे तपासणे गरजेचे आहे, असे मंचाचे मत आहे व गैरअर्जदाराने दाखल केलेले दस्तऐवज व त्याबद्दलची तक्रारकर्त्याने त्याच्या उलट तपासणीत दिलेली कबूली यावरुन असे दिसते की, गैरअर्जदाराने या मंचाच्या आदेशाप्रमाणे माहे ऑक्टोंबर 2011 ते ऑक्टोंबर 2012 पर्यंतचे विजेचे बील हे कोणत्याही व्याजाची आकारणी न करता सुधारुन दिलेले आहे. तसेच या कालावधीतील वीज देयकात तक्रारकर्त्याने भरलेली व अंतिम आदेशातील अनुक्रमांक 1 मधील रक्कम समाविष्ट केलेली आहे. तसेच या कालावधीमध्ये तक्रारकर्त्याकडून जास्तीची जमा करुन घेतलेल्या रक्कमेचा ही सविस्तर हिशोब निशाणी-16 मध्ये गैरअर्जदाराने दाखल केलेला आहे. तक्रारकर्त्याने त्याच्या उलट तपासणी मध्ये हे देखील कबूल केले आहे की, या मंचाच्या अंतिम आदेशातील अनुक्रमांक 3 मधील नुकसान भरपाई पोटीची रक्कम तक्रारकर्त्याला प्राप्त झाली आहे. तसेच तक्रारकर्त्याने आदेशाच्या पुर्ततेबाबत त्यांच्या उलट तपासणीत अशी देखील कबूली दिलेली आहे की, ‘‘ मंचाच्या आदेशाप्रमाणे पूर्ण रक्कमेचे समायोजन केल्यानंतर सप्टेंबर 2013 चे बिलामध्ये रुपये 546.83 पैसे बाकी आहेत, हे मला कबूल आहे ’’. अशाप्रकारे तक्रारकर्त्याची उलट तपासणी निशाणी-21 तपासली असता, यावरुनही स्पष्टपणे दिसून येते की, गैरअर्जदाराने मुळ तक्रार क्र. 10/2012 मधील या मंचाचा आदेश दिनांक 18/06/2013 चे पालन पूर्णपणे केलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची ही फीर्याद खारिज करणे योग्य राहील,हया निष्कर्षाप्रत मंच आले आहे. सबब अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अंतिम आदेश
1) तक्रारकर्त्याची फीर्याद खारिज करण्यांत येते.
2) न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
3) उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.