(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौ. जागीरदार, सदस्या) (पारित दिनांक – 27 फेबु्वारी, 2020) 1. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारकर्त्याची संक्षिप्त तक्रार अशी आहे की, त्याने विरुध्द पक्ष क्रं. 2 कंपनी यांनी उत्पादीत केलेला मोबाईल मायक्रोमॅक्स ए-74 ज्याचा मॉडेल क्र. IMEI No. 911331600892209 & BAT No. V00329130 8340033824 रुपये 8,000/- एवढया किंमतीत विरुध्द पक्ष क्रं.3 यांचेकडून तक्रारकर्त्याने दिनांक 20/11/2013 रोजी खरेदी केला. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्द पक्ष क्रं. 3 हे विक्रेता आहेत. विरुध्द पक्ष क्र. 4 हे विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 चे अधिकृत केअर सर्व्हीस सेंटरचे व मोबाईल दुरुस्त करण्याचे संचालक आहेत. तक्रारकर्त्याने सदर मोबाईल खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी मोबाईलचा Display खराब झाल्यामुळे व वारंटी कालावधीत असल्यामुळे माहे ऑक्टोंबर 2014 ला दुरुस्ती करण्याकरीता विरुध्द पक्ष क्रं. 4 यांचेकडे दिला. विरुध्द पक्ष क्रं. 4 यांचेकडून तक्रारकर्त्याला दुस-या प्रकारची बॅटरी माहे एप्रिल 2015 मध्ये देण्यात आली व त्यासोबत खरेदी केलेला मोबाईल देण्यात आल्यानंतर सदरहु मोबाईल दुस-याच दिवशी बंद पडल्यामुळे सदर मोबाईल पुन्हा दिनांक 15/09/2015 रोजी विरुध्द पक्ष क्रं. 4 यांचे सर्व्हीस सेटर मध्ये देण्यात आला. तक्रारकर्त्याने दिनांक 15/04/2015 पासून दुरुस्ती करण्याकरीता दिलेला मोबाईल तक्रारकर्त्याने खुप वेळा मोबाईल दुरुस्ती करण्याविषयी विचारणा केली व प्रत्येक्ष भेट घेवून सुध्दा तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्ती करुन दिला नाही वा सदर मोबाईल परत सुध्दा दिलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला प्रचंड आर्थिक, मानसिक शारीरीक व कार्यालयीन कामकाजात वेळोवेळी व्यत्यय आले व त्यांचे अतोनात नुकसान झाले. विरुध्द पक्ष क्रं. 4 हे त्यांचे सर्व्हीस सेंटरच्या दिलेल्या पत्त्यावर राहत नाही. त्यांनी त्यांची सर्व्हीस सेटर कुठे नेली किंवा बंद केली याबाबतचा सोध घेवूनही पत्ता लागला नाही. विरुध्द पक्ष क्रं. 4 याना पाठविलेला नोटीस परत आलेला आहे. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी तक्रारकर्त्यास दुसरा नवीन मोबाईल देण्याचे कबुल केले, परंतु दुसरा मोबाईल आज देतो, उद्या देतो असे फोनद्वारे सांगितले, परंतु आजतागायत तक्रारकर्त्यास दुसरा नवीन मोबाईल दिलेला नाही. तक्रारकर्त्यास विरुध्द पक्षाकडून कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तक्रारकर्त्याने सेवेत न्युनता व निष्काळजीपणा होत असल्याबाबत कायदेशीर नोटीस आपल्या वकीलांमार्फत दिनांक 30/10/2015 रोजी विरुध्दपक्ष क्रं. 1 ते 4 यांना पाठविली. परंतु विरुध्दपक्षाला नोटीस मिळूनही विरुध्द पक्षाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने त्याला दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे त्यास शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याने त्याने विरुध्दपक्षां विरुध्द प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचासमक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षांविरुध्द खालील मागण्या केल्यात- - विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी त्यांचे कंपनीचा सदोष मोबाईल विरुध्द पक्ष क्रं. 3 च्या मोबाईल शॉपीला पुरवठा करुन सदरचा मोबाईल तक्रारकर्त्यास विकल्यामुळे सदर मोबाईल वॉरंटी कालावधीमध्ये दोष निर्माण झाल्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 चे सांगण्यावरुन विरुध्द पक्ष क्रं. 4 च्या सर्व्हीस सेंटरमध्ये दुरुस्तीकरीता दिल्यानंतर त्यांनी मोबाईल दुरुस्ती वा परत न केल्यामुळे तक्रारकर्त्यास दुसरा नवीन मोबाईल देण्याचा आदेश व्हावा.
-
- तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी सदोष मोबाईल विकल्यामुळे व त्यांनी सांगितलेल्या विरुध्द पक्ष क्रं. 4 च्या सर्व्हीस सेंटरमध्ये दुरुस्तीकरीता दिल्यानंतर त्यांनी मोबाईल दुरुस्ती वा परत न केल्यामुळे तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थिक आणि कार्यालयीन त्रासाबद्दल रुपये 25,000/- विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांचेकडून वसूल करण्याचा आदेश व्हावा.
-
- सदर प्रकरण दाखल करण्यास तक्रारकर्त्यास आलेला खर्च रुपये 10,000/- विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांचेकडून संयुक्तरित्या वसूल करण्याचा आदेश व्हावा.
-
- विद्यमान मंचास योग्य वाटेल अशी इतर दाद तक्रारकर्त्याचे पश्चात देण्याचा आदेश व्हावा.
02) मंचाद्वारे पाठविलेली नोटीस विरुध्द पक्ष क्रं. 2 व 3 यांना पृष्ठ क्रं. 28 व 32 नुसार प्राप्त होऊनही मंचासमक्ष हजर न झाल्याने तसेच त्यांनी आपले म्हणणे सादर न केल्याने विरुध्द पक्ष क्रं. 2 व 3 यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक 29/08/2018 रोजी पारीत करण्यांत आला. 03) विरुध्द पक्ष क्रं. 1 व 4 यांचे विरुध्द सदर प्रकरण खारीज करण्यात यावा अशी पुरसिस तक्रारकर्त्याच्या वकीलांनी पृष्ठ क्रं. 50 वर दाखल करुन त्यांचेविरुध्द सदर तक्रार खारीज करण्यात यावे असे नमुद केले. सदर पुरसिसच्या अनुषंगाने मंचाने दिनांक 24/01/2020 रोजी विरुध्द पक्ष क्रं. 1 व 4 यांचेविरुध्द प्रकरण खरीज करण्याचा आदेश पारीत केला. 04) सदर प्रकरणांत तक्रारकर्त्याने तक्रारी बरोबर दस्ताऐवज एकूण 01 ते 09 दाखल केलेले असून त्यात प्रामुख्याने मोबाईल खरेदीचे बील, मोबाईल दुरुस्तीकरीता दिल्याची पावती, विरुध्दपक्षाला वकीलामार्फत रजिस्टर पोस्टाने पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत व पोचपावत्या, वि.प. यांचेकडून परत आलेली नोटीस, अशा दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने पान क्रं-51 ते 53 वर शपथेवरील पुरावा व पान क्रं. 54 ते 56 वर लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. 05) सदर प्रकरणांत विरुध्द पक्ष क्रं. 2 व 3 यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक 29/08/2018 रोजी पारीत झालेला आहे व विरुध्द पक्ष क्रं. 1 व 4 यांचेविरुध्द तक्रार खारीज करण्याचा आदेश दिनांक 24/01/2020 रोजी पारीत झालेला असल्याने तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज, तक्रारकर्त्याचा शपथेवरील पुरावा लेखी युक्तिवाद व तक्रारकर्त्याचे वकील श्री. सुधीर मेश्राम यांचा मौखिक युक्तिवाद ऐकण्यात आला यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे देण्यात येतो- ::निष्कर्ष:: 06) तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार व संपूर्ण दस्ताऐवजांचे मंचाद्वारे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्याने पृष्ठ क्रमांक 11 वर मोबाईल खरेदीच्या बीलाची प्रत दाखल केली आहे यावरुन तक्रारकर्त्याने मोबाईल खरेदी केला होता हे सिध्द होते त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षचा ग्राहक आहे. 07) तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार त्याने वि. प. क्रं. 3 यांचेकडून खरेदी केलेला मोबाईल काही दिवसांनी मोबाईलचा Display खराब झाल्यामुळे बंद पडला. सदर मोबाईल वॉरन्टी कालावधीत असल्यामुळे तक्रारकर्त्याने माहे ऑक्टोबर 2014 मध्ये वि.प. क्रं. 4 यांचेकडे दुरुस्ती करण्याकरीता दिला, विरुध्द पक्ष क्रं. 4 यांनी तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्ती करुन दिला नाही. या संदर्भात तक्रारकर्त्याने पृष्ठ क्रं. 13 वर पावती दाखल केलेली आहे. सदर पावतीचे अवलोकन केले असता विरुध्द पक्ष क्रं. 4 यांचा पत्ता दिनांक 15/04/2015 नमुद आहे. तसेच Problem Reported – 5301 CHARGING/ BATTERY NO CHARGING असे नमुद आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत विरुध्द पक्ष क्रं. 4 यांचेकडून आजतागायत त्याचा मोबाईल दुरुस्त करुन परत मिळाला नाही असे कथन केलेले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे वारंवार चौकशी केली असता त्याला समाधानकारक उत्तरे मिळाले नाही. त्याचप्रमाणे विरुध्द पक्ष क्रं. 2 व 3 यांना तक्रारकर्त्याने नोटीस पाठवून सुध्दा विरुध्द पक्षाने मंचासमक्ष हजर होऊन तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील कथन खोडून काढले नाही. त्याचप्रमाणे विरुध्द पक्ष क्रं. 1 व 4 यांचेविरुध्द प्रकरण चालवावयाचे नाही अशी पुरसिस तक्रारकर्त्याने दाखल केल्याने त्यांचेविरुध्द दिनांक 24/01/2020 रोजी प्रकरण खारीज करण्याचा आदेश पारीत करण्यात आला. त्यामुळे मंचास विरुध्द पक्ष क्रं. 1 व 4 यांचेविरुध्द कुठलाही आदेश पारीत करता येणार नाही. 08) विरुध्द पक्ष क्रं. 4 यांनी आजतागायत तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्तीकरुन दिलेला नाही. विरुध्द पक्ष क्रं. 4 हे विरुध्द पक्ष क्रं. 2 कंपनी यांचे अधिकृत सर्व्हिस सेंटर असल्याने विरुध्द पक्ष क्रं. 4 यांचे कृतीस विरुध्द पक्ष क्रं. 2 हे पुर्णपणे जबाबदार आहेत. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी दोषपुर्ण मोबाईलची विक्री केल्यामुळेच सदर मोबाईल मध्ये दोष निर्माण झाला. म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता मायक्रोमॅक्स ए-74 या मॉडेलची किंमत रुपये 7,850/- विरुध्द पक्ष क्रं. 2 यांचेकडून मिळण्यास पात्र आहे. विरुध्द पक्ष क्रं. 3 विक्रेता यांनी तक्रारकर्त्याचा मोबाईल समस्येचे निराकरण करण्यास टाळाटाळ केल्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 3 सुध्दा तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई जबाबदार आहे. विरुध्द पक्ष क्रं. 2 व 3 यांनी केलेल्या सेवेतील त्रृटीमुळे तक्रारकर्त्याला निश्चितच शारीरीक व मानसिक त्रास झाला आणि मंचात तक्रार दाखल करावी लागली, त्यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल तसेच तक्रारीचा खर्च विरुध्दपक्ष क्रं. 2 व 3 यांचेकडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 4 यांचेविरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 09) उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. ::आदेश:: (01) तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्द पक्ष क्रं. 2 व 3 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. (02) विरुध्दपक्ष क्रं. 2 यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याचा मायक्रोमॅक्स ए-74 या मॉडेलची किंमत रुपये 7,850/- तक्रारकर्त्याला द्यावी. (03) विरुध्दपक्ष क्रं. 2 व 3 यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-3000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) संयुक्तीक व वैयक्तिकरित्या तक्रारकर्त्याला द्यावेत. (04) विरुध्द पक्ष क्रं. 1 व 4 यांचेविरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. (05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं. 2 यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. अन्यथा वर नमुद मुद्या क्रं. 2 नुसार आदेशीत रकमेवर 09% द.सा.द.शे. दंडनीय व्याजासह रक्कम देण्यास जबाबदार राहील. (06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात. (07) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात. |